सोमवार, २९ ऑक्टोबर, २०१८

प्रेक्षक आणि चित्रपट

चित्रपटांचा पूर्वीपासून मानवी मनाशी तेवढाच नातेसंबंध आहे, जेवढा आता आहे. कल्पनाविलास, अतिशयोक्ती, स्वप्नरंजन या पायांवर उभी असणारी ही मायावी दुनिया प्रत्येकाची पहिली आवड आहे. आता प्रत्येकाची आवड कोणत्या प्रकारची हा दुय्यम भाग. पण तरीही कधी कधी मला प्रश्‍न पडतो की, मनोरंजनाचे साधन प्रभावीपणे आपलं मनोरंजन करता करता थांबलं तर?

सामान्य माणूस आपलं रूपडं या जगात शोधण्याचा प्रयत्न करतो. हिरो आणि हिरोईनच्या जागी स्वतःला इमॅजिन करून स्वतः त्या स्वप्नरंजनात रंगून जातो. मुकपटानंतर बोलपटांचा जमाना आला. पात्रांना शब्द मिळाले. तंत्र प्रगत होत गेलं. तशी भावनांनाही उत्कटता लाभू लागली. थिएटरात पडणार्‍या टाळ्या आणि शिव्या या उत्कट भावनांचा अविष्कार आणि दाद असतात. समाजात दुष्ट आणि सुष्ट दोन्ही प्रवृत्तीच्या व्यक्ती असतात. त्याच प्रवृत्ती चित्रपटांतून पात्र म्हणून येतात. नायक-खलनायकांचा संघर्ष हा यातलाच. फक्त अतिशयोक्ती आणि संघर्ष त्यात अमाप असतो.


नायक, खलनायक, नायिका, चरित्र अभिनेते यांच्या जोडीला गाणी, उत्कृष्ट कथासूत्र आणि या सर्व गोष्टींना एका सूत्रात गुंफणारा दिग्दर्शक या सर्वांच्या परिश्रमातून चित्रपट जन्माला येतो. एक चित्रपट समीक्षक आणि काही मोजके चोखंदळ प्रेक्षक, चाहते सोडले तर सामान्य माणसांना काय लागते. तो अभिनय आणि दिग्दर्शनावर बोलत नाही. हिरो-हिरोइनच्या तोंडी असणारे डायलॉग त्याला भावतात. दिग्दर्शन काय असतं, त्यांना काहीही घेणं नसतं. त्यांना हवी असते फक्त तीन तासांची करमणूक. विचार करायला लावणारी पटकथा. थोडक्यात बोअर न होणारी कहाणी. त्यात संघर्ष, फोडणीला गाणी आली की, मग तो त्या चित्रपटात गुंतून जातो. तेव्हा ही कहाणी कोणती आहे, याचा विचार तो करत नाही. तसं असतं, तर पडद्यावर कित्येकदा येणार्‍या त्याच त्याच प्रेमकहाण्या त्यांनी नाकारल्या असत्या? त्याच बाटलीत नवी दारू किंवा जुन्या बाटलीत रंग बदलून पेश केलेली शराब. यात फारसा फरक नसतो.

एका प्रसिद्ध समीक्षकला मी एक प्रश्‍न विचारला होता. उत्कृष्ट समीक्षा लाभलेला चित्रपट चालेलच असं नाही. माझा प्रश्‍न होता सामान्य चित्रपट चाहता या समीक्षा कितपत वाचतो किंवा त्यांना भाव देतो? तेव्हा त्या समीक्षकानं मोठ उत्तर दिलं होतं. ‘चित्रपट पाहणारे तीन प्रकारचे असतात. जे समीक्षा वाचून चित्रपट बघतात आणि समीक्षा चांगली असली म्हणजे कितीही फालतू चित्रपट असला, तरी त्यांना तो चांगला वाटतो. थोडक्यात समीक्षेवरून स्वतःचं मत बनवणारी नवउच्चवर्गीय मंडळी, सो कॉल्ड तथाकथित उच्च मध्यमवर्गीय मंडळी, दोन चित्रपट बघितल्यानंतर स्वतःचं मत बनवणारी ही खरी चोखंदळ आणि चित्रपट, दिग्दर्शन यावर वगैरे चर्चा करणारी मंडळी. आणि तिसरी म्हणजे जे कोणतेही चित्रपट बिनधास्तपणे एन्जॉय करणारी. बहुतांश मंडळी तिसर्‍या कॅटेगरीत मोडतात आणि चित्रपट चालवणारी किंवा पाडणारी हीच मंडळी असतात. तसं नसतं तर प्रत्येक फालतू दिग्दर्शकाचा पिक्चर एक दिवसही चालला नसता. उदाहरण घ्यायचे झाले तर ‘कुली नंबर 1’ वगैरे अशा चित्रपटांची द्यावी लागतील. डेव्हीड धवनला उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणण्याचं धाडस मी करणार नाही. याउलट केतन मेहता, श्याम बेनेगल यांची चित्रपट खूप चालली असती. या सर्व गोष्टींचा सांगोपांग विचार केलाच तर प्रेक्षकांना नेमकं काय आवडतं? एक हिरो, एक हिरोईन, पन्नास टक्के प्रेम, सुराई खलनायक आणि संघर्ष. चटपटीत किंवा झणझणीत संवाद आणि गुणगुणवणारी किंवा थिरकायला लावणारी गाणी. एवढं करूनही पिक्चर यशस्वी होतीलच याची शाश्‍वती नाही!

प्रेक्षकांचं विभाजन हाही चित्रपटांच्या यशस्वीतेवर परिणाम करतो. ग्रामीण भागात किंवा शहरी भागात चालणारे पिक्चर्स त्याचे विभाजन होतं ते आश्‍चर्यकारक आहे. ‘अंदाज अपना अपना’ किंवा ‘हम है राही प्यार के’ हे दोन चित्रपट ग्रामीण भागात किंवा विशिष्ट भागात मुळीच चालले नाहीत. याउलट शहरी आणि नागरी संस्कृतीत हे चित्रपट धंदा करून गेले. याउलट सध्याच्या काळातील दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा अनेक पुरस्कारप्राप्त चित्रपट ‘फँड्री’, भाऊसाहेब कर्‍हाडेचा अनेक पुरस्कारप्राप्त चित्रपट ‘ख्वाडा’, ‘बबन’ यांसारखे कित्येक चित्रपट ग्रामीण प्रेक्षकांनी स्वीकारले, तेवढे ते शहरी लोकांना मानवले नाहीत.

महाराष्ट्र (विशेष करून पश्‍चिम महाराष्ट्र) केरळ, गुजरात या राज्यातील पिक्चर्स बघणारी मंडळी आणि यूपी, बिहारी या रेटारेटीत येणारे चित्रपट आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद यावरून प्रेक्षकांचं विभाजन त्या-त्या विभागानुसार, प्रगल्भतेच्या चोखंदळपणानुसार होतं, हे मानावच लागतं.

चित्रपट येतात आणि जातात, परंतु मनात रुतून बसणारे चित्रपट फारच कमी असतात. कमालीचा चित्रपट शौकीन असणार्‍या एका मित्राला त्याचा आवडणारा चित्रपट विचारलं. तो म्हणाला, ‘हम आपके है कौन.’ शिवाय त्याच्या मते सर्व चित्रपट फालतू होते.

सामान्य प्रेक्षकांना काय लागतं याचा विचार या लेखात केला गेला असला, तरीही ते ‘डिफाईन’ करणं सोपं आहे. पण काहीही असो दोन-तीन घटका करमणूक देणारी ‘मायावी दुनिया’ तुम्हा सर्वांना दुर्दम्य आशावाद शिकवते, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती होणार नाही.


विनोद बिडवाईक

रविवार, २८ ऑक्टोबर, २०१८

एकेकाचं स्वप्न

खूप दिवसांनी माझी त्याच्याशी भेट झाली. त्याचा अवतार बघून मला आश्‍चर्य वाटलं, अर्थात कॉलेजमध्ये ‘हँडसम’ या सदरात मोडणारा तो आता बेढब झाला होता. जरा ‘गोलमटोल’ झाला होता आणि नेहमी हसरा असणारा त्याचा चेहरा, आता एरंडाचे तेल प्यायलेल्या व्यक्तीसारखा दिसत होता. खूप दिवसांपासून भेट नसल्यामुळे आम्ही अगदी गळाभेट घेऊन भेटलो. गळ्यात अडकवलेला त्याचा टाय ओढत मी त्याला विचारलं, ‘काय म्हणते लाइफ?’. तो हताशपणे हसला.
‘नथिंग स्पेशल, अ‍ॅज युज्वल’

आयुष्याचा प्रत्येक दिवस नव्या आशा, नव्या गोष्टी, नवे स्वप्न घेऊन येतो, असं मत असणार्‍याच्या आयुष्याबद्दलचं असं उत्तर ऐकून मी चकीत झालो.

आम्ही दोघे लहानपणापासूनचे मित्र होतो. आयुष्यातील अनेक स्वप्ने, दिवा स्वप्ने एकमेकांच्या सोबतीने रंगवली होती. त्याचं एक मोठं स्वप्न होतं. शाळेमध्ये असताना त्याला डॉक्टर व्हावं असं वाटायचं; पण तो डॉक्टर होऊ शकला नाही. नंतर बीएसस्सीला अ‍ॅडमिशन घेतल्यावर एक शास्त्रज्ञ व्हावं, असं त्याला वाटत राहायचं. पण तो शास्त्रज्ञच काय साधा तंत्रज्ञही झाला नाही. पुढे त्याला आयुष्यात स्वतःची केमिकलची फॅक्टरी टाकावी, असं खूप दिवसांपर्यंत वाटायचं. आता तो एका औषधी कंपनीचा प्रतिनिधी आहे. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. पैसा चांगला कमावतो; पण आयुष्याची स्वप्नं आता तो बघत नसावा.

‘बरं, तू लग्न कधी करणार आहेस?’
‘लग्न ? सध्या विचार नाही यार...’ 

त्याने तुटकपणे उत्तर दिलं. स्वतःच्या आयुष्याबद्दल बिनधास्तपणे आणि रोमँटिक मतं देणारा हा प्राणी एवढा रुक्ष कसा झाला, याचंच मला आश्‍चर्य वाटलं. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह या आपल्याला जगातील सर्वात जास्त ज्ञान आहे, असं समजणारा प्राणी असतो. स्वतःचं मोठेपण सांगणारी आणि मार्केटिंग संपूर्णपणे कोळून प्यायल्याचा समज असणारी ही मंडळी ‘एक्स्ट्रॉऑर्डनरी’ असतात. असा त्यांचाच समज असतो. नेहमी इंग्रजीचा वापर केल्यामुळे ते आपला प्रभाव टाकतात. माणसाला बोलतं करण्यासाठी त्यांचा ‘इगो’ सुखवावा लागतो. मी त्याच्या व्यवसायाबद्दल सुरुवात केली, तसा तो खुलला आणि मग त्याची रसवंती सुरू झाली.

‘यार....आयुष्यात तुला डॉक्टर व्हायचं होतं मग आता एखाद्या डॉक्टरकडे गेल्यावर मनात एखादी खंत नाही येत?’  मी त्याला विचारलं.
‘या डॉक्टर लोकांना फारसा सेन्स नसतो. डोळ्यावर झापडं लावून जगणारी माणसं असतात ही. कधी कधी वाटतं आपण डॉक्टर झालो असतो तर एखादी मशिन झालो असतो.’
‘असतो पण तरीही...’
‘यू आर राईट, काही डॉक्टर्स एकदम मठ्ठ असतात रे. साधे लायसन्स कोर्स केलेले तथाकथित डॉक्टर्स नावापुढे तज्ज्ञ वगैरे लावतात आणि सामान्य माणसांकडून पैसे उकळतात. तेव्हा आपणही एखादी RMP डिग्री घेऊन बक्कळ पैसा कमावू शकलो असतो असं वाटतं.’
नोकरीच्या निमित्ताने तो खेडोपाडी फिरत असतो. त्याचं डॉक्टर्स मंडळींबद्दलचं निरीक्षण अगदी बरोबर होतं. एमडी सर्जन ते एलइईएच किंवा RMP डॉक्टरांना तो रोज भेटत असतो. तो त्याच्या नोकरीचा भाग असतो. त्यामुळे प्रत्येक डिग्रीहोल्डर डॉक्टरचं स्वभावविश्‍लेषण मस्तपैकी करतो.

‘कधी कधी वाटतं, यार डॉक्टर झालो नाही, ते बरं झालं. काही डॉक्टर्स चांगले असतात. एमबीबीएस, बीएएमएस, बीएचएमएस डॉक्टर्स स्वतःचं काहीतरी टॅलेंट दाखवतात. त्यांच्या बोलण्या, वागण्यात एक प्रकारचा आगाऊपणा असला तरी त्यातही थोडेफार मॅनर्स असतात. बाकी काही अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले आणि निव्वळ पैशांच्या मागे धावणारे डॉक्टर्सही आहेत.’

 त्याने एक लायसन्स कोर्स केलेल्या आणि स्वतःचं मोठ्ठं हॉस्पिटल बांधलेल्या डॉक्टरचा किस्सा सांगितला.

‘एका खेड्यातील गरीब बाई एका छोट्याशा बाळाला घेऊन आली. डॉक्टरांनी चेकअप वगैरे केलं. गॅस ट्रबल, अ‍ॅडमिट करावं लागेलं. एवढं बोलून त्या मुलाला अ‍ॅडमिट करणं किती आवश्यक आहे, हे समजून सांगितलं. बिचारी अडाणी बाई घाबरली. मुलाला अ‍ॅडमिट करायला तयार झाली.’ 

प्रत्येकाची आपल्या व्यवसायाची गुपित असतात. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आणि डॉक्टर यांचे संबंध नाहीत दोघांसाठी आवश्यक? एक डॉक्टर एका संस्थेच्या निमित्ताने फॉरेन टूरवर जाऊन आले (त्यांच्या भाषेत फोरेन) आणि इकडे पेशंटला ‘मी रिसर्चसाठी गेलो होतो,’ असं सांगतात. ‘धड इंग्रजीही बोलता येत नाही आणि तेथे काय रिसर्च करणार?’ मित्राचा प्रश्‍न.

‘तू डॉक्टर झाला नसला तरी त्याच क्षेत्रात पडलासी की, इनडायरेक्टली,’ मी.
‘पूर्ण आयुष्य येथे घालवायची इच्छा नाही. ही बॅग बघूनच लोकं नाव ठेवतात. त्यात एखाद्या डॉक्टरची मर्जी सांभाळा. वरून मॅनेजर टार्गेट पूर्ण करण्यासाठी शिव्या घालणार. काही केलं तरी पैसा, नाही केलं तरी पैसा, पण समाधान नाही.’ तो खिन्नपणे हसला. त्याच्या डोळ्यात चमक दिसली. तो अचानक बोलला.
‘विन्या, आठवतं माझं एक स्वप्न बाकी आहे.’
‘कोणतं?’
‘फॅक्टरी ओनर बनण्याचं. एक छोटीसी फार्मस्युटीकल कंपनीचा प्रोजेक्ट टाकण्याचं.’ एवढं बोलून त्याने स्वतःचे भावी प्लॅन्स् सांगायला सुरुवात केली.


विनोद बिडवाईक


शुक्रवार, २६ ऑक्टोबर, २०१८

संशयकल्लोळ

‘तू माझ्यावर संशय घेतोस,’ ती संतापाने बोलली आणि तेथेच ठिणगी पडली. एकमेकाला समजावून घेण्याचा दावा करणारे दोघेही घसरले. खूप दिवसांपासून जपून ठेवलेल्या स्वप्नांना काजळी लागली. ती त्याला नेहमी ‘मी तुला शंभर टक्के समजावून घेतलं,’ अशा शब्दांत दिलासा द्यायची. पण वरील वाक्याने घोटाळा केला आणि त्याच्या विश्‍वासाला आणि प्रेमाला तडा गेल्याचं त्याला वाटायला लागलं.

कधी-कधी माणूस खूपच अपेक्षा ठेवतो. एवढ्या अपेक्षा तो स्वतःबद्दलही ठेवत नाही. तिचं प्रेम विशुद्ध होतं हे त्याला माहीत होतं. तिच्यावरचं त्याचं प्रेमही वादातीत होतं. आयुष्यात त्याने स्वतःवर जेवढा विश्‍वास ठेवला नव्हता, तेवढा विश्‍वास तिच्यावर त्याने टाकला होता. म्हणून जेव्हा तिने त्याला अशा पद्धतीने डिवचलं, तेव्हा त्याची प्रतिक्रिया अपेक्षित अशीच होती. तो चरफडला, संतापला, स्वतःवरच. त्याच्या प्रेमाचा आणि विश्‍वासाचा अतिशय वाईट पद्धतीने अपमान झाला असं त्याचं मत झालं.

Related image

मग ती त्याच्या भावनाच अशा पद्धतीने तुडवत आहे, असा त्याचा समज झाल्यावर संबंधात निर्माण होणारी कटुता कोण दूर करणार? त्याला जाणवलं, आपण आयुष्यात जी चूक केली नाही ती येथे केलीय. ती त्यांच्या जीवनाची जोडीदारीण झालीय. याचा अर्थ तिचं स्वातंत्र्य आपण हिरावून घेऊ शकतं नाही. तिचा स्वभाव हा तिच्या वयाच्या शून्य वर्षांपासून तिचा सोबती आहे. आपण तर तिच्या आयुष्यात जेमतेम काही दिवसांपासून प्रवेश केला आहे. त्यामुळे आपण सांगतो तसंच तिने वागावं ही अपेक्षा करणंच चूक होतं.
दुसर्‍या बाजूने ती प्रत्येक गोष्ट मनावर घ्यायची. कदाचित ती चुकून संतापली असेन; पण ती तिच्या मनात उमटलेली उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती.

प्रेम हे काचेसारखं असतं. आयुष्यात जगताना या प्रेमावरच जगाची, जगण्याची भिस्त असते. प्रेमाला थोडाफार जरी तडा गेला की संपलं. संबंधातली कमतरता ती नंतर-नंतर जाणवायला लागते. प्रेमाच्या नात्याने एकमेकांवरचा हक्क हा गृहीतच असतो, येथे तिने त्याला अशा पद्धतीने बोलायला नको होतं, हे त्याला मात्र राहून-राहून वाटायला लागलं.

तिच्या मनात भविष्यातही असा प्रश्‍न उभा राहणार नाही याची खात्री काय? या विचाराने त्यांचं डोकं बधिर झालं. तो संवेदनशील असल्यामुळे तिचं हे बोलणं त्याने गंभीरपणे मनावर घेतलं. तिच्या प्रेमाबद्दल त्याच्या मनात शंका नव्हती; पण प्रेमाला संशयाचं ग्रहण लागलं की मग वाद वाढतात. संबंधात कटुतेचं बीज पेरलं जातं. त्याने तिच्यावर संशय घेतला नव्हताच. कारण त्याचा तिच्यावर असणारा विश्‍वास. त्यामुळे आपला विश्‍वासच पुराने दुथडी भरणार्‍या वाहत्या नदीतील भोवर्‍यात सापडला आहे, असं त्याला वाटायला लागलं. प्रेमाचा पाया हा विश्‍वासावरच मजबूत होत असतो. त्या विश्‍वासालाच तडा गेला की प्रेम हे पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडतं. 

तिला आपण हे उगाचच बोललो असं राहून-राहून वाटायला लागलं. तिला पश्‍चाताप व्हायला लागला; पण तिच्या मनात यायलाच नको असं त्याचं मत होतं. त्याला दोन-तीन दिवसांपूर्वीचा किस्सा आठवला.
‘तुझे माझ्याकडे लक्षच नाही,’ तिने लाडीवाळपणे तक्रार केली.
‘अगं नाही, तसं काही नाही. तुझ्याकडेच तर माझं लक्ष लागलेलं असतं’, तो.
‘काही सांगू नको, तू फक्त माझ्यावर नजर ठेवतो.’ तिची प्रतिक्रिया.

तो गोंधळला, ‘नजर ठेवणे’ याचा अर्थ न समजण्याइतकी ती खुळी नव्हती. म्हणजे आपल्यामुळे तिच्या स्वातंत्र्यावर गदा येते की काय? या विचाराने तो अस्वस्थ झाला. आपल्याला आवडतं, तसंच तिनं राहावं, ही अपेक्षा प्रेमातून आलेली होती. पण तिला जर ती ‘नजर ठेवणे’ वाटत असेल, तर संबंधात कोठेतरी मिठाचा खडा पडलाय. तिला असं वाटणं म्हणजे आपला जाच वाढत असल्याची लक्षणं आहेत आणि जेथे जाच वाढतो तेथे तक्रार येते. तक्रार आली की विश्‍वास डळमळतो आणि शेवटी आपले संबंधही एका काळ्या पायावर उभे होते, याची जाणीव होते.

आयुष्यात जगण्यासाठी खूप काही लागतं. काही जणांच्या अपेक्षा वेगळ्या असतात. त्याला तिच्याकडून विश्‍वास आणि त्यावर भरभक्कम असणार्‍या प्रेमाची अपेक्षा होती. तडजोड करायची इच्छा नव्हती. कित्येक उदाहरणं त्याच्या समोर होती. मागच्याच महिन्यात त्याच्या मित्राने बायकोशी घटस्फोट घेतला होता. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे त्यांचा ‘प्रेमविवाह’ झाला होता. प्रेमात एकमेकाला संपूर्ण समजून घेणं आवश्यक असूनही ‘प्रेमविवाह’ अयशस्वी का ठरतात, या प्रश्‍नाने तो अधिकच गोंधळून जात होता.

मुळात प्रेमात अपेक्षाच जास्त असतात. त्या अपेक्षा प्रत्यक्षात उतरल्या नाही की मग अपेक्षाभंग होतो. अपेक्षाभंग विश्‍वासाला तडा देऊन जातो आणि मग एकमेकांबद्दल जीवापाड प्रेम असूनही प्रेम बाजूला पडतं, एकटं..... पोरकं होऊन.

त्याच्या डोक्यातलं विचाराचं थैमान काही संपत नाही. पण तिच्याबद्दलचं प्रेमही कमी होत नाही. तिची काळजी दुपटीने वाढते. कारण आता तिच्याबद्दल त्याला चिंता वाटायला लागते. 

बारमधील एका कोपर्‍यात एक मनुष्य एकटाच पीत बसलेला असतो. कानात हेडफोन लावून, मोबाईलवर मंद आवाजात हरिहरनच्या आवाजातील गझल सुरू असते. शेवटचा पेग मारून तो उठायला लागतो. तोच त्याच्या कानावर शब्द पडतात...

‘शहर दर शहर लिए फिरता हूँ तनहाई को
कौनसा नाम दूँ मै तेरी शनासाई को...’

विनोद बिडवाईक

रविवार, २१ ऑक्टोबर, २०१८

गुर्‍हाळ चर्चेचे

चर्चा करणं हा प्रत्येक मनुष्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे. चर्चा कशावर करावी याला बंधन हवेच अशातला भाग नाही. चर्चेतून काहीतरी हातात यावं असा हेतू असतोच असेही नाही. निरुपयोगी चर्चा करणे ही अन्न, वस्त्र, निवारा या गरजेसारखी एक गरज आहे. 
अनेक वर्षांपूर्वी लग्नात शिवलेला ठेवणीतला कोट घालून अखंड बडबड करणारी मंडळी आपण टीव्हीवर खूपदा बघतो. अशा चर्चा घडवून आणण्यात ते तत्पर असतात.

Image result for panel discussion sketch

अमेरिकेने इराकवर आक्रमण केलं... इकडे दोघे कोणीतरी त्यावर चर्चा करणार, कंबोडियात निवडणुका झाल्या... इकडे काही जण कॅमेर्‍यासमोर तयार! सोमालियात दुष्काळ पडला... टीव्हीवर हसरे चेहरे हजर...

चित्रपटातील हिरॉइनच्या चोळीपासून डोनाल्ड ट्रम्पपर्यंत विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांची चर्चा ऐकणे म्हणजे शिक्षाच असते. एखादी घटना घडली की त्यावर परिसंवाद होतात. अर्थात या परिसंवादाला श्रोतावर्ग किती आणि कसा येतो हा तसा वादाचा (की चर्चेचा?) विषय. जपानमधील भारतीयांचे राहणीमान किंवा बोस्नियामधील कम्युनिस्ट राजवट अशा विषयावर चर्चा करत बसणारे विचारवंत आपल्याला परिचित असतात.

सार्वजनिक जीवनातलं जाऊ द्या; आपल्या सभोवतालची उदाहरणेही खूप आहेत. सामान्य माणसांना चर्चेला तसा कोणताही विषय चालतो. माधुरी दीक्षितची चोळी, दीपिका पदुकोण आणि करिना कपूरचे कपडे, नरेंद्र मोदी यांची बुद्धिमत्ता इथपासून अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापर्यंत कोणातही, कोणत्याही क्षेत्रातला विषय त्यांना चालतो.

माझा एक मित्र श्याम. हा विचारवंत व्हायचा, तर साधा कारकून झाला. त्याला आम्ही फिलॉसॉफर म्हणत असू. एकदा कॅन्टीनमध्ये त्याने चहाच्या प्याल्यावर स्वतःच एक भाषण सुरू केलं आणि ते थेट ‘सुवर्णरोखे व्यवहार आणि तोटे’ या विषयावर संपवलं. एक महान विचारवंत बँकेत स्वतःचं दुःख बरबाद करतोय याचं दुःख वाटलं, बाकी काय?

संजय दत्त दोषी की निर्दोष, महागाई, अमिताभची पांढरी दाढी, हजरतबल इथंपासून शेजारची सुलोचना आणि आपला विनू यांचं लफडं असे शेकडो विषय चर्चेत येतात. रेल्वे जशी रुळावरून ट्रॅक बदलंत, वळण घेत इप्सित स्थळी पोहोचते, तशी चर्चाही अनेक वळणं घेते.
स्त्रियांच्या चर्चा ऐकणे हा एक करमणुकीचा प्रकार असतो. टीव्हीवरच्या निवेदकेच्या गळ्यातला नेकलेस यावर दिवसभर  चर्चा रंगू शकते. पाच-सहा मैत्रिणी अथवा ओळखीच्या जेव्हा एकत्र येतात, तेव्हा त्या वेळी अनुपस्थित असलेल्या सभासदावर चर्चा चालते. तसेच साड्या, अमकीचा नवरा, तमकीची सासू या विषयावर तर हमखास चर्चा चालतेच.

कॉलेजमधील दीपिका , स्मार्ट, सुंदर जेथे सौंदर्यही क्षणभर स्तब्ध होते! (घाबरू नका सौंदर्यावर मी चर्चा करणार नाहीय.) या दीपिकाला  फक्त एकच वाईट खोड होती, चर्चा करण्याची. आणि तिचा हक्काचा श्रोता (किंवा पार्टनर-चर्चेचा) होता रणवीर . बाकी ती  बोलायची छान. तिच्या सहवासात राहून-राहून रणवीरराव  तिच्या प्रेमात पडले. प्रत्येक प्रेमात पडलेल्या व्यक्तीला जो प्रश्‍न पडतो, तोच प्रश्‍न त्यालाही  पडला. ‘हाऊ टू एक्सप्रेस इमोशन्स’ (मध्ये-मध्ये इंग्रजी पेरण्याने चर्चा थोडी इफेटिव्ह होते) आपलं प्रेम व्यक्त करावं कसं, हा गहन प्रश्‍न त्याच्या समोर असायचा. तो  तसा प्रयत्नही करायचा. 

Related image

‘दिपू  मला काही सांगायचंय' 
‘बोल ना.’ ती. 
रणवीर क्षणभर गप्प बसायचा . शब्दाची जुळवाजुळव करायचा आणि...
‘दिपू  ...दिपू  आज वातावरण काय छान आहे नाही?’ तो पटकन बोलून जायचा आणि मग दिपू  वातावरण, प्रदूषण यावर खूप वेळपर्यंत बोलत राहायची. म्हणजे प्रेम व्यक्त करण्याची रणवीरची  तशी हिंमतच व्हायची नाही. शेवटी एकदा काहीही करून प्रेमाचा ‘इजहार’ दीपिका जवळ करायचाच असं  त्याने ठरवलं. तिला एका छान सायंकाळी, एका चांगल्या हॉटेलमध्ये जेवणासाठी निमंत्रित केलं.
जेवण सुरू करायच्या अगोदर त्याने कोटात लावलेलं गुलाबाचं फूल तिच्या हातात दिलं. तिला ते वेणीत लावायला सांगितलं.  प्रेम व्यक्त करण्यासाठी वातावरण निर्मिती होत होती. त्याने तिचा हात हातात घेतला, तो तयारी करूनच आला  होता . त्याने शब्दांची जुळवाजुळव केली आणि मोठ्या स्टायलीशपणे वाक्य फेकलं, ‘दिपू ...  काश्मिरसारख्या...’ पण त्याचे वाक्य पूर्ण होण्याच्या आत तिने छान स्मित केलं आणि सुरुवात केली.

‘नाही रणवीर , काश्मिरचा प्रश्‍न भारताचा आहे, मेहबूबा  प्रकरणाने त्याला वेगळी कलाटणी मिळाली. तो भाग वेगळा; पण ती चूक आपल्या राज्यकर्त्यांची आहे. पाकिस्तानने आपला डाव पद्धतशीरपणे टाकलाय. प्रश्‍न काश्मीरच्या जनतेच्या मानसिकतेचा आहे. असे, सूप पीना! तर प्रश्‍न कोणताही असो...’
दिपू  अखंड बोलत होती आणि रणवीर ऐकत होता .
खरंतर ‘दिपू काश्मिरसारख्या स्वर्गीय निसर्गात तुला कवेत घेऊन मला धुंद व्हावंसं वाटतं,’ असं खूपसं काहीतरी रणवीर ला  सांगायचं होतं.

आता आता मला कळले आहे कि दीपिकानेच  रणवीरला प्रपोज केले आहे आणि  दोघे जण लवकरच लग्न करणार आहेत. 

विनोद बिडवाईक

शनिवार, २० ऑक्टोबर, २०१८

चोरी

चहाचा पेला घेऊन जाणार्‍या त्या हॉटेलमधल्या पोर्‍याला माझा धक्का लागला आणि पेला त्यावरच्या बशीसहित जमिनीच्या ‘मिलनासाठी’ वेगाने खाली गेला!

क्षणभर खळ्ळऽऽऽ आवाज कानात घुमला. माझी घाई तशी नेहमीचीच. घड्याळ्याच्या काट्यावर चालणारे आपण कधी कधी या वेळेचा ‘टाइम मनेजमेंट’ म्हणून उगाचच बाऊ करतो. मी त्या मुलाकडे लक्ष दिले नाही. मला तेवढा वेळ नव्हता. त्यावेळी कदाचित क्षणभरच. क्षणभर मी मागे वळून बघितलं, तो मुलगा काहीतरी पुटपुटतं उभा राहिला. निश्‍चितच त्या मला शिव्या होत्या. अर्थात चूक त्याची नव्हती! मी क्षणभर थबकलो. तोच शेजारी उभा असलेला घोळका माझ्याकडे आकर्षित झाला. त्यातला एक उत्तरला, ‘अशा वेळेस सरळ पुढे निघायचं, मागे बघायचंच नाही.’ तो बोलला उपरोधिकपणे. नेमकं मला काही कळालं नाही. मी नंतर सरळ, तेवढ्याच वेगाने चेहर्‍यावरची सुरकुती आणि कपड्यावरचीही न बिघडवता पुढे निघालो! वरील सर्व घटना काही सेकंदात घडल्या. शेजारून येणारी सिटी बस पकडली आणि निवांतपणे सीटवर बसलो. खिडकीतून बाहेर बघितलं. मघाचा मुलगा दुसरा पेला घेऊन चालला होता...

Related image

बस सुरू झाली, खिडकीतून येणारा गार वारा अंगाला झोंबू लागला. खिडकी वैतागाने खाली ओढली आणि डोकं टेकलं. नजरेसमोर मघाचं दृश्य उभं राहिलं. फुटलेला पेला घेऊन हॉटेलमध्ये परत गेल्यावर काय घडलं असेल, याची कल्पना करता करता माझ्या मनात चलबिचल सुरू झाली. टोचणीचा भुंगा मन पोखरायला लागला. त्या मुलाचा काही दोष नसताना बिचार्‍याला मालकाची बोलणी खावी लागली असतील. कदाचित आधीच तुटपुंज्या मिळणार्‍या पैशातून त्याचे पैसेही कापून घेतले असतील. त्याचं वय तरी फारसं नव्हतं. 12 ते 13 वर्षांपेक्षा जास्त नसावं. चेहरा तरतरीत पण दरिद्री परिस्थितीने त्याच्यावर वेठबिगारी लादली गेली. ज्या वयात शाळेत जायचं, खेळायचं त्या वयात हॉटेलमधल्या टेबलावर फडकं मारणं आलं.

दोन दिवसांपूर्वी एका परिसंवादात ‘भारत आणि बालमुजरी’ या विषयावर मांडलेले विचार मोठमोठ्या वक्त्यांनी स्वीकारले होते. ‘हे करायला पाहिजे’, ‘दशा, दिशा आणि बरंच काही !’ माझा पेपर उत्कृष्ट ठरला होता आणि मानव संसाधन व विकासमंत्र्यांनी या पेपरवर विचार करण्यासाठी समिती नेमण्याची घोषणा केली होती. आणि आज एका बालमुजराच्या कष्टाच्या कमाईआड मी आलो होतो. धक्का लागल्यावर उभं राहून त्याची समजूत घालण्याचे कष्टही (?) घेतले नव्हते. माझं ‘वेळेचं व्यवस्थापन’ त्या आड आलं होतं. माझं मन मलाच खाऊ लागलं. दोन-तीन मिनिटे थांबून ती घटना घडल्यावर मी त्या मुलासाठी काहीतरी करायला पाहिजे होतं, असं मनापासून वाटू लागलं.

मुळात गरिबी, बापाची जबरदस्ती, घरातल्याचा या मुलांकडे ‘कमाईचे साधन’ म्हणून बघण्याचा दृष्टिकोन आणि एकंदर सरकारची उदासीन वृत्ती या सर्व प्रकारचं हे अपत्य होतं! बालमुजरी संपवा, संपवू या, वगैरे घोषणा घोषणाच ठरल्यात की. वरवरची उपचारपद्धती सोडून आपण मुळाकडे जातच नाही. असो; पण या घडलेल्या घटनेत मी त्या मुलाची नुकसान भरपाई म्हणून पेल्याचे पैसे, त्याच्यासोबत सहानुभूतीचे दोन शब्द, एवढंच करू शकणार होतो. कारण काहीतरी कमाई करून घरी पैसे देणं त्याला गरजेचं होतं.

दुसर्‍या दिवशी निव्वळ कुतुहलापोटी मी त्या हॉटेलमध्ये गेलो. त्या पोरला भेटता आलं तर बरं होईल हाही विचार होता. हॉटेलचा मालक भेटला. नेहमीचा ग्राहक म्हणून मी त्याचा ओळखीचा झालेलो. त्याने चहा मागितला. मी सहज विचारलं, ‘तुझ्याकडे एक मुलगा आहे ना?’
‘मुलगा’ 
‘चहा वगैरे...’
‘हा हा, तो. काढलं त्याला कालच...’
‘का रे?’ 
‘माजोर असतात हो हे. फुकटचं खायची यांची सवय...’
‘.............’  मी
‘त्याचं कामात लक्ष राहत नव्हतं. इकडे-तिकडे बघत राहायचा. कधी कप फोड, कधी बशी. कामात लक्ष नाही. काही उपयोग नव्हता.’
‘लहान होता खूप.’
‘महाहुशार असतात लेकाचे. एका नेहमीच्या कस्टमरचे पैसे चोरले.’
‘पैसे चोरले?’
‘हो. आपल्या हॉटेलातून पैसे चोरीला जाणे म्हणजे नाव खराब होतं हो.’
‘त्यानेच पैसे चोरले कशावरून?’
‘त्याच्या हातात सापडले ना, वरून म्हणतो, माझेच आहेत म्हणून.’
ते पैसे त्याचे नसतील कशावरून, हा प्रश्‍न जिभेवर आला. मी विचारला नाही. कारण त्याचं उत्तर कोणतं मिळणार हेही माहीत होतं. मी फक्त विचारलं,
‘किती पैसे होते?’
‘दोन रुपये.’

मी बाहेर पडलो. पैसे कदाचित त्याने चोरले असतील किंवा नसतीलही. त्याच्या चेहर्‍यावरून तरी तो खूप निरागस दिसत होता. त्याने पैसे चोरले असतीलही तरी त्याला तो जबाबदार नव्हता.

रस्त्याच्या दुसर्‍या टोकाला असलेल्या सुपरमार्केटमध्ये घुसलो. तेथे एक गाडी उभी होती. एक छोटा मुलगा, चौदा-पंधरा वर्षांचा. गाडीतून मोठी पुडकी खाली उतरवत होता. सुपरमार्केटच्या दारातून एक जोडपं बाहेर पडलं. जाताना त्यांनी एक मोठी बाहुली विकत घेतली होती. तो मुलगा क्षणभर थबकला. त्या जोडप्याला न्याहाळत... आणि परत आपल्या कामात गर्क झाला.

विनोद बिडवाईक

शुक्रवार, १९ ऑक्टोबर, २०१८

कसोटी

त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. त्यांच्या प्रेमाला कशाचीही मर्यादा नव्हती. आयुष्यात काही कमावलं नाही, पण प्रेमाचं राज्य आपण जिंकलं, या धुंदीत आयुष्याचे कित्येक क्षण एकमेकांच्या सहवासात घालवताना, भविष्याच्या गुजगोष्टी करताना ते भारावून जात. ती त्याच्याशिवाय अपूर्ण होती. तो तिच्याशिवाय राहणे ही कल्पनाही त्याला सहन होत नव्हती.

कॉलेजच्या जीवनात फुलणारं प्रेम हळूहळू प्रगल्भ होत गेलं. शारीरिक आकर्षणाच्या सीमा नव्हत्याच. भावनिक प्रेमातून त्यांनी एकमेकाला समजून घेतलं. दुसर्‍यांसाठी त्यांचं प्रेम हा चर्चेचा विषय आणि चघळण्याचा विषय झाला. प्रेम हे अळवावरच्या पाण्यासारखं असतं. ते घसरलं, की मग संपलं. आळवाच्या पानावर मोत्यासारखं दिसणार पाणी घसरून गेलं, की मग त्याचं सौंदर्यही संपून जातं. पण शेवटी असली मोत्याची सर त्या अळवावरच्या पाण्याला येणार कोठून? त्याचं मन, हृदय, सांभाळता सांभाळता ती भावनिक व्हायची. तिची मर्जी सांभाळता सांभाळता तोही हळवा व्हायचा. 

एकदा तिनं त्याला विचारलं, ‘तुझं प्रेम असचं राहील का रे माझ्यावर?’

तो हसला. तिच्या रेशमी केसांत बोट फिरवत त्याने प्रश्‍न विचारला, 
‘माझ्या प्रेमाची व्याप्ती नाही सांगता येणार वेडे; पण चंद्राच्या कमी होणार्‍या कलेप्रमाणे तुझं प्रेम मला दगा तर देणार नाही ना?’ त्याच्या या प्रश्‍नाने ती दुखावली. डोळ्यातून टचकन पाणी गालावर ओघळलं. 

Related image

‘म्हणजे तू मला समजूनच घेतलं नाही?’ ती म्हणाली. ‘नाही पण व्यवहाराच्या कसोट्यांवर आपलं प्रेम यशस्वी होईल?’ त्यानं विचारलं.

‘तू असं का बोलतोस?’ तिने रडवेली होऊन विचारलं.

‘उलट या कसोट्यांवर आपलं प्रेम हिर्‍यासारखं उजळणार नाही का?’

‘बोलते छान !’ तो हसला.

त्याच्या आयुष्यात असे कित्येक प्रसंग आले, धक्के आले. तिचं बोलणंच सत्य ठरलं. हिर्‍याला घासल्यावर जशी चकाकी येते, तसं त्यांचं प्रेमही उजळून निघालं. अशा धक्क्यांनी त्यांचे संबंध एवढे घट्ट झाले, की ते शरीराने जरी दोन असले तरी मनाने एक झाले.

भविष्याच्या गर्भातली स्वप्ने फुलतच होती. आयुष्य असंच आनंदाच्या उन्मत्त शिखरावर होतं. तो परिस्थितीने पिचला होता. त्याच्या स्वतःच्या आयुष्याचे कित्येक प्रश्‍न त्यालाच सुटले नव्हते. संघर्ष करण्यासाठी एक जोडीदारीण मिळाली होती. तिला कशाचीही अपेक्षा नव्हती. त्याचं प्रेम तिच्यासाठी सर्वात मोठी दौलत होती.

त्याच्या मनात एक शल्य नेहमीच टोचत राहायचं. आपण आयुष्याची एवढी वर्ष शिकण्यात घालवली, करिअरची स्वप्ने फुलवली; पण हातात फारसं आलं नाही. प्रयत्न कमी पडले होते कदाचित; पण आयुष्याच्या धावत्या शर्यतीत इतरांपेक्षा आपण मागे आहोत, हे शल्य त्याची झोप उडवून लावत असे. इतरांसाठी तो उच्चविद्याविभूषित, प्रगल्भ, दुसर्‍यांना समजून घेणारा, एक सोज्वळ आणि धडपड्या तरुण होता. त्यांच्या मते, अतिशय लहान वयात त्याने खूप काही कमावलं होतं; पण त्याला पाहिजे ते यश मिळतच नव्हतं. तो स्वतःच्या करिअरबद्दल समाधानी नव्हता. त्याला स्वतःच्या कर्तृत्वाचं उदाहरण जगासमोर दाखवायचं होतं.

हे शल्य त्याने तिच्याजवळ कित्येकदा बोलून दाखवलं होतं. तिने दिलेला दिलासा, हळूवार आत्मविश्‍वास तो विसरू शकत नव्हता. त्याला रस्ता सापडत नव्हता. त्याला चिंता होती, ती आयुष्याच्या खडतर प्रवासात त्याच्या हातात हात घालून ती चालू शकेल काय? तिने त्याच्यामागं फरफटत यावं, अशी त्याची मुळीच इच्छा नव्हती. तिच्या इच्छेविरुद्ध त्याला काहीही करायचं नव्हतं; पण तिच्या इच्छेत स्वतःला बांधूनही घ्यायचं नव्हतं. एखादा निर्णय घेतल्यावर त्या निर्णयात तिचा सहभाग हवाच, असं त्याला वाटायचं.

त्याची मानसिक स्थिती तीच समजून घेऊ लागली. त्याचं मन तिला संपूर्णपणे उमजू लागलं होतं. काचेसारख्या पारदर्शक संबंधात दोघंही एकमेकांच्या विश्‍वासातं मग्न होते. आयुष्याच्या अशाच एका वळणावर त्याला स्वतःचा रस्ता सापडला. स्वतःमधील ‘स्व’ चा शोध लागला. खूप दिवसांनी जे समाधान पाहिजे होतं, ते त्याला मिळालं होतं. यशाचा प्रश्‍नच नव्हता. येथे त्याला यशाची अपेक्षाच नव्हती. तो केवळ कार्य, कर्म करणार होता. या वाटेवर ती त्याला सोबत करेल, याची त्याला खात्री होती. पण तिचं आयुष्य त्याला वाया घालवायचं नव्हतं आणि म्हणून त्या रस्त्यावरुन एकटंच चालण्याचा त्याने निर्णय घेतला. भविष्यात त्याच्यामागून त्याच्या पावलावर पाऊल टाकून चालणारे खूप असतील, याची त्याला खात्री होती.

‘तू मला कधी घेऊन जाणार आहे?’ तिने लडीवाळपणे विचारले.

‘माझ्यासोबत तू नाही येऊ शकणार.’ त्याने तिला सर्व काही समजून सांगितलं. स्वतःचं आयुष्य, प्रेम यापेक्षा दुसरं जग आहे.

‘मग तुझा काय निर्णय झाला?’ तिने विचारले.

‘माझ्या आयुष्यात संसार नाही, प्रेम नाही.’

‘म्हणजे मी जे प्रेम केले ते उगाचच?’ ती म्हणाली.

‘तसं नाही, पण मला माझ्या जीवनाचा अर्थ कळालाय. तू माझ्या हृदयात आहेस, पण... हा रस्ता माझा एकट्याचाच आहे आणि एकट्यालाच पार पाडावा लागणार आहे.’

एवढं बोलून तो झपाझप पावलं टाकत निघून गेला. ती कित्येक वेळापर्यंत त्याच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बघत होती. मावळत्या सूर्याच्या प्रतिबिंबाकडे चालत जाताना त्याची कृष मूर्ती एखाद्या तपस्वीप्रमाणे भासत होती.

‘मी मात्र तुला एकटी सोडू शकत नाही वेड्या,’ ती मनाशी पुटपुटली आणि त्याच्यामागे पळत सुटली.

विनोद बिडवाईक

इंतजार

कुणाला कुणाची वाट बघणं प्रत्येकाच्या नशिबी लिहिलेलं असतं.. कुठल्या कारणासाठी कोण खोळंबून राहतं, यावर सगळं ‘तिष्ठत’ राहण्याची ‘तीव्रता’ अवलंबून असते....


" यह तनहाईया और ढलते लम्हे 
जला रहे है पल पल 
इंतजार आपका करते करते 
लम्हे भी थम गये है।"
 
Image result for girl waiting somebody sketch

इंतजार’ या शब्दातच एक प्रकारचा गहन अर्थ दडलेला आहे. बर्‍याच वर्षांपूर्वी दूरदर्शनवर अजीज मिर्झांची ‘इंतजार’ ही मालिका प्रक्षेपित होत होती. त्यातील शीर्षक गीतात कोणाला कशाचा ‘इंतजार’ असतो, यावर मस्तपैकी सांगितले होते. ‘भुखो की रोटी’का पासून तर रेल्वे स्टेशनवर येणार्‍या गाडीचा ‘इंतजार’ करणार्‍या व्यक्तीच्या मानसिक परिस्थितीचं विश्‍लेषण समजून घेण्यासारखं होतं.

‘इंतजार’, ‘वाट पाहणे’, ‘पाहणे’ या शब्दातच त्या व्यक्तीच्या भावना दिसून येतात. अर्थात कोण, कशाचा, कशासाठी इंतजार करतो, यावर त्या वाट बघण्याची तीव्रता अवलंबून असते. 

माणूस मुळातच बुद्धिमान आणि महत्त्वाकांक्षी प्राणी म्हणून ओळखला जातो. भाव-भावनांचा वरदान असणारा हा प्राणी एखाद्या गोष्टीची किंवा व्यक्तीची वाटही त्याच तीव्रतेने बघू शकतो. 

प्रत्येकाची जगण्याची पद्धत वेगळी आहे. ध्येय धोरणे वेगळी आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीने जगण्याचा प्रयत्न करतो. जगण्याची धडपड करतो. हे जगणंही मग एखाद्याकडे जाण्याची धडपड असते आणि ते ध्येय हातात येण्याची वाट बघू-नाही असं चालूच राहतं.
जगण्याचीही अशी तर्‍हा ‘इंतजार’ या शब्दात सामावल्यासारखी वाटते.

एखाद्या प्रिय व्यक्तीची वाट बघण्याचं सुख अवर्णनीयच. एखाद्या गोष्टीची वाट बघितल्यानंतर ती गोष्ट जेव्हा हातात पडते, तेव्हाचं समाधान हे स्वर्गीय आनंदाची अनुभूती देणारं असतं; पण परत नंतर काय? या प्रश्‍नात माणूस गुरफटून जातो आणि परत कशाची तरी वाट बघायला सुरुवात करतो.

त्याची वाट बघणं हे नित्याचंच झालंय. कधी दोन मिनिटंही उशीर झाला की, दोन वर्षांसारखी वाटतात. 
तो उशिरा आला की, ती लटकं रागावून घड्याळ दाखवते. ‘एवढा उशीर? वाट बघून बघून मी किती थकलेय.’
एकमेकांची अशी वाट बघणं, प्रणयाचाचं एक भाग होऊन जातो, हे कळतही नाही. हे वाट बघणं कधी संपतच नाही. 
वाट बघता बघता सांज लवंडते, वारा मंद होतो, वृक्षवेली रोमांचित होतात आणि तिच्या आठवणीने तो व्याकूळ होतो. संध्याकाळ संपायला लागते, ती येत नाही. ओठातून गाण्याच्या ओळी बाहेर पडतात.

‘इन्तेहा हो गयी इंतजार की, 
आयी ना कुछ खबर मेरे यार की!’ 

इंतजार-वाट बघण्याची परीक्षा/ कसोटी लागते; पण ती येत नसते. ती येणार हे मात्र नक्की असतं आणि शेवटी मात्र ती येते,
‘आयी रे... सजना’ म्हणतं

Image result for girl waiting somebody sketch

या गोड भावना मला वाटतं, वाट बघण्यात जगातलं सर्व सुख सामावलेलं असावं. तीच नेहमी वाट बघायला लावते असं नाही. कधी कधी तोही उशिरा येतो ‘टाईम मॅनेजमेंट’ कुठून प्यालो, असा दावा करणारा आणि तिच्यावर रागावणारा तो, तू कशी रुसली असेल या कल्पनेने मनातल्या मनात पुलकित होतो. तो येतो. तिचा लटका राग.

‘तुझी वाट बघून डोळे थकले’ असे जरी ती म्हणत असली तरी तिची कितीही वाट पाहण्याची तयारी आहे हे तिच्या डोळ्यात तो पाहतो. प्रेम, खरं प्रेम दिसतं डोळ्यात... मग ‘इंतजार’ एक मोठी तलवार बनून जाते. 

वाट बघणं हा मनुष्याचा स्थायीभाव आहे. तो त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येकाची तर्‍हा मात्र वेगळी. संध्याकाळी दरवाजात उभी राहून पतीची वाट बघणारी पत्नी, प्रेमिकांनी बघितलेली वाट, बाहेरगावी गेलेल्या नातेवाइकांची वाट आणि पप्पा आज माझ्यासाठी खेळणं आणा, म्हणून पप्पा घरी कधी येतील याचा विचार करत त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसणारी छोटी मुलगी, या सर्वांची वाट बघण्याची तर्‍हा वेगळी असली, तरी त्यांच्या भावना शब्दात व्यक्त करण्यासारख्या सोप्या नसतातच.

या वाट बघण्यात जुनेपणा नसतोच, रोज तेवढ्याच उत्साहाने, तेवढ्याच तीव्रतेने वाट बघण्याच्या प्रक्रियेमागे या भावनिक झिलई आहे. 

"क्या करू सजनी 
आये ना बालम’"

या  ठुमरीतलं विरहणीचं ते पियाच वाट बघणं म्हणूनच आर्द्र वाटतं. या वाट बघण्यामागे एक आशा असते, इच्छा असते आणि त्याहीपेक्षा एक भावनिक गुंतवणूक असते.

इंटरव्ह्यूच्या कॉलची वाट बघणारा बेरोजगार तरुण, तो कॉल आल्यावर आयुष्याची स्वप्न बघायला लागतो. त्यावेळेस त्याच्या चेहर्‍यावर स्वर्गीय आनंद बघून घरातल्या इतरांचे चेहरेही उजळतात.

वाट बघण्यात भावनिक गुंतवणूक नसली की, मग त्याला व्यवहाराचं रूप येतं, असा कोरडेपणा वाट बघण्यात नसतोच.
यापेक्षाही माणूस आयुष्यात एका गोष्टीची वाट बघत असतो, ते म्हणजे ‘यश’. ‘यशाची’ वाट बघणची इच्छा बनते, आशा वाटायला लागते. मग ते कोणतेही ‘यश’ असो, अगदी प्रेमापासून इंटरव्यू कॉलपर्यंत. कारण या वाट बघण्यामागे या सर्व इच्छा असतात. त्या एकमेकांशी संलग्न झालेल्या असतात. 

मग कधी-कधी ती आपली वाट बघताना कशी व्याकूळ होते, हे लपून बघायची इच्छा होते. ती वाट कशी बघते हे बघण्याची आणि तिला छेडण्याची इच्छा प्रणयाचाच भाग असतो.

हे वाट बघणं असंच असतं, इंतजार करतच राहतं, कोणी कोणाची तरी! भावनिक तीव्रतेने व्याकुळतेने.

"इंतजार और इस तनहाई मे
तुम्हारी याद मुझे 
जीने नही देगी 
तुम्हारा इंतजार हमे मरने नही देगा!"

विनोद बिडवाईक

दुभाषा

Image result for trump and kim meeting

मला नेहमीच एका गोष्टीचं कुतुहल वाटत आलं आहे, ते कुतूहल म्हणजे दोन राष्ट्रांमधील प्रतिनिधी, राजदूत मंत्री-जंत्री वगैरे जेव्हा भेटतात, तेव्हा हातात हात घेतल्यावर नेमके कोणते संभाषण करतात? आपण टीव्हीवर नेहमीच बघतो, हसत आणि जोरजोरात हात (अर्थात एकमेकांचे) हलवताना ते काय बोलतात? माझे हे कुतूहल शमेल तेव्हा शमेल, ती संधी  येण्यासाठी मला वरीलपैकी कोणीतरी व्हावं लागेल. पण जेव्हा ती औपचारिक हस्तांदोलनानंतरची भेट पार पडते त्यानंतर एका भल्या मोठ्या पॉश ड्रॉइंगरूममध्ये गुबगुबीत सोफ्यावर बसून काय चर्चा करत असतील, त्यामध्ये भाषेचा प्रश्‍न आलाच तर दुभाषे मदतीला येतातच, मग दुभाषांकरवी केलेली चर्चा किती परिणामकारक होत असेल?

दुभाषकाची भूमिका तशी महत्त्वाचीच; पण म्हणून प्रत्येक वेळी दुभाषकावर अवलंबून राहिल्यावर काय गमती घडत असतील, हाही कुतूहलाचा विषय आहे. विमानातून व्हीआयपी खाली उतरतात. स्वागतासाठी इतर प्रतिनिधी, मंत्री असतातच. कमांडोज आणि इतर स्वागतोत्सुक लगेच पळत येतात आणि त्या प्रतिनिधी किंवा नेत्याचा हात हातात घेतात. या वेळी दोघेही हसून एकमेकांना अभिवादन करतात, पण नंतरचं काय? म्हणजे परत दुभाषक आलाच. या दुभाषकाला स्वतः या गोष्टीचं हसू येत नसेल का?

‘सर, इंडियन मिनिस्टर मिस्टर अमुक-तमुक आपले स्वागत करत आहेत.’ पाहुण्यांच्या भाषेत दुभाषक इंडियन मिनिस्टरांचे शब्द सांगतात. या वाक्यावर मग पाहुणे प्रतिक्रिया देतात आणि मग त्यांचं भाषांतर देशी भाषण.

माझं हे कुतूहल टीव्हीवरील कार्यक्रम बघून अधिकच चाळवलं जातं. माझी एक इच्छा आहे, ती पूर्ण होईल तेव्हा होवो. पण दुभाषक होऊन एखाद्याची संपूर्ण फजिती करायचे आहे. या फजितीवरून आठवलं समजा एकमेकांच्या भाषा न समजणार्‍या दोन व्यक्ती चर्चेच्या वेळेस काही कारणाने अचानक एकमेकांवर रागवल्या, तर तेव्हा दुभाषक काय करेल?

‘यू इडियट’
‘सर, मिस्टर अमुक-तमुक आपल्याला मुर्ख म्हणताहेत,’ दुभाषकाचं भाषांतर.
‘सांग त्याला तूच नालायक आहेस.’
‘सर, मि. अमुक-तमुक आपल्याला म्हणताहेत की तुम्हीच नालायक आहात,’ दुभाषकाचं भाषांतर.

Image result for modi and putin meeting

अशा वेळेस दुभाषकाला आपलं कौशल्य पणाला लावून परिस्थिती हाताळावी लागत असेल. भारत आणि पाकिस्तान या परंपरागत शत्रू राष्ट्रात प्रतिनिधींशी चर्चा किती स्फोटक (?) होत असली, तरी सामान्य माणसांप्रमाणे मलाही त्यात दोन प्रतिनिधींच्या चर्चेबद्दल कुतूहल आहे.

सौंदर्य स्पर्धा (किंवा अंगप्रदर्शन स्पर्धा) किंवा अतिशय महत्त्वाच्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये किंवा अशा स्पर्धेमध्ये दुभाषकाची भूमिका महत्त्व घेऊन जाते. एखाद्या सौंदर्यसम्राज्ञीने एखाद्या प्रश्‍नाचं फालतू उत्तर दुभाषक आपल्या कौशल्याने बदलून परीक्षकांचं मन बदलू शकत असतील. (अर्थात ही एक शक्यताही असू शकेल.)

पंतप्रधानांच्या हिंदी भाषणाचं भाषांतर (आपल्या बहुतांश पंतप्रधानांनी आणि राष्ट्रपतींनी हिंदीवर तसा अन्यायच केला. दिवंगत पंतप्रधान भारतरत्न श्री. अटलबिहारी वाजपेयी आणि विद्यमान पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचा अपवाद वगळता.) इंग्रजीमध्ये किंवा इंग्रजी भाषणाचं भाषांतर हिंदीमध्ये करताना दुभाषकाची भूमिकाही तशी महत्त्वाची. एखाद्या अवघड शब्दाला नेमका प्रतिशब्द आठवत नसेल तर? 
दोन देशांच्या व्हीआयपींची भाषणे उडत असेल?

आपल्या अनेक पंतप्रधानांना हिंदी भाषा येत नाही (येत असली तरी ते हिंदीत बोलत नाहीत) मुलायमसिंग आणि रामविलास पासवान यांच्या सारख्या काही नेत्यांना इंग्रजी भाषेचे वावडे. मंत्रिमंडळाच्या मिटिंगमध्ये मग दुभाषकाचा रोलही आलाच. अशा वेळेस या यूपी-बिहारीबाबूंच्या शिवराळ हिंदीचं इंग्रजी भाषांतर कसं करणार?

मला वाटतं सर्वात कठीण भाषांतर असेल ते मराठीचं इंग्रजीमध्ये! अशा भाषांतराचं मलाही कुतूहल आहे. आपल्या शासकीय ( हो सरकारी) भाषांतराचं जाऊ द्या; पण, ‘आज दोडक्याचे गरमागरम फदफदे खाऊन आलो,’ या वाक्याचं काय भाषांतर करणार? पु. ल. देशपांडे यांना पडलेला प्रश्‍न मलाही खूपदा पडतो.

दोन परराष्ट्रीय व्यक्तींमधील प्रेम कसं फुलत असेल? कल्पना करा, मराठी तरुण एखाद्या जपानी तरुणीच्या प्रेमात पडला आणि दोघांनाही एकमेकांच्या भाषेचा गंध नाही. तेव्हा त्यांचं प्रेम कसं फुलत असेल? स्पर्श, नेत्रातून तर संदेश परावर्तित होत असतीलंच; पण जर इथे दुभाषकाची मदत घेतली तर...? दुभाषकच प्रेमात पडायचा किंवा पडायची? दुभाषकाकरवी प्रेम करणं किती मजेदार (?) (त्या दूभाषकाला) असावं.

एका मल्याळम म्हणजेच केरळी तरुणीची एका मराठी तरुणाशी पत्रमैत्री झाली. खरा घोटाळा नंतरच. दोघांनाही एकमेकांच्या भाषेचा गंध नाही. पहिले काही दिवस इंग्रजीमधून संवाद झाला; पण नंतर दोघेही आपापल्या मित्राकडून पत्र लिहून घेऊ लागले. केरळी मैत्रिणीकडून मराठीत आणि मराठी तरुण त्याच्या मित्राकडून मल्याळीत. यात दोघांच्या भावना बाजूलाच राहिल्या आणि दोन दुभाषकांच प्रेम जमलं.
आज इंग्रजी भाषा जागतिक भाषा झाली आहे. प्रत्येकाला इंग्रजी शिकण्याची गरजही वाटू लागली आहे; पण त्याचबरोबर मातृभाषेचा हट्टही वाढू लागला आहे. जगाच्या पाठीवरील कित्येक देश मातृभाषेतूनच व्यवहार करत आहेत. अशा वेळेस दुभाषकाची भूमिका भाव खाऊन जाते.

.... पण काहीही असो, काहीही होवो, मला आयुष्यात एकदा तरी दुभाषक व्हायचं आहे.

विनोद बिडवाईक

आश्‍चर्यचकित व्हावं तरी किती वेळा?

Image result for surprise faceमला नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं आश्‍चर्य वाटत राहतं. माझ्या स्वभावाचा तो गुणधर्मच बनला की काय न कळे. पण जेव्हा जेव्हा मी एखाद्या घटनेकडे बघतो, ती घटना विश्‍लेषित करतो (हे विश्‍लेषणाचं काम मीही करू लागलो त्याचंही एक आश्‍चर्य) तेव्हा मी अधिकच आश्‍चर्यचकित होतो. आता कोणत्या घटनेकडे मी आश्‍चर्यचकित होतो, हे सांगणं कठीण आहे. नेहमीच मी ज्या घटनेचं आश्‍चर्य दाखवतो ती घटना दुसर्‍यांना चकित करू शकत नाही. त्यामुळे आश्‍चर्यचकित होणं माझ्याच बाबतीत घडतं की काय न कळे!

सांगायचा मुद्दा एवढाच की ब्रह्मदेवाने माझ्यात आश्‍चर्चचकित होण्याचा गुणधर्म थोडा जास्तच दिला आहे. मला समजायला लागल्यापासून म्हणजे वयाच्या पाच वर्षांपासून (आता हे समजायचं वय अकाली प्रौढ झालं, मुलांना दोन महिने लागल्याबरोबरच ते समजावून घेतात.) नेहमीच मी चकित होत गेलो. कदाचित या जगात माझा अवतारही (?) एक (दुसर्‍यांना) आश्‍चर्यचकित करणारी घटना होती. कारण लहानपणी वयाच्या बाराव्या दिवशी (माझ्या) मला बघायला येणार्‍या प्रत्येकाच्या चेहर्‍यावरचे भाव हे आश्‍चर्याचे होते. माझे पाय पाळण्यात दिसतात हे सर्वांचेच मत, पण मुळातच ती माझी करामत. म्हणजे दुसर्‍यांना ते पाय दिसावेत म्हणून मीच ते पाय पाळण्याच्या वर काढत असे, असो.

तसं आश्‍चर्यचकित होणं, काय वाईट आहे? पण नाही, पहिल्यांदा मी जेव्हा शाळेत गेलो तेव्हा मुच्छड गुरुजींना बघून आश्‍चर्यचकित झालो. नंतर-नंतर मी चकित होता होता रडतही असे. (त्या मानाने आताची पोर भाग्यवान. या मुच्छड गुरुजींची जागा सुंदर सुंदर तरुणींनी घेतल्यापासून तर परत एकदा शाळेत नाव घालावं अशी इच्छा होऊ लागली आहे.) या घटनेनंतर मी नेहमीच चकित होत गेलो. पेपर बघून आणि निकाल बघितल्यावर मी एवढा आश्‍चर्यचकित झालो असेल की तेवढा कधी मी गुरुजींच्या हातचा मारही खाल्ला नसेल.
मात्र दहावीचा निकाल बघून तर मी चकित झालोच होतो. पण त्याचबरोबर आमच्या क्लासटीचर (जाड टाइप) पंधरा दिवस आयसीयूमध्ये भरती होत्या. कारण मी चक्क फर्स्ट क्लासमध्ये पास झालो होतो. त्यानंतर मीही कधी कधी दुसर्‍यांना आश्‍चर्चचकित करू शकतो याची मला खात्री पटली.

मुळातच मी आश्‍चर्यचकित होऊ नये, असं मी खूपदा ठरवतो; पण हे ठरवणंही एक आश्‍चर्यच ठरतं.  व्ही. पी. सिंग पंतप्रधान झाले (1989 साली) तेव्हाही आश्‍चर्यचकित झालो होतो; पण जेव्हा चंद्रशेखर पंतप्रधान झाले (1990 साली) तेव्हा तर मी आश्‍चर्याच्या बरोबर व्यथितही झालो होतो. पी. व्ही. नरसिंहरावांनी पाच वर्षे सत्ता उपभोगली (1991 ते 1996), हे माझ्या आश्‍चर्याचं कारण! पुढे 2004 साली डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान झाले, त्या वेळीही तसाच आश्‍चर्याचा मोठा धक्का मलाच काय संपूर्ण देशाला बसला असेल! हे मी खात्रीशीर सांगेन. (काही बाबतीत दुसर्‍यांची मते माझ्या मताशी हमखास जुळतात.)

Image result for surprise face sketch
मला काही कळेनासं झालंय, मी पुरता गोंधळून गेलेलो आहे. 1996 साली मायकल जॅक्सनचा भारतात मुंबईमध्ये कार्यक्रम होणार होता. त्याच्या नाचण्याने आपली संस्कृती पडणार (भिंत पडावी तशी) हे वाचून आणि ऐकून आपली संस्कृती एवढी कमजोर आहे हे उमजून मी आश्‍चर्यचकित होतो. तशीच काहीशी घटना 2016 सालीही सनबर्न फेस्टिव्हल पुण्यात होणार होता. त्यावेळीही आपली संस्कृती ढासळणार वगैरे वगैरे... मी टू , शहरी नक्सल सारख्या शब्दानेही मी आश्‍चर्यचकित होतो.

एखादा तरुण एखाद्या तरुणीची छेड काढतो तेव्हाही मी आश्‍चर्यचकित होतो. पण त्या तरुणीच्या सँडलचा मार जेव्हा त्या तरुणाला बसतो तेव्हा त्या लाजाळू वाटणार्‍या तरुणीचा आवेश बघूनही मी थक्क होतो. कॉलेज कट्ट्यावर बसून टवाळक्या करणार्‍या कंपूतला एखादा जण रस्ता ओलांडणार्‍या आंधळ्याचा हात धरून रस्ता क्रॉस करायला मदत करतो, तेव्हा मी आश्‍चर्यचकित होतो आणि एखाद्या बोअर प्रोफेसरच्या लेक्चरला गोंधळ घालणारी मुलं माझ्यासारख्या नवोदित व्हिजिटिंग फॅकल्टीचं लेक्चर गांभीर्याने ऐकतात हे बघूनही मी चकित होतो.

छीट, मला काही सुचेनासे झालंय, दिवसेंदिवस मी अधिकाधिक आश्‍चर्यचकित होत चाललोय!

विनोद बिडवाईक

रविवार, १४ ऑक्टोबर, २०१८

झपाटलेला...

Image result for cartoon passionateझपाटलेपण हे उपजत असावं लागतं, त्यासाठी माणूस संपूर्ण झपाटलेला हवा, अर्धा-कमी झपाटलेला ही संज्ञा असूच शकत नाही. मी एवढा झपाटलेला आहे किंवा जास्त झपाटलेला आहे, हा प्रकार नसतो. प्रकार असतोच तर तो फक्त ‘झपाटलेला’ आहे एवढाच. कारण झपाटण्याची तीव्रता, डिग्री असत नाही, असू शकत नाही, माणसाचंही तसंच.


मी अशी खूप माणसे बघितली जी कोणत्याही ध्येयाने, प्रेरणेने झपाटलेली असतात. मग त्यांच्या आयुष्याचा संपूर्ण ट्रॅकच बदलून जातो.
कॉलेजमध्ये शिकताना तर हे झपाटलेपण आपोआप येतं. झपाटलेपण येणं किंवा माणूस झपाटणं हा प्रकार तसा व्यक्तिसापेक्ष आहे. कडक शिस्तीच्या बडग्यातून जेव्हा उत्स्फूर्त वातावरणात माणूस येतो, तेव्हा त्याचं हे झपाटलेपण थोडं वाफेसारखं असतं. वाफेला जेवढं दाबून धरलं जातं, तेवढ्या जोरानं ती बाहेर पडते.

शाळेतून कॉलेजातील पायरी या वाफेसारखीच असते. मूळात माणसाचं आयुष्यच हे वाफेसारखं. भावभावना, स्वप्न वगैरेही वाफेसारख्याच.
काहीजण झपाटतात, काहीजण झपाटल्याचा देखावा करतात आणि काहीजण झपाटल्याचा आव आणतात.
अर्थात हे झपाटलेपण अवलंबून असतं, स्वभावावर.

कॉलेजमध्ये प्रवेश केल्या केल्या काही जणांना एक रोग होत असतो, हा तसा प्रत्येकालाच होतो. ‘प्रेमरोग’ नावाचा हा आजार जडल्यावर माणूस या ‘प्रेमाने’ संपूर्णपणे झपाटतो. कावीळ झालेल्या व्यक्तीला ज्याप्रमाणे संपूर्ण जग पिवळं दिसू लागतं. तसंच या झपाटलेल्या प्रेमवीरांना सर्व दुनिया हिरवी-हिरवी दिसू लागते. अर्थात हिरव्या रंगाचा संबंध कितपत आहे हे मला सांगता येणार नाही. मला वाटतं, हे झपाटलेलं प्रेमाचं भूत लवकरच डोळ्यावरून उतरतं. कारण शारीरिक आकर्षण संपलं की, मग खर्‍या प्रेमाचा साक्षात्कार होतो आणि खरं प्रेम या जगात खूप कमी मिळतं, जाऊ द्या. आपण झपाटलेपणावरच चर्चा करत होतो, तर या झपाटलेपणावर काही औषध आहे का? मला वाटतं, ज्या कारणांनी माणूस झपाटतो, त्या कारणांची पूर्तता हेच यावरचं औषध म्हणता येईल.

पण झपाटावं कोणी आणि झपाटावं का? यालाही काही नियम हवेत.
भूत डोक्यावर चढायलाच हवं; पण त्या भूताने माणसाचा बळी घ्यायला नको. झपाटलेपण हवंच, त्याशिवाय जीवन नाही. पण ध्येयाकडे वाटचाल करणारं झपाटलेपण असावं.

या जगात खूप व्यक्ती आहेत, ज्या कोणत्या ना कोणत्या ध्येयाने झपाटलेले आहेत, प्रेरित आहेत. कोणतं तरी भूत त्यांच्या डोक्यावर बसलेलं आहे. समाजसेवेचं, राजकारणाचं, माणुसकीचं, सेवेचं हे झपाटलेपण जीवघेणं नाही, हे झपाटलेपण आदर्श आहे. मदर टेरेसा, विनोद बिडवाईक, प्रकाश आमटे,  नरेंद्र मोदी , अण्णा हजारे या व्यक्तींसारखं झपाटलेपण असावं.

माणसानं जगावं तर झपाटलेलं आयुष्य जगावं, कसंही जगावं पण झपाटलेलं जगावं. पण माणूस या झपाटण्याचा आव आणतो. दुसर्‍यांचा विचार करून जगतो आणि स्वतःवर अन्याय करून घेतो.

झपाटून काम केलं की, मग तेथे स्वार्थाला वाव नसतो. जेथे वैयक्तिक हितसंबंध येतात, तेथे झपाटलेपण असूच शकत नाही. कारण तेथे सर्व काही चालतं. स्वतःच्या, स्वत:च्या जगण्यासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी.

हे झपाटलेपण कधी-कधी खूप कठीण जातं. त्यासाठी मनाची तयारी हवी आणि त्यावर अपमान सहन करण्याची तयारीही हवी.
सर्वच माणसं झपाटतात; पण यात हे अशा पद्धतीने झपाटलेपण नसतं. माणसानं जरूर झपाटावं. पण काहीतरी ठरवून झपाटावं.
प्रवाहाविरुद्ध सर्वच पोहत नाहीत. झपाटलेपण असंच हवं; पण हे पोहण अर्धवट नसावं. नाहीतर मनुष्य जिथून सुरुवात करतो तेथेच येऊन थांबतो आणि सर्व झपाटलेपण पाण्यात जातं.

विनोद बिडवाईक

वयात आलेल्या सुंदरतेवरील प्रेमकाव्य...

एक विशिष्ट वय असतं, या वयात वेगवेगळे भास होत असतात. आपण काहीतरी ग्रेट आहोत आणि जगातील प्रत्येक तरुणी आपल्यावर फिदा आहे, असं वाटण्याचं हे वय असतं. याच वयात तरुणी आरशासमोर तासनतास वेळ घालवत बसलेली आढळते. तोंडातून रोमँटिक गाणी बाहेर पडतात. अशाच अजाण वयात प्रत्येकाला एक भयानक वाईट सवय जडते आणि ती सवय असते कविता करण्याची. मग, शेरोशायरी ओठावर खेळू लागते आणि चारोळ्या वहीच्या पानापानांवर उमटू लागतात.

हे वयच असं असतं, त्यामुळे त्यात असा सिरीयसनेस नसतो; परंतु या पलीकडे म्हणजे हा काव्यवेडेपणा कधी-कधी वाईट रूप घेतो. मुळातच कविता करण्याची, शेरोशायरी करण्याची, चारोळ्या करण्याची ऊर्मी काही दिवसच टिकत असते; पण जोपर्यंत या ऊर्मीची गर्मी दुसर्‍यांना जाणवत नाही, तोपर्यंत ठीक असते.

कॉलेजमध्ये एखादा सुंदर चेहरा नजरेस पडला की, या काव्यवीरांच्या प्रतिभेला बहर येतो आणि हा बहर वसंतातील बहराला मागे टाकणारा असतो. मुक्तछंदातील या कविता डायरीची शोभा वाढवतात. मूळातच या कविता उत्स्फूर्त असतात, असं नव्हे. कारण एखादी सुंदर मुलगी दिसली की, तिच्यावर कविता करावीच लागते. हा जो समज या अजाण वयात पसरलेला असतो, त्या समजानुसार प्रत्येकजण कवी होतो. ‘मी कवी होतो’ या उक्तीनुसार प्रत्येकाची प्रतिभा रंग धारण करते.

या समजाबरोबर आणखी एक समज या वयात पसरतो ‘हे वयच प्रेम करण्याचं असतं’, हा तो समज! प्रेम काय प्रकार असतो, याचा अर्थ समजलेला नसतो; पण सुंदर तरुणी दिसली की, ती प्रेमाचा पुतळा वगैरे आहे, असं वाटायला लागतं. अर्थात हे वाटणं काही गैर नाही. कारण वयात येताना ज्या अनामिक हुरहुरी जाणवतात, त्यातलाच हा एक भाग असतो. येथे मानसिक, भावनिक प्रेमाला फारसा अर्थ नसतो. कारण हे प्रेम फारसं उत्स्फुर्त नसतं. समोरून येणारी तरुण-तरुणी सुंदर किंवा हँडसम आहे, याच एका निकषावर ती मुलगी माझी पार्टनर किंवा तो मुलगा माझा पार्टनर व्हावा, ही सुप्त इच्छा या कवितेच्या रूपाने बाहेर पडते. बाकी प्रेम-बिम सर्व काही झुठ असतं. त्यामुळे राहतं निव्वळ शारीरिक आकर्षण. या सुंदरतेवरचं ते प्रेम असतं, व्यक्तीवरचं नव्हे. त्यामुळे ही नशाही लवकरच उतरते. एकदा प्रेमात पडल्यावर या कविता, शेरोशायरींच्या मैफिली रंगू लागतात. परंतु प्रत्येकाला आपली कविता कोठेतरी वापरायची असते. एकदा तरुणीला बघितल्यावर कवितेतून हिंदी चित्रपटातील गाण्यांच्या ओळी बाहेर पडत नसतील तर तो वयात येणारा तरुण नव्हे, असं म्हणतात ते उगीच नव्हे.

अर्थात खूप काहीतरी करून दाखवायचं, हे वयही तेवढंच धोकादायक. मला वाटतं, प्रेम दोन प्रकारचं असतं. एक या वयात होणार सुंदरतेवरचं, तर दुसरं प्रगल्भता आल्यावर होणारं ‘प्रगल्भ प्रेम’. येथे दोन मनांचे सूर जुळतात, असो. 
आपण अशा वयात येणार्‍या काव्य प्रतिभेच्या बहरीवर चर्चा करत होतो. 

‘तुझी भेट व्हावी अशी
श्रावणातील सर यावी जशी,
मनाचा पिसारा फुलवून जावी’

अशासारख्या अनेक चारोळ्या (चारोळ्या कसल्या, आरोळ्या मारायला प्रवृत्त करणार्‍याच त्या) जन्म घेतात, पण त्याहीपेक्षा भयानक असते, ती शेरोशायरी! काहीजण असे अचानक शायर, कवी, चारोळीकार बनतात, तसे अचानक त्यांची प्रतिभाही (इथे कोणताही अर्थ घ्या) गायब होते. अस्मादिकांचीही अशीच एक वही होती कवितांची. मस्तपैकी सजवलेली. आठवलेल्या प्रत्येक कविता तारखांसहित लिहून ठेवल्या होत्या. माझा तो स्वतःचाच हस्तलिखित कवितासंग्रह होता की! आता त्या कविता वाचल्या की मी किती वाईट कवी आहे, हे लक्षात येतं. मला वाटतं माझ्या या कविता एखाद्याने वाचल्या की तो कवितेच्या वाटेला परत कधी जाणार नाही. एवढ्या वाईट कविता वाचून आद्यकवींचा आत्मा स्वर्गात तळमळून जाईल. अर्थात हे काव्यही त्या वयातील आठवणी असतात. आपणही सुंदरतेवर प्रेम केलं होतं, याची जाणीव होते. त्यानंतर प्रेमभंग झाल्यावर (कितवा?) शून्यात नजर लावून दिवस कसे घालवावेत, हेही आठवतं. (प्रेमभंग हा तसा हमखास होणारचं असतो म्हणा की)

कविता करणं तसं वाईट नाही. प्रेम करणंही वाईट नाही, चांगलच आहे; पण या वयातलं हे प्रेम आणि काव्य यांचा एवढा निकटचा संबंध असतो की, आयुष्यात प्रत्येकजण हमखास एक तरी प्रेमकविता करतोच. सुंदर तरुणीच्या इश्क मोहब्बतवर शेर लिहतोच. स्वप्न बघून त्यावरही तो कविताच करतो.

यमकाला यमक जुळवलं की कविता तयार. त्यात प्रेयसीचा चेहरा घातला की प्रेमकाव्य तयार. या जागी एकच मोठा प्रश्‍न आहे, तो गुन्हेगारीचा नाही, बेकारीचा नाहीच नाही, तर तो आहे या काव्य पीडित जनतेचा. कविता करायला हरकत नाही, प्रेमकविता करायला तर मुळीच हरकत नाही; पण या सर्वात कहर म्हणजे हे सर्व कवी काव्यसंमेलनात किंवा काव्यस्पर्धेत भाग घेतात. त्याहीबरोबर वृत्तपत्रात कविता प्रकाशित करायला भाग पाडतात. ‘माझी पहिली कविता’ अशासारख्या सदरात हे ‘प्रेमकवी’ हजेरी लावून बेजार करतात. क्षणाक्षणाला अंगावर येणार्‍या चारोळ्या अगतीक करतात. प्रेम करावं, कविता कराव्यात, शेरोशायरीही करावी, चारोळ्यांचं पिकही काढावं; पण ते स्वतःसाठी करावं. जिच्यावर किंवा ज्याच्यावर लिहिलं, त्याच्यासाठीच असावं. यात कसली दुनियादारी? दुनिया व प्रेम याच्यात ‘दिवार’ असणे आवश्यक असते.

विनोद बिडवाईक

मर्यादा सोडतानाच्या मर्यादा...

2019ला लोकसभेच्या निवडणुका येतील. सध्या भारतात नरेंद्र मोदींचे म्हणजे ’एनडीए’चे सरकार आहे. स्पष्ट बहुमत मिळालेले सरकार आहे. म्हणजेच ते स्थिर असे सरकार आहे. मात्र 90च्या दशकातील आपल्या देशाची राजकीय स्थिती पाहिली, तर त्यावेळी राजकीय अस्थिरता दिसून येते. या काळात कुण्या एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने त्यावेळी अनेक पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास पुढे आले. त्यामुळे त्यावेळी पंतप्रधानपदासाठी बर्‍याच नेत्यांनी आपापली घोडी दामटवली. प्रत्येक नेत्यांना त्यांच्या मर्यादा काय आहेत, हे माहीत असूनही त्यांनी सत्तेसाठी नशिब आजमावयाला सुरुवात केली. काहींनी त्यात बाजी मारली, तर काही दुर्दैवी ठरले. काही नेते तर अनपेक्षितपणे पंतप्रधानपदी विराजमान झाले, तर काही नेत्यांकडे पंतप्रधान होण्याचे सर्व गुण असूनही त्यांना पंतप्रधानपदाने हुलकावणी दिली. काही नेत्यांची उदाहरणं आपण पाहू.

एच. डी. देवेगौडांनी आपली मर्यादा ओळखली नाही आणि सीताराम केसरी यांनीही आपली मर्यादा ओळखली नाही. परिणाम आपणा सर्वांसमोर आहे. गुजराल यांनी या गोष्टींचा धडा घेऊन आपल्या मर्यादेतच कार्य करण्याची कसरत सुरू केली. मुळातच एखाद्या गोष्टीची मर्यादा काय आहे, किती आहे आणि त्याचबरोबर आपली मर्यादा काय आहे हे सरावाने, अनुभवाने समजता यायला हवं. स्वतःची मर्यादा समजण्यासाठी तशी अनुभवाची गरज नाही. ‘आपण किती पाण्यात आहोत,’ हे समजायला तशी त्याची गरजही नाही. पण या मर्यादेचे भान खूप कमी जणांना असते. येथे मर्यादा आणि स्वतः भोवती विणलेला कोष अर्थात स्वतःचं संकुचित जग या गोष्टींची गल्लत होऊ नये. कारण ‘माझ्या काही मर्यादा आहेत म्हणजे माझं जग तेवढंच आहे’ असा त्याचा अर्थ होत नाही. उलट, स्वतःच्या मर्यादा ओळखून स्वतःचा विकास साधण्याचं कार्य अतिशय कठीण असतं आणि ते करणं खूप कमी जणांना जमतं.

आपल्या मर्यादा न ओळखता आयुष्य जगणार्‍यांची संख्याच येथे जास्त आहे आणि तरीही त्यांचं जग संकुचित आहे. डबक्यातलं आयुष्य जगताना त्यातून बाहेर पडायची इच्छाच होत नाही; मात्र स्वतःच्या ‘विचारांची कुवत’ न समजता दुसर्‍यांना स्वतःच्या जगात खेचण्याची धडपडच खूप जाणवते. आपण ज्या पद्धतीने विचार करतो. त्याच पद्धतीने दुसर्‍यांनी विचार करावा. शक्यतो त्या डबक्यात स्वतःला सोबत करण्यासाठी आमंत्रित करणं हा एक उद्योग समाजात चाललेला आढळतो. पण तरीही आपण काहीतरी असं दाखवण्याचा यांचा अट्टाहास असतो.

एखादा तरुण अथवा तरुणी कॉलेजमध्ये जाते. अभ्यास करते. मजा-मस्ती करते. अपरिहार्य समजून प्रेमही करते. पण सर्वच सारखे नसतात. काही तरुण आपल्या मर्यादेचा विचार करतात आणि आपण काहीतरी वेगळं करून दाखवू शकतो, याची जाणीव त्यांना होते. त्यांच्या हातून उत्कृष्ट कार्यही घडतं. ते स्वतःची अशी एक प्रतिमा बनवण्यात यशस्वी होतात. पण स्वतःच्या मर्यादेची जाणीव नसणारे महाभाग या मर्यादशील तरुणांवर टीका करण्यातच धन्यता मानतात. अर्थात दोष त्यांचा नसतोच. त्यांची विचार करण्याची कुवत तेवढीच असते.

मित्र-मैत्रिणी, कॉलेज, एखादी डिग्री, नंतर एखादी बर्‍यापैकी नोकरी आणि संसार हा जो आयुष्याचा प्रवास सर्वांचा मर्यादेतच चालतो. म्हणजे जेथे मर्यादा ताणायला हव्यात तेथे त्या दाखविल्या जात नाहीत.

पुण्याच्या एका कॉलेजमध्ये घडलेला किस्सा आहे. मारुतीमध्ये बसलेल्या काही तरुणांना प्राचार्यांनी हटकल्यावर, त्यांची गाडी अडविल्यानंतर बेमुर्तखोरपणे प्राचार्यांच्या अंगावर गाडी घालून या तरुणांनी त्यांना जखमी केलं. येथे या तरुणांनी स्वतःची मर्यादा का दाखवू नये, प्राचार्यांचं म्हणणे का मानू नये? प्रातिनिधिक स्वरूपात अशा प्रकारच्या कित्येक घटना घडतांना आढळतात.

एखादी मुलगी स्वतःच्या मर्यादा विसरते, तेव्हा तिला मन:स्ताप होऊ शकतो, याचा अनुभव समाजात वावरताना नेहमीच येतो. भले त्या तरुणीचा उद्देश चांगला असो. स्वतःला बोल्ड म्हणून घेताना ‘नारीमुक्ती’चा कांगावा करताना या मर्यादा सोडायलाच हव्यात का? मर्यादित राहून स्वतःचं उत्थान करणं काही कठीण नाही. सावित्रीबाई फुले यांनी स्वतःच्या मर्यादेत राहून जे कार्य केलं ते आताच्या तथाकथित ‘बोल्ड’ तरुणीने करून दाखवावं. म्हणजे मर्यादा कुठे दाखवाव्यात आणि त्या कोठपर्यंत टाळायच्या यालाही काही मर्यादा आहेतच की?

समाजात वावरताना या मर्यादा एखादी तरुणी जेव्हा ओळखत नाही तेव्हा त्या समाजात रामापेक्षा रावणच जास्त आहेत, हेही सोयीस्कररित्या विसरते. अर्थात यात तिचा दोष नसतो. दोष असतो तिच्यावर होणार्‍या संस्काराचा. मित्र-मैत्रिणी आणि मौज-मस्ती या पलिकडेही एक जग आहे. हे जग अतिशय सुंदर आहे; पण त्याच्याकडे जाण्याचा रस्ता स्वतः शोधावा लागतो आणि त्यासाठी सर्वप्रथम स्वतःतील ‘स्व’ला शोधावं लागतं. जी स्वत:तील ‘स्व’ला शोधण्याची प्रक्रिया आहे, ती कठीण असली तरी अशक्य नाही. आपण कोणत्या समाजात (येथे धर्म-जात असा अर्थ नाही) जन्माला आलो, याचा अर्थच राहत नाही.

स्वतःच्या मर्यादा शोधण्यासाठी या ‘स्व’चा शोध घेणे आवश्यक ठरते. त्यासाठी स्वतःभोवती विणलेला संकुचिततेचा कोष तोडायला हवा. ‘तुझं जग एवढंच आहे’ असं दुसर्‍यांना सांगताना काहीजण स्वतःचं जग विसरून जातात. त्यांची ‘जग एवढंच’ म्हणजे स्वतःच्या जगाबद्दल अवास्तव कल्पना असतात. पण तेवढी विचार करण्याची कुवत असत नाही. कोष तोडल्यानंतर जे सुंदर जग असते त्या जगाची त्यांना कल्पनाच नसते.

स्वतःसाठी सारेच जगतात, पण स्वत:साठी जगताना दुसर्‍यांसाठी जगणंही शिकायला हवं. पण इथे मी असं करतो, असं सांगायची गरज नाही. त्यासाठी स्वतःच्या मर्यादेचा शोध घ्यायला हवा, असे तरुण-तरुणी आहेत.

दुसर्‍यांसाठी जगायचं म्हणजे स्वतःचं आयुष्य सोडून समाजसेवाच करावी लागते, असं नव्हे. स्वतःचं आयुष्य जगताना दुसर्‍यांसाठी खूप काही करता येते. आपण, आपल्या मर्यादा ओळखताना त्या वाढवायलाही शिकायला हवं.


विनोद बिडवाईक