मंगळवार, २ नोव्हेंबर, २०२१

दिवाळीच्या शुभेच्छा!

 दिवाळीच्या शुभेच्छा!

प्रभू रामचंद्र रावणाचा वध करून अयोध्येला परतले. १२ वर्षाचे तप संपवून पहिल्यांदा प्रभू रामचंद्र सीतामाता, लक्ष्मण आणि पवनसुत हनुमानासोबत जेव्हा अयोध्येत आले, तेव्हा अयोध्यावासी जनतेने त्यांचे दिवाळी साजरी करून स्वागत केले. तेव्हापासून हा सण मोठया उत्साहाने साजरा करण्यात येतो. 

दिवाळी हा प्रकाश, आनंद आणि प्रेरणेचा सण आहे. जीवनातील सर्व अडचणींवर मात करण्याचा हा उत्सव आहे. भारतीय अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. हंगामाच्या शेवटी, लोकांना कुटुंब आणि मित्रांसाठी नवीन कपडे, भेटवस्तू खरेदी करण्यासाठी खर्च करण्यासाठी पैसे मिळालेले असतात.  कार, ​​बाईक, दागिने आणि घरे यासारख्या मोठ्या वस्तू खरेदी करण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधीही त्यांना मिळते. त्यामुळे दिवाळी साजरी करणे, अर्थव्यवस्थेला गती देणे, इतरांच्या जीवनात काही बदल घडवून आणणे हा मोठा उद्देश हा सण साजरा करण्याचा आहे. दिवाळी हे जीवनातील छोट्या-छोट्या गोष्टींतील यश साजरे करण्याचे रूपकही आहे. श्रीमंतांपासून गरीबांपर्यंत सर्वच दिवाळीचा आनंद लुटतात. दिवाळीत प्रत्येकाच्या डोळ्यात एक प्रकारचे स्वप्न आणि मनात उत्साह असतो. लहान मातीचे दिवे, आकाशकंदील आणि निरनिराळ्या सजावटीच्या वस्तूंनी आपली घरे सजवली जातात. फराळाची, गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. फटाके आणि रोषणाई करून हा सण उत्साहाने साजरा केल्या जातो. 
धनश्रीने बनवलेला इको फ्रेंडली आकाशकंदील

या दिवसात लोक कुटुंबासाठी वेळ काढतात, एकत्र येतात आणि मजा करतात. दिवाळीचा उद्देश आत्मज्ञानाचा  प्रकाश पसरवण्यात आहे. दिवाळी आपल्याला शत्रुत्वाचा मार्ग सोडून मैत्रीचा अवलंब करण्यास शिकवते. शहरी जीवनाच्या गजबजाटात, ही एक वेळ आहे जेव्हा लोक एकत्र काही दर्जेदार वेळ घालवण्यासाठी एकत्र येतात.

दिवाळी म्हणजे अंतर्मुख होण्याचा आणि आपल्या अंतःकरणात आणि मनात ज्ञान आणि सत्याचे दिवे प्रज्वलित करण्याचा उत्सव आहे. आपल्या मनातील अंधार आणि अज्ञानाच्या शक्तींना दूर करण्याचा समारंभ आहे. हे करत असताना, इतरांना चांगुलपणाला प्रकाश देण्याचा उद्देश आहे. देवी लक्ष्मी, संपन्नेतची देवता आहे. दिवाळीच्या काळात आपण लक्ष्मीमातेला संपन्नता, करुणा, क्षमा आणि प्रेम-दया यासारख्या आध्यात्मिक संपत्ती (समृद्धीसह) जोपासण्यासाठीचा आशीर्वाद मागतो.  

गेल्या वर्षभरातील आपले विचार, शब्द आणि कृती यावर चिंतन आणि मूल्यमापन करण्याची ही वेळ आहे. आपले पूर्वग्रह, नकारात्मक वागणूक आणि वाईट सवयी मान्य करण्याची आणि चांगल्या प्रकारे समजून घेण्याची ही वेळ आहे, जेणेकरून आपण स्वतःला बदलण्याची प्रक्रिया सुरू करू शकू. आपण स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल अधिक प्रेमळ, दयाळू, आदरणीय कसे होऊ शकतो हे शोधण्याची ही वेळ आहे. सर्व संपत्ती, मग ती भौतिक असो वा आध्यात्मिक, कमनशिबी लोकांसोबत शेअर केली करण्याची बुद्धीही लक्ष्मीमाता देते.  

या वर्षी, आपण कोरोनाशी लढत आहोत. ही महामारी आपल्या सर्वांसाठीच एक मोठी शिकवण आहे. कोविड 19 पासून संरक्षण करण्यासाठी आरोग्य आणि सुरक्षिततेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याची आणि काळजी घेण्याची ही वेळ आहे. आता वेळ आली आहे, ती परत बाउन्सबँक होण्याची. 

दीपोत्सवाच्या या शुभ सणाच्या दिवशी, आपले जीवन आनंदी, समृद्ध आणि आरोग्यदायी जावो ह्या शुभेच्छा.


विनोद, धनश्री आणि अथर्व बिडवाईक

(विनोद बिडवाईक ह्यांची सर्व पुस्तके फ्लिपकार्ट आणि बुकगंगा वर उपलब्ध आहेत. इंग्रजी मध्ये लिहिली पुस्तके किंडल फॉरमॅट मध्ये ऍमेझॉन आणि पोथी.कॉम वर प्रिंटेड कॉपीज  उपलब्ध आहेत.) 


रविवार, ५ सप्टेंबर, २०२१

माझे गुरु

माझी शाळा ही माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे. माझी जडणघडण झाली ती माझ्या शाळेत. तुळशीरामजी मडके विद्यालय आणि त्याआधीची जिल्हा परिषद शाळा माझ्या अजूनही आठवणीत आहेत. त्यांचा चेहरामोहरा बदलला असेल. मी सुदैवी आहे असे म्हणावे लागेल कि मला चांगले शिक्षक मिळाले. मी शाळेत हुशार होतो. दरवर्षी पहिला नंबर कधी सोडला नाही. पण सर्वात महत्वाचे म्हणजे माझे शिक्षक, ते खऱ्या अर्थाने गुरु होते. चौथी आणि सातवी मध्ये मी स्कॉलरशिपच्या परीक्षा दिल्या होत्या आणि चांगल्या नंबरने त्या परीक्षांमध्ये उत्तीर्णही झालो होतो. त्यावेळेचे शिक्षक खरंच निरपेक्ष भावनेने काम करीत असताना, परिस्थिती तशी कोणाचीही चांगली नसायची. कित्येक शिक्षकांच्या घरची मंडळी शेतामध्ये पेरणी अथवा पीक काढावयाच्या वेळेस दुसऱ्यांच्या शेतात काम करायची. त्याची कोणालाही लाज वाटत नसे. मला वाटते त्या वेळच्या शिक्षकांवर जरा जास्तच अन्याय झाला असावा. 

चौथीपर्यंत आमच्या प्रायमरी शाळेचे मुख्याध्यापक होते बोबडे सर. त्यांची मुले आणि आम्ही एकत्र शिकलो. कशाचीही अपेक्षा न करता बोबडे गुरुजींनी माझी स्कॉलरशिप ची तयारी करून घेतली. रोज संध्याकाळी सात ते नऊ पर्यंत कोणतीही फी न घेता गुरुजींनी आम्हाला शिकवले. त्यांचा सर्वात मोठा मुलगा आता मोठ्या पदावर आहे. पण दुर्दैवाने इतर तीन मुले फार शिकलेले नाहीत. गुरुजी मुख्याध्यापक तर होतेच पण गावातील पोस्टाचे पोस्टमास्तरही होते, त्यामुळे गावातील प्रत्येक घरांसोबत त्यांचा या ना त्या कारणाने संबंध यायचा. पांढरा सदरा, पांढरा पायजमा आणि खांद्यावर पांढरे उपरणे असा त्यांचा पेहराव असायचा. गावातील प्रत्येक मुलगा त्यांच्या तालमीतून पुढे गेलेला आहे. 

माझ्याकडे त्यांचे विशेष लक्ष असायचे. त्यामुळे शाळेत मला फारशा उचापति करता येत नसे. त्यांचा सर्वात लहान मुलगा आणि मी एकाच वर्गात होतो. आमची दोघांची छान मैत्री होती, पण आमच्यात कधी कधी भांडणेही झालेली आहेत. गुरुजी त्यांच्या घरी नेहमी माझे नाव काढायचे, माझे उदाहरण द्यायचे, म्हणून त्याचा माझ्यावर विशेष राग असायचा.

मी चौथीतुन पुढे हायस्कूलमध्ये गेलो. गजाननही माझ्या सोबत होता. पुढे गुरुजींनी कुटुंबियांसोबत गाव सोडले. त्यानंतर माझा त्यांचा संबंध संपला, पण बोबडे गुरुजी अजूनही मला आठवतात. दुपारी शाळेमध्ये सर्व शिक्षक स्वतःसाठी चहा बनवायचे, त्यासाठी दूध आणायला ते कोणाला तरी पाठवत असत. तसेच गावातील प्रत्येक मुलांनी शिकून पुढे जावे अशी त्यांची तळमळ असायची, पण दुर्दैवाने गावातील वातावरण पोषक असे नव्हतेच. शिवाय गुरुजी किती प्रयत्न करणार? बोबडे गुरुजी सारखे शिक्षक मला नाही वाटत आता असतील.

आमचे वर्गशिक्षक होते खाटकडे गुरुजी. ते दुसऱ्या गावात राहात असत. दररोज सायकलवरून शाळेत येत असत आणि कधीही रजा घेत नसत. गुरुजी वेळेच्या बाबतीत खूप पक्के होते. त्याचा आवडीचा विषय होता गणित. त्यावेळेस एक शिक्षक सर्व विषय शिकवत असत. 

त्यांचा आवडीचा विषय गणित असल्यामुळे ते मनात येईल तेव्हा गणित शिकवत असत. मराठी, इतिहास, भूगोल हे विषय त्यांचा मूड झाला तर शिकवत असत. गणित हा विषय मला मुळी आवडलाच नाही. परंतु गुरुजींनी माझी गणिताची एवढी तयारी करून घेतली, की बारावीपर्यंत मला गणितामध्ये ९५ ते ९८ पर्सेंट मार्क मिळायचे. कदाचित पुढील शिक्षणासाठी गणिताचा जास्त उपयोग होऊ शकतो हे त्यांना चांगलेच माहीत होते. गणित हा विषय त्यांची पॅशन होता. पण त्यामुळे ते आमच्यासारख्या निरागस लहान मुलांवर अतिशय अन्याय करत असत.  त्यांच्या नावाप्रमाणेच ते मुलांना सपासप मारण्यात पटाईत होते. पहिली ते चौथीपर्यंत गुरुजी माझे वर्गशिक्षक होते. त्यामुळे त्यांनी आम्हाला किती छळले असावे हे तुमच्या लक्षात आले असेलच. त्यात मी शाळेतील हुशार मुलगा; त्यामुळे चुका करण्याची मुभा मला नव्हती. इतर मुलांपेक्षा दुप्पट मार मला बसायचा. छडी वाजे छम छम, विद्या येई घमघम या म्हणीवर त्यांचा कमालीचा विश्वास होता. वर्गात तीस-पस्तीस छोटी चिल्ले पिल्ले. त्यात गणित हा विषय आणि दररोज खाटकडे गुरुजी त्यांच्या हातातील छडी. दर दोन तीन मिनिटांनी छडीचा फटका. त्यावेळेस बाल हक्क आयोग वगैरे नसावेत. हे आताचे फॅड आहे आणि तसे असते तर कदाचित त्या वेळेस गुरुजींवर बालहक्क आयोगाने हजारो केसेस केल्या असत्या. शाळेतील भिंतीवर, गणितातील फार्मूले लिहिलेले असायचे. एखाद्याला एखादे गणित समजले नाही, तर फार्मुले मुलांना वाचायला सांगायचे. मुलींची वेणी पकडून तर ते त्यांना वर उचलत असत आणि फार्मूले वाचायला लावत असत. खाटकडे गुरुजींचा कहर सुरू होता आणि आम्ही तो निमूटपणे अन्याय सहन करत होतो. बोबडे गुरुजी त्यांना अधेमध्ये समजून सांगत असत. मला तर शाळेत जायची इच्छाच व्हायची नाही. छडीचे फटके, पाठीवर बुक्क्या यामुळे आम्ही वैतागलेले असायचो. काही मुलांना त्याचा काहीही त्रास व्हायचा नाही, त्यांनी हे सर्व स्वीकारलं होते. पाठीवरील बुक्के थोडे कमी लागावेत म्हणून मी हिवाळ्यात माझे जाड स्वेटर घालायचो. त्यामुळे मला फारसे लागायचे नाही, पण उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात मात्र त्रास होत असे. एकदा एका मुलाच्या डोक्यावर त्यांनी पट्टीने मारले, दुर्दैवाने मुलगा दोन दिवसांपूर्वी खेळताना पडला होता; त्यामुळे डोक्यावर थोडी जखम झाली होती. गुरुजींचा फटका नेमका त्या जागेवर बसला आणि त्यातून रक्त वाहायला लागले. रडत रडत तो घरी गेला आणि मग मोठे महाभारत घडले. 

त्यानंतर बोबडे सरांनी खाटकडे गुरुजींना शेवटचा अल्टिमेटम दिला. गुरुजींनी हात थोडा आखडता घेतला. मला अजूनही माझे गणित चांगले की वाईट हे कळले नाही. परंतु त्यानंतर मला गणितात प्रत्येक वर्गात चांगले मार्क्स पडायचे पण गणिताबद्दल फारसे प्रेमही वाटले नाही. बारावीनंतर गणित सोडून मी दुसरे विषय घेतले आणि आता मी आनंदी आहे.

शासकीय विद्यानिकेतनच्या (आताच्या नवोदय शाळेच्या) प्रवेश परीक्षा तेव्हा मी चौथीत असताना दिल्या.  त्याचवेळेस स्कॉलरशिप परीक्षा देऊन मी पास झालो होतो. शासकीय विद्यानिकेतन मध्ये माझी जाण्याची तयारी सुरू झाली. माझा मोठा भाऊ तेथे शिकत होता. पुढे त्याने दहावीनंतर नाशिकला प्रस्थान केले. मला होस्टेलवर राहायची. आणि शासकीय विद्यानिकेतनमध्ये प्रवेश घेण्याची प्रचंड उत्सुकता होती. पण आईबाबांना थोडी शंका होती. सध्या तेथील क्वालिटी खराब झालेली आहे, अशा बातम्या मध्ये मध्ये येत असत. प्रशासनाचे लक्ष तेथे नव्हते. म्हणून माझा तेथे प्रवेश न घेण्याचा निर्णय आई-बाबा आणि मोठ्या भावांनी घेतला. 

शेवटी नदीच्या पल्याड असणाऱ्या गावात हायस्कूलमध्ये पाचवीला मी प्रवेश घेतला. पाचवी ते दहावीपर्यंतचे शालेय प्रवास खूप छान होता. त्यावेळेस गावातील वातावरण एवढे बिघडले नव्हते. नदी पल्याडच्या गाव हे बाजाराचे ठिकाण होते. सर्व प्रकारची दुकाने तेथे होती. नदी ओलांडून तेथे जायचे आणि किराणा, भाजी वगैरे खरेदी कार्याचे आणायचा असा तो प्रकार होता.

पावसाळ्यात मात्र नेहमी टेन्शन येत असे, मी शाळेत गेलो आणि नदीला पूर आला तर कुठे राहायचे, हा मोठा यक्षप्रश्न मला पडायचा. पावसाळ्यात नदीला नेहमी घोट्यापर्यंत पाणी असायचे; मजा यायची पाण्यातून जाताना. चपला काढायच्या आणि पाण्यातून जायचे, खूप पाणी असेल तर, एकमेकांचा हात पकडून नदी पार करायची असा तो रोजचा दिनक्रम असायचा. 

पाचवी ते सातवी माझ्या वर्गशिक्षिका होत्या रोटे मॅडम. त्या हिंदी आणि इंग्रजी शिकवायच्या. मडघे सर गणित शिकवायचे. बाकी विषयांचे शिक्षक फारसे लक्षात राहिले नाहीत. पण रोटे मॅडमचे माझ्याकडे पूर्ण लक्ष असायचे. एकदा हिंदी चे पेपर तपासण्यासाठी मी त्यांना मदत केलेली आहे. मडघे सर दररोज सकाळी एक तास एक्स्ट्रा क्लास घ्यायचे विनामोबदला, गणित विषय अगदी सोपा करून सांगायचे. हिंदीचे सर होते वर्हेकर सर. त्यांचा एक डोळा बकरीचा आहे असे बरेच विद्यार्थी मानत असत. स्वभावाने ते मृदू होते.  दरवर्षी दसर्‍याला सोने द्यायला आम्ही त्यांच्या घरी जात असू.  त्या वेळेस प्रत्येकाच्या हातावर ते अत्तर लावत असत. 

सातवीनंतर मला वर्गशिक्षक म्हणून विजया उमाळे मॅडम आल्या. अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे त्यांनी मला प्रेम दिले. इंग्रजी आणि मराठी विषय अगदी मनापासून त्यांनी शिकवले. त्याचे पती काकड सर आम्हाला केमिस्ट्री आणि बायो शिकवायचे. खूप असा होमवर्क ते द्यायचे आणि दुसऱ्या दिवशी प्रश्न विचारायचे. छडीवर त्यांचाही कमालीचा विश्वास होता. उत्तर आले नाही तर हातावर छडी मारायचे. 

आज वयाच्या या टप्प्यावर मागे वळून बघताना वाटते कि ह्या सर्व शिक्षकांचा माझ्या आयुष्यात सहभाग नसता तर आम्ही कसे घडले असतो? अगदी निरपेक्ष भावनेने त्यांनी आम्हाला घडविले. दहावीनंतर मी गावाबाहेर पडलो. आता हे सर्व शिक्षक रिटायर होऊन आपले पुढील आयुष्य जगत असतील. चांगले वाईट हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला नाही, परंतु त्याच्याबद्दलची कृतज्ञाता व्यक्त करणे आपल्या हातात आहे.

शिक्षकदिनाच्या सर्वाना शुभेच्छा!

(विनोद बिडवाईक ह्यांची सर्व पुस्तके फ्लिपकार्ट आणि बुकगंगा वर उपलब्ध आहेत. इंग्रजी मध्ये लिहिली पुस्तके किंडल फॉरमॅट मध्ये ऍमेझॉन आणि पोथी.कॉम वर प्रिंटेड कॉपीज  उपलब्ध आहेत.)

रविवार, २९ ऑगस्ट, २०२१

भुताचा जन्म

रात्रीचे आठ वाजले होते. रस्त्यावरील खांबावर विजेचा फिलॅमेंटचा दिवा मिणमिणत होता. त्या अंधुक प्रकाशात ते पाच जण एका जुनाट घराच्या पायरीवर बसून गप्पा मारत होते. घराच्या बाहेर एक जुनी मोठी विहीर होती. शेजारी पिंपळाचे झाड कित्येक शकापासून भारदस्तपणे उभे होते. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना सावलीसाठी त्याच झाडाचा आधार होता. सध्या हे घर रिकामेच होते. गावात कोणी नवीन शिक्षक बदली होऊन आले कि काही दिवस ह्या घरात राहत असत भाड्याने. पण नंतर ते दुसरेकडे राहायला जात असत किंवा स्वतःच्या गावातून जाणे येणे करणे पसंत करत असत. 

घराची पायरी मोठी होती त्यामुळे बसण्यासाठी आणि शिळोप्याच्या गप्पा मारण्यासाठी ती जागा चपलख होती. त्यामुळे खूपदा लोक तेथे बसून गप्पा मारत असत.  ते पाच जणही असेच बसले होते. गप्पांच्या ओघात भुताखेतांच्या विषय निघाला. शिवारात भूत कोठे आहेत, ते कोणी बघितले, भुतांचे प्रकार किती असतात वगैरे विषयावर गप्पा जोमात आल्या होत्या. त्यातील एकाने स्वतः भूत बघितले असे सांगितले. एकाने तर गावातील खडूस म्हातारा लहान तनपुरे भूत आहे हे शपथेवर सांगितले. तो म्हणे दिवसा माणूस म्हणून वावरतो आणि रात्री भूत असतो. म्हणून तो घरी झोपत नाही. तो नेहमी त्याच्या शेतातील घरातच झोपायला जातो. एकदा काही कामानिमित्त तो भल्या पहाटे त्याच्या शेतात गेला होता म्हणे. त्यादिवशी कदाचित भूतापासून माणूस व्हायला तो विसरला होता म्हणे, म्हणून त्याने म्हाताऱ्याला भुताच्या अवतारात बघितले. भूतापासून माणूस कसा झाला ह्याचे वर्णन त्याने केले. 

एकाने सांगितले कि भुतांमध्ये सुद्धा जातीपाती असतात म्हणे. त्यांची लग्नेही होतात. भुतांचे बरेच प्रकार असतात वगैरे वगैरे. अश्या गप्पा रंगात आल्या असताना, विहिरीत  काहीतरी पडण्याचा जोरात धपकन असा आवाज आला. तो आवाज संपूर्ण आसमंतात निनादला. अचानक आलेल्या त्या आवाजाने सर्वजण घाबरले आणि घाबरून विहिरीकडे बघायला लागले.

"ह्या पिंपळाच्या झाडावर भूत नसेल ना?" एकाने शंका काढली. 

"येथे कसे भूत येईन?" दुसरा 

"तो म्हातारा तनपुरे आला असेल तर? शेतात झोपायला जाताना आला असेल इकडे, बसला असेल पिंपळावर. आणि टाकली असेल उडी पाण्यात." तिसरा घाबरून बोलला.

"भुतांना विहिरीत पोहायला खूप आवडते म्हणे." चौथा बोलला. 

"पण हा म्हातारा लहान तनपुरे आहे हे कशावरून?" एकाने शंका काढली. "ह्या घरात पण भुते असू शकतील? येथे एका महिन्याच्या वर कोणी राहिलेले तू बघितले का?

खूप चर्चेनंतर आणि वादविवादानंतर ह्या घरातच भूत असण्याची शंका आहे, म्हातारा लहान तनपुरे भूत जरी असला तरी त्याला दम्याचा त्रास आहे आणि तो काही एवढ्या थंडीत विहिरीत पोहायचे धाडस करणार नाही, ह्या नित्कर्षाप्रत सर्वजण आले आणि घाबरून सर्वजण तेथून सटकले. 

ह्या पाच जणांच्या गप्पा जोरजोरात चालू असतानां, शेजारच्या घरातील साहेबरावची झोपमोड व्हायला लागली. अर्थात हे पाचजण दररोज त्या पायरीवर येत आणि गप्पा मारत, वादविवाद करत. परंतु त्यांचा गप्पांचा त्रास इतरांना होतो कि नाही ह्याचा मागमूसही त्यांना नसे.  

इकडे साहेबराव बाहेर आला, अंगणात असलेला मोठा दगड उचलला आणि जोरात विहिरीत फेकला. दगड पाण्यात पडला आणि जोराचा धपकन असा आवाज आला. रात्रीच्या निरव शांततेत तो आवाज जरा जास्तच भयाण आणि गूढ वाटला.

काही दिवसानंतर अचानक दोन अफवा वनव्यासारख्या पसरल्या. एक लहान तनपुरेच्या अंगात रात्री भूत येते दुसरी त्या जुनाट घराच्या बाहेर असणाऱ्या पिंपळावर भुते आहेत आणि रात्री ते मनसोक्त विहिरीत आंघोळ करतात.

(विनोद बिडवाईक ह्यांची सर्व पुस्तके फ्लिपकार्ट आणि बुकगंगा वर उपलब्ध आहेत. इंग्रजी मध्ये लिहिली पुस्तके किंडल फॉरमॅट मध्ये ऍमेझॉन आणि पोथी.कॉम वर प्रिंटेड कॉपीज  उपलब्ध आहेत.)

रविवार, १८ जुलै, २०२१

माझ्या पहिल्या भाषणाची कथा

खरे तर आमच्या शाळेत अवांतर उपक्रम फारसे होत नसत. वर्षातून एकदा शालेय आणि जिल्हा स्तरावर क्रीडा स्पर्धा होत असत. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी चे कार्यक्रम वगळता इतर स्पर्धा फारश्या भरत नसत. सर्व स्पर्धा ह्या शैक्षणिक प्रकारात मोडत असत. परंतु मेश्राम नावाचे नवीन मुख्याधापक म्हणून रुजू झाले आणि त्यांच्या पुढाकाराने, वादविवाद, वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन सारख्या स्पर्धा घेण्याचे ठरले. आम्हा सर्व मुलांना हा अनुभव नवीन होता. स्पर्धेच्या तारखा जाहीर झाल्या. मी तेव्हा आठवीत होतो. सर्व वर्गशिक्षकांना वर्गातील चुणचुणीत स्मार्ट विद्यार्थ्यांना ह्या स्पर्धेसाठी तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मुलांना काय, अभ्यासातून विरंगुळा पाहिजेच असतो. त्यामुळे, मुलांचा अमाप प्रतिसाद मिळाला. ह्या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे तर होतीच पण त्यांना संस्थास्थरीय पुढील फेरीत शाळेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार होती.

मी माझे नाव वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धेत नोंदवले. वादविवादाचा विषय होता, "आपला गाव बरा की शहर”. मी माझ्या गावाच्या बाजूने बोलणार होतो.  वक्तृत्व स्पर्धेसाठी, महात्मा गांधींचा, "खेड्याकडे चला." हा विषय निवडला. मी दोन्ही विषयाची तयारी जोमाने केली. माझ्या ताई कडून, भावाकडून माहिती घेतली.  शाळेतील ग्रंथालयातील पुस्तके चाळली. काकड उर्फ उमाळे मॅडमचे मार्गदर्शन घेतले. आणि दोन्ही विषय रीतसर पणे कागदावर लिहून काढले. 

स्पर्धेचा दिवस उगवला. शाळेच्या मैदानावर तात्पुरते व्यासपीठ उभारल्या गेले होते. मेश्राम सरानी अश्या स्पर्धा का महत्वाच्या आहेत हे समजावून सांगितले. काकड सर, मडघे सर आणि वर्हेकर सर परिक्षक म्हणून नेमण्यात आले. 

स्पर्धेला सुरुवात झाली. वादविवाद स्पर्धा अडखडत पार पडली. खाली बसलेली मुले, हसत खिदळत दाद देत होती, तर कधी ट्रोलिंग करत होती. सर्व मुले व्यासपीठावर जाऊन पहिल्यांदाच बोलत होती. काही स्पर्धकांनी त्यांच्या मित्रांना काहीही बोलले तरी टाळ्या वाजवण्याची तंबी दिली होती. मुलांच्या ह्या वागण्यामुळे स्पर्धकांचे टेन्शन जरा जास्तच वाढले. सोनार सर मधेमधे मुलांत जाऊन शिटीच्या दोरीने सपासप पाठीवर वार करायचे, पण ते गेले की मुलांचा गोंधळ परत सुरु व्हायचा.  

दुसऱ्या दिवशी वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या. माझे भाषण तयार होतेच. मी ते पाठ केले होते, तरीही काही भाग मी वाचून दाखवला. इतरांच्या मानाने माझे भाषण चांगले झाले होते असेच म्हणावे लागेल. उज्वला बोबडे नावाची ९वी ची मुलगी मात्र मस्त बोलली. चौथी पर्यंत असणाऱ्या आमच्या मुख्याध्यापक बोबडे सरांची ती मुलगी होती.

शेवटी स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. वक्तृत्व स्पर्धेत उज्वलाला पहिले, मला दुसरे आणि संजय शिंदेला तिसरे बक्षीस मिळाले. आम्हाला आता संस्थेच्या पुढील फेरीत प्रवेश मिळाला होता. 

काकड मॅडमच्या सल्ल्याने तोच विषय घायचा हा निर्णय मी घेतला. विषयाचे तसे बंधन नव्हते. पण मॅडमने माझ्याकडून पूर्ण तयारी करून घेण्याचे ठरवले. संजय माझ्यापेक्षा एक वर्ष पुढे होता. उज्वलाच प्रश्नच नव्हता. ती बोलण्यात हुशार होतीच.

आमच्या गावापासून संस्थेच्या मुख्य कार्यालय असणाऱ्या शाळेत करजगाव येथे पुढील स्पर्धा होणार होत्या. आम्ही सर्वजण आदल्या दिवशी तेथे पोहोचलो. संजय माझा शेजारी होता, त्यामुळे माझी त्याच्यासोबत मैत्री होती. शाळेतच आमची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. संजय आणि मी एकत्र होतो. मी माझ्या विषयांची तयारी करत होतो. संजय मात्र बेफिकीर होता. त्याच्याकडे बघून त्याने हि स्पर्धा फारसी मनावर घेतली असे वाटत नव्हते. मी त्याला त्याच्या तयारीबाबत विचारले. "त्यात काय तयारी करायची, माझ्याकडे आहेत पॉईंट्स कागदावर लिहिलेले." असे बोलून तो गायब झाला. आमची रात्रीचे जेवण आटोपली. 

झोपायच्या आधी, मी लिहिलेले भाषण परत वाचावे असे ठरवले. कागद घेण्यासाठी पिशवीत हात घातला. चार पानाचे मोठया मेहनतीने लिहिलेले माझे भाषण गायब झाले होते. मी ते सगळीकडे शोधले, इतर मुलांनां विचारले. जेथे जेथे गेलो होतो ते तपासले. पण मला माझे कागद काही सापडले नाही. मी आता रडकुंडीला आलो होतो. भाषण बऱ्यापैकी पाठ झाले होते, परंतु कागद समोर पाहिजे होता. काही मुद्दे आठवण्यासाठी तो कागद महत्वाचा होता. मला आता रडू कोसळू लागले होते. आमच्या सोबत आलेल्या मडघे सरांना मी हे सांगितले. 

"तू भाषण पाठ केले आहेस ना? मग घाबरू नकोस, तुझा आत्मविश्वास गमावू नकोस." ते म्हणाले. पुढील पंधरावीस मिनिटे त्यांनी आत्मविश्वास, पाठांतर, प्रगती ह्या विषयावर माझे बौद्धिक घेतले.  

दिवस उजाडला. सकाळी लवकर उठून आम्ही तयार झालो. स्पर्धा नऊ वाजता सुरु होणार होती, प्रमुख पाहुणे उशिरा आले म्हणून उदघाटन उशिरा झाले आणि एकदाची ११ वाजता स्पर्धा सुरु झाली. सुदैवाने वक्तृत्वस्पर्धा आधी सुरु झाल्या. वेगवेगळ्या शाळेतून आलेली मुले छान बोलत होती. एकतर माझा कागद हरवला आणि ह्या मुलांची भाषणे बघून माझा आत्मविश्वास तेथेच ढासळला.

त्यात संजयचे नाव पुकारला गेले. तो मोठया आत्मविश्वासाने व्यासपीठावर गेला. त्याच्या हातात एक कागद होता. त्याने विषयाची माहित दिली आणि हे काय! मी लिहिलेले संपूर्ण भाषण त्याने वाचून दाखवले होते. अगदी शब्द न शब्द सारखा होता. म्हणजे संजय ने माझा कागद चोरला होता. मी मनातून संतापलो. संजयचा राग आलेला होताच.  मी पळत मडघे सरांकडे गेलो आणि त्यांना परिस्थिती सांगितली. त्यांचा माझ्यावर विश्वास होता. 

ते म्हणाले. "घाबरू नकोस, त्याने ते भाषण वाचून दाखवले आहे. तू तयारी केली आहेस, ते मुद्दे तू लिहिले आहेस, विषय तुला समजला आहे, त्यामुळे तू बिनधास्त जा आणि भाषण कर. घाबरू नकोस. आणि एखादा मुद्दा आठवला नाही तर लगेच दुसरा मुद्दा घे." त्यांनी माझ्या पाठीवर हात फिरवला. "आणि मी पुढे येऊन बसतो. मध्ये मध्ये माझ्याकडे बघ." त्यांच्या ह्या शब्दांनी मला धीर आला. 

थोड्या वेळाने माझे नाव पुकारल्या गेले. मी भाषणासाठी व्यासपीठावर गेलो. मडघे सर पुढे येऊन बसले होते. त्यांनी स्मित दिले. माझ्यासमोर मुलांचा महासागर बसला होता. मी शेवटच्या रांगेतील मुलाकडे बघितले. आणि मी बोलायला सुरुवात केली. "गाव, माझा गाव, तुमचा गाव, मुळातच गावातील माणसे रांगडे असली तरी मनाने भावनिक असतात. चेहऱ्यावर मुखवटे आपण लावत नाहीत, आणि मुखवटे लावले तरी ते आपल्याला झेपत नाहीत, आणि कदाचित म्हणूनच महात्मा गांधी म्हणाले असतील, खेड्याकडे चला." मी सुरुवात केली, क्षणभर थांबलो, प्रेक्षकांचा अंदाज घेतला. आणि दुसऱ्याच क्षणाला टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यानंतर पुढील वीस मिनिटे मी बोलत होतो. संजय ने माझेच भाषण वाचून दाखवले होते, अडखडत, आणि मी तेच माझे भाषण उत्स्फुर्तपणे केले होते. बोलण्याच्या ओघात, करजागावातील चांगल्या गोष्टींचा मला दिसलेला उल्लेखही मी केला. 

मी खाली उतरलो. मडघे सर, माझ्याकडे आले आणि त्यांनी माझी पाठ थोपटली. शेवटी संध्याकाळी स्पर्धेचा निकाल परीक्षकांनी जाहीर केला. त्यात त्यांनी माझ्या भाषणाचा उल्लेख केला. "विनोद बिडवाईक ह्या स्पर्धकाने केलेले स्पर्धेतील भाषण, आधी दुसऱ्या स्पर्धकाने पण केले, पण विनोद चे भाषण उस्फुर्त होते. एखाद्याने कितीही नक्कल केली तरी त्याला मूळ गुणवत्तेची सर येत नाही हे आपण लक्षात ठेवायला हवे. " परीक्षकाने संजयचे कान पण टोचले होते. पण हे ऐकायला संजय तेथे नव्हता, तो केव्हाच पसार झाला होता.  

मला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले. पुढील काही दिवस संजय माझी नजर चुकवत फिरत होता.

विनोद बिडवाईक

(विनोद बिडवाईक ह्यांची सर्व पुस्तके फ्लिपकार्ट आणि बुकगंगा वर उपलब्ध आहेत.  इंग्रजी मध्ये लिहिली पुस्तके किंडल फॉरमॅट मध्ये ऍमेझॉन वर उपलब्ध आहेत.)