सोमवार, १४ जानेवारी, २०१९

तरुणांच्या भावविश्‍वाचा विचार कोण करणार?

बदलत्या राजकीय, सामाजिक आणि एकंदरीत सर्वच क्षेत्रांत तरुणांच्या सहभागाबद्दल काही प्रश्‍नचिन्ह आहेत. ‘स्टार जनरेशन’, ‘झी जनरेशन’, फोर-जी जनरेशन’ आणि एकंदर पाश्‍चात्य जगताचा प्रभाव आणि वाढलेला उपभोगवाद या सर्व पार्श्‍वभूमीवर तरुणांच्या मानसिकतेचा प्रश्‍न थोडा गोंधळात टाकणारा आहे. जनरेशन गॅप आणि अचानक बदलणार्‍या परिस्थितीशी जुळवून घेताना तरुणांना प्रश्‍न असू शकतात? त्याहूनही तरुणांच्या भावनांना किती महत्त्व असू शकते, अशी कितीतरी वाजवी कधीकधी अवाजवी असे प्रश्‍न आपल्या समोर थैमान घालू शकतात.


बदलते सामाजिक संदर्भ तर एवढ्या झपाट्याने बदलतात की, परिस्थितीशी जुळवताना त्रेधातिरपीट उडते. ती परिस्थिती आजच्या तरुणाची मानसिकता अधिकच गोंधळात करून टाकते.

माणुसकी  लयास जात असताना या सर्व गोष्टींचा विचार डोक्यावर भयानक दडपण घेऊन येतो. तरुणांच्या हसण्या-बोलण्यावर आणि एकंदरीत वागणुकीवर टीका नेहमीचीच. ‘शराबी’ चित्रपटातील एक प्रसंग आठवतो. त्यात अमिताभ बच्चनचा एक डायलॉग आहे. अमिताभच्या दारुडेपणाची आणि हसण्याची टिंगल जेव्हा त्याचा बाप प्राण करतो, त्या वेळेस अमिताभ खास त्याच्या अंदाजात सांगतो, ‘डॅडी, शराब की बोतल पर तो मेरा लेबल आपनेही चिपका दिया है। रही बात हँसी की, तो जिंदगी में मै कभी हँसा नही हूँ। मै तो यह हँसी के कहकहे लगा रहा था। आप जैसे लोगो के हँसीपर...’

मला वाटतं आयुष्यात सकारात्मक जगतानाही कोठेतरी एक बोच असते. ती बोच, ते शल्य हृदयाला कोठेतरी टोचत असतं. दातात अडकलेल सुपारीच्या टुकड्यासारखं. किंवा कधीकधी अश्‍वत्थाम्याच्या कपाळावरील जखमेसारखं. अशा वेळेस सुखाचे एक-दोन क्षण वाट्याला आले तरी ते शल्य राहतच.

प्रत्येकाची स्वत:ची स्वप्ननगरी असते. स्वत:च तयार केलेली स्वभावानुसार आणि आपापल्या दृष्टीकोनानुसार ती ‘डेव्हलप’ केलेली असते. लहान मुलांच्या परीकथेसारखी ती नसतेच; पण कधीकधी जवळ जाणारी असते. या स्वप्ननगरीचा प्रवास करताना किती पालक तरुणांच्या भावनांचा विचार करतात? मुलाने डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावं आणि आता तर एखाद्या मोठ्या कंपनीत मॅनेजर व्हावं, अशी अपेक्षा बाळगताना किती पालक स्वत:चं बालपण, तरुणपण आठवतात? प्रश्‍न बोचरा आहे. त्यापेक्षा विचार करायला लावणारा आहे.
जगताना टप्प्याटप्प्यावर अनेक दडपणांना सामोरे जाताना कोठेतरी काहीतरी हरवल्याची जाणीव होत असते. काही जणांना काय हरवलं, हे स्पष्टपणे उमजतही नाही.  'Something is lacking'  ही जाणीव हूरहूर वाढवून जाते.

मुखवटे लावून शेवटी मुखवटाच स्वत:ची ओळख बनून जातो आणि या अशा वयात तर मुखवटे चळवताना कित्येक मुखवटे चढवावे लागतात. ते मुखवटे चढवताना आणि उतरवताना जी दमछाक होते, तीच जीवघेणी ठरते. आणि मग अजूनच गोंधळायला होतं.
अर्थात हा गोंधळ कोणी गंभीरपणे घेतो, कोणी नाही; पण कालची परिस्थिती आज बदलताना माणसाला त्या परिस्थितीशी जुळवून घेताना काय अवस्था होत असेल?

तरुणांच्या वाढत्या आत्महत्या, व्यसनाधिनता, मानसिक संतुलन, नैराश्य, गुन्हेगारी या गोष्टी कशाचा परिपाक आहेत? याचा विचार सामाजिक अभ्यासकांशिवाय कोणी केलाय? आपल्या पाल्याची/मुलांची जबाबदारी म्हणजे निव्वळ त्यांचं ‘करिअर डेव्हलप’ करण्यापर्यंतच मर्यादित आहे का? त्यांच्या ‘भावविश्‍वा’चा विचार करण्याची गरज नाही वाटत? मला वाटतं, आत्ताच्या सामाजिक गंभीर परिस्थितीला केवळ ही भावनाच कारणीभूत आहे. आई-वडिलांमधला, त्यांचा त्यांच्या मुला-मुलींमधला संवाद कोठेतरी खुंटला आहे आणि विश्‍वासही उडत चालला आहे.

ही जी ‘वेव्हलेन्थ’ आहे, ती कोठेतरी बाधित झालेली आहे. संवाद कोठेतरी तुटत चाललाय. तो संपूर्ण तुटायच्या आधी पुन्हा सांभाळून तो साधायला हवा/ प्रगल्भतेची अपेक्षा करताना आपण कोठे आहोत, याचाही विचार करणे आवश्यक आहे.

स्वत:च्या मर्यादित जगापासून पुढे जायला हवं. स्वत:भोवती विणलेला कोष तोडायला हवा. कोणीतरी कोठेतरी हे समजायला हवं. तरुणांच्या भावविश्‍वाचा विचार करणारं कोणीतरी हवं.

विनोद बिडवाईक

1 टिप्पणी: