गुरुवार, ६ डिसेंबर, २०१८

स्वतःच करा स्वतःची प्लेसमेंट

हजारो बेरोजगार तरुणांना गंडा लावणाऱ्या उचापती लोकांवर आधारित हा तिरकस लेख आहे. पुणे आणि इतर भागात अश्या लोकांचे पेव फुटले आहे. अश्या लोकांपासून सावधान करणे हा ह्या विनोदी लेखाचा उद्देश आहे . 
तुम्ही बेरोजगार आहात? 

मग तुमच्यासाठी स्वयंरोजगाराचा आणि भरवशाचा उद्योग नक्कीच सांगता येईल.
विचार करा, तुम्ही एक बेरोजगार. तुमच्यासारखे असे या राज्यात, देशात एकूण किती बेरोजगार आहेत आणि असतील? तुम्हाला याच बेरोजगारांच्या बेरोजगारीचा फायदा उठवायचा आहे. यात हजारो लाखो बेरोजगारांच्या बेकारीवर तुमचा उद्योग, (चांगल्या भाषेत त्याला प्रोफेशन म्हणतात) उभा करायचा आहे. या प्रोफेशनसाठी (आता या उद्योगाला आपण हाच शब्द पुढे वापरणार आहोत) बेसिक इन्व्हेस्टमेंट कमीत कमी आणि किमान आहे.

आणखी एक, तुम्ही नोकर्‍या शोधून शोधून थकलात का? किंवा कोठेही नोकरी मिळवण्याचे चान्सेस तुम्हाला कमी झाल्यासारखेच वाटत आहेत ना? तरच हा मार्ग निवडा. बेसिक इन्व्हेस्टमेंट म्हणजे फक्त एक ऑफिस, तुमचं घर  तुमचं ऑफिस म्हणून तुम्हाला वापरता येईल. एक फोन (कनेक्शन नसलं तरी चालेल), दोनतीन  मोबाइल, फक्त इन्स्ट्रुमेंट असावं बस्स, तुमचा व्यवसाय सुरू.

फारसा सस्पेन्स वाढवत नाही. अनेकांच्या डोक्यातही व्यवसाय आहे; पण बेरोजगारांच्या भावनेचा व्यवसाय आहे; पण बेरोजगारांच्या भावनेचा व्यापार आणि त्यांच्या आशेला फुंकर घालण्यासाठी जी भामटेगिरी लागते, ती आजतरी बर्‍याच जणांकडे नाही. त्यामुळे एक महत्त्वाचा गुण हा व्यवसाय करण्यासाठी आवश्यक आहे, हे तुमच्या लक्षात आले असेल.

हो, तुम्ही तुमची स्वतःची प्लेसमेंट एजन्सी सुरू करू शकता. नोकर्‍या उपलब्ध असो वा नसो बेरोजगार बेकारांची रिघ तुमच्या ऑफिसमध्ये लागेल. एक मित्र आहे, पदवीनंतर व्यवस्थापनातील डिग्री घेऊनही जेव्हा नोकरी मिळाली नाही, तेव्हा हताश झाला आणि आता तो दुसर्‍यांना नोकर्‍या मिळवून देण्याचं काम करतो. अर्थात या मित्राएवढं शिक्षण घेण्याची तुम्हाला गरज नाही. नोकर्‍या देण्यासारखं आजकाल दुसरं सोपं काम नाही.

एखादी नोकरी मिळवणं अतिशय कठीण आहे; पण नोकरी मिळवून देण्यासारखं सोपं काम कोणतच नाही. तुम्ही फक्त मोठमोठ्या कंपन्यांची नावं घ्यायची.

‘हॅलो, कौन गुप्तासाहब...’
‘...................’
‘काय, रIगावलो आम्ही तुमच्यावर...’
‘...................’
‘हो’
‘.................’
‘ठीक आहे, वहिनींना घेऊन या घरी.’ 

एखाद्या मोठ्या कंपनीच्या उच्चपदस्थांचं नाव घेऊन गोड गोड बोलत, हसत, एकतर्फी संभाषण करण्याचं कौशल्य चांगल्यापैकी अवगत असायलाच हवं!

समोरच्या बेकार, बेरोजगारांवर एकदम इम्प्रेशन पडते की नाही बघा. निमूटपणे रजिस्ट्रेशनचे हजार दोन हजार  जे काय असतील तो काढून देईन.

तुम्हाला इंग्रजीचं नॉलेज हवंच असं नाही; पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. समोर एखादा बकरा आला की, तुम्हाला कोणत्या तरी कंपनीतून फोन यायलाच हवा. त्यासाठी फोनच्या रिंगसारखी बेल ऑफिसमध्ये बसवून घ्या. मग रिसिव्हर उचलून बिनधास्त संभाषण करा. 

‘अं, हो स्पीकिंग.’
‘या या... आय हॅव सम कँडिडेट्स.’
‘व्हॉट, यू वील ऑफर? मोर दॅन फाइव्ह ?’
‘ओके, प्लीज गीव्ह मी अ टाईम टू कॉल माय कँडिडेट्स...’
वगैरेसारखं बोलण्याची प्रॅक्टिस नियमित करा.

अर्थात मोठमोठ्या कंपन्यांची नावे तोंडावर हवीत. कोणते उमेदवार रजिस्टर करायचे याचा विचारच करू नका. बीएच्या उमेदवाराला बिनधास्त एखाद्या इंजिनीअरिंग कंपनीमध्ये पाठवा. बीएस्सी मॅथस्च्या विद्यार्थ्याला एखाद्या केमिकल इंडस्ट्रीजमध्ये पाठवा. त्याचं सिलेक्शन होण्याची गॅरंटी नसतेच; पण एक कॉल दिला हे तुम्ही सांगू शकता. कंपनीचा इंटरव्ह्यू कॉल देण्याची जबाबदारी फक्त तुमची. त्याचं सिलेक्शन होणे, हे सर्वस्वी त्याच्यावरच अवलंबून आहे, हे लक्षात घ्या. आणि तुमच्या सुदैवाने तो निवडला गेलाच, तर त्याचा पहिला पगार सोडू नका. उमेदवार स्वतःहून पैसे आणून देणार नाहीत. तुम्ही कंपनीच्या गेटवर पठाणासारखे उभे राहा. म्हणजे तुमचं इन्कम आहेच. या व्यवसायात बर्‍यापैकी नव्हे तर बक्कळ पैसा तुम्ही कमावू शकाल.

और एक बात, हळुहळु कंपनीच्या मॅनेजर आणि ऑफिसर्सशी ओळख करून घ्या. थोडा त्यांचाही फायदा करून द्या. त्यांच्या कंपनीत जागा नसली, तरी फक्त इंटरव्ह्यू घेण्याची त्यांना विनंती करा.

ते सांगतील ‘ओके वुई वील कॉल टू लेटर.’ बिचारे बेकार, बेरोजगार त्यांच्या त्या तथाकथित कॉलची वाट बघतील. हळुहळु दुसर्‍या शहरात, नंतर मोठ्या शहरात आणि हळुहळु परदेशातही तुमच्या शाखा उघडा. घाबरू नका. ‘आमची अब्रोड विंग’ हे सांगितले तरी इनफ.

बघा प्रयत्न करून. अल्पावधीतच तुम्ही श्रीमंत या कॅटॅगरीत मोडाल. मग... करता ‘श्री गणेशा?’ 

नको बरं का, सहज सुचलं म्हणून लिहिलं. असलं काही फॅड डोक्यात घेऊ नका. नाहीतर व्हाल पोलिसांच्या हवाली!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा