दोन तीन दिवसापासून गावातील वातावरण एकदम उत्साही झाले होते. घरातील मोठी माणसे आणि लहान मुले, आबालवृद्ध, धनिकांच्या घरी काम करणारे गडी सर्वजण आनंदात होते. प्रत्येकजण उत्साहाने एकमेकाला विचारात होते कि "तू येणार ना?". शाळेमध्ये तीच चर्चा होती. मधल्या सुट्टीत गप्पांचा विषय तोच होता आणि तेथेही सर्वजण एकमेकाला विचारात होते, "तू येणार ना?" किती वाजता जायचे, कोठे बसायचे, समोरची जागा पकडायची कि मागची, अश्या प्रकारच्या चर्चेचे गावात उधाण आले होते. घरातील सुनांना कधीतरी बाहेर पडायची संधी मिळणार होती म्हणून त्या पण खुश होत्या. एकंदरीत उत्साहाचे भरते आले होते.
आमच्या गावात देशमुखांचा जवाहर साऊंड सिस्टम भाड्याने देण्याचा व्यवसाय करत असे. म्हणजे त्याचा खरा उद्योग गावातील पारावर मित्रांना गोळा करून पत्ते खेळण्याचा होता. कधीकधी जवाहर आणि त्याचे मित्रलोक चौसर पण खेळत असत. त्यातून वेळ मिळाला की बापाशी भांडायचे आणि त्यातूनही वेळ मिळाला कि मग शेतात काम करायचे आणि पूरक उद्योग म्हणून साऊंड सिस्टम भाड्याने देण्याचे काम करायचे. असे उद्योग जवाहर करत असे. साऊंड सिस्टम मध्ये दोन भोंगे, एक अँप्लिफायर, एकदोन माईक, काही तबकड्या आणि कॅसेट असायच्या. गावातील गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेश्या होत्या.
एक दिवस जवाहर आमच्या गावापासून २५ किलोमीटर दूर असणाऱ्या परतवाडा नावाच्या शहरात गेला. कोणीतरी त्याला, गावात तंबू लावून चित्रपट दाखवण्याचा धंधा करण्याचा सल्ला दिला. परतवड्यात असे तंबू लावून चित्रपट जोरात चालत असत. ते पाहण्यासाठी गावातील मंडळी कधीकधी जात असत. ह्या तंबूतील चित्रपटांना टुरिंग टॉकीज म्हणत असत. अर्थात त्यापैकीच एकाने जवाहरची मदत घेण्याचे ठरवले. सर्व व्यवस्था तो मालक करणार, गावातील विजेची, मैदानाची, आणि लोकांना घेऊन येण्याची व्यवस्था तेवढी जवाहरने करायची अशी ही भागीदारी होती.
ही व्यवस्था पूर्ण करण्याच्या आधी जवाहरने गावातील बऱ्याच लोकांच्या घरी जाऊन त्यांची मते घेतली होती. थोडक्यात हा एक मार्केट सर्वेच म्हणावा लागेल आणि ह्याच आधारावर गावांमध्ये टुरिंग टॉकीज ला चांगले दिवस आहेत या निष्कर्षाप्रत जवाहर आला होता.
आणि एक दिवस जवाहरने त्याच्या साऊंड सिस्टिम चा उपयोग पहिल्यांदा स्वतःसाठी करण्याचा निर्णय घेतला. मोठ्या आवाजात त्याने टुरिंग टॉकीजची प्रसिद्धी करायला सुरुवात केली. येत्या रविवारी गावात "सती सावित्री" हा चित्रपट या टुरिंग टॉकीजमध्ये दाखवण्यात येणार असल्याचे जाहीर केले. खरं तर हे जाहिरातीचे तंत्र पूर्णपणे यशस्वी झाले होते. गावांमध्ये टुरिंग टॉकीज आणि त्यातही पहिला चित्रपट सती सावित्री. त्यामुळे गावातील प्रत्येक जण या बातमीने उत्साहीत झाला होता. थोडक्यात काय तर मनोरंजनाचे असे नवीन साधन आता गावांमध्ये उपलब्ध होणार होते. त्यावेळेस खरंतर कोणाच्या घरी टीव्ही नव्हते. एक दोन धनिक मंडळी होती, त्यांच्याकडे ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असायचा. रेडिओ आणि टीव्हीवरचे कार्यक्रम सुद्धा ठराविक वेळेस असायचे. त्यामुळे टुरिंग टॉकीजच्या प्रयोगाने गावातील वातावरण ढवळून निघाले नसते तरच नवल.
"सर्व गावकऱ्यांना कळविण्यात येत आहे की येत्या रविवारी दिनांक अमुक-अमुक दिवशी महान भव्य बोलपट सती सावित्री चा प्रयोग गावातील शाळेच्या मैदानावर आयोजित केलेला आहे. पहिल्यांदाच हा प्रयोग करण्यात येत असून सर्व गावकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत हा कार्यक्रम बघण्यासाठी जरूर यावे. प्रवेश फी फक्त दोन रुपये." आणि "आपल्या मृत पावलेल्या नवऱ्याला यमाच्या तावडीतून घेऊन येणाऱ्या, एका सती सावित्रीची ही कहाणी आपल्या डोळ्यात नक्कीच अश्रू आणेल. त्यामुळे हा धार्मिक बोलपट अवश्य बघावा, अशी गावातील आया-बहिणींना विनंती आहे. येत आहे, लवकरच येत आहे सतीसावित्री. प्रवेश तिकिटाचे दर फक्त दोन रुपये" ह्या आणि अश्या जाहिरातींनी जवाहरने अक्षरशः धुमाकूळ घातला. त्याच्या घराच्या छतावर दोन भोंगे लावून दिवसातून कमीत कमी दहा बारा वेळा हा जाहिरातीचा कार्यक्रम पार पडत असे. गावातील लहान मुलांना माईकवर बोलण्याची खूप हौस असायची. त्यामुळे या जाहिरातीचे काम गावातील लहान मुले सुद्धा इमानेइतबारे करू लागली.
शेवटी तो महत्त्वाचा दिवस उगवला. गाव तसे सुस्त असायचे. पण गावातील लगबग जरा जास्तच जाणवू लागली. आया-बहिणी आपापली कामं आटोपु लागली. रात्रीचा स्वयंपाक सकाळीच करून ठेवला गेला. शाळेला तर सुट्टी होती, त्यामुळे मुले जागोजागी उभे राहून चर्चा करू लागले. काही उत्साही लोकआणि उत्साही मुले उगाचच गावातील त्या ग्राउंड वर जाऊन टुरिंग टॉकीज म्हणजे काय असते हे बघून आले. इतर मुलांना माहिती देऊ लागले. परत त्यांना सोबत घेऊन जाऊ लागली. कुठून तरी विजेची व्यवस्था करण्यात आली होती. मोठा तंबू पडला होता. कमीत कमी दोनशे तीनशे लोक बसू शकतील असा तो मोठा तंबू होता. समोर एक मोठा पांढरा पण मळकट मोठा पडदा लावला होता. खरं तर तोपर्यंत माझ्या आयुष्यात मी कधीही चित्रपट बघितला नव्हता. चित्रपट नेमका कसा असतो हेही मला माहीत नव्हते. तो पडद्यावर दिसतो, तो कसा प्रोजेक्ट होतो, ते आवाज कुठून येतात हे मला काहीच माहीत नव्हते. त्यामुळे हा चित्रपट बघण्याची उत्सुकता मलाही होती. आमच्या घरी पण नेमके तेच वातावरण होते. अर्थात बोलपट म्हणजे काय, चित्रपट म्हणजे काय अश्याही चर्चा रंगू लागल्या.
त्यावेळेस पिक्चर काय प्रकार असतो, तो कसा दिसतो, हा सर्व प्रकार मला नवीन होता. नाही, चित्रपट हा प्रकार त्या वेळेस नवीन नव्हता; परंतु विदर्भातील त्या खेडेगावातला तो नवीन होता. खेडोपाडी फिरत चित्रपट दाखविणारे ते ‘मोबाईल थिएटर’गावात अवतरले. गावात अमाप उत्साह संचारला. खरंतर नेहमी शहरात जाणार्या मंडळीना चित्रपट हा प्रकार माहीत होता. परंतु 90 टक्के जनतेने आयुष्यात कधीही पिक्चर बघितला नव्हता. आम्ही सर्व काम सोडून थिएटरच्या तंबूकडे काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करू लागलो. एक मोठा पडदा टांगण्यात आला होता. संपूर्ण मैदान पडद्याने बंदिस्त करण्यात आलं. लाकडी बाबूंचे कठडे बसवण्यात आले. आम्ही बच्चेमंडळी हा सर्व प्रकार कुतूहलाने बघत होतो. गावातील मोठी माणसं पाठीमागे हात बांधून हा प्रकार उत्सुकतेने बघत होती. संध्याकाळ झाली, लाऊडस्पीकरवर घोषणा होऊ लागली, "सुरू होत आहे, चालू होत आहे, महान धार्मिक बोलपट सती सावित्री, ठीक साडेआठ वाजता, सर्वांना विनंती आहे की वेळेवर या, आपापल्या जागी शांतपणे, बसा तिकिटाचा दर फक्त दोन रुपये.
तंबूमध्ये दोन भाग केले होते. एक भाग पुरुषांसाठी. एक महिलांसाठी. मोठ्या मुलांना पुरुषांच्या भागामध्ये बसविण्यात येत होते. हळूहळू गर्दी जमा होऊ लागली. वातावरणातील उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता सती सावित्री हा चित्रपट सुरू होण्याची वेळ आली होती. साडेआठ वाजले. तंबूतील मोठे लाईट बंद करण्यात आले. अंधार झाला. मागून एक फोकस समोरच्या पडद्यावर पडला. काहीतरी काळपट पांढरट वेगात दिसू लागले. पंधरा-वीस मिनिटं हा फोकस अड्जस्ट करण्यात गेले. पडद्यावर शब्द आले, "समाप्त". अरे हे काय आहे. चित्रपट सुरु व्हायच्या आधीच समाप्त? लोकांनी थोडा आरडाओरड केली.
आणि हे काय? यम आणि सावित्रीचा संवाद सुरु झाला. आणि यमाने सावित्रीला आशीर्वाद दिला. कोणीतरी ओरडले, "हे काय आहे? मधेच उलटेपालटे सिन येत आहेत. सुरुवातीपासून सुरु करा." परत पडदा कोरा झाला. आता फक्त प्रकाश दिसू लागला. काही शब्द दिसले आणि प्रोजेक्टर बंद पडले. परत लोक ओरडू लागले. असा प्रकार २५-३० मिनटे सुरु होता. शेवटी पडद्यावर सिन सुरू झाले. सती सावित्रीची कहाणी दिसू लागली, तिचे कुटुंब, वगैरे. आता चित्रपटाने गती घेतली होती. सावित्रीचा संघर्ष बघून बाया मुसमुसू लागल्या. सर्वजण चित्रपटात गुंतून गेले आणि अचानक मागून भांडण्याचा आवाज येऊ लागला. आमच्या गावातील बन्सी काळे नावाचा एक म्हातारा गृहस्थ भयानक दारू पीत असे. त्याने जोरात आरडाओरडा सुरू केला. तंबूचे कापड वर करून तो आत येण्याचा प्रयत्न करू लागला. जवाहर आणि इतर लोक त्याचे सहकारी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होते. "मी पैसे देणार नाही मला बोलपट बघायचा आहे" असे तो जोरजोरात ओरडू लागला. आता झटपट सुरु झाली. ह्या झटापटीत तंबूला लावलेला एक बांबू कोसळला. मागच्या बाजूने संपूर्ण तंबू खाली आला. सुदैवाने आम्ही बसलो होता त्या भागात तंबूचे बांबू सुस्थितीत होते. पण या प्रकाराने सगळीकडे गोंधळ माजला. लोक बाहेर पडायला लागले. काही जण उठून पडद्याकडे गेले. बन्सी काळे आता पुरता चवताळला आणि जवाहरच्या पार्टनर च्या अंगावर धावून गेला. जवाहर बाजूला झाला आणि माईक शोधू लागला. कोठेतरी प्रोजेक्टर च्या टेबल वर पडलेला माईक त्याने हातात घेतला आणि लोकांना शांततेचे आवाहन करू लागला. "बंधुनो आणि भगिनींनो, शांतता बाळगा." पण आता शांतता पाळण्याच्या परिस्थितीत कोणी दिसत नव्हते. एकाने जवाहरच्या हातातील माईक घेऊन फेकून दिला. हे बघून पार्टनर ने बाहेर धूम ठोकली. बन्सी काळे त्याचा पाठलाग करू लागला.
चेंगराचेंगरीची परीस्थिती निर्माण झाली. लोक बाहेर पडू लागले. मी माझ्या आई आणि बहिणीसोबत होतो. बाबांना बाहेर पडताना त्यांनी आम्हाला आवाज दिला. भयानक गोंधळ माजला होता. थोड्या वेळाने संपूर्ण तंबू खाली कोसळला. लोकांनी धुमाकूळ घालायला सुरुवात केली. त्यांनी बांबू उखडले. पडदे फाडले. प्रोजेक्टर ची दशा काय झाली असेल देव जाणे. आम्ही गोंधळातच घरी आलो. सर्व लोक जवाहरच्या नावाने बोंब मारत होते. पुढचे पंधरा दिवस जवाहर गावाच्या बाहेर होता.
सती सावित्री आपल्या नवऱ्याचा प्राण यमराजाकडून परत कसा आणते हे मात्र आम्हाला शेवटपर्यंत समजले नाही. दुसऱ्या दिवशी आईनेच आम्हाला सती सावित्रीची गोष्ट संपूर्णपणे सांगितली.
मी "सती सावित्री" हा चित्रपट संपूर्ण बघू शकलो नसेल, मात्र त्याचा पाहिलेला काही भाग माझ्या आयुष्यातील पहिल्यावहिल्या चित्रपटाच्या नोंदणीत निश्चितच ठेवावा लागेल.
विनोद बिडवाईक
(विनोद बिडवाईक ह्यांची सर्व पुस्तके फ्लिपकार्ट आणि बुकगंगा वर उपलब्ध आहेत. इंग्रजी मध्ये लिहिली पुस्तके किंडल फॉरमॅट मध्ये ऍमेझॉन वर उपलब्ध आहेत.)
अप्रतिम!
उत्तर द्याहटवा