रविवार, ३१ जानेवारी, २०२१

तहान

खरंतर त्या लहान वयात जातपात हा काय प्रकार हे काहीच माहीत नव्हते. आम्ही सर्व मुले एकत्र खेळात असू. बारा बलुतेदार पद्धतीचा थोडाफार काय तो पगडा होता. त्यामुळे आमच्या आडनावापेक्षा वडिलांच्या कामावरून आम्हाला हाक मारल्या जात असत. सर्वांचे कुटुंब त्यांच्या व्यवसायावरून ओळखले जात. शिवाय कोणाचा उल्लेख करताना फारसा आदर वगैरे दिल्या जात नसे. खेळत असताना अर्थात एकमेकांचा उद्धार करायचा असेल तर तो वडिलांच्या नावावरून आणि व्यवसायावरून. माझी आई अतिशय धार्मिक तर वडील एकदम नास्तिक.  प्रत्येक सण, प्रत्येक विधी साजरा करण्याचा तिचा प्रयत्न असे. त्यामुळे बऱ्याच छोटामोठ्या गोष्टी मला माहीत झाल्या. त्यामुळे मांसाहार आम्हाला वर्ज होता. अंडे, मासे, मटण, चिकन हे केवळ ऐकून. अर्थात मला पण अश्या आहाराचे आकर्षण कधीच झाले नाही. जिवंत प्राणी अथवा पक्षी मारून खाणे हे माझ्या मनातही कधी आले नाही. 

ह्या सर्व वातावरणामुळे, घरात किंचित सोवळे पाळले जायचे. अर्थात त्याचा अतिरेक नव्हता. गावातील काही गावकुसाबाहेरील विशीष्ट समाज गाईचे मांस खात असे, हे इतर लोकांना आवडत नसे. पण ते तेवढ्या पुरतेच.

एकदा एक गावकुसाबाहेरील बाई कामानिमित्त आईला भेटायला आली. गप्पा सुरु झाल्या. बाईला तहान लागली असावी, अंगणात एक बाजूला एक पेला ठेवलेला होता. आईने तिला तो पेला दिला, त्यात माठातून पाणी ओतले. परंतु त्या बाईला ते आवडले नसावे. अंगणात ठेवलेला पेला दिलेला तिला आवडला नाही. आमच्या घराचे दार नेहमी उघडे असायचे. रस्ताने कोणी जात असले तर ओळखीचे लोक हाक मारायचे, विचारपूस करायचे, दारावर येणारे विक्रेते असायचे, तेही ओळखीचे झाले होते त्यामुळे कोणाला पाणी वगैरे प्यावयाचे असेल तर आत येऊन ते पीत असत. तो पेला त्यासाठी वेगळा ठेवलेला होता. 

त्या बाईचा काहीतरी गैरसमज झाला आणि ती पाणी न पिताच निघून गेली. बाई पाणी न पीता निघून गेली ह्याचे आईला खूप वाईट वाटले. एखादी व्यक्ती दारावरून पाणी न पीता निघून गेली ह्याची चुटपुट आईला लागून राहिली. 

दोन तीन दिवसानंतर आईने त्या बाईला तिच्या घरी जाऊन जेवणाचे आमंत्रण दिले. क्षणभर ह्यावर तिचा विश्वासच बसला नाही. परंतु आढेवेढे घेत ती तयार झाली. ती आली तेव्हा आईने मोठ्या आस्थेने तिची चौकशी केली. तिला हळदी कुंकू देऊन एक चोळीचा खण दिला आणि तिला जेवू घातले. तिला समजून सांगितले की त्यादिवशी तिला देण्यात आलेला पेला हा जाणूनबुझून दिला नव्हता. ती बाईच्या डोळ्यात नकळत अश्रू आले. डोळे पुसत ती म्हणाली, "आज तुमच्यामुळे माझा माणुसकीवरील विश्वास परत आला. नाहीतर आम्हाला अशी वागणूक कोणी देत नाही. आमच्याशी लोक धड बोलत नाहीत, जेवू घालायची गोष्ट तर दूरच. पण सर्व लोक सारखे नसतात हेच खरे. " 

त्याकाळी समाजातील जातीपातीचा पगडा खूप भक्कम होता. गावकुसाबाहेरील समाजाबद्दल तर खूपच अनास्था लोकांना असायची. अश्या वातावरणात आईने तो पगडा पुसण्याचा एक प्रयत्न केला. हि एक प्रकारची छोटीशी क्रांतीच म्हणावी लागेल.

विनोद बिडवाईक 


(विनोद बिडवाईक ह्यांची सर्व पुस्तके फ्लिपकार्ट आणि बुकगंगा वर उपलब्ध आहेत.  इंग्रजी मध्ये लिहिली पुस्तके किंडल फॉरमॅट मध्ये ऍमेझॉन वर उपलब्ध आहेत.) 

रविवार, २४ जानेवारी, २०२१

डॉक्टर

डॉ नामदेव बदरके आमच्या गावातील सर्वांचे डॉक्टर होते. माझे इतर मित्र त्यांना काका म्हणून बोलावयाचे. ते आमचे शेजारी होते. माझ्या आई बाबांना ते काका काकी म्हणत, म्हणून मी त्यांना भाऊ म्हणत असे. नदीपलीकडे त्यांचा दवाखाना होता पण त्यांचा दवाखाना हा फक्त नावालाच होता, कारण दवाखान्यात ते खूप कमी असत. असत तेव्हा सोबत पाच सहा लोकांचा राबता असे. अर्थात हे लोक रुग्ण म्हणून येत नसत तर नामदेव भाऊ सोबत गप्पा मारायला येत असत. नामदेव भाऊ गावाचे सरपंच पण होते, त्यामुळे तेथे भारतातील राजकारणाबद्दल चर्चा रंगलेली असायची. तसेच गावातील प्रश्न त्याचा दवाखान्यात चर्चेला येत असत.  चर्चेला काळवेळ ह्याचे काहीही बंधन नसायचे. गावातील आबालथोर, श्रीमंत गरीब, लहान मोठे ह्या सर्वांचा राबता त्या दवाखान्यात असे. ह्या गडबडीत काही रुग्ण पण येत असत. गप्पा मारत मग डॉक्टर रुग्णांची तपासणी करत असत. 

"बोला काय झाले काका?" डॉक्टर विचारत,

"कालपासून पोटात कसंतरीच होते." रुग्ण 

"अरे रामराव, त्या बाईचं आता खरं नाही? " डॉक्टर रामराव किंवा तत्सम व्यक्तीकडे बघत इंदिरा गांधींबद्दल आपले मत मांडायचे. रुग्ण बिचारा थोडा वेळ गोंधळात पडायचा.

"काय खाल्ले काल?" डॉक्टर (हे रुग्णाला) 

"काल जरा उशिरा जेवलो, पण नेहमीचेच." रुग्ण,

"पण तिच्या लोकांची  खाण्याची सवय अशी जाणार नाही, आता धडा शिकवावाच  लागेल." अर्थात हे रामराव कडे बघून.

रुग्ण एकदम दचकून डॉक्टर कडे बघत असे. डॉक्टर अशीच जुजबी माहिती विचारायचे. नंतर हळूहळू रामराव आणि रुग्ण डॉक्टरच्या बोलण्यावरून कोणासाठी काय आहे हे समजून घ्यायचे. मधेच कोणीतरी मुलगा त्यांना घरी बोलवायला यायचा. त्याच्या घरी कोणीतरी म्हातारे माणूस गंभीर आजारी असे. मग दवाखान्यातील रुग्णाला दोनतीन गोळ्या देऊन पिटाळून लावायचे. तू हो पुढे, असे त्या मुलाला म्हणत, डॉक्टर बॅग हातात घ्यायचे, रामराव मग कोणतातरी प्रश्न विचारायचा. डॉक्टरांना परत चेव यायचा, गप्पाच्या ओघात आपल्याला कोठे जायचे हे पूर्ण विसरून गेलेले असायचे. एक तास झाले की परत तो मुलगा येत असे आणि मग डॉक्टरांचा नाईलाज व्हायचा.  एक मात्र निश्चित त्यांच्या हाताला गुण होता. रुग्ण हमखास बरा होत असे. नामदेवभाऊ ह्यांच्याकडे मेडिकल ची औपचारिक पदवी नव्हती. त्यांचे वडील गावातील नावाजलेले आणि प्रभावी वैद्य होते. त्यांचा वारसा नामदेव भाऊ ह्यांनी घेतला होता. आयुर्वेदातील औषधें ते देत असत. RMP ची पदवी ते नावामागे लावत असत. गावातील साधे, छोटे मोठे उपचार तेच करत असत.   

जेव्हा ते घरी अथवा दवाखान्यात नसत, तेव्हा ते राजकारणी लोकांसोबत असत. डॉक्टरभाऊ ची विचारसरणी डावी होती. भाई सुदाम देशमुख ह्यांचे हे खंदे समर्थक होते. गावातील श्रीमंत आणि विशिष्ट समाज वगळता सर्वांचा त्यांना पाठिंबा असे आणि ग्रामपंचायतच्या निवडणुकीत ते हमखास निवडून येत आणि तेच गावाचे सरपंच होत असत. त्याचा राजकीय प्रभाव संपूर्ण तालुक्यात होता. गावातील राजकारण करत असताना डॉक्टर म्हणून लोकांची सेवा ते मनोभावे करत असत. आतासारखा डॅम्बीसपणा लोकांत नव्हता. सरकारकडून पैसा फारसा येत नसे. विकासकामांच्या नावाखाली आतासारखा भ्रष्टाचार माजला नव्हता. डावी विचारसरणी असल्यामुळे तळागाळातील माणसे नेहमी त्याच्याकडे येत असत आणि त्याचे ते प्रश्न मार्गी लावत असत.

एकदा ते घरातून बाहेर पडले, आई ओट्यावर काहीतरी करत बसली होती. "काय काकी, बरे आहे ना?" असे त्यांनी विचारले. आईला बरे नसले की ते औषधें देत असत. "अरे ये नामदेव" मग काय, डॉक्टर आले, बसले, गप्पा सुरु झाल्या. आईला पण गप्पा मारायला खूप आवडत असे. आईने चंची उघडली. सुपारी कातरत पान वगैरे खाऊन झाले. गप्पाच्या ओघात चहा पण झाला. आणि अचानक त्यांना आठवले. गावातील कोणातरी कडे गंभीर आजारी रुग्ण आहे आणि त्यांना बघायला बोलावले आहे. ते उठले आणि वेगाने चालायला लागले.   

"वाचला असेल तर चांगली औषध दे रे बाबा त्याला." आई मिश्कीलपणे हसत ओरडली.   

"हो हो, वाचला असेल तर." डॉक्टर बोलले.

नंतर कधीतरी, डॉक्टर पंचायत समितीचे उपसभापती झाले. जेव्हा ते उपसभापती झाले तेव्हा गावात दिवाळी साजरी झाली. पण दोन वर्षात त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यात आला आणि त्यांना ते पद सोडावे लागले. 

त्यांनी आपली शेती आणि दवाखान्यावर लक्ष केंद्रित केले. गावातील राजकारण नंतर संपूर्ण बदलून गेले.

विनोद बिडवाईक 
(विनोद बिडवाईक ह्यांची सर्व पुस्तके फ्लिपकार्ट आणि बुकगंगा वर उपलब्ध आहेत.  इंग्रजी मध्ये लिहिली पुस्तके किंडल फॉरमॅट मध्ये ऍमेझॉन वर उपलब्ध आहेत.) 

रविवार, १७ जानेवारी, २०२१

तो उनाड दिवस

काळचे सहा वाजले असावेत, पण वेळेकडे कोण लक्ष देतो. आज खरेतर संजय देशमुखच्या संत्र्याच्या बागेतील संत्री खाण्याचा बेत तसा ठरला नव्हता. सुटीच्या दिवशी तसा काही प्लॅन नसायचा. समोर जसा दिवस येईल तसा साजरा करायचा. पण संत्री खाणे हे निव्वळ निमित्त मात्र होते. आधी नदीवर जाऊन आंघोळ करण्याचा बेत होता आणि नंतर गावभर फिरायचे, समविचारी मित्र गोळा करायचे आणि दुपारच्या जेवणाला घरी यायचे असे एकंदर माझे ठरले होते. समविचारी मित्र तसे कमी होते, त्यातही ते नेहमी बदलत असत. काल समविचारी असणारा मित्र आज विरोधक झालेला असायचा, काही कारण नसताना. एखादयाने कान भरले कि झाले. त्यामुळे माझे नेमके किती मित्र होते हेही कळत नसे. काही मित्रांना त्यांच्या आईवडिलांनी माझ्यासोबत मैत्री करण्याची तंबी दिली होती. शाळेत मी तसा हुशार विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध होतो आणि गाव छोटे असल्यामुळे माझ्याबद्दल मोठ्या माणसांचे मतही तसेच होते. त्यामुळे माझ्या वयाची मुले मात्र माझ्या नेहमी विरोधात असत. डायरेक्ट विरोध ते करत नसत पण आपापले गट बनवून मला एकटे पडण्याचा प्रयत्न करत असत, हेही काही कारण नसताना. 

हे सर्व असूनही माझे काही मित्र शेवटपर्यंत माझी साथ देत असत. त्यापैकी एक विजय देशमुख हा माझा मित्र होता. दोन वर्ग मागे होता माझ्या. विजय संजयचा लहान भाऊ होता. संजय माझा काही वर्ष वर्गमित्र होता, पण नंतर तो मागे पडला. पक्का मस्तीखोर आणि वेळोवेळी गट बदलणारा. कधी तो माझा पक्का मित्र असायचा तर कधी जानी दुष्मन. गणेश बदरके नावाचा माझा दुसरा मित्र. हा पण संजयसारखा कधी मित्र तर कधी दुश्मन. विजय मात्र स्वभावाने खूप छान होता. भाऊ विरोधात असला तरी नेहमी मला पाठिंबा देत असे. 

त्यादिवशी संजय, विजय आणि गणेश आम्ही सकाळीच नदीवर गेलो. मला नदीवर आंघोळीला जाण्याची परवानगी नव्हती. विचारली असती तर कधीच मिळाली नसती. त्यामुळे मी बाहेर मित्रांसोबत बाहेर खेळायला चाललो, इतकेच घरी सांगितले. मला पोहता येत नसे, पण पाण्यात डुंबायला आवडत असे. अर्थात केस ओले होऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागे. कारण केस ओले झाले तर घरी मी नदीत आंघोळ केली हे कळत असे. कमरेचा करडोळा हि दुसरी वस्तू जी कोरडी ठेवावी लागे. कपडे काढताना करडोळा पण काढून ठेवत असे. 

आम्ही नदीत मनसोक्त डुंबलो. एकदोन तास कसे गेले कळले नाही, पण ह्या गडबडीत करडोळा काढायचा मी विसरलो आणि केसही पूर्ण ओले झाले. आता घरी जाण्यात अर्थ नव्हता. संजय आणि विजयच्या बागेत जावे ह्यावर आमचे एकमत झाले. बाग खूप मोठी होती. संत्र्यांच्या सोबतीला पेरू आणि बोरांची झाडेही होती. तसेच शेतात त्यांचा रखवालदार आपल्या कुटुंबासोबत राहत असे. नदीपासून ५-६ किलोमोटर अंतरावर असणाऱ्या बागेत आम्ही रमतगमत पोहोचलो. संजयने मस्त संत्री तोडून आणली. आम्ही संत्र्यावर ताव मारला. गप्पा, खेळ, मस्ती ह्यात परत दोन तीन तास कसे गेले तेही कळले नाही. 

"पोरांनो काही खाऊन घ्या" म्हणत रखवालदाराच्या बायकोने गरमगरम भाकरी, ठेचा आणि तुरीची उसळ (घुगऱ्या म्हणतात विदर्भात ह्या भाजीला) आणून ठेवली. आम्ही हात धुतले आणि जेवणावर तुटून पडलो. मग मस्त संत्र्याच्या झाडाखाली बसून गप्पा सुरु झाल्या, एकमेकांची टिंगल टवाळी ह्यात किती वेळ गेला हे कळलेच नाही. नंतर संजय उठला आणि विहिरींची पाण्याचा पंप सुरु केला. वेगात हौदात पाणी येऊ लागले, आम्ही सर्व हौदात उद्या मारल्या आणि मनसोक्त आंघोळ करू लागलो. आता केस थोडेच कोरडे राहणार? 

मी रखवालदाराला वेळ विचारली आणि उडालोच. दुपारचे ४ वाजत आले होते. मी तसा वेळोवेळी घरी जात असे. मी कोठे गेलो हे घरी नेहमी सांगत असे. पण आज गडबडीत मी घरी गेलोच नाही. एव्हाना आई बाबा आणि ताई आता काळजीत पडले असतील हे लक्षात आले. मी हौदातून तसाच बाहेर आलो, कपडे घातले  आणि घरी जाण्यासाठी धूम ठोकली.

अर्धा रस्ता कापला असेल, बाबा दिसले. ते रागात असावेत कारण काहीतरी बडबडत होते. हातात एक झुडुपाची तोडलेला फोक होता. आता काही खरे नाही हे मला समजून चुकले. मी गुपचूप त्यांच्यासमोर उभा राहिलो. ते अतिशय संतापले होते. फोकाचा एक फटका माझ्या पायावर मारला. "कोठे गायब झाला होता" ते ओरडले. 

त्यांनी माझा हात पकडला. मी निमूटपणे चालू लागलो. नंतर ते नरमले. "घरी सांगून जायचे ना बाबू, आम्ही कीती काळजीत होतो तुला काय माहित?" ते पुटपुटले. नंतर त्यांनी मला समजावून सांगितले. घरी सांगून कोठे चाललो हे सांगणे कीती महत्वाचे आहे आणि घरातील लोकांच्या जीवाला घोर कसा लागून राहतो वगैरे वगैरे.  

घरी पोहोचलो तेव्हा, ताई आणि आई ची बोलणी खावी लागणार याची मी तयारी केली होती. त्याआधीच बाबा बोलले, "मी त्याला खूप झोडपले. आता नाही करणार तो हि चूक."

बाबांनी मारलेले एक फटका हा कदाचित शेवटचा होता. त्यानंतर त्यांनी कधीच माझ्यावर हात उगारला नाही.


(विनोद बिडवाईक ह्यांची सर्व पुस्तके फ्लिपकार्ट आणि बुकगंगा वर उपलब्ध आहेत.  इंग्रजी मध्ये लिहिली पुस्तके किंडल फॉरमॅट मध्ये ऍमेझॉन वर उपलब्ध आहेत.) 


रविवार, ३ जानेवारी, २०२१

जातपात तोडफोड

१९८० चा काळ तसा प्रगत नव्हता. विदर्भातील माझ्या लहान गावाला तर मुळीच प्रगत नव्हता. घोडगाव आणि कविठा हि दोन गावे नदीच्या दोन बाजूला होती. दोन्ही गावात बारा बलुतेदार आणि वेगवेगळ्या   जातीची मंडळी होती. गावाची रचना ही जाती वर आधारित असावी. आम्ही लहान मुले एकमेकांसोबत जातीचा विचार न करता खेळत असू. परंतु कधीतरी ह्या जातीचे प्रतिबिंब वागणुकीत पडत असे. आणि ह्या जातीचा उल्लेख कोणत्याही निवडणुकीच्या वेळेस हमखास होत असे. 

८०च्या दशकात भाई सुदाम देशमुख हे विधानसभेच्या निवडणुकीसाठी उभे होते. भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे ते उमेदवार होते. अमरावती जिल्ह्यातील आदिवासी भागात त्यांनी भरपूर काम केले होते. तळागाळात ते अतिशय प्रसिद्ध होते. मला डावी विचारसरणी मुळीच आवडत नाही. डावी विचारसरणी ही देशासाठी घातक आहे असे माझे मत आहे. डाव्या विचारसरणीच्या लोकांनी हे वेळोवेळी सिद्ध केले आहे. परंतु भाई सुदाम देशमुख हे थोडे वेगळे होते. त्यांची विचारसरणी डावी असली तरी ते इतर लाल भाई सारखे आक्रस्थाळे नव्हते. त्यांचा विरोध हा नेहमी तार्किक आधारावर असे. त्यांचे भाषण हे मेजवानीसारखे  असायचे. त्यांची सभा असेल तेव्हा बाबा मला त्यांच्या भाषणाला घेऊन जात. बरे निव्वळ निवडणुकीच्या वेळेसच ते भाषण सभा घेत असे नाही, ते नेहमी लोकांशी जोडलेले असायचे. अतिशय बोचऱ्या शब्दात, विनोदी उदाहरणे, दाखले देऊन ते लोकांना खिळवून ठेवत. त्याची भाषा ओघवती तर होतीच. भाषेतला संयम त्यांनी कधी सोडला नाही. 

अतिशय साधे कपडे आणि जमिनीवर पाय. राज्य महामंडळाच्या बसने ते प्रवास करत असत. गाडी कधीतरीच वापरत. ते अविवाहित होते आणि त्यांनी आपले आयुष्य तळागाळातील लोकांसाठी वाहून घेतले होते. 

१९८० ते १९८९ पर्यंत ते विधानसभेचे सभासद होते आणि त्यानंतर ते १९८९ तो १९९१ पर्यंत लोकसभेचे सभासद होते.  कुणबी मराठा आणि माळी समाजाचे प्राबल्य असणाऱ्या मतदारसंघात ते नेहमी निवडून येत. हे सांगायचे कारण असे की ते ब्राम्हण होते असे एक निवडणूक प्रचाराच्या वेळेस लोकांना सांगितल्या गेले. 

त्याचे असे झाले की अश्याच एकदा निवडणूका लागल्या. त्यावेळीस काँग्रेस ची परिस्थिती खूप चांगली होती. कोणीतरी दुसरे देशमुख आडनावाचे काँग्रेस चे उमेदवार भाईंच्या विरोधात होते. भाईचा प्रचार हा त्यांचे कार्यकतें, लहान मुलेच जास्त करत असत. 

गावातील काही सधन मंडळी, काँग्रेस चे परंपरागत तर मतदार होतेच पण गावातील काँग्रेस प्रतिनिधी असत. प्रचार शिगेला पोहोचला होता. एके दिवशी गावात भलामोठा गाड्यांचा ताफा आला. गावातील प्रत्येक घरात जाऊन उमेदवार प्रचार करू लागला. कार्यकर्त्याचा गर्दी तर होतीच. 

उमेदवार पुढील घरात गेले की काही कार्यकर्ते मागे राहत आणि लोकांना सांगत की विरोधी उमदेवार अमुक अमुक जातीचे आहेत आणि हे आपले उमेदवार आहेत. राजकारणात जातीपातीला इतके महत्व का आहे हे मला नंतर कळले.  अर्थात त्यांची जात आम्हाला ऐकीव माहितीवर कळली.  जातीचा आधार घेऊन प्रचार काही पुढे कामात आला नाही आणि भाई सुदाम देशमुख प्रचंड मताने विजयी झाले. 

आजही आपण २१व्या शतकात असूनही जातपात सोडायला तयार नाही ही दुर्दैवाची बाब आहे.

विनोद बिडवाईक 


(विनोद बिडवाईक ह्यांची सर्व पुस्तके फ्लिपकार्ट आणि बुकगंगा वर उपलब्ध आहेत.  इंग्रजी मध्ये लिहिली पुस्तके किंडल फॉरमॅट मध्ये ऍमेझॉन वर उपलब्ध आहेत.)