शनिवार, १९ जानेवारी, २०१९

स्वत:चं व्यक्तिमत्व फुलविण्यासाठी गरज आत्मपरीक्षणाची

माझ्या ओळखीची एक व्यक्ती आहे. कृश बांध्याची. अतिशय सामान्य चेहर्‍याची ही व्यक्ती आपल्या मित्रमंडळातील अतिशय प्रसिद्ध आहे. त्यांचं बाह्य व्यक्तिमत्व अतिशय सामान्य असलं, तरी ते एक यशस्वी उद्योगपती म्हणून ओळखले जातात. समोरच्या व्यक्तीला प्रभावित करण्याची कला त्यांच्याकडे आहे. ती म्हणजे त्यांचं वागणं, बोलणं.

मला इथं एवढंच सांगायचं आहे की, निव्वळ बाह्यसौंदर्य किंवा सुंदर शरीरामुळं दुसर्‍यावर प्रभाव टाकता येत नाही. तो ‘प्लस पॉइंट’ जमेची बाजू निश्‍चितच आहे; पण सर्वांनाच काही सुंदर, आकर्षक व्यक्तिमत्वाची देणगी मिळालेली नसते. पण त्यानं फारसं काही बिघडत नाही. स्वत:चं व्यक्तिमत्व तयार करणं हे आपल्या हातात आहे आणि ते अशक्य आहे, अशातली गोष्ट नाही. थोड्याशा प्रयत्नानं आपणही दुसर्‍याला प्रभावित करू शकतो.

स्वत:चं व्यक्तिमत्व कसं फुलवाल, हा प्रश्‍न नेहमीच आपल्याला सतावत असतो. कधी शरीर मार खातं, तर कधी कुठं, कसं वागावं हेच समजत नाही. म्हणूनच स्वत:चं व्यक्तित्व फुलवण्यासाठी सर्वप्रथम आपण स्वत:चं आत्मपरीक्षण करायला पाहिजे. स्वत:कडे तटस्थ दृष्टीने बघून आपणच आपल्यात सुधारणा घडवून आणू शकतो. 

आपण कसं बोलतो, यावर सुद्धा खूपसं अवलंबून असतं. ओघवत्या आणि प्रभावी; पण कमी शब्दात तुम्ही समोरच्याला कसं प्रभावित करू शकता, यावर आपल्या व्यक्तिमत्वाचा यशस्वीपणा अवलंबून असतो. असं म्हणतात की, एक छोटसं हसू खूप काही करू शकतं. आणि म्हणूनच हसरा चेहरा हा एक माणसाचा गुणधर्म व्हायला पाहिजे. उगाचच चेहरा गंभीर ठेवायचा याचा काही अर्थ नाही. हास्यात एक अशी जादू आहे की, जी अनोळखी व्यक्तीला आपलं बनवते. क्षणिक हास्याचा प्रभाव नेहमीकरता होऊ शकतो. इथं हास्य म्हणजे चेहरा प्रसन्नचित्त दिसायला हवा. चेहरा हसरा ठेवायचा म्हणजे उगाचच ‘खिदीखिदी’ करू नये.

स्वत:चं बोलणं प्रभावी करण्यासाठी अशीच भाषा वापरा जी ऐकणार्‍याला समजेल. आचार्य अत्रेंनी एकदा भाषेबद्दल लिहिलं होतं की, सुंदर शुद्ध भाषा म्हणजो बोजड आणि अलंकारीक भाषा नव्हे, तर सोपी जी एकाच प्रयत्नात समजेल ती भाषा. मग ती कशीही असो. 

सुटसुटीत शब्दप्रयोग समोरची व्यक्ती समजू शकते. बोलताना समोरची व्यक्ती कंटाळणार नाही याची काळजी घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे समोरच्याला मुर्ख समजू नका. कमी बोला; पण संयुक्तिक बोला. जर असं बोललं तर समोरची व्यक्ती प्रभावित नक्कीच होईल. 

खालील प्रश्‍नांची उत्तर सोडवून आपण स्वत:चं आत्मपरीक्षण करू शकतो.
1) आपण साध्या आणि सोप्या भाषेचा उपयोग करता?
2) आपली भाषा सहजपणे समजू शकते?
3) आपल्याला जे काही बोलायचे असते, त्याबद्दल आपण अगोदर मनात स्पष्ट केलेलं असतं?
4) आपली एखादी गोष्ट समोरच्याला जर कळली नाही, तर समोरची व्यक्ती आपल्याला नेहमी नेहमी स्पष्टीकरण मागते
5) आपण चांगलं संभाषण (चांगल्या गोष्टी) करता; पण काय चांगल्या गोष्टी आपल्याला आवडतात? (दुसर्‍यानं केलेलं चांगलं संभाषण आपल्याला आवडतं?)
6) आपल्या बोलण्याची तारीफ आपले मित्रगण करतात?
7) आपलं बोलणं दुसर्‍यावर प्रभाव टाकतं? समोरचे तुमच्याशी सहमत होतात?
8) समोरच्याने विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तर लवकर देता?
9) आपल्या स्पष्टवक्तेपणाने समोरच्याला नाराज करता?
10) आपल्या एखाद्या गोष्टीला समोरच्याने सहमती दिली नाही तर त्यांच्यावर संतापता?
11) दुसर्‍यांना समजून घेण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ देता?
12) आपली भाषा किंवा गोष्ट कोणाला समजली नाही, तर तुम्ही त्याला मंदबुद्धी समजता?
13) ऐकणारा जर आपल्याला एखादी गोष्ट पुन्हा विचारत असेल, तर आपण त्याला वेळेची बरबादी मानता?
14) काय ही खात्री बाळगता की, ऐकणारी व्यक्ती आपली गोष्ट समजू शकते?

वरीलपैकी 1, 10, 12 आणि 13 या प्रश्‍नांचं उत्तर ‘नाही’ असं असेल आणि बाकी ‘होय’ असं असेल, तर वरील प्रश्‍नांवर विचार करा. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी पाच गुण घ्या. जर आणि 40 ते 60 गुण मिळवले, तर आपलं बोलणं, बोलण्याची पद्धत चांगली आहे आणि आपण उत्कृष्ट संवादक आहात. जर 40 पेक्षा कमी गुण असतील, तर बोलणत सुधारणा घडवून आणावी.

ज्याप्रमाणे बोलण्यावर व्यक्तिमत्व अवलंबून असतं, त्याचप्रमाणं आपलं वागणं कसं आहे, हे महत्त्वाचं समजलं जातं. आपल्या वागण्यामुळं आपण आपलं महत्व वाढवू शकतो. सभ्यपणे वागलो, तर निश्‍चितच आपल्याबद्दल दुसर्‍याला आदर वाटेल. विनाकारण दुसर्‍यावर टीका करण्यातही काही अर्थ नाही. जर टीका आवश्यक असेलच, तर सर्वप्रथम त्याच्या चांगल्या कामाची प्रशंसा करा. तुमचा मोठेपणा त्यात दिसेल. जीवनात मानव संबंधाला विशेष महत्व असतं. जेवढं व्यक्तिमत्व चांगलं तेवढे तुमचे मानव संबंध चांगले राहतील. मानव संबंध या शब्दातच त्याचा अर्थ सामावलेला आहे. मा-मानव, न-नम्रता, व-वात्सल्य, सं-संस्कार, बं-बंधुता, ध-धैर्य. या गोष्टी आत्मसात केल्या की कोण तुम्हाला वाईट म्हणेल? मोठ्यांचा आदर करा, लहान्यांनाही आदरानं वागवा. कारण तुम्ही लहान व्यक्तींशी ज्या शब्दात बोलाल त्या शब्दात ती व्यक्ती उत्तर देईल.

वागणं आणि बोलणं या बरोबरीनंच प्रभावी निर्णयक्षमता हा व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे. यात प्रसंगावधान, हजरजबाबीपणा या गोष्टी येतात. 

जेवढ्या प्रभावीपणे एखादा निर्णय आपण घेऊ, तेवढं आपल्या फायद्याचं असतं. आणि तो निर्णय पूर्ण विचारांती असावा. व्यक्तिमत्व बांधणीचे हे काही फॉर्म्युले. व्यक्तिमत्व बांधणी हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. व्यक्तिमत्व विकासात विद्या, वीरता, बुद्धी, साहस, शक्ती आणि साहस किंवा धैर्य हे गुण महत्त्वाचे ठरतात आणि ते माणसाचे खरे आणि नैसर्गिक मित्र आहेत. त्यांची संगत सोडूच नये. संकटकाळात त्यांच्या मदतीने आपण यशस्वी होऊ शकू. शेवटी स्वत:चं व्यक्तिमत्व हे समाजाचं व्यक्तिमत्व घडवत असतं आणि अर्थातच देशाचंही.

विनोद बिडवाईक

सोमवार, १४ जानेवारी, २०१९

तरुणांच्या भावविश्‍वाचा विचार कोण करणार?

बदलत्या राजकीय, सामाजिक आणि एकंदरीत सर्वच क्षेत्रांत तरुणांच्या सहभागाबद्दल काही प्रश्‍नचिन्ह आहेत. ‘स्टार जनरेशन’, ‘झी जनरेशन’, फोर-जी जनरेशन’ आणि एकंदर पाश्‍चात्य जगताचा प्रभाव आणि वाढलेला उपभोगवाद या सर्व पार्श्‍वभूमीवर तरुणांच्या मानसिकतेचा प्रश्‍न थोडा गोंधळात टाकणारा आहे. जनरेशन गॅप आणि अचानक बदलणार्‍या परिस्थितीशी जुळवून घेताना तरुणांना प्रश्‍न असू शकतात? त्याहूनही तरुणांच्या भावनांना किती महत्त्व असू शकते, अशी कितीतरी वाजवी कधीकधी अवाजवी असे प्रश्‍न आपल्या समोर थैमान घालू शकतात.


बदलते सामाजिक संदर्भ तर एवढ्या झपाट्याने बदलतात की, परिस्थितीशी जुळवताना त्रेधातिरपीट उडते. ती परिस्थिती आजच्या तरुणाची मानसिकता अधिकच गोंधळात करून टाकते.

माणुसकी  लयास जात असताना या सर्व गोष्टींचा विचार डोक्यावर भयानक दडपण घेऊन येतो. तरुणांच्या हसण्या-बोलण्यावर आणि एकंदरीत वागणुकीवर टीका नेहमीचीच. ‘शराबी’ चित्रपटातील एक प्रसंग आठवतो. त्यात अमिताभ बच्चनचा एक डायलॉग आहे. अमिताभच्या दारुडेपणाची आणि हसण्याची टिंगल जेव्हा त्याचा बाप प्राण करतो, त्या वेळेस अमिताभ खास त्याच्या अंदाजात सांगतो, ‘डॅडी, शराब की बोतल पर तो मेरा लेबल आपनेही चिपका दिया है। रही बात हँसी की, तो जिंदगी में मै कभी हँसा नही हूँ। मै तो यह हँसी के कहकहे लगा रहा था। आप जैसे लोगो के हँसीपर...’

मला वाटतं आयुष्यात सकारात्मक जगतानाही कोठेतरी एक बोच असते. ती बोच, ते शल्य हृदयाला कोठेतरी टोचत असतं. दातात अडकलेल सुपारीच्या टुकड्यासारखं. किंवा कधीकधी अश्‍वत्थाम्याच्या कपाळावरील जखमेसारखं. अशा वेळेस सुखाचे एक-दोन क्षण वाट्याला आले तरी ते शल्य राहतच.

प्रत्येकाची स्वत:ची स्वप्ननगरी असते. स्वत:च तयार केलेली स्वभावानुसार आणि आपापल्या दृष्टीकोनानुसार ती ‘डेव्हलप’ केलेली असते. लहान मुलांच्या परीकथेसारखी ती नसतेच; पण कधीकधी जवळ जाणारी असते. या स्वप्ननगरीचा प्रवास करताना किती पालक तरुणांच्या भावनांचा विचार करतात? मुलाने डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावं आणि आता तर एखाद्या मोठ्या कंपनीत मॅनेजर व्हावं, अशी अपेक्षा बाळगताना किती पालक स्वत:चं बालपण, तरुणपण आठवतात? प्रश्‍न बोचरा आहे. त्यापेक्षा विचार करायला लावणारा आहे.
जगताना टप्प्याटप्प्यावर अनेक दडपणांना सामोरे जाताना कोठेतरी काहीतरी हरवल्याची जाणीव होत असते. काही जणांना काय हरवलं, हे स्पष्टपणे उमजतही नाही.  'Something is lacking'  ही जाणीव हूरहूर वाढवून जाते.

मुखवटे लावून शेवटी मुखवटाच स्वत:ची ओळख बनून जातो आणि या अशा वयात तर मुखवटे चळवताना कित्येक मुखवटे चढवावे लागतात. ते मुखवटे चढवताना आणि उतरवताना जी दमछाक होते, तीच जीवघेणी ठरते. आणि मग अजूनच गोंधळायला होतं.
अर्थात हा गोंधळ कोणी गंभीरपणे घेतो, कोणी नाही; पण कालची परिस्थिती आज बदलताना माणसाला त्या परिस्थितीशी जुळवून घेताना काय अवस्था होत असेल?

तरुणांच्या वाढत्या आत्महत्या, व्यसनाधिनता, मानसिक संतुलन, नैराश्य, गुन्हेगारी या गोष्टी कशाचा परिपाक आहेत? याचा विचार सामाजिक अभ्यासकांशिवाय कोणी केलाय? आपल्या पाल्याची/मुलांची जबाबदारी म्हणजे निव्वळ त्यांचं ‘करिअर डेव्हलप’ करण्यापर्यंतच मर्यादित आहे का? त्यांच्या ‘भावविश्‍वा’चा विचार करण्याची गरज नाही वाटत? मला वाटतं, आत्ताच्या सामाजिक गंभीर परिस्थितीला केवळ ही भावनाच कारणीभूत आहे. आई-वडिलांमधला, त्यांचा त्यांच्या मुला-मुलींमधला संवाद कोठेतरी खुंटला आहे आणि विश्‍वासही उडत चालला आहे.

ही जी ‘वेव्हलेन्थ’ आहे, ती कोठेतरी बाधित झालेली आहे. संवाद कोठेतरी तुटत चाललाय. तो संपूर्ण तुटायच्या आधी पुन्हा सांभाळून तो साधायला हवा/ प्रगल्भतेची अपेक्षा करताना आपण कोठे आहोत, याचाही विचार करणे आवश्यक आहे.

स्वत:च्या मर्यादित जगापासून पुढे जायला हवं. स्वत:भोवती विणलेला कोष तोडायला हवा. कोणीतरी कोठेतरी हे समजायला हवं. तरुणांच्या भावविश्‍वाचा विचार करणारं कोणीतरी हवं.

विनोद बिडवाईक

गुरुवार, ३ जानेवारी, २०१९

संकल्प सोडण्याची कहाणी

नवीन वर्षाची चाहुल लागली की खूपदा संकल्प सोडायला सुरुवात होते. तुम्हीही यंदा काहीतरी ‘संकल्प’ सोडलाच असणार! नवीन म्हणजे तसे जुनेच संकल्प तडीस नेण्याचा संकल्प आपल्याकडून नेहमीच ‘सोडण्यात’ येतो. ‘संकल्प सोडणे’ हा माझ्या मते एक ‘गंभीर विनोद’ (?) आहे. नवीन वर्षात काहीतरी ‘ठरवणे’ म्हणजे ‘संकल्प’ असं सरळसोट स्पष्टीकरण देता आलं असलं, तरी माझ्या मते संकल्प हे दुसर्‍या अर्थानेच ‘सोडून दिले’ जातात. नवीन वर्ष सुरू होऊन एक-दोन दिवस उलटल्यानंतर आपण ‘सोडलेला’ संकल्प आपल्या अंतर्मनाने केव्हाच ‘सोडून’ दिल्याची आपल्याला जाणीव होते.

Related image

माझंही नेमकं तसंच की, मी दर वर्षी काही ना काही ‘संकल्प सोडतो’. तसा माझा हेतू प्रामाणिक असतो. या संकल्पांची यादीही मोठी देता येईल. उदा. सकाळी दररोज लवकर उठणे, व्यायाम करणे, दररोज काहीतरी लिहित रहावे, रोज रात्री दैनंदिनी (डायरी) लिहिणे वगैरे.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सकाळीच उठण्याची पाळी येते तेव्हा ‘आज आणि उद्या’ म्हणून वेळ मारून न्यावी लागते. हा ‘उद्या’ नंतर कधीच येत नाही. अर्थात हे सांगणे न लागे. असो, माझं डायरी प्रकरणही अगदी असंच आहे. डायरी म्हटल्यावर नको त्या माणसांची नावे समोर येत असली, तरी या दिग्गजांच्या (?) कर्माशी माझ्या डायरीचा संबंध नाही. पण तरीही हे डायरी प्रकरण माझ्या जिव्हाळ्याचं आहे. म्हणूनच नववर्षात नियमित डायरी लिहावी, हा संकल्प मी दर वर्षी नेमाने सोडत आलो आहे आणि अजूनतरी मी नियमित डायरी लिहू शकेन याची मलाही खात्री नाही.

एक जानेवारीला नवीन वर्षाच्या स्वागताच्या धुंदीत (नाही, मी 31 डिसेंबर साजरा करत नाही. माझी धुंदी वेगळी...) मी डायरी लिहिण्याचं चक्क विसरून जातो. डायर्‍या या विकत घेण्यासाठी नसतात. त्या एकतर भेट मिळतात किंवा मिळवाव्या लागतात. पण तरीही मी डिसेंबर महिन्यात एखादी सुंदर, सुबक डायरी विकत घेतो. त्यात नेमकं काय लिहायचं ते सूचतच नाही. शेवटी काय, डायरी नियमित लिहिण्याचा संकल्प अधुराच राहतो. पण त्या डायरीच्या पानांचा उपयोग, दर महिन्याच्या किराणा सामानाची यादी आणि जमा-खर्च लिहायला घरच्यांना मात्र नक्की होतो.

सर्व संकल्पांचं असंच होतं. तसं बघितल्यास 31 डिसेंबरला वर्ष संपतं, असं मानणं चुकीचंच म्हणावं लागेल. कारण आर्थिक वर्ष 31 मार्चला संपतं. मराठी वर्ष गुढीपाडव्याला सुरू होतं. आपला स्वत:चा वाढदिवस असतो, त्या दिवशी आपण नव्या वर्षात प्रवेश केलेला असतो. म्हणून एक जानेवारीपासून नवीन वर्ष सुरू होतं, असं मानणं तात्विकदृष्ट्या बरोबर नाही. तरीही पाश्‍चात्यांच्या पद्धती आपण स्वीकारल्या. हे नववर्षाचंही तसंच. हा प्रकार खूपदा हास्यास्पद वाटतो. मी हे करणार किंवा ते करणार नाही, असं ठरवणं आणि तडीस नेणं हे मनाच्या तयारीवर आहे.

मानसिकदृष्ट्या आपण कितीही हे संकल्प सोडण्यासाठी तयार असलो, तरी हे शक्य असतं का? आणि जर काहीतरी करायचं हे मनाने पक्क ठरवलं असेलच, तर मग एखाद्या मुहुर्ताची तरी काय गरज? 

31 डिसेंबर साजरा करण्यामागे थोडी वेगळी मानसिकता असावी. मनुष्य आपला आनंद आणि दु:खही साजरा करतो तो विशिष्ट प्रकारे. काही महाभाग मनसोक्त दारू पिऊन 31 डिसेंबर आनंद साजरा करतात आणि दु:ख विसरण्याचा प्रयत्न करतात. वर्षभरात मिळालेला आनंद आणि दु:ख हे असं दारूच्या ग्लासासोबत ‘शेअर’ केलं जात असेल, तर मग नववर्षाच्या पूर्वसंध्येला नवीन वर्षात काय करायचं? जेणेकरून आनंद मिळेल आणि काय करू नये, ज्यामुळे दु:ख वाट्याला येणार नाही. या कारणांसाठी संकल्प सोडले जात असावेत; पण माझ्या मते हे संकल्प अशा प्रकारे सोडणे एक औपचारिकताच आहे. तरीही सवयीने आपण एकमेकाला शुभेच्छा देतो आणि आपण स्वत:साठीही काहीतरी देवाकडे मागत असतो. म्हणूनच एखादं ध्येय पूर्ण करण्यासाठी संकल्प सोडला असेल, तर आपल्या मनाशी ठाम निश्‍चय करून तो संकल्प तडीस नेणे आवश्यकच. तर मग करा मनाची तयारी आणि तडीस न्या आपला संकल्प...


विनोद बिडवाईक