मंगळवार, २९ डिसेंबर, २०२०

श्री गुरुदेव दत्त आणि गुरूंचे महत्व

श्रीगुरु दत्त, श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती, दत्ताचे अनेक अवतार. सर्व काही सामान्य जणांच्या भावविश्वात घर करून आहेत. भक्ती तेथे शक्ती ह्या उक्तीचा अनुभव देणारे श्रीगुरु दत्त महाराजांची आज जयंती. दत्त गुरूंचा जन्म अनुसया मातेच्या पावित्र्याच्या तेजातून झालेला आहे. दत्तगुरु ब्रम्हा, विष्णू आणि महेश ह्यांचा अवतार आहेत. सर्जनशीलता, विश्वनिर्मिती, विश्वपोषण, आणि विनाश करणाऱ्या शक्तींचा हा अवतार आहे. दत्तगुरु हे सामान्य जनतेचा देव आहेत.

चित्र: डॉ धनश्री बिडवाईक 

एकदा ह्या जगाचा निर्माता, ब्रम्हाने सर्व सृष्टीला एकत्र केले आणि म्हणाले, “मनुष्य जोपर्यंत प्रगल्भ होत नाही तोपर्यंत त्याची शक्ती मी त्यांच्यापासून कोठेतरी लपवू इच्छितो. स्वतःची ओळख तयार झाल्यावर ह्या शक्तीचा ते उपयोग करू शकतील." 

पवन म्हणाला, “ते मला दे मी चंद्रात लपवून ठेवीन."

ब्रह्मदेव म्हणाले,” नाही. एक दिवस ते तेथे जाऊन ते शोधतील.”

मासा म्हणाला, “मी ते समुद्राच्या तळाशी नेईन .”

"नाही ते तिथेही जातील."

पृथ्वी म्हणाली, "मी ते माझ्यात संपूर्ण लपवून ठेवीन."

ब्रह्मदेव म्हणाले, “ते तुझे कवच कापून तेथेही शोधतील.”

शेवटी विष्णू म्हणाले, "ती शक्ती त्यांच्यातच लपवून ठेवा देवा." 

ब्रह्मदेवाने लगेच ती सर्व शक्ती मनुष्यातच मनात लपवून ठेवली. 

ती शक्ती, क्षमता म्हणजेच आपली अव्यक्त स्वयंशक्ती, ऊर्जा, धैर्य, माणुसकी, शांतता आणि आत्मविश्वास.

आपण सर्व काही बाहेर शोधतो, देवळात देव शोधतो, सर्वकाही बाहेर शोधतो. ह्या सर्व शक्ती आपल्यातच आहेत ह्याची जाणीव आपल्याला कधीच होत नाही. 

मनुष्यात अमर्याद सामर्थ्य लपलेले आहे. हाच संदेश दत्त गुरु देतात. जेव्हा स्वामी समर्थ, "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" असे सांगतात, तेव्हा ते आपल्यात असणाऱ्या सामर्थ्याला आव्हान देत असतात. तू पुढे जा, मी पाठीशी आहे. जे काही करावे लागणार ते तुलाच करावयाचे आहे. ते करण्याचे सामर्थही तुझ्यात आहे. भिऊ नकोस. आत्मविश्वासाने पुढे जा...मी आहेच पाठीशी." हा स्वामींचा दिलासा आपल्याला यशाकडे, कर्तव्यपूर्तीकडे घेऊन जातो.  

कोणतीही अपेक्षा न ठेवता, मनापासून जर तुम्ही आराधना केली तर तो नक्कीच मदतीला येतो. दत्त आणि दत्ताचे अवतार पुरुष हे अगदी साधे अवलिया अवतार आहेत. कोणत्याही तंत्रमंत्राचा, विधीचा उदो उदो ते करत नाहीत. जेथे सर्व मार्ग संपतात, तेथे गुरु मदतीला येतात. 

दत्त गुरूंचे स्वतःचे २४ गुरु आहेत. हे सर्व गुरु आहेत. 

पृथ्वी, पाणी, हवा, आग, आकाश, चंद्र, सूर्य, कबूतर, अजगर, महासागर, पतंग, मधमाशी, मध गोळा करणारा, हत्ती, हरण, मासे, नृत्य करणारी मुलगी, पिंगळा, डोंबकावळा, लहान मूल, कुमारिका साप, बाण बनविणारा, कोळी आणि किडा.

रेखाटन: डॉ धनश्री बिडवाईक 

अश्या आणि अनेक गुरूकडून दत्त शिकले. निसर्ग हा आपला पहिला गुरु आहे, आजूबाजूला घडणारे प्रसंग दुसरा गुरु आहे. घडणाऱ्या घटना काहीतरी शिकवून जातात हाच संदेश दत्त गुरु देतात. 

स्वामी समर्थ असोत, नृसिंह असोत, शंकर महाराज, ह्या दत्त अवतारांची कधीच रेडिमेड उत्तरे दिली नाहीत. त्यांनी माणसाला आधी एखादे कर्म करण्याचा उद्देश आणि हेतू जाणून घ्यायला सांगितला.    

मनात भक्ती असेल तर नक्की अनुभूती येते. श्रद्धा महत्वाची. तुमचा विश्वास कदाचित असेलही पण श्रद्धा नसेल तर अनुभूती कठीण आहे. जेव्हा तुम्ही तुमचा मी पणा सोडून गुरूंना शरण जाता तेव्हा नकळत सर्व काही मोकळे होते. बरे गुरूंना शरण होण्यासाठी गंडेदोरे, विधिविधान आणि तंत्रमंत्राची गरज नाही. डोळे मिटून नामस्मरण केले की मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते.  मानसपूजा ह्या देवांना पुरेशी आहे. दत्तगुरु, स्वामी अशी फक्त हाक दिली तर मनोकामना पूर्ण होतात. फक्त ती हाक हृदयापासून यायला हवी. मनात आतुरता हवी. 

दत्त गुरु, स्वामी, आणि श्रीपाद श्रीवल्लभ हे पुजण्याचे देव नाहीत तर मानण्याचे आहेत. ते देव आणि अवलिया महापुरुष म्हणून महान आहेत पण त्याचबरोबर मार्ग दाखवणारे गुरु आहेत.

दत्तसंप्रदाय हा महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात पोहोचलेला आहे. तळागाळातील लोक दत्तगुरूंचे भक्त आहेत. हजारो लोक स्वामी समर्थांच्या मठात जातात. कोठेही बाजारूपण नाही, बडेजाव नाही. ह्या जागी सर्वजण एकत्र येतात. ओठावर दत्ताचे आणि समर्थाचे नामस्मरण तेवढे असते. पण सर्वाना गुरूंची प्रचिती येते. 

खऱ्या अर्थाने दत्तगुरु आध्यात्मिक विकासाचा मार्ग दाखवतात. हे करत असताना प्रापंचिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त करतात. दत्ताच्या प्रत्येक लीलांमधून कोणतातरी संदेश आहे. चमत्कार समजून ते वाचले तर हातात काहीच पडणार नाही, पण त्यामागचा अर्थ समजून घेतला की मग सर्व सोपे आहे. 

प्रत्येक गोष्ट विधात्यापासून सुरु होते आणि तेथेच संपते. ह्या दोन बिंदूंमधला प्रवास म्हणजे जीवन. हा प्रवास सुकर करण्याचे माध्यम म्हणजे गुरु...त्याला तुम्ही कोणत्याही नावाने हाक मारली तरी तो एकच, दत्त गुरु, स्वामी समर्थ, श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती.

विनोद बिडवाईक 


(विनोद बिडवाईक ह्यांची सर्व पुस्तके फ्लिपकार्ट आणि बुकगंगा वर उपलब्ध आहेत.  इंग्रजी मध्ये लिहिली पुस्तके किंडल फॉरमॅट मध्ये ऍमेझॉन वर उपलब्ध आहेत.)  

३ टिप्पण्या: