रविवार, १६ मे, २०२१

ज्योतिषी आणि रामराव

 गावात, रामराव नावाचा एक कुख्यात टवाळखोर स्वतःच्या कुटुंबियांसह राहत होता. मारामारी करणे, तंबाखू चोळत उगाचच येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची टवाळी करणे, शेजाऱ्यांशी भांडण उकरून काढणे अश्यासारखे त्याचे उपद्वयाप चालत असत. त्याची बायको त्याच्या ह्या प्रकाराला पुरती कंटाळली होती.  ७०-८० किलोमीटर दूर असणाऱ्या मध्य प्रदेशाच्या बॉर्डर वरून कापसाची तस्करी करणाऱ्या देशमुखांचा तो उजवा हात होता. गावातील लोक त्याच्यापासून बिचकून असत. कोणी त्याच्या नादी लागत नसे. 

गावात नियमितपणे एक कुडमुड्या ज्योतिषी येत असे. गावातून चक्कर मारून झाल्यावर, आमच्या शाळेचा बाहेर असणाऱ्या कडुलिंबाच्या झाडाखाली तो बस्तान मांडत असे. त्यादिवशी ज्योतिषी आला, गावातून चक्कर मारली, काही बायाबापड्याचे हात बघून भविष्य आणि उपाय सांगितले. कोणातरी कडे दुपारचे जेवण केले. बाहेरच्या गावातून आलेल्या अगदी अनोळखी लोकांना जेवण मिळत असे. जेवणाच्या वेळी कोणी आले तर कोणीही उपाशी जात नसे. थोड्यावेळाने त्याने आमच्या शाळेजवळील कडुलिंबाच्या झाडाखाली त्याचे दुकान मांडले. 

रामराव सायकलवरून तालुक्यातील ठिकाणाहून परत येत होता. त्याने ज्योतिष्याला बघितले. सकाळपासून त्याला कोणी बकरा भेटला नव्हता. त्यामुळे त्याने आपला मोर्चा बिचाऱ्या ज्योतिष्याकडे वळवला. 

"राम राम." सायकल स्टॅन्ड वर लावत रामरावाने ज्योतिष्याला नमस्कार केला. 

"राम राम." ज्योतिष्याने प्रतिसाद दिला.   

थोडी इकडची तिकडची विचारपूस झाल्यावर रामरावाने विचारले. 

"तुम्ही लोकांना भविष्य सांगता. उपायही सांगता, तुम्हाला लोकांचे भवितव्य माहित आहे, पण तुमचे का नाही? उन्हातान्हात फिरत असता, एवढे कष्ट करता, त्यापेक्षा स्वतःचे भविष्य बघून का उपाय करत नाही?”

“बेटा, मला माझे भविष्य चांगलेच माहीत आहे. पण जे प्राक्तनात आहे तेच होणार. मला माझ्या नियतीला सामोरे जावेच लागेल. मी फक्त उपाय सांगू शकतो, पण स्वतःची नियती स्वतःलाच भोगावी लागते.” ज्योतिषाने उत्तर दिले.

अर्थात हे सर्व रामरावच्या डोक्यावरून गेले असावे. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव ज्योतिषाने बरोबर ओळखले. हुशार ज्योतिष्याने रामरावच्या स्तुतीचा डाव टाकला. रामरावच्या चांगल्या गुणांची यादीच त्याने वाचून दाखवली, शेवटी रामराव कष्ट किती करतो आणि त्याची कदर कोणालाच का नाही हे वाक्य त्याने फेकले.   

रामरावाला थोडे बरे वाटले. "बरे, मला सांगा, एक महिन्यानंतर माझी नियती कशी असेल.?" त्याने विचारले.   

ज्योतिषाने रामरावचा हात पाहिला; त्याला जन्मतारीख विचारली, सर्व तपशील विचारले, पंचांग बघितले, कागदावर काहीतरी खोडखाड केली, आणि शून्यात नजर लावली. 

रामरावची सहनशक्ती संपत आली होती. "अहो सांगा की." त्याने जरबेने विचारले.  

“माझ्यावर विश्वास ठेवा अथवा ठेवू नका. पुढच्या महिन्यातील पहिल्या सोमवारचा सूर्य काही तुम्ही ह्या गावात, बघू शकणार नाही." ज्योतिषाने रामरावला सांगितले. 

रामराव चकित झाला, रागावून त्याने विचारले, “काय? तू मस्करी करतोयस का?”

“नाही बेटा, मी मस्करी करीत नाही, मला माहित नाही, ते घडेल की नाही, पण माझे आडाखे काढू चुकत नाहीत." गूढपणे ज्योतिषी उत्तराला. खरंतर रामरावचा अश्या गोष्टीवर विश्वास नव्हता. पण त्याने थोडा विचार केला आणि ज्योतिषाला अकरा रुपये देऊन त्याहून निघून गेला.

असे काही होणार नाही असे रामरावाला वाटत होते. पण नंतर तो काही जुन्या घटना आठवू  लागला. देशमुख कापूस खरेदी करायच्या आधी मुहूर्त का बघतो? प्रत्येक महत्वाची गोष्ट करायच्या आधी, मुहूर्त बघतात. हजार लोक भविष्य बघतात, पण सर्वांचे भविष्य थोडे खरे होते? पण त्यातल्या २५% लोकांचे तर खरे होत असेल, आणि त्या २५% टक्क्यात आपणच असलो तर? ह्या विचारानेच रामराव घाबरला.  

दुसऱ्या दिवसापासून तो अबोल झाला. बायकोला काही कळेना, पण त्याची बडबड ऐकल्यापेक्षा त्याचे न बोलणे तिला आवडले. काही झाले का, तब्येत बरोबर नाही का, वगैरे ह्या तिच्या प्रश्नावर त्याने फक्त, "काही नाही" असे उत्तर दिले. थोड्या वेळाने त्याने त्याच्या दोन लहान मुलांना जवळ घेतले, त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्यांना संत्र्याच्या गोळ्या घेण्यासाठी पैसे दिले. संध्याकाळी स्वयंपाकघरात जाऊन बायकोला विचारले की ती कशी आहे? पत्नीलाही आश्चर्य वाटले, कारण रामराव आपल्या बायकोची आणि मुलांची एवढी विचारपूस करत नसे. 

त्या दिवसापासून रामरावच्या पत्नी आणि मुलांचे आयुष्य बदलले. गावातील लोकांना स्वतःहून येत जात नमस्कार करू लागला, वडीलजनांना मान देऊ लागला. त्याची भांडणे बंद झाली. शेजारी-पाजारी शांतपणे नांदू लागली.  रामरावांच्या वागणुकीत उल्लेखनीय बदल झाल्याने गल्लीत शांतता नांदू लागली. 

एक महिन्यानंतरचा पहिला सोमवार जवळ येत होता आणि अचानक शनिवारी शेजारच्या गावातून त्याचा सासरा आजारी असण्याचा निरोप रामरावला कोणीतरी दिला. रामराव बायकापोरांना घेऊन सासुरवाडीला निघून गेला. सासऱ्याला तालुक्याच्या दवाखान्यात ऍडमिट करण्यापासून, सासुरवाडीची शेतीची कामे मार्गी लावण्याचे सर्व काम रामरावलाच करावे लागले. ह्या सर्व गडबडीत सोमवारपण निघून गेला. एकदोन दिवसानंतर जेवण झाल्यानंतर रामराव सुपारी कातरत बसला होता, गावाला परत जायला हवे असा विचार करत असताना त्याला त्या ज्योतिष्याने सांगितलेले भविष्य आठवले.

"च्या मारी कुडमुड्याच्या" असे पुटपुटत रामरावाने अडकित्त्याखाली सुपारी जरा जोर लावूनच फोडली. 

एका महिन्यानंतर, कुडमुड्या कडुलिंबाच्या झाडाखाली बसलेला दिसला. 

"तुमचे भविष्य मी खोटे ठरवले." रामराव बोलला. 

"तुला आता कसे वाटत आहे?" ज्योतिषाने विचारले.

"मजेत आहे मी, पण तुम्ही मला सांगितले होते की मी ह्या महिन्याच्या पहिल्या सोमवारी मरेन, आता दोन महिने झाले आणि मी जिवंत आहे."

"पण मी तुझ्या मरण्याचे भविष्य सांगितले नव्हतेच."

"काय राव, तुम्ही काय म्हणाले होते, की 'पुढच्या महिन्याचा पहिला सोमवार मी बघणार नाही.'

"हो, पण 'ह्या गावात' पहिला सोमवार बघणार नाही असे म्हणालो होतो आणि पहिल्या सोमवारी कोठे होतास?'. ज्योतिषी हसत उत्तराला. 

"अरे हो, मी तर शनिवारीच सासुरवाडीला गेलो होतो, सासरा आजारी होता, त्या गडबडीत आठवडाभर तेथेच होतो."

"ह्याचा अर्थ काय? तू महिन्याचा पहिला सोमवार ह्या तुझ्या गावात बघितला नाही. म्हणजे माझे भविष्य खरे झाले. आहे की नाही." ज्योतिषी जोरात हसला.

रामरावाने कोपरापासुन हात जोडले. 

“आधी मला सांगा आता आयुष्य कसे सुरु आहे?”

"मजा आहे, पण एक सांगू का, माझी कटकट कमी झाली, गावातील लोक मला मान देतात आता. बायकोसोबतची भांडणे नाहीत, शेजारी पाजारी, कसाकाय रामभाऊ म्हणून स्वतःहून विचारतात." रामरावाने सांगितले.

"पण हे झाले कसे?"

"काय सांगू, तुमच्या भविष्यावर माझा विश्वास नव्हता, पण मनात थोडी भीती होती. मरण आलेच तर काय ह्या विचाराने, मी थोडा का होईना, घाबरलो होतो. त्यामुळे, माझे सर्व लक्ष त्या "सोमवार" वर होते. काही झालेच तर कश्याला भांडणे, कटकटी म्हणून, ते सर्व बंद केले, लोकांशीही चांगले वागू लागलो, आणि तेही प्रतिसाद देऊ लागले. सासरा आजारी होता, तेव्हा सर्व काही केले, सासूला मदत केली, त्यांची शेतीची कामे मार्गी लावली." 

“रामरावभाऊ, आयुष्य कसे चांगले आहे ते पहा. आपण जे काही करतो ते आपल्याला परत मिळते आणि आपण जसे जग बघतो, तसेच आपल्याला जग वाटते. तुम्ही विचार बदलला, तुमची जगाकडे बघण्याची तुमची दृष्टी बदलली आणि लोकांची तुमच्याकडे. शेवटी सर्व आपल्या हातातच आहे." ज्योतिषी उत्तरला. 

'खरे आहे." रामरावाने नकळत आपले हात जोडले.

(विनोद बिडवाईक ह्यांची सर्व पुस्तके फ्लिपकार्ट आणि बुकगंगा वर उपलब्ध आहेत.  इंग्रजी मध्ये लिहिली पुस्तके किंडल फॉरमॅट मध्ये ऍमेझॉन वर उपलब्ध आहेत.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा