
सांगायचा मुद्दा एवढाच की ब्रह्मदेवाने माझ्यात आश्चर्चचकित होण्याचा गुणधर्म थोडा जास्तच दिला आहे. मला समजायला लागल्यापासून म्हणजे वयाच्या पाच वर्षांपासून (आता हे समजायचं वय अकाली प्रौढ झालं, मुलांना दोन महिने लागल्याबरोबरच ते समजावून घेतात.) नेहमीच मी चकित होत गेलो. कदाचित या जगात माझा अवतारही (?) एक (दुसर्यांना) आश्चर्यचकित करणारी घटना होती. कारण लहानपणी वयाच्या बाराव्या दिवशी (माझ्या) मला बघायला येणार्या प्रत्येकाच्या चेहर्यावरचे भाव हे आश्चर्याचे होते. माझे पाय पाळण्यात दिसतात हे सर्वांचेच मत, पण मुळातच ती माझी करामत. म्हणजे दुसर्यांना ते पाय दिसावेत म्हणून मीच ते पाय पाळण्याच्या वर काढत असे, असो.
तसं आश्चर्यचकित होणं, काय वाईट आहे? पण नाही, पहिल्यांदा मी जेव्हा शाळेत गेलो तेव्हा मुच्छड गुरुजींना बघून आश्चर्यचकित झालो. नंतर-नंतर मी चकित होता होता रडतही असे. (त्या मानाने आताची पोर भाग्यवान. या मुच्छड गुरुजींची जागा सुंदर सुंदर तरुणींनी घेतल्यापासून तर परत एकदा शाळेत नाव घालावं अशी इच्छा होऊ लागली आहे.) या घटनेनंतर मी नेहमीच चकित होत गेलो. पेपर बघून आणि निकाल बघितल्यावर मी एवढा आश्चर्यचकित झालो असेल की तेवढा कधी मी गुरुजींच्या हातचा मारही खाल्ला नसेल.
मात्र दहावीचा निकाल बघून तर मी चकित झालोच होतो. पण त्याचबरोबर आमच्या क्लासटीचर (जाड टाइप) पंधरा दिवस आयसीयूमध्ये भरती होत्या. कारण मी चक्क फर्स्ट क्लासमध्ये पास झालो होतो. त्यानंतर मीही कधी कधी दुसर्यांना आश्चर्चचकित करू शकतो याची मला खात्री पटली.
मुळातच मी आश्चर्यचकित होऊ नये, असं मी खूपदा ठरवतो; पण हे ठरवणंही एक आश्चर्यच ठरतं. व्ही. पी. सिंग पंतप्रधान झाले (1989 साली) तेव्हाही आश्चर्यचकित झालो होतो; पण जेव्हा चंद्रशेखर पंतप्रधान झाले (1990 साली) तेव्हा तर मी आश्चर्याच्या बरोबर व्यथितही झालो होतो. पी. व्ही. नरसिंहरावांनी पाच वर्षे सत्ता उपभोगली (1991 ते 1996), हे माझ्या आश्चर्याचं कारण! पुढे 2004 साली डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान झाले, त्या वेळीही तसाच आश्चर्याचा मोठा धक्का मलाच काय संपूर्ण देशाला बसला असेल! हे मी खात्रीशीर सांगेन. (काही बाबतीत दुसर्यांची मते माझ्या मताशी हमखास जुळतात.)
मला काही कळेनासं झालंय, मी पुरता गोंधळून गेलेलो आहे. 1996 साली मायकल जॅक्सनचा भारतात मुंबईमध्ये कार्यक्रम होणार होता. त्याच्या नाचण्याने आपली संस्कृती पडणार (भिंत पडावी तशी) हे वाचून आणि ऐकून आपली संस्कृती एवढी कमजोर आहे हे उमजून मी आश्चर्यचकित होतो. तशीच काहीशी घटना 2016 सालीही सनबर्न फेस्टिव्हल पुण्यात होणार होता. त्यावेळीही आपली संस्कृती ढासळणार वगैरे वगैरे... मी टू , शहरी नक्सल सारख्या शब्दानेही मी आश्चर्यचकित होतो.
एखादा तरुण एखाद्या तरुणीची छेड काढतो तेव्हाही मी आश्चर्यचकित होतो. पण त्या तरुणीच्या सँडलचा मार जेव्हा त्या तरुणाला बसतो तेव्हा त्या लाजाळू वाटणार्या तरुणीचा आवेश बघूनही मी थक्क होतो. कॉलेज कट्ट्यावर बसून टवाळक्या करणार्या कंपूतला एखादा जण रस्ता ओलांडणार्या आंधळ्याचा हात धरून रस्ता क्रॉस करायला मदत करतो, तेव्हा मी आश्चर्यचकित होतो आणि एखाद्या बोअर प्रोफेसरच्या लेक्चरला गोंधळ घालणारी मुलं माझ्यासारख्या नवोदित व्हिजिटिंग फॅकल्टीचं लेक्चर गांभीर्याने ऐकतात हे बघूनही मी चकित होतो.
छीट, मला काही सुचेनासे झालंय, दिवसेंदिवस मी अधिकाधिक आश्चर्यचकित होत चाललोय!
विनोद बिडवाईक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा