बुधवार, १३ मार्च, २०१९

लक्ष्मणरेषा

घटना फारशी चर्चिली न जाणारी. घराण्याची आणि मुलीची अब्रू जाईल या भीतीने बाहेरच मिटवलेली; पण तरीही अतिशय किळसवाणी आणि मानवी संस्कृतीला कलंक असणारी. सुसंस्कृत समजणार्‍या समाजाबद्दल विचार करायला लावणारी...

एक पाच जणांचा, मित्र-मैत्रीणींचा ग्रुप. मैत्रीण एकच, चार मित्र, दुसर्‍यांच्या नजरेत भरणारा. कॉलेजमध्ये फुलणार्‍या निरागस (?) मैत्रीचं प्रतीक (हेही त्या ग्रुपच्या मतेच). एक मुलगा आणि एक मुलगी सोबत फिरत असली, की ते अफेयर समजलं जातं(!). एक मुलगी आणि चार मुलगे फिरत असतील, तर मतं वेगळी असू शकतील. काही समजदार आणि प्रगल्भ व्यक्ती निखळ मैत्रीचं नाव देतील, काही संकुचित लोक त्या मुलीच्या ‘बोल्डनेस’ला नावं ठेवतील. मुलीच्या घरच्यांना या मैत्रीबद्दल आक्षेप नाही. सर्व मुलं ओळखीचीच. उलट आपली मुलगी अशा मित्रांत सुरक्षित आहे, हीच त्यांची भावना. त्यामुळे सर्व काही आनंदी आनंद. चार मित्रांची मैत्रीही घट्ट. दुवा ती मुलगीच. थोडक्यात, त्या चौघांना एकत्र बांधून ठेवणारा बिंदू तीच. कॉलेजला जाणं, फिरायला जाणं, जणू काही पाच मित्रच. लिंगभेद नाहीच, अशा पद्धतीचं ते वागणं. इतरांना खटकलं, तरी घरचा आणि त्या मुलीचा-मुलाचा पाठिंबा असताना सर्वच बेफिकीर... पण अचानक एक दिवस अवचित घडतं... मित्रत्वाचं नातं गळून पडतं. फुलवलेली मैत्री दुर्गंध देऊ लागते. शारीरिक आकर्षण वाटू लागतं आणि त्या चार मुलांतला मित्र कोठेतरी गायब होतो. शिल्लक राहतो तो फक्त नर. आता उरतात दोन नाती, नर आणि मादी.

मैत्रीण अचंबित होते... हे रूप तर या मित्रात तिनं कधी बघितलं नव्हतं. आजच काय झालं? यांच्या नजरा अशा का झाल्यात? कोठे गेली ती मैत्री? ती हतबल होते आणि चौघांकडूनही कुस्करली जाते. मित्र पशु बनतात. मैत्री या नात्याला कलंक लागलो. तिला काहीच सूचत नाही. काय करावे उमजत नाही? हा प्रकार नवीन होता. आयुष्यात असा प्रसंग वाट्याला येईल, असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण काय करणार? विश्‍वासघात तर झालेला आहेच.

त्या चौघांविरूद्ध पोलिस स्टेशनमध्ये तक्रार जाते, आई-वडील अगतिक, मुलगी उद्ध्वस्त झालेली. मुलीची अब्रू तर गेलीच; पण अजून धिंडवडे निघू नयेत, विटंबना होऊ नये म्हणून समजदार (?) आई-वडील केस मागे घेतात. पण अशा गोष्टी लपतात कोठे? गवगवा तो झालाच...

ती मुलगी उद्ध्वस्त आहे. चूक कोणाची हा वादाचा मुद्दा; पण ती चार मुलं आता बिनधास्त वावरताहेत.

********

ती त्या शहरात नवीन. घरी जाण्यासाठी बसस्टॉपवर उभी. या मार्गावर जाणार्‍या बसेसची तिला काही माहिती नाही. ती गोंधळते. एक तरुण उभा. त्याला ती विचारते. तो योग्य ती माहिती सांगतो.

हे आता रोजचंच. ती मुलगी थोडीशी अल्लड. आयुष्यात कोणाशी कसं वागायचं, याचा अनुभव घेण्याचा कधी प्रयत्न केला नाही. एका अनोळखी व्यक्तीसोबत कसे संबंध ठेवायचे याचं भानही राहिलं नाही. अशा भेटी रोजच्याच झाल्या. दोघांनाही वाटलं आपली खूप ओळख झाली.

एका क्षणाला तिला त्याचा हेतू कळून चुकला. तिनं स्वत:ला सावरलं आणि स्पष्ट शब्दात त्याला उडवून लावलं. त्याचा जाच कमी झाला नाही. आता तो तिला हटकून छळू लागला. फोनवर, बसमध्ये, घरी जाताना, वेळी-अवेळी. अर्थात तो भीत्राच होता. तिच्या सुदैवानं तिनं यातूनही मार्ग काढला. एका मित्राच्या सहाय्यानं हा जाचही मिटला; पण सर्वच मुली अशी लकी ठरतात?

वरील दोन घटना प्रातिनिधिक आहेत. समाजात वावरताना असे अनुभव खूप मुलींना येत असतील. काही मुली या परिस्थितीतूनही मार्ग काढतात. स्वत:चं स्वत्व आणि महत्त्व राखतात. स्वत:ची जरब दाखवून देतात; पण प्रत्येकीलाच हे जमतं?

खरं तर सामाजिक परिस्थितीबद्दल विचार करताना काही गोष्टी कालानुरूप बदलत असतात. स्त्री-पुरुष, मुलगा-मुलगी हे भेद आज मानणं म्हणजे मागासलेपणाचं लक्षण समजलं जातं. मुलाला किंवा मुलीला तशी वागणूक देऊही नये. पण समाजात वावरताना मुलींना व्यवस्थित प्रशिक्षित करण्याची गरज आहे. काही प्रतिबंध मुलांवरही जेथे आहेत, तेथे मुलींनीही स्वत:च्या मर्यादा का ओळखू नयेत?

स्त्रीमुक्ती वगैरे ठीक आहे. स्त्रीला हा तिचा दर्जा मिळायलाच हवा; परंतु आपली सामाजिक स्थिती फारशी सुधारलेली नाही, प्रत्येकाचा स्वत:चा दृष्टिकोन असतो. आपल्यातील हा दृष्टिकोन बदलणं खूप कठीण आहे. कारण आपण आधुनिकतेकडं जरी प्रवास करीत असलो, तरी प्रवृत्तीनं आदीमतेकडं प्रवास करीत आहोत. आजच्या समाजात संस्काराला फारसं महत्त्वच उरल नाही. मुलं शाळेत जातात, शिकतात, आई-वडील मुलांनी चांगलं शिकावं, त्यांनी नाव कमवावं म्हणून हाल-अपेष्टा काढतात; परंतु दुसर्‍या बाजूनं आपली मुलं काय दिवे लावतात याबाबत अनभिज्ञ असतात. तेवढा वेळही त्यांना मिळत नाही. विभक्त कुटुंबपद्धतीमुळं कोणाचा कोणावर दबाब-धाकही राहिलेला नाही. आणि म्हणूनच समाजात विकृती वाढत चालली आहे. 

वरील घटना घडतात त्या केवळ आपल्या अवाजवी अपेक्षांमुळे. म्हणून समाजात वावरताना मर्यादेची लक्ष्मणरेषा तरुणींनीती तर आखून घ्यावीच; पण त्याच बरोबर मुलांनीही ती आखून घ्यावी. आई-वडील जसे आपल्या मुलीला मर्यादेत राहायला शिकवतात, तसेच त्यांनी मुलांनाही त्यांच्या मर्यादा शिकवायला हव्यात. आणि ही काळाची गरज आहे. मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांपुढं ठेवायला हवा. कल्याणच्या सुभेदाराची सून मावळ्यांनी शिवाजी महाराजांपुढं आणून उभी केली. त्या मुस्लिम स्त्रीमध्येही शिवाजी महाराजांनी ‘आई’ पाहिली. तिचा यथोचित गौरव करून तिला सुखरूप पाठवणी केली. या अशा शिकवणुकीची मुलांना गरज आहे. 

मुलींनो, मुलांसोबत बरोबरी करण्यासाठी खूप क्षेत्रं आहेत. आपल्या सहाव्या इंद्रियाला सतत जागृत ठेवून आपण आपलं मार्गक्रमण करत राहा!

विनोद बिडवाईक