शनिवार, २६ जून, २०२१

धर्म, हिंदू संस्कृती आणि त्याचे तत्वज्ञान

कार्ल मार्क्स कधीतरी, "धर्म ही अफूची गोळी आहे!" असे सांगून गेला आणि आपल्या देशातील काही अतिहुशार लोकांनी, बाजारू विचारवंतांनी आणि त्याच्या काही जागतिक शिष्यांनी त्याचा वापर आपली सत्ता बळकट करण्यासाठी आणि बुद्धिभेद वाढवण्यासाठी  केला. कार्ल मार्क्सची विचारसरणी ही तेव्हा धर्मसत्ता आणि राजसत्तेने भोळ्या आणि गरीब लोकांवर केलेल्या अन्यायाच्या संदर्भात होती. धर्मसत्तेने राजसत्तेवर ठेवलेला अंकुश तेव्हा राजकारणातील ढवळाढवळ ठरत होता तेव्हाची ही गोष्ट आहे. इंग्लड, युरोप मध्ये तेव्हा धर्मसत्तेने कहर माजविला होता. तिकडे अरब मध्ये तर धर्मसत्ताच राजकीय सत्ता झाली होती. भारतातही काही गोष्टींचा अतिरेक झाला होता. 

धर्म नैतिक चौकट तयार करण्यात आणि दररोजच्या जीवनातील मूल्यांसाठी आवश्यक ठरते. काही गोष्टी कालबाह्य होतात, तेव्हा समाजातील विचारवंतांनी एकत्र येऊन त्या कालबाहय गोष्टीबद्दल विचारमंथन करून समाजजागृती करायला हवी. धार्मिक दृष्टीकोन एखाद्या व्यक्तीचे चरित्र निर्माण करण्यास मदत करतो. दुसर्‍या शब्दांत, धर्म समाजकारणाची संस्था म्हणून काम करते. अशा प्रकारे, प्रेम, सहानुभूती, आदर आणि सुसंवाद यासारख्या मूल्ये निर्माण करण्यास धर्म मदत करतो. 

परंतु आजकाल हे तथाकधीत विचारवंत एखाद्या धर्मातील विशिष्ट प्रथांवर आघात करताना त्या धर्माला आरोपीच्या पिंजऱ्यात जमा करतात. हिंदू धर्म हा नेहमी प्रवाही राहिलेला आहे. इतर सर्व धर्मात कोणीतरी एक प्रेषित आहे. हिंदूंचा असा कोणताही प्रेषित नाही. जैन, बुद्ध, बसवराज इत्यादी प्रेषितांनी वेगळे धर्म प्रस्थापित केले असतील. परंतु त्यांच्या तत्वज्ञानाचा पाया हिंदू तत्वज्ञावरच आधारित आहे. ख्रिस्ती आणि इस्लाम धर्मांचे प्रेषित हे बंडखोर होते आणि त्यांनी तेव्हाच्या प्रचलित धर्माच्या वाईट प्रथेविरुद्ध आवाज उठवला. शेवटी प्रत्येक धर्माच्या पद्धती वेगळ्या असतील, मार्ग वेगळे असतील परंतु ध्येय एकच आहे. मनाची शांतता आणि मोक्ष हे दोन उद्देश प्रत्येक धर्माचा सार आहेत. अनिष्ट प्रथांच्या विरुद्ध जन्माला आलेले, प्रेषितांनी निर्माण केलेल्या धर्मांचा आणि धर्मग्रंथांतील अर्थांचा अनर्थ दुर्दैवाने त्यांच्या अनुयानांनी काढला आणि केवळ धर्मप्रसार एवढाच उद्देश ह्या धर्माचा राहिला. त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी त्यांनी ठेवली. 

हिंदू धर्म मुळात धर्म नव्हे, तो एक जगण्याचा मार्ग आहे. हिंदू धर्माचा कोणी एक प्रेषित नाही. त्यामुळे ज्या काही चालीरीती धर्मात आहेत त्या लोकांच्या मनाप्रमाणे त्यावेळेस असणाऱ्या परिस्थितीनुसार आलेल्या आहेत. विशेष म्हणजे हिंदू धर्म लवचिक आहे, कारण काय करायचे आणि काय नाही ह्याचे स्वातंत्र ते प्रत्येकाला देते.  

हिंदू धर्म मुळातच प्रवाही आहे, तो काळाप्रमाणे बदलत गेला आहे. अजूनही इंग्लडची राणी हि चर्चची प्रमुख आहे. जगातील बहुतांश देश हे धर्माधित आणि धर्माधीन आहेत. हिंदू धर्माने राजसत्ता होण्याचा कधी प्रयत्न केला नाही. जेवढे प्रबोधन हिंदू धर्मातील संतांनी केले तेवढे कोणीही केले नसेल. हिंदू धर्मातील चुकीच्या पद्धतीवर संतांनी आघात केले आणि लोकांनी ते मानले, अंगिकारले. बुवाबाजी, अंधश्रद्धा ह्या गरिबीमुळे आणि लोकांच्या असहायतेमुळे निर्माण होतात आणि काही धर्ममार्तंड त्याचा फायदा घेतात, परंतु केवळ मूठभर लोकांसाठी संपूर्ण धर्म वाईट आहे हे ठरवणे हा आताच्या विचारवंताचा आणि तथाकथित पुरोगामी मंडळींचा हलकटपणा आहे. 

हिंदू धर्मात मूर्तिपूजा आहे, इतर धर्मात ती मानल्या जात नाही, मूर्ती एक प्रतीक आहे, भाव व्यक्त करण्याचे साधन आहे. प्रत्येक धर्माचे असे एक प्रतीक अथवा साधन आहे. क्रूस, चर्च, मस्जिद, अग्यारी वगैरे वगैरे हीही साधने नव्हेत का? मानलेल्या देवापर्यंत, जाण्याचे हे सर्व साधने आहेत, मार्ग आहेत, प्रतीके आहेत. फक्त त्या त्यांच्या कीती आहारी जायचे हे ज्याने त्याने ठरवायचे आहे.

हिंदू धर्म जगण्याचा मार्ग असल्यामुळे, सर्व प्रकारची जीवन कौशल्ये आपण जगत आलेलो आहोत. 

हिंदू धर्म ही एक वैविध्यपूर्ण प्रणाली आहे ज्यामध्ये तत्वज्ञान आणि सामायिक संकल्पना, धार्मिक विधी, विश्‍वविद्या प्रणाली, तीर्थक्षेत्र आणि ज्ञान आहेत. धर्मशास्त्र, मेटाफिजिक्स, वेगवेगळे वेद, पौराणिक कथा, वैदिक यज्ञ, योग, गतिशील धार्मिक विधी आणि मंदिर बांधणी ह्यासारखे अनेक विषय हिंदू धर्मात आहेत. अगदी जगण्याच्या पद्धतीपासून तर वैद्यकीय पर्यंतचे शिक्षण वेगवेगळ्या ग्रंथात सांगितलेले आहे. 

हिंदू श्रद्धास्थान असणाऱ्या विषयांमध्ये चार पुरुषार्थ, मानवी जीवनाचे ध्येय किंवा उद्दीष्टे यांचा समावेश आहे. खालील तत्वज्ञान बघा. 

  • नीतिशास्त्र आणि कर्तव्ये, 
  • अर्थ:समृद्धी आणि आर्थिक जबाबदाऱ्या
  • काम: इच्छा आणि आकांक्षा
  • मोक्ष: मृत्यू आणि पुनर्जन्म

हिंदु धर्मात प्रामाणिकपणा, अहिंसा, धैर्य, सहनशीलता, संयम, सद्गुण आणि करुणा यासारख्या इतर कर्तव्याचे वर्णन केले गेले आहे. मला वाटते वरील तत्वज्ञान हे प्रत्येक धर्मात समान असावे. 

काही विधी आणि पद्धती ह्या मनाच्या समाधानासाठी आणि मनशांतीसाठी आवश्यक आहेत. हिंदू धर्म लोकांना गुन्हा आणि पाप करण्यापासून परावृत्त करते. प्रत्येक धर्म जगायला शिकवतो आणि अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग दाखवतो. फक्त तो समजून घ्यायला हवा.

त्यामुळे मी प्रत्येक धर्माचा आदर करतो परंतु हिंदू धर्माचा मला अभिमान आहे कारण माझ्यामते माझ्यासाठी हा धर्म नव्हे तर जगण्याचा एक मार्ग आहे. अध्यात्माचे देणे जगाला देण्याचे महान कार्य हिंदू संस्कृतीने केले आहे. माझ्या धर्मातील चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याचा आणि आजच्या काळात योग्य नसणाऱ्या गोष्टी त्यागण्याचा पूर्ण अधिकार मला हिंदू धर्म देतो.    

धार्मिक असणे आणि धर्मांध असणे ह्यात फरक आहे. अध्यात्मिक उन्नती करण्यासाठी धर्मांध असण्याची गरज नाही. त्यामुळे धर्म, हिंदू संस्कृती तरी, ही अफूची गोळी नाही, तर आयुष्याला एक उद्देश देण्याचे साधन आहे.  

(विनोद बिडवाईक ह्यांची सर्व पुस्तके फ्लिपकार्ट आणि बुकगंगा वर उपलब्ध आहेत.  इंग्रजी मध्ये लिहिली पुस्तके किंडल फॉरमॅट मध्ये ऍमेझॉन वर उपलब्ध आहेत.)

रविवार, २० जून, २०२१

आमचे बाबा

आज जागतिक पितृदिन आहे. पण वडील हे फक्त एकाच दिवशी आठवायचे असतात का? वडील हे आपल्या आयुष्यात नेहमीच असतात. आपल्या मुलांचा अभिमान फक्त आपल्या आई वडिलांनाच असतो. वडील कठोर असतात, ते शिस्त लावतात हा आपला समज असतो पण त्यामागे निव्वळ मुलांचाच विचार असतो. 

प्रत्येक वडील हे आपल्या मुलांसाठी हिरो असतात. मुले कितीही मोठे होऊ दे, त्याची चिंता काही सुटत नाही. मुले मोठी झाली, कमावती झाली, आपले निर्णय स्वतः घेत असली तरी, त्यांची मुलाबद्दलची काळजी काही कमी होत नाही. 

मुले आईच्या खूप जवळ असतात, परंतु घराची आणि भविष्याची चिंता वडील काही सोडत नाही. आपले काय होईल हा त्याचा विचारच नसतो, आपल्यानंतर आपले काय होईल ह्याची काळजी मात्र त्यांना पोखरत राहते. मुलांनां मात्र आपले वडील जरा जास्तच विचार करतात असे वाटते. 

वडील आयुष्यभर कर्तव्याचे ओझे वाहत राहतात. 

माझे वडील तसे शांत आणि दुसऱ्यांचा विचार करणारे होते. मी सर्वात धाकटा असल्यामुळे माझ्यावर त्याचा खूप जीव होता. घरी यायला थोडा उशीर झाला तरी ते काळजीत असत. माझ्या अभ्यासावर त्यांचे कडक लक्ष असे. परंतु माझ्याकडून झालेल्या चुकांवर ते कधीच मला रागावले नाही. स्वभावाने ते थोडे हळवे होते. आपल्या मुलांना काय वाटेल हाच विचार ते शेवटपर्यंत करत राहिले. 

त्यांचा हळवेपणा प्रत्येक प्रसंगात दिसत असे. दहावीनंतर जेव्हा मी शिक्षणासाठी गाव सोडले, तेव्हा ते मला वेशेपर्यंत सोडायला आले होते. मी मोठया शहरात माझ्या मोठ्या भावासोबत राहणार होतो. त्यावेळेस मी दूर जाण्याच्या कल्पनेने, त्यांच्या डोळ्यात आलेल्या अश्रूंची किंमत मला त्यावेळेस समजलीच नाही.   

घरातील सुनांना आपल्या मुलींप्रमाणे वागवणारे ते होते. कधी गरज पडली तर त्यांना मदत करायला त्यांना कधीच कमीपणा वाटला नाही. त्यांच्या नातवंडांचे ते लाडके आजोबा होते. आम्हा सर्व भावंडाच्या छोट्या छोट्या गोष्टीचा त्यांना खूप अभिमान असे. त्यांच्या शेवटच्या दिवसात ते भावाकडे होते आणि मी मुंबईला जॉब करत होतो, पण ते माझी प्रत्येक आठवड्याला वाट पाहत असत. कधीतरी नाही जमले तर ते अस्वस्थ होत असत.

त्यांच्यासाठी त्यांच्या मनासारखे मला फारसे काही करता आले नाही परंतु आज त्यांचे अस्तित्व आजूबाजूला जाणवत राहते.  आज माझा एकही दिवस त्यांच्या आठवणींशिवाय जात नाही.

(विनोद बिडवाईक ह्यांची सर्व पुस्तके फ्लिपकार्ट आणि बुकगंगा वर उपलब्ध आहेत.  इंग्रजी मध्ये लिहिली पुस्तके किंडल फॉरमॅट मध्ये ऍमेझॉन वर उपलब्ध आहेत.)

रविवार, ६ जून, २०२१

एका चित्राची किंमत

दाशिव खूप असा सधन नव्हता, परंतु इतर गावकऱ्यांपेक्षा सधनच म्हणावा लागेल. शिक्षितही होता. इरिगेशन विभागातून निवृत्त झाला होता. टुमदार घर, छोटीसी बागायती शेती आणि एक मुलगा असा त्याचा संसार होता. त्याची बायको काही वर्षांपूर्वी स्वर्गवासी झाली होती. त्याने दुसरे लग्न करायचे टाळले, ह्याचे एकमेव कारण होते त्याचा मुलगा, प्रफुल. सदाशिव आपल्या मुलासोबत राहत होता. यशवंत आणि त्याची बायको बायजा सदाशिवकडे घरगडी म्हणून काम करत होते. सदाशिवच्या घरचेच ते झाले होते. सदाशिव सुखी आणि आनंदी दिसत असला तरी आतून फारच अस्वस्थ आणि दुखी होता. दुर्दैवाने मुलगा, प्रफुल, मतिमंद होता. परंतु सदाशिवचा प्रफुलवर खूप जीव होता. त्याच्यावर त्याने मनापासून प्रेम केले होते. मुलगा पाच वर्षांचा होता तेव्हा त्याची आई मरण पावली. त्यामुळे तर तो मुलाला खूप जपत असे. 

माझ्यानंतर मुलाचे काय होईल ह्या विचाराने त्याला झोप येत नसे. खूपदा तो माझ्या आई बाबा सोबत ह्या विषयावर बोलत असे. आई बाबा त्याची समजूत काढत असत. 

काही वर्षांनी सदाशिवला अचानक हार्ट अटॅक आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याचा मुलगा पोरका झाला. अचानक सदाशिवच्या नातेवाईकांची गर्दी गावात वाढायला लागली. जे कधी गावात आयुष्यात आले नाहीत तेही दूरचे नातेवाईक गावात दिसू लागले. सर्वांचा डोळा सदाशिवच्या घरावर आणि शेतीवर होता. 

एकमेकांत भांडणे सुरु झाली. प्रकरण, पोलिसात आणि नंतर कोर्टात गेले. शेवटी दोन तीन चिवट नातेवाईकांनी आपणच सदाशिवचे वारसदार आहोत असे कोर्टात ठासून सांगितले.  ह्या सर्व गदारोळात प्रफुलची काळजी मात्र फक्त यशवंत आणि बायजाच घेत होते. काही दिवसांनी प्रफुलला शहरातील रिमांड होम मध्ये हलवण्यात आले. यशवंत आणि बायजा कधीकधी प्रफुलला भेटायला नियमित जात असत. 

सदाशिवचा तालुक्याचा ठिकाणी एक वकील मित्र होता. त्याला हि सर्व परिस्थिती माहित होती. सदाशिवच्या संपत्तीतुन मुलाचे संगोपन करण्यासाठी एक ट्रस्ट तयार करावा असा त्याचा प्रस्ताव होता. शेवटी एकदोन वर्षांनी नातेवाईकांचा क्लेम कोर्टाने फेटाळून लावला. नातेवाईकांचा उद्देश हा स्वार्थी आहे हे लक्षात आल्यावर कोर्टाने प्रफुलच्या नावाने ट्रस्ट स्थापन करण्याचा आदेश दिला. मुलगा हे सर्व सांभाळण्यासाठी समर्थ नाही म्हणून सदाशिवचे घर, शेती आणि इतर मालमत्ता लिलाव करण्याची आणि आलेला पैसे ट्रस्ट मध्ये जमा करण्याची परवानगी कोर्टाने दिली. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील एक सक्षम अधिकारी लिलाव अधिकारी म्हणून नेमण्यात आला. लिलावाची नोटीस गावात लागली. लिलावाचा दिवस ठरला. इतर गावातून आणि शहरातून बरेच लोक भाग घेण्यासाठी आले.   

सर्वप्रथम, एक चित्राच्या फ्रेम ची बोली लागली. ते चित्र प्रफुल ने काढले असावे. सदाशिवने मोठ्या प्रेमाने ते चित्र फ्रेम करून ठेवले होते. कोणीही त्या फ्रेमला बोली लावायला पुढे आला नाही. लिलाव अधिकाऱ्याने ती फ्रेम बाजूला फेकण्यासाठी उचलली. त्या फ्रेमचे महत्व ते काय. एका लहान मतिमंद मुलाने काढलेले चित्राची किंमत ती काय?

तोच गर्दीतून, बायजाने हात वर केला. "मला घ्यायची आहे ते चित्र." ती ओरडली. तिचे डोळे पाणावले होते. कित्येक वर्षांपासून ती आणि तिचा नवरा त्या घरात वावरले होते. स्वतःला कोणीही मुलबाळ नव्हते, सारी माया तिने प्रफुलवर ओवाळली होती. प्रफुलच्या आठवणीने तिला रडू कोसळले.

"बोली लाव." गर्दीतून कोणीतरी ओरडले.

"पन्नास रुपये" बायजा म्हणाली. 

त्या चित्रावर कोणीही चढती बोली लावली नाही. शेवटी ती फ्रेम, बायजाला मिळाली. फ्रेम हाताळताना अचानक ती खाली पडली. काच फुटली. हवेमुळे चित्र एका बाजूला गेले. बायजाने ते उचलले. चित्राच्या विरुद्ध बाजूला एक स्टॅम्पपेपर चिकटवला होता. लिलाव अधिकाऱ्याच्या सहाय्यकाने ते चित्र परत घेतले आणि तो स्टॅम्पपेपर बाहेर काढला. ते चक्क हाताने लिहिलेले मृत्यूपत्र होते आणि त्यात लिहिले होते, "माझ्या मृत्यूनंतर, सर्व संपत्तीचा आणि वस्तूचा लिलाव करण्यात यावा.  आलेल्या पैशातून माझ्या मुलाच्या नावाने ट्रस्ट बनवण्यात यावा. परंतु माझ्या मुलाच्या ह्या चित्राचा मनापासून स्वीकार करणाऱ्या व्यक्तीलाच त्या ट्रस्टचे अधिकार द्यावेत. मुलाला काही झाले, अथवा त्याचा अचानक मृत्यू झाला तर माझी सर्व संपत्ती चित्र घेणाऱ्या व्यक्तीलाच देण्यात यावी. भविष्यकाळात माझ्या मुलानंतर माझा वारसदार, जो कोणी हे चित्र घेईल तोच होईल.” पुढे तारीख आणि सर्व मालमत्तेची माहिती दिली होती.     

लिलाव संपला. परंतु सर्व गावात ह्या प्रकारची खूप चर्चा झाली. मृत्यूपत्र खरे कि खोटे? बायजाला ते चित्रच का आवडले? असे फाटे पाडण्यात आले. कोर्टाच्या आदेशानुसार परत मृत्युपत्राची शहानिशा करण्यात आली. मृत्यूपत्र खरे निघाले. बायजाने चित्राला बोली मनापासून लावली होती, प्रफुलच्या प्रेमापोटी. प्रफुलने काढलेल्या चित्राची किंमत सामान्य बायजाला कळली होती हे मात्र पक्के. 

पुढे प्रफुलच्या नावाने ट्रस्ट करण्यात आला. यशवंत आणि बायजाने प्रफुलचा स्वतःच्या मुलासारखा सांभाळ केला.

विनोद बिडवाईक

(विनोद बिडवाईक ह्यांची सर्व पुस्तके फ्लिपकार्ट आणि बुकगंगा वर उपलब्ध आहेत.  इंग्रजी मध्ये लिहिली पुस्तके किंडल फॉरमॅट मध्ये ऍमेझॉन वर उपलब्ध आहेत.)