Career Development लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Career Development लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २ जुलै, २०२०

मी, मीडिया आणि पत्रकारिता


मी माझ्या कारकिर्दीची सुरूवात प्रथम मीडिया विपणन आणि संशोधनात केली, त्यानंतर पत्रकारितेत गेलो आणि आता मानव संसाधन विभागात काम करत आहे.  पहिल्या दोन कारकिर्दी  त्यामानाने छोट्या होत्या, पण ते अनुभव मात्र आयुष्यभराची कमाई होती.  माझा  वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी संबंध आला. माझ्या पहिल्या नोकरीत मी एका वर्तमानपत्रात  काम करत होतो.  वृत्तपत्र वाचनाबद्दलची लोकांची सवय,  बातम्यांच्या आवडीनिवडी, वृत्तपत्र वाचताना त्यांची वागणूक, त्यांची खरेदीची सवय इ. समजून घेण्यासाठी मी माझ्या सहकाऱ्यांसोबत घरोघरी भेट द्यायचो.

गोळा केलेल्या माहितीचे विश्लेषण संपादकीय विभागाला देऊन योग्य तो अभिप्राय देऊन सुधारणा सुचवणे, त्यांची विक्री मोहिमेची जाहिरात आणि मागणी कुठे आहे यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रसार करणे ह्यासारखी कामे आम्ही करत असू.  वेगवेगळ्या लोकांना प्रश्न विचारणे, फॉर्म भरणे आणि संशोधन एकत्रित करणे हे एक विस्तृत काम होते.  व्यवसायवृद्धी साठी ही एक अंतर्गत प्रणाली होती.  या प्रक्रियेत आम्ही वर्तमानपत्र आणि जाहिराती प्रसारित करण्यासाठी बर्‍याच लीड्स देखील निर्माण करत होतो. 

माहिती गोळा करत असताना काहीजण अगदी मनापासून आपला अभिप्राय देत असत तर काहीजण अगदी तुसडेपणाने वागत असत. येथे काम करत असताना मी माणसांचे वेगवेगळे नमुने बघीतले, अनुभवले. लोकांच्या तऱ्हा बरेच काही शिकवून गेल्या. मीडिया कॉमर्स आणि व्यवसायाबद्दल बर्‍याच गोष्टी येथे शिकलो.  या काळात, मी मनुष्याच्या दोन छटा देखील पाहिल्या, छान आणि वाईट.  खूप  लोक चांगली वागायची तर काही वाईट.

येथे एक वर्ष काम केल्यावर, मी महाराष्ट्रातील एका वर्तमानपत्राच्या इंग्रजी आवृत्तीचा उपसंपादक म्हणून रुजू झालो.  ही स्थानिक आवृत्ती होती.  माझ्या कॉलेजच्या दिवसात मी वेगवेगळ्या वर्तमानपत्रात लिहित होतो. त्यावेळी मी वेगवेगळ्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय विषयावर लिहीत असे. ललित लेखनही सुरु होते. सोबत रोजगार आणि तरुणांसाठी स्तंभ लेखनही करत असे. मी सामाजिक समस्या, रोजगार आणि त्या परिसरातील काही राजकीय विषयांवर स्तंभ लिहित होतो.  माझ्या वरिष्ठासोबत मी राजकीय नेत्यांच्या सभा कव्हर करत असे.  उप-संपादक म्हणून काम सुरू करणे हा माझ्यासाठी पुरेसा अनुभव होता.  येथे काम करत असताना मला सामाजिक-राजकीय विषय, लेखन कौशल्ये, बोलण्याची कौशल्ये, मथळे कसे द्यायचे, कॉपी कशी संपादित करावीत आणि अर्थातच वेगवेगळ्या स्त्रोतांकडून माहिती कशी मिळवायची हे मला समजले.  माझा तसा डेस्क जॉब होता. वेगवेगळे पत्रकार, वार्ताहर आणि स्ट्रींजर्स यांच्याशी समन्वय साधणे, नवीन स्ट्रींजर्सना प्रशिक्षण देणे आणि काही चांगली बातमी मिळवणे आणि नंतर अंतिम छापण्यासाठी त्यांची कॉपी संपादित करणे अशासारखी माझी कामे होती.  प्रथम पृष्ठ संपादन करणे  आणि संपादकीय पृष्ठ करणे  हा माझ्यासाठी नेहमीच एक आनंदाचा क्षण असायचा.  मराठी आवृत्तीत काम करणारे माझे संपादकीय सहकारी मला त्यांच्यासाठी लिहायला सांगायचे.  मला काही संपादकीय आणि अग्रलेख लिहिण्याची संधीही मिळाली.  मीडिया कंपन्यांमध्ये काम करणे हे एक मोठे आव्हान आहे.  माध्यमातील नोकर्‍या असंघटितसारख्या आहेत.  ह्या क्षेत्रात काम करण्यासाठी खूप धैर्य, संयम आणि कुशलतेने हाताळण्याची कौशल्ये आवश्यक आहेत. या कालावधीत, मी दुपारी तीन वाजेपासून प्रिंट तयार होईपर्यंत काम करत असे.

वृत्तपत्र आपल्या दरवाज्यापर्यंत आणण्यासाठी कित्येक लोकांचे अथक परिश्रम असतात. प्रिंटर, डिझाइनर, प्रूफ-रीडर, सर्कुलेशन कर्मचारी, जाहिरात इत्यादी कर्मचारांचे अथक परिश्रम असतात. वरिष्ठांचा तणाव आणि वेळेचे बंधन ह्यामुळे सर्वावर प्रचंड मानसिक तणाव असतो. ह्याचा परिणाम प्रकृतीवर सतत होत असतो. बदलत्या  तंत्रज्ञानामुळे बरीच कामे आता स्वयंचलित झाली आहेत.


बहुतेक सर्व माध्यम कंपन्यांमध्ये राजकारण्यांचे वर्चस्व असते.  त्यांच्यासाठी काम करताना आपणही राजकीय बनतो. आपल्या वैयक्तिक मूल्यांमध्ये तडजोड केलेली, भिन्न मानसिकता असलेले भिन्न गट, तयार होतात. माझ्यासाठी हा मुख्य अंतर्गत संघर्ष होता.
"तो एक समृद्ध करणारा अनुभव होता.  माझा व्यक्तिमत्व विकास, माझे सॉफ्टस्किल्स येथेच मी डेव्हलप करू शकलो.  मी माणूस आणि त्यांची व्यक्तिमत्त्वे वाचण्यास शिकलो." 
नंतर मला ह्यूमन रिसोर्स  मध्ये संधी मिळाली .माझ्या कारकीर्दीत, मला सर्वात मोठ्या मीडिया हाऊसमध्ये एचआर फंक्शन स्थापित करण्याची संधी देखील मिळाली.  ह्या मीडिया हाऊसच्या लीडरशिप टीम सोबत जवळून काम केले. दूरचित्रवाणी वाहिन्या, वेब मीडिया इत्यादींचा भाग होण्याची संधी मला मिळाली. माध्यम अभिसरण ही त्या काळातली एक भूमिका होती. वेगवेगळ्या मीडिया प्लॅटफॉर्मवर बातम्या प्रसारित करण्याचे चांगले काम करत आहे. या मीडिया हाऊसमध्ये काम करताना मला मॅकिन्से, गार्सिया डिझाइन, ई अँड वाय वगैरे व्यवसाय, संपादकीय आणि मानव संसाधन क्षेत्रातील विविध प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळाली.  खरं तर, त्या अनुभवामुळे मानव संसाधनात माझी पुढील कारकीर्द घडली.
 “मीडियामध्ये काम करत असताना आपोआप आदर मिळतो, दुर्दैवाने, हा आदर बहुतेक लोकांच्या डोक्यात जातो."
आज सर्व माध्यमे पूर्णपणे वेगळ्या पातळीवर आहे.  भारतीय माध्यमांनी आपली एक वेगळी प्रतिमा तयार केली आहे, चांगली कि वाईट माहित नाही. समाजात माध्यमाचा समाजावर मोठा प्रभाव आहे. सध्या खूप कमी पत्रकार आहेत जे आपल्या मूल्यांनुसार जगतात. बहुतेकांचा स्वतःचा अजेंडा असतो.  आजकाल ते पत्रकारांपेक्षा पीआर एजंट आणि राजकीय पक्षांचे प्रवक्ते आहेत.  पॅकेज पत्रकारिता आता उच्च शिखरावर पोहोचली आहे.  अजूनही समाजात आणि राजकीय क्षेत्रात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करणारे काही पत्रकार, आहेत.  त्यांच्या प्रयत्नांना समर्थन देऊन त्यांचे कौतुक केले पाहिजे.

तथापि, तंत्रज्ञानाने सामान्य नागरिकांच्या हाती शस्त्र दिले आहे.  सशक्त सोशल मीडियामुळे प्रत्येक नागरिक पत्रकार होऊ शकतो आणि त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी ते स्वतः मांडू शकतात.  त्याचा योग्यप्रकारे वापर करण्यासाठी खूप सावधगिरी बाळगली पाहिजे, अन्यथा ते बॅकफायर होऊ शकते.

दुर्दैवाने, मीडिया उद्योग, मुख्यतः प्रिंट मीडिया, कोरोनाव्हायरस मुळे संकटात आहे. जाहिरातीचा मुख्य महसूल स्त्रोत वाईट स्थितीत आहे.  व्हायरस पसरण्याच्या भीतीने लोक प्रिंट मिडिया खरेदी करण्यास कचरतात.  छोटी मीडिया घरे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. मोठया मीडिया हाऊसेस मधील कित्येक पत्रकार आणि कर्मचारी आपला जॉब टिकवण्यासाठी संघर्ष करत आहेत आहेत. 

दुर्दैवाने जे पत्रकार टाळेबंदी आणि कामगार , कर्मचारी कपातीच्या बातम्या देतात, त्यांच्या कपातीच्या बातम्या मात्र मीडिया हाऊस मधील कॉर्पोरेट केबिन मधील कार्पेटच्या खाली आपोआप दडलेल्या जातात.

Please read the print replica of his latest book written for leaders on amazon kindle; Vitality in Human Resource      
विनोद  बिडवाईक

(लेखक प्रसिद्ध मानव संसाधन , मनुष्य बळ तज्ञ असून त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अनेक भारतीय आणि बहुराष्ट्रीय संस्थेत त्यांनी काम केलेले आहे. वरील मते त्यांची वैयक्तिक आहेत.)

गुरुवार, ६ डिसेंबर, २०१८

स्वतःच करा स्वतःची प्लेसमेंट

हजारो बेरोजगार तरुणांना गंडा लावणाऱ्या उचापती लोकांवर आधारित हा तिरकस लेख आहे. पुणे आणि इतर भागात अश्या लोकांचे पेव फुटले आहे. अश्या लोकांपासून सावधान करणे हा ह्या विनोदी लेखाचा उद्देश आहे . 
तुम्ही बेरोजगार आहात? 

मग तुमच्यासाठी स्वयंरोजगाराचा आणि भरवशाचा उद्योग नक्कीच सांगता येईल.
विचार करा, तुम्ही एक बेरोजगार. तुमच्यासारखे असे या राज्यात, देशात एकूण किती बेरोजगार आहेत आणि असतील? तुम्हाला याच बेरोजगारांच्या बेरोजगारीचा फायदा उठवायचा आहे. यात हजारो लाखो बेरोजगारांच्या बेकारीवर तुमचा उद्योग, (चांगल्या भाषेत त्याला प्रोफेशन म्हणतात) उभा करायचा आहे. या प्रोफेशनसाठी (आता या उद्योगाला आपण हाच शब्द पुढे वापरणार आहोत) बेसिक इन्व्हेस्टमेंट कमीत कमी आणि किमान आहे.

आणखी एक, तुम्ही नोकर्‍या शोधून शोधून थकलात का? किंवा कोठेही नोकरी मिळवण्याचे चान्सेस तुम्हाला कमी झाल्यासारखेच वाटत आहेत ना? तरच हा मार्ग निवडा. बेसिक इन्व्हेस्टमेंट म्हणजे फक्त एक ऑफिस, तुमचं घर  तुमचं ऑफिस म्हणून तुम्हाला वापरता येईल. एक फोन (कनेक्शन नसलं तरी चालेल), दोनतीन  मोबाइल, फक्त इन्स्ट्रुमेंट असावं बस्स, तुमचा व्यवसाय सुरू.

फारसा सस्पेन्स वाढवत नाही. अनेकांच्या डोक्यातही व्यवसाय आहे; पण बेरोजगारांच्या भावनेचा व्यवसाय आहे; पण बेरोजगारांच्या भावनेचा व्यापार आणि त्यांच्या आशेला फुंकर घालण्यासाठी जी भामटेगिरी लागते, ती आजतरी बर्‍याच जणांकडे नाही. त्यामुळे एक महत्त्वाचा गुण हा व्यवसाय करण्यासाठी आवश्यक आहे, हे तुमच्या लक्षात आले असेल.

हो, तुम्ही तुमची स्वतःची प्लेसमेंट एजन्सी सुरू करू शकता. नोकर्‍या उपलब्ध असो वा नसो बेरोजगार बेकारांची रिघ तुमच्या ऑफिसमध्ये लागेल. एक मित्र आहे, पदवीनंतर व्यवस्थापनातील डिग्री घेऊनही जेव्हा नोकरी मिळाली नाही, तेव्हा हताश झाला आणि आता तो दुसर्‍यांना नोकर्‍या मिळवून देण्याचं काम करतो. अर्थात या मित्राएवढं शिक्षण घेण्याची तुम्हाला गरज नाही. नोकर्‍या देण्यासारखं आजकाल दुसरं सोपं काम नाही.

एखादी नोकरी मिळवणं अतिशय कठीण आहे; पण नोकरी मिळवून देण्यासारखं सोपं काम कोणतच नाही. तुम्ही फक्त मोठमोठ्या कंपन्यांची नावं घ्यायची.

‘हॅलो, कौन गुप्तासाहब...’
‘...................’
‘काय, रIगावलो आम्ही तुमच्यावर...’
‘...................’
‘हो’
‘.................’
‘ठीक आहे, वहिनींना घेऊन या घरी.’ 

एखाद्या मोठ्या कंपनीच्या उच्चपदस्थांचं नाव घेऊन गोड गोड बोलत, हसत, एकतर्फी संभाषण करण्याचं कौशल्य चांगल्यापैकी अवगत असायलाच हवं!

समोरच्या बेकार, बेरोजगारांवर एकदम इम्प्रेशन पडते की नाही बघा. निमूटपणे रजिस्ट्रेशनचे हजार दोन हजार  जे काय असतील तो काढून देईन.

तुम्हाला इंग्रजीचं नॉलेज हवंच असं नाही; पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. समोर एखादा बकरा आला की, तुम्हाला कोणत्या तरी कंपनीतून फोन यायलाच हवा. त्यासाठी फोनच्या रिंगसारखी बेल ऑफिसमध्ये बसवून घ्या. मग रिसिव्हर उचलून बिनधास्त संभाषण करा. 

‘अं, हो स्पीकिंग.’
‘या या... आय हॅव सम कँडिडेट्स.’
‘व्हॉट, यू वील ऑफर? मोर दॅन फाइव्ह ?’
‘ओके, प्लीज गीव्ह मी अ टाईम टू कॉल माय कँडिडेट्स...’
वगैरेसारखं बोलण्याची प्रॅक्टिस नियमित करा.

अर्थात मोठमोठ्या कंपन्यांची नावे तोंडावर हवीत. कोणते उमेदवार रजिस्टर करायचे याचा विचारच करू नका. बीएच्या उमेदवाराला बिनधास्त एखाद्या इंजिनीअरिंग कंपनीमध्ये पाठवा. बीएस्सी मॅथस्च्या विद्यार्थ्याला एखाद्या केमिकल इंडस्ट्रीजमध्ये पाठवा. त्याचं सिलेक्शन होण्याची गॅरंटी नसतेच; पण एक कॉल दिला हे तुम्ही सांगू शकता. कंपनीचा इंटरव्ह्यू कॉल देण्याची जबाबदारी फक्त तुमची. त्याचं सिलेक्शन होणे, हे सर्वस्वी त्याच्यावरच अवलंबून आहे, हे लक्षात घ्या. आणि तुमच्या सुदैवाने तो निवडला गेलाच, तर त्याचा पहिला पगार सोडू नका. उमेदवार स्वतःहून पैसे आणून देणार नाहीत. तुम्ही कंपनीच्या गेटवर पठाणासारखे उभे राहा. म्हणजे तुमचं इन्कम आहेच. या व्यवसायात बर्‍यापैकी नव्हे तर बक्कळ पैसा तुम्ही कमावू शकाल.

और एक बात, हळुहळु कंपनीच्या मॅनेजर आणि ऑफिसर्सशी ओळख करून घ्या. थोडा त्यांचाही फायदा करून द्या. त्यांच्या कंपनीत जागा नसली, तरी फक्त इंटरव्ह्यू घेण्याची त्यांना विनंती करा.

ते सांगतील ‘ओके वुई वील कॉल टू लेटर.’ बिचारे बेकार, बेरोजगार त्यांच्या त्या तथाकथित कॉलची वाट बघतील. हळुहळु दुसर्‍या शहरात, नंतर मोठ्या शहरात आणि हळुहळु परदेशातही तुमच्या शाखा उघडा. घाबरू नका. ‘आमची अब्रोड विंग’ हे सांगितले तरी इनफ.

बघा प्रयत्न करून. अल्पावधीतच तुम्ही श्रीमंत या कॅटॅगरीत मोडाल. मग... करता ‘श्री गणेशा?’ 

नको बरं का, सहज सुचलं म्हणून लिहिलं. असलं काही फॅड डोक्यात घेऊ नका. नाहीतर व्हाल पोलिसांच्या हवाली!

मंगळवार, ४ डिसेंबर, २०१८

विल आय गेट अ ब्युटीफुल जॉब ?




"नोकरीबद्दल चॉईस असायला हरकत नाही, पण स्वतःच्या कुवतीचा विचार न करता असं म्हणणं निराशेला जन्म देऊ शकतं." 
Related image

"बेटा पुढच्या महिन्यात तुझी एमबीएची डिग्री तुझ्या हातात पडेल, त्यानंतर काय? कोठे प्रयत्न वगैरे सुरू केलेत की नाही?" मुलाच्या करिअरच्या बाबतीत सजग असणार्‍या बापाने मुलाला प्रश्‍न विचारला. डिग्री घेतल्यानंतर वरमाला घेऊन उभ्या असणार्‍या राजकन्येप्रमाणे नोकर्‍याही आपल्या पायाशी आहेत असं समजणार्‍या नव्या जमान्याच्या, आधुनिक, दुधाऐवजी पेप्सीवर जगलेल्या स्टार जनरेशनच्या तरुणाने सर्व अंग घुसळत आणि खांद्यांची विचित्र हालचाल करत उत्तर दिलं, "येस डॅडी, व्हाय नॉट. आय नो आय वील डेफिनेटली गेट द जॉब." संपूर्ण अंग घुसळून इंग्रजीत संभाषण न केल्यास आपण गावठी समजले जाऊ म्हणून संपूर्णपणे अमेरिकन बनलेल्या त्या तरुणाच्या या उत्तराने वडिलांच्या कपाळावर सूक्ष्मशी आठी पडली. 

या वयात आपण अशा नटवेपणाने उत्तर दिलं असतं, तर बापाने खाडकन मुस्कटात दिली असती, असा विचार मनात येतो न येतो तोच मुलगा परत उत्तरला. "यू नो डॅड, कॅम्पस इंटरव्ह्यूज वील बी हेल्ड इन नेक्स्ट मंथ. त्यावेळेस मैं ऐसा परफॉर्मन्स दुंगा की..."  

पुढचे शब्द बापाच्या डोक्यावरून गेले. समजून बापाने परत विचारलं, "बाळा तू मार्केटिंगमध्ये एमबीए केलं; पण आताच्या स्पर्धेच्या जगात तुला चांगली नोकरी मिळण्याचे चान्सेस किती आहेत?"
 
"सेंट परसेंट डॅड. आय विल गेट अ ब्युऽऽऽटीफुल जॉब विथ हाय कंपेसेशन पॅकेजेस, विथ कार, बंगलो अँड ब्युटीफूल सेक्रेटरी... यूसी..."
 
हे जग किती कठोर आहे, याचा अनुभव आलेल्या वडिलांनी उत्तर दिलं, "म्हणजे भविष्यात तुला नोकरी मिळण्याची अजिबात संधी नाही, असं तुला म्हणायचंय? मीन्स, युवर इंटेन्शन इज नॉट टू गेट जॉब इन फ्यूचर?" वडिलांनी स्वतःच्या वाक्याचे भाषांतर करून पोराला सुनावलं.

एखादी प्रोफेशनल डिग्री घेतल्यानंतर नोकर्‍या खूप स्वस्त आहेत. मोठ्या हुद्द्याच्या, पगाराच्या नोकर्‍या त्यांची वाटच बघत आहे, असं समजणारी खूप मंडळी आहेत. वडिलांच्या पैशावर शिक्षण घेतल्यानंतर पैसे कमावणे किती कठीण आहे, याचा प्रत्यक्ष अनुभव नसणारी ही तथाकथित हायप्रोफेशनल डिग्रीहोल्डरची मनं खूप वेगळी असतात. नाही माझंही तसंच मत आहे. एमबीए, बीई वगैरेनंतर चांगल्या पगाराची नोकरी मिळावीच. कारण हे कोर्सेस त्यादृष्टीने योजलेले असतात. पण प्रत्येक क्षेत्रात साठा झाल्यामुळे ‘मागणी तसा पुरवठा’ या तत्त्वाप्रमाणे खूपसे पदवीधारक आज महिन्याला दहा -पंधरा हजारावर काम करीत आहेत. आणि एखाद्या फॅक्टरीमध्ये साध्या हेल्परची कामे त्यांच्या वाटेला आलेली आहेत. एमबीए मार्केटिंग झालेल्या पदवीधारकांना डोअर टू डोअर मार्केटिंग अथवा खाजगी बँकेची खाती नाईलाजाने विकण्याचे काम करावं लागतं. तेव्हा या तरुणांच्या जगण्याच्या सर्व कल्पना धारातीर्थी पडतात.

एक-दोन दिवसांपूर्वी एक एमबीए झालेले, असेच नवबेरोजगार भेटले. वरील किस्स्यातील तरुणाप्रमाणेच कमीत कमी सत्तर हजार  रुपये महिन्याची नोकरी मिळावी, अशा विचाराच्या या तरुणाची मला कीव आली.

"दॅट कंपनी वॉज ऑफरिंग मी फिफ्टी थाउजंड अ‍ॅट जलगॉन बट आय रेफ्यूज्ड जलगॉन! राम राम भैय्या मैने कहा."

वरील कंपनीचा इतिहास बघता ही कंपनी दहा   हजार ऑफर करेल हे एक बंडलच असावं. कारण त्या कंपनीच्या अनुभवी मॅनेजरचा पगार एक लाखाच्यावर थांबला होता. आणि हे खरंही असेल तर त्या कंपनीने दिलेली पन्नास  हजाराची ऑफर या स्पर्धेच्या युगात वाईट नव्हती. प्रत्येकाच्या नशिबात मल्टिनॅशनल कंपनी असेलच असं नाही. मग अनुभवासाठी या तरुणाने या कंपनीची ही ऑफर स्वीकारायला हरकत नव्हती. संधी ही चोरपावलांनी येते आणि बेकार राहण्यापेक्षा काही दिवस अनुभव मिळवण्यासाठी कोणतीही संस्था वाईट नसते. देशातील बेरोजगारी वाढण्याचं हेही एक कारण आहे. असं माझं मत आहे. ‘बेगर्स आर नॉट चुझर्स’ या वाक्यावर जरी आक्षेप घेतला, तरी मानसिकता बदलायला हवी. अशा वेळेस उगाचच सरकारवर दोष देण्यात अर्थ नाही. मुळातच स्वतःच्या कुवतीचा विचार न करता स्वतः बद्दलची भूमिका तयार करणं ही निराशेला जन्म देऊ शकते.

नोकरीबद्दल चॉईस असायला हरकत नाही; पण अशा नोकर्‍या मिळतात कोठे? चांगली नोकरी मिळण्यासाठी काही गुण असणे आवश्यक आहे. यस, हुशारी/ मेरिट आणि टॅलेंट हाही एक गुण आवश्यक असला तरी दुय्यम आहे. सरकारी नोकर्‍यांमध्ये पैसा आणि वशिला आवश्यक झालेला आहे. 

सिन्नरमधील एका मोठ्या कंपनीची हकीकत माझ्यासमोर आहे. एका महत्त्वाच्या पदासाठी येथे दोन वेळा इंटरव्यू झाले. परंतु या मुलाखती म्हणजे फार्सच होता. माझ्या एका मित्राने स्वतःची वर्णी त्या पदावर लागावी म्हणून त्यांच्या मुंबई ऑफिसमधून ओळखीच्या अधिकार्‍याची चिठ्ठी आणली. ती चिठ्ठी घेऊन तो जेव्हा त्या कंपनीत गेला तेव्हा तेथे त्याच्याच कॉलेजमधील दुसर्‍याची वर्णी त्या पदावर लागली होती. मित्राच्या चिठ्ठीपेक्षा त्याचा ‘जॅक’ थोडा भारदस्त होता. दुसर्‍या कंपनीतलाही किस्सा असाच. तेथे मुलाखती झाल्यात आणि नेमणूक त्याच कंपनीतील एकाची झाली. 

Image result for unemployed MBAथोडक्यात सांगायचा मुद्दा हाच की, आज तुमच्याकडे निव्वळ डिग्री असता उपयोगी नाही. या सर्व प्रोफेशनल पदव्या आणि पदविका निव्वळ मृगजळ ठरल्या आहेत. हा दोष कोणाचा, शिक्षणपद्धतीचा की शिकणार्‍यांचा हा वाद उपयोगी नाही. एका बाजूला चोखंदळपणा अडतो आहे. मेंढरासारखी प्रवृत्ती बेकारी वाढवत आहे. एकेकाळी एम.कॉम., एम.ए., एम.एस्सी. वगैरे करिअर घडवणार्‍या पदव्या होत्या. आता एम.बी.ए., बी.ई., एम.पी.एम. वगैरेसारख्या प्रोफेशनल पदव्या आल्या. मेडिकल, इंजिनिअर बनू न शकणारी मंडळी असो वा झालेली, ‘मॅनेजमेंट’ आवश्यक झालेलं आहे. त्यातही इंजिनीअर्सची पदवीही आता भरवशाची नोकरी मिळवून देऊ शकेल याची खात्री देत नसताना काही परीक्षार्थी, (विद्यार्थी नव्हे) स्वतःच्या करिअरबद्दल जरा जास्तच जागरूक झालेली आहेत. नोकरीच्या संधी असूनही मला अशीच नोकरी मिळाली पाहिजे. हा अतिचोखंदळापणाही बेकारी वाढवत आहे.

मृगजळाच्या मागे धावताना शेवटी तोही थकतो आणि मग नाईलाजाने कोणतीही नोकरी पत्करावी लागते. एकेकाळी कर्नल, मेजर, मॅनेजरसारख्या पदाची स्वप्ने बघत होतो, आता सध्या ऑफिसबॉय पदासाठीही अर्ज करण्याची तयारी आहे. माझ्या एका मित्राचं मत.
करिअर घडवणं हातात आहे; पण त्यासाठी आत्मविश्‍वास हवा. आयएएस, पीआय सारख्या परीक्षा देता देता अर्ध आयुष्य निघून जातं आणि तरीही तरुणाच्या डोक्यावरचं आयएएस किंवा पीआय होण्याचं भूत काही जात नाही. वेळ कोणासाठी थांबत नाही. त्यामुळे डिग्री हातात पडल्या पडल्या काहीतरी करणे गरजेचे असते. मृगजळ हे निव्वळ मृगजळच असतं. करिअर घडविताना याचाही विचार असावाच ना?

विनोद बिडवाईक