marathi movie लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
marathi movie लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १२ डिसेंबर, २०२०

सती सावित्री

दोन तीन दिवसापासून गावातील वातावरण एकदम उत्साही झाले होते. घरातील मोठी माणसे आणि लहान मुले, आबालवृद्ध, धनिकांच्या घरी काम करणारे गडी सर्वजण आनंदात होते. प्रत्येकजण उत्साहाने एकमेकाला विचारात होते कि "तू येणार ना?". शाळेमध्ये तीच चर्चा होती. मधल्या सुट्टीत गप्पांचा विषय तोच होता आणि तेथेही सर्वजण एकमेकाला विचारात होते, "तू येणार ना?" किती वाजता जायचे, कोठे बसायचे, समोरची जागा पकडायची कि मागची, अश्या प्रकारच्या चर्चेचे गावात उधाण आले होते. घरातील सुनांना कधीतरी बाहेर पडायची संधी मिळणार होती म्हणून त्या पण खुश होत्या. एकंदरीत उत्साहाचे भरते आले होते.

आमच्या गावात देशमुखांचा जवाहर साऊंड सिस्टम भाड्याने देण्याचा व्यवसाय करत असे. म्हणजे त्याचा खरा उद्योग गावातील पारावर मित्रांना गोळा करून पत्ते खेळण्याचा होता. कधीकधी जवाहर आणि त्याचे मित्रलोक चौसर पण खेळत असत. त्यातून वेळ मिळाला की बापाशी भांडायचे आणि त्यातूनही  वेळ मिळाला कि मग शेतात काम करायचे आणि पूरक उद्योग म्हणून साऊंड सिस्टम भाड्याने देण्याचे काम करायचे. असे उद्योग जवाहर करत असे. साऊंड सिस्टम मध्ये दोन भोंगे, एक अँप्लिफायर, एकदोन माईक, काही तबकड्या आणि कॅसेट असायच्या. गावातील गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेश्या होत्या.

एक दिवस जवाहर आमच्या गावापासून २५ किलोमीटर दूर असणाऱ्या परतवाडा नावाच्या शहरात गेला. कोणीतरी त्याला, गावात तंबू लावून चित्रपट दाखवण्याचा धंधा करण्याचा सल्ला दिला. परतवड्यात असे तंबू लावून चित्रपट जोरात चालत असत. ते पाहण्यासाठी गावातील मंडळी कधीकधी जात असत. ह्या तंबूतील चित्रपटांना टुरिंग टॉकीज म्हणत असत. अर्थात त्यापैकीच एकाने जवाहरची मदत घेण्याचे ठरवले. सर्व व्यवस्था तो मालक करणार, गावातील विजेची, मैदानाची, आणि लोकांना घेऊन येण्याची व्यवस्था तेवढी जवाहरने करायची अशी ही भागीदारी होती.

ही व्यवस्था पूर्ण करण्याच्या आधी जवाहरने गावातील बऱ्याच लोकांच्या घरी जाऊन त्यांची मते घेतली होती. थोडक्यात हा एक मार्केट सर्वेच म्हणावा लागेल आणि ह्याच आधारावर गावांमध्ये टुरिंग टॉकीज ला चांगले दिवस आहेत या निष्कर्षाप्रत जवाहर आला होता. 

आणि एक दिवस जवाहरने त्याच्या साऊंड सिस्टिम चा उपयोग पहिल्यांदा स्वतःसाठी करण्याचा निर्णय घेतला. मोठ्या आवाजात त्याने टुरिंग टॉकीजची प्रसिद्धी करायला सुरुवात केली. येत्या रविवारी गावात "सती सावित्री" हा चित्रपट या टुरिंग टॉकीजमध्ये दाखवण्यात येणार असल्याचे जाहीर केले. खरं तर हे जाहिरातीचे तंत्र पूर्णपणे यशस्वी झाले होते. गावांमध्ये टुरिंग टॉकीज आणि त्यातही पहिला चित्रपट सती सावित्री. त्यामुळे गावातील प्रत्येक जण या बातमीने उत्साहीत झाला होता. थोडक्यात काय तर मनोरंजनाचे असे नवीन साधन आता  गावांमध्ये उपलब्ध होणार होते. त्यावेळेस खरंतर कोणाच्या घरी टीव्ही नव्हते. एक दोन धनिक मंडळी होती, त्यांच्याकडे ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असायचा. रेडिओ आणि टीव्हीवरचे कार्यक्रम सुद्धा ठराविक वेळेस असायचे. त्यामुळे टुरिंग टॉकीजच्या प्रयोगाने गावातील वातावरण ढवळून निघाले नसते तरच नवल.

"सर्व गावकऱ्यांना कळविण्यात येत आहे की येत्या रविवारी दिनांक अमुक-अमुक दिवशी महान भव्य बोलपट सती सावित्री चा प्रयोग गावातील शाळेच्या मैदानावर आयोजित केलेला आहे. पहिल्यांदाच हा प्रयोग करण्यात येत असून सर्व गावकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत हा कार्यक्रम बघण्यासाठी जरूर यावे. प्रवेश फी फक्त दोन रुपये." आणि "आपल्या मृत पावलेल्या नवऱ्याला यमाच्या तावडीतून घेऊन येणाऱ्या, एका सती सावित्रीची ही कहाणी आपल्या डोळ्यात नक्कीच अश्रू आणेल. त्यामुळे हा धार्मिक बोलपट अवश्य बघावा, अशी गावातील आया-बहिणींना विनंती आहे. येत आहे, लवकरच येत आहे सतीसावित्री. प्रवेश तिकिटाचे दर फक्त दोन रुपये" ह्या आणि अश्या जाहिरातींनी जवाहरने अक्षरशः धुमाकूळ घातला. त्याच्या घराच्या छतावर दोन भोंगे लावून दिवसातून कमीत कमी दहा बारा वेळा हा जाहिरातीचा कार्यक्रम पार पडत असे. गावातील लहान मुलांना माईकवर बोलण्याची खूप हौस असायची. त्यामुळे या जाहिरातीचे काम गावातील लहान मुले सुद्धा इमानेइतबारे करू लागली.

शेवटी तो महत्त्वाचा दिवस उगवला. गाव तसे सुस्त असायचे. पण गावातील लगबग जरा जास्तच जाणवू लागली. आया-बहिणी आपापली कामं आटोपु लागली. रात्रीचा स्वयंपाक सकाळीच करून ठेवला गेला. शाळेला तर सुट्टी होती, त्यामुळे मुले जागोजागी उभे राहून चर्चा करू लागले. काही उत्साही लोकआणि उत्साही मुले उगाचच गावातील त्या ग्राउंड वर जाऊन टुरिंग टॉकीज म्हणजे काय असते हे बघून आले. इतर मुलांना माहिती देऊ लागले. परत त्यांना सोबत घेऊन जाऊ लागली. कुठून तरी विजेची व्यवस्था करण्यात आली होती. मोठा तंबू पडला होता. कमीत कमी दोनशे तीनशे लोक बसू शकतील असा तो मोठा तंबू होता. समोर एक मोठा पांढरा पण मळकट मोठा पडदा लावला होता. खरं तर तोपर्यंत माझ्या आयुष्यात मी कधीही चित्रपट बघितला नव्हता. चित्रपट नेमका कसा असतो हेही मला माहीत नव्हते. तो पडद्यावर दिसतो, तो कसा प्रोजेक्ट होतो, ते आवाज कुठून येतात हे मला काहीच माहीत नव्हते. त्यामुळे हा चित्रपट बघण्याची उत्सुकता मलाही होती. आमच्या घरी पण नेमके तेच वातावरण होते. अर्थात बोलपट म्हणजे काय, चित्रपट म्हणजे काय अश्याही चर्चा रंगू लागल्या. 

त्यावेळेस पिक्चर काय प्रकार असतो, तो कसा दिसतो, हा सर्व प्रकार मला नवीन होता. नाही, चित्रपट हा प्रकार त्या वेळेस नवीन नव्हता; परंतु विदर्भातील त्या खेडेगावातला तो नवीन होता.  खेडोपाडी फिरत चित्रपट दाखविणारे ते ‘मोबाईल थिएटर’गावात अवतरले. गावात अमाप उत्साह संचारला. खरंतर नेहमी शहरात जाणार्‍या मंडळीना चित्रपट हा प्रकार माहीत होता. परंतु 90 टक्के जनतेने आयुष्यात कधीही पिक्चर बघितला नव्हता. आम्ही सर्व काम सोडून थिएटरच्या तंबूकडे काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करू लागलो. एक मोठा पडदा टांगण्यात आला होता. संपूर्ण मैदान पडद्याने बंदिस्त करण्यात आलं. लाकडी बाबूंचे कठडे बसवण्यात आले. आम्ही बच्चेमंडळी हा सर्व प्रकार कुतूहलाने बघत होतो. गावातील मोठी माणसं पाठीमागे हात बांधून हा प्रकार उत्सुकतेने बघत होती. संध्याकाळ झाली, लाऊडस्पीकरवर घोषणा होऊ लागली, "सुरू होत आहे, चालू होत आहे, महान धार्मिक बोलपट सती सावित्री, ठीक साडेआठ वाजता, सर्वांना विनंती आहे की वेळेवर या, आपापल्या जागी शांतपणे, बसा तिकिटाचा दर फक्त दोन रुपये.

तंबूमध्ये दोन भाग केले होते. एक भाग पुरुषांसाठी. एक महिलांसाठी. मोठ्या मुलांना पुरुषांच्या भागामध्ये बसविण्यात येत होते. हळूहळू गर्दी जमा होऊ लागली. वातावरणातील उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता सती सावित्री हा चित्रपट सुरू होण्याची वेळ आली होती. साडेआठ वाजले. तंबूतील मोठे लाईट बंद करण्यात आले. अंधार झाला. मागून एक फोकस समोरच्या पडद्यावर पडला. काहीतरी काळपट पांढरट वेगात दिसू लागले. पंधरा-वीस मिनिटं हा फोकस अड्जस्ट करण्यात गेले. पडद्यावर शब्द आले, "समाप्त". अरे हे काय आहे. चित्रपट सुरु व्हायच्या आधीच समाप्त? लोकांनी थोडा आरडाओरड केली. 

आणि हे काय? यम आणि सावित्रीचा संवाद सुरु झाला. आणि यमाने सावित्रीला आशीर्वाद दिला. कोणीतरी ओरडले, "हे काय आहे? मधेच उलटेपालटे  सिन येत आहेत. सुरुवातीपासून सुरु करा." परत पडदा कोरा झाला. आता फक्त प्रकाश दिसू लागला. काही शब्द दिसले आणि प्रोजेक्टर बंद पडले. परत लोक ओरडू लागले. असा प्रकार २५-३० मिनटे सुरु होता. शेवटी पडद्यावर सिन सुरू झाले. सती सावित्रीची कहाणी दिसू लागली, तिचे कुटुंब, वगैरे.  आता चित्रपटाने गती घेतली होती. सावित्रीचा संघर्ष बघून बाया मुसमुसू लागल्या. सर्वजण चित्रपटात गुंतून गेले आणि अचानक मागून भांडण्याचा आवाज येऊ लागला. आमच्या गावातील बन्‍सी काळे नावाचा एक म्हातारा गृहस्थ भयानक दारू पीत असे. त्याने जोरात आरडाओरडा सुरू केला. तंबूचे कापड वर करून तो आत येण्याचा प्रयत्न करू लागला. जवाहर आणि इतर लोक त्याचे सहकारी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होते. "मी पैसे देणार नाही मला बोलपट बघायचा आहे" असे तो जोरजोरात ओरडू लागला. आता झटपट सुरु झाली. ह्या झटापटीत तंबूला लावलेला एक बांबू कोसळला. मागच्या बाजूने संपूर्ण तंबू खाली आला. सुदैवाने आम्ही बसलो होता त्या भागात तंबूचे बांबू सुस्थितीत होते. पण या प्रकाराने सगळीकडे गोंधळ माजला. लोक बाहेर पडायला लागले. काही जण उठून पडद्याकडे गेले. बन्सी काळे आता पुरता चवताळला आणि जवाहरच्या पार्टनर च्या अंगावर धावून गेला. जवाहर बाजूला झाला आणि माईक शोधू लागला. कोठेतरी प्रोजेक्टर च्या टेबल वर पडलेला माईक त्याने हातात घेतला आणि लोकांना शांततेचे आवाहन करू लागला. "बंधुनो आणि भगिनींनो, शांतता बाळगा." पण आता शांतता पाळण्याच्या परिस्थितीत कोणी दिसत नव्हते. एकाने जवाहरच्या हातातील माईक घेऊन फेकून दिला.  हे बघून पार्टनर ने बाहेर धूम ठोकली. बन्सी काळे त्याचा पाठलाग करू लागला.

चेंगराचेंगरीची परीस्थिती निर्माण झाली. लोक बाहेर पडू लागले. मी माझ्या आई आणि बहिणीसोबत होतो. बाबांना बाहेर पडताना त्यांनी आम्हाला आवाज दिला. भयानक गोंधळ माजला होता. थोड्या वेळाने संपूर्ण तंबू खाली कोसळला. लोकांनी धुमाकूळ घालायला सुरुवात केली. त्यांनी बांबू उखडले. पडदे फाडले. प्रोजेक्टर ची दशा काय झाली असेल देव जाणे. आम्ही गोंधळातच घरी आलो. सर्व लोक जवाहरच्या नावाने बोंब मारत होते. पुढचे पंधरा दिवस जवाहर गावाच्या बाहेर होता. 

सती सावित्री आपल्या नवऱ्याचा प्राण यमराजाकडून परत कसा आणते हे मात्र आम्हाला शेवटपर्यंत समजले नाही. दुसऱ्या दिवशी आईनेच आम्हाला सती सावित्रीची गोष्ट संपूर्णपणे सांगितली.   

मी "सती सावित्री" हा चित्रपट संपूर्ण बघू शकलो नसेल, मात्र त्याचा पाहिलेला काही भाग माझ्या आयुष्यातील पहिल्यावहिल्या चित्रपटाच्या नोंदणीत निश्चितच ठेवावा लागेल.

विनोद बिडवाईक

(विनोद बिडवाईक ह्यांची सर्व पुस्तके फ्लिपकार्ट आणि बुकगंगा वर उपलब्ध आहेत.  इंग्रजी मध्ये लिहिली पुस्तके किंडल फॉरमॅट मध्ये ऍमेझॉन वर उपलब्ध आहेत.)  

शनिवार, २८ नोव्हेंबर, २०२०

फसलेली क्रांती

भारताच्या इतिहासात कित्येक क्रांत्या घडून गेल्या असतील; कित्येक बंड झाले असतील. त्यातील कित्येक बंड फसली असतील. परंतु एक असे बंड, एक क्रांती अशीही आहे जी इतिहासाच्या कोणत्याही रुपेरी पानावर लिहिल्या गेली नाही. त्याबद्दल फारसे बोलल्या गेले नाही. इतिहासाच्या पुस्तकांवरून नजर टाकली तर आपल्या लक्षात एक गोष्ट येईल ती म्हणजे भारतामध्ये झालेली सर्व क्रांत्या अथवा बंड इंग्रजांच्या अथवा देशाबाहेरील शत्रुंच्या विरोधात होते. परंतु हे बंड आपल्याच लोकांविरुद्ध करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली होती.

स्वकियांविरुद्ध लढण्याची हौस कोणालाच नसते. महाभारतात घडल्याप्रमाणे स्वकीयांविरुद्ध, आपल्या परिजनाविरुद्ध, गुरूजनांविरुद्ध लढण्याची वेळ त्या लहान विद्यार्थ्यांवर आली होती. हि अभूतपूर्व परिस्थिती बहुरडा नदीच्या दोन्ही काठावर वसलेल्या कविठा आणि घोडगाव या गावी निर्माण झाली होती. त्यासाठी जबाबदार होते शाळेतील गुरुजन.

आम्हा सर्व विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश घालावा लागत असे. खाकी हाप पॅन्ट, पांढरा शर्ट, त्यावर लाल टाय असा हा गणवेश सक्तीचा असे. शर्ट इन् करून टापटीप राहावे लागत असे. बुट आणि सॉक्स हे मात्र सक्तीचे नव्हते. आम्ही स्लीपर अथवा चप्पल घालूनच शाळेत जात असू. काही सधन मुले शुज घालून येत असत. दररोज हा गणवेश घालणे सक्तीचा असे, अर्थात शुक्रवारी आम्हाला आमच्या आवडीचे कपडे घालावयाचे स्वातंत्र्य होते. अर्थात या गणवेश याबद्दल तक्रार करण्याचे कोणतेही कारण नव्हते. दहावीपर्यंत हा गणवेश चालत असे. एकदा कपडे शिवले कि दोनतीन वर्ष हमखास चालत असत. प्रश्न मुळात गणवेशाचा नव्हताच. प्रश्न होता प्रतिष्ठेचा.

त्याचे झाले असे कि सातवीनंतर आठवीत गेल्यानंतर मुले थोडी थोराड दिसत असत, त्यामुळॆ आठवी ते दहावीच्या विध्यार्थ्यांना हाप पॅन्ट ऐवजी फुल पॅन्ट ची परवानगी द्यावी अशी मागणी काही विद्यार्थ्यांनी पीटीच्या सोनार सरांकडे केली. हिवाळा सुरु होणार होता आणि थंडीही खूप पडत असे. हेही एक कारण ह्या मागणीमागे होते. 

हि मागणी उर्मटपणे धुडकावून देण्यात आली. सोनार सर हे आमचे पीटी चे सर होते. कधीकधी ते चित्रकलेचा क्लास घेत असत. जेव्हा ते शाळेत नसत तेव्हा ते दारूच्या गुत्त्यावर असत. शाळेत येणे आणि पीटीचा तास घेणे हि त्यांची हौस असावी.  पण बऱ्याचदा ते दारू पिऊन झिंगत पडलेले असत. त्यादिवशी कदाचित ते नशेतच असावेत त्यामुळे अतिशय अपमानास्पद पणे त्यांनी विद्यार्थ्यांची मागणी धुडकावून दिली.

हा अपमान जयेश तडस, श्रीकृष्ण तनपुरे, दिनेश गायकवाड, रावसाहेब कावरे आणि विजय अकोलकर ह्यांच्या जिव्हारी लागला. बरे हि मागणी तशी जुनीच होती. संस्थेच्या दुसऱ्या गावातील शाळेत सर्व मुलांना फुल पॅन्ट वापरण्याची मुभा मागच्या वर्षीच देण्यात आली होती. मग हीच मुभा आम्हाला का नाही हा प्रश्न तसा वाजवी होता.

सोनार सरांनी काहीही कारण न देता, काहीही समजावून न सांगता, चर्चेची भूमिका न घेता मागणी धुडकावून लावल्यामुले प्रत्येकाचा इगो दुखावल्या गेला. पुढचे दोन दिवस अतिशय तणावाचे होते. जयेश, दिनेश, श्रीकृष्ण, रावसाहेब आणि विजय हे माझे मित्र होते. त्यांनी हि मागणी अनौपचारिकपणे केली होती. आता ह्या लढ्याला   औपचारिक स्वरूप देणे गरजेचे आहे असे मी सुचवले. त्यामुळे हि मागणी मुख्याध्यापकांकडे  लेखी स्वरूपात करण्याचे ठरले. 

मागणीपत्रात इतरही विषय टाकावेत का, जसे, शाळा छडीविरहित करणे, गृहपाठ फक्त एकच दिवसाचा असावा, गणिताचा एक्सट्रा क्लास थांबवण्यात यावा, पीटी चा तास न घेता तो खेळण्याचा तास जाहीर करावा वगैरे वगैरे, ह्यावर बरीच चर्चा झाली. परंतु इतर मागण्यापुढे फुल पँटची मागणी मागे पडू शकते आणि वरील मागण्या कधीच मान्य होणार नाहीत, पालकांना हे समजले तर हे सर्व उलट अंगावर येऊ शकते अश्या नित्कर्ष्याप्रत सर्वजण आहेत. त्यामुळे सध्यातरी फक्त पँटची मागणी पुढे ठेवावी हे ठरले.   

लिखित स्वरूपात अर्ज लिहिण्यात आला, ही मागणी करण्याचे कारण लिहिण्यात आले. आठवी पासून ते दहावी पर्यंत सर्व वर्गातील मुलांच्या सह्या घेण्यात आल्या. सर्वानी वरील मुलांना प्रतिनिधी आणि शिष्टमंडळ म्हणून मान्यता दिली.

ठरलेल्या दिवशी, मधल्या सुट्टीत वरील शिष्टमंडळ मुख्याध्यापकाकडे भेटायला जायला तयार झाले.  ग्राऊंड वर जवळपास १५० विध्यार्थ्यांच्या गर्दीसमोर जयेश तडस ह्याने जोशपूर्ण भाषण केले. सर्व मुलांनी “ले लेंगे, ले लेंगे, फुल पॅन्ट लेकर रहेंगे” अश्या घोषणा देऊन शिष्टमंडळाला आपला पाठिंबा दर्शवला. ह्या घोषणा ऐकून मडघे, काकड आणि वर्हेकर सर, च. ह. रसे ह्या आमच्या मुख्याध्यापकासोबत बाहेर आले. त्यांच्यामागे रोटे आणि काकड मॅडम पण बाहेर आल्या. सोनार सर अर्थात दोन दिवसापासून गायब होते. काकड सरांनी येताना एक झुडुपाचा फोक तोडून सोबत आणला.

गुरुजन स्वतःच आपल्या बाहेर भेटायला येतात हे बघून मुलांमध्ये चलबिचल सुरु झाली. दहावीचे मुले हळूच मागे सटकली. सर्व जमाव पूर्ण ग्राउंड वर पांगला. शिष्टमंडळ एकटेच पडले. त्यात विजय अकोलकरने हळूच माघार घेतली. जयेश तडस च्या हातात मागणीचा कागद होता. काकड सरांचा रागीट चेहरा बघून रावसाहेब चाचपडला. आता फक्त जयेश, दिनेश आणि श्रीकृष्ण मागे उरले.

"काय गोंधळ आहे रे?" रसे सरांनी विचारले. 

"सर, आमची एक मागणी आहे?" जयेश घाबरत उत्तरला.

"क्या है रे मागणी तेरी?' वर्हेकर सर, हे सर आम्हाला हिंदी शिकवायचे. 

"आणि मागणी कोणाची आहे? तू आमची म्हणालास, आमची म्हणजे कोणाची? तुम्हा तिघांची? सर्व विद्यार्थ्यांची? की फक्त तुझी रे?" काकडे सर आपल्या नेहमीच्या खर्जातल्या आवाजात बोलले. "आणि घोषणा काय देताय. ले लेंगे, ले लेंगे म्हणून? काय ले लेंगे रे?" असे म्हणून काहीही ऐकून न घेता काकड सरांनी आणलेल्या फोकाने तिघांच्या पायावर फटके मारले. हे सुरु असताना इतर मुले डोळ्याच्या कोपऱ्यातून हा सर्व प्रकार बघत होती. 

"सर, ऐकून तर घ्या,"  

"ह सांग" रसे सर.

"सर हे आमचे लेखी निवेदन. ह्यावर सर्व मुलांच्या सह्या आहेत." जयेश ने रसे सरांकडे कागद सुपूर्द केला.  

रसे सरांनी निवेदन घेतले. आणि त्यांनी वाचायला सुरुवात केली. वाचल्यावर तो कागद, निवेदन रोटे मॅडमनी घेतला. वाचून त्या हसायला लागल्या.

"घ्या, ह्यांना आता फुलपॅण्ट वापरण्याचाही परवानगी हवीय." ते हसत बोलले. 

"काय रे चड्डी घालायची लाज वाटते का?" काकड सर. ह्यावर सर्व गुरुजन जोरजोरात हसले. 

"चला पळा. कश्याला बापांना खर्चात पाडता. काही परवानगी मिळणार नाही." रसे सर म्हणाले. रसे सर तसे चांगले होते, शांत होते, पण ते का रागावले काही कळले नाही. 

"आणि गोंधळ घातला तर सटकावून काढेल आता." सर्वाना ऐकू जाईल अश्या आवाजात काकड सर बोलले.   

हा सर्व प्रकार क्लास मधील मुली बघत होत्या आणि खिदळत होत्या. त्यामुळे सर्वाना अपमान जरा जास्तचं लागला.  

संध्याकाळी घरी जाताना सर्वांनी नदीकिनारी भेटायचे ठरले. नदीकिनारी मोठी सभा भरली. ७० मुले तरी होती. दहावीत असणाऱ्या मुलांनी ह्या सर्व प्रकाराला विरोध दर्शवला. 

"तुमचे आता फक्त ५-६ महिने राहिले. पण आम्हाला अजून पुढचे ३-४ वर्ष काढायचे आहेत." दिनेश बोलला. 

"काय एक वर्गात किती वर्ष राहायचे ठरवलेत." मागून कोणीतरी ओरडले. 

"ये गप, विषय काय आहे? आम्ही काय हे स्वतःसाठी करतोय का?" जयेश ने झापले. 

"हो, हे असे चालणार नाही. आताच ठरवा आपली एकजूट आहे की नाही." रावसाहेब म्हणाला. 

"हो, तूच आधी सटकला मघाशी." परत कोणीतरी पुटपुटले. 

"ज्यांना फुल पॅन्ट साठी लढाई सुरु ठेवायची त्यांनी हात वर करा." दिनेश 

ह्यावर दहावीचे विद्यार्थी सोडून सर्वांनी हात वर केला. दहावीत शिकणारे दिनेशचे मित्र पण सभा सोडून निघून गेले. 

"ठीक आहे, जे गेले ते कावळे आणि जे राहिले ते मावळे." रावसाहेब ओरडला. त्यावर सर्व मुलांनी टाळ्या वाजवल्या.

ले लेंगे, ले लेंगे, फुल पॅन्ट लेकर रहेंगे, ह्या घोषणेने नदीकाठ दणाणून निघाला. 

"आता पुढे काय करायचे?" एकाने विचारले.

"सर्वांत आधी सर्वांनी एकजुटीची शपथ घ्यावी. हो आणि पहिल्या बेंच बसणाऱ्या मुलांनी ती आधी घ्यावी. जयेश माझ्याकडे बघत बोलला. आठवी आणि नववी मधील आम्ही चारपाच हुशार आणि पहिल्या बेंचवर बसणारी मुले होतो. आम्ही उभे राहिलो आणि एकजुटीची शपथ घेतली. 

"आणि हो, त्यांनी काकड मॅडमला येथे काय ठरले हे काहीही झाले तरी काहीही सांगणार नाही अशीही शपथ घ्यावी." मागून श्रीकृष्ण तनपुरे बोलला. 

अश्याप्रकारे प्रत्येकाला एकजुटीची शपथ देण्यात आली. 

"हे सर्व, ठीक आहे, पण पुढे काय?" मी विचारले.

"सविनय कायदेभंग." कोणीतरी बोलले. 

"हो, सविनय कायदेभंग," सर्वजण जोरजोरात ओरडले. पण नेमके काय करायचे कोणालाच कळले नाही.

"उद्यापासून शर्ट इन करायची नाही." 

दुसऱ्या दिवशी खूप मुलांनी शर्ट इन केला नाही, काही मुलांनी तो क्लास मध्ये गेल्यावर केला आणि बाहेर येताना काढून टाकला. सोनार सर त्यादिवशी नेमके आले होते, प्रार्थनेच्या वेळी त्यांच्या शिट्टीच्या दोरीने 

विद्यार्थीच्या पायावर अमानुषपणे हल्ला केला. क्रांतीची ज्योत आता पूर्ण पेटली होती. काही जण डबल गेम करत होते. पण बहुतांश विध्यार्थ्यांना फुल पँटची परवानगी हवी होती. 

सविनय कायदेभंग चा दुसरा भाग पुढील आठवड्यात सुरु झाला. 

आता शर्ट इन सोबत टाय पण न घालायचे ठरले. आता मुले गबाळ दिसू लागली. शर्ट इन नाही, टाय नाही. हे पाहून पाचवी ते सातवीची मुलेही तसे वागू लागली. हे बंड पूर्ण शाळेत पसरते आहे ह्याची जाण आता गुरुजनांना येऊ लागली. सोनार सर आपल्याच विश्वात होते. ते जेव्हा येत. तेव्हा अमानुषपणे सपासप पायावर फोकाचें अथवा शिट्टीच्या दोरीचे वर करत. त्यात काकड सर पण आता आपली मारण्याची हौस भागवून घेऊ लागले. 

एक दिवशी प्रार्थनेच्या वेळी, रसे सरांनी प्रार्थना झाल्यावर भाषण केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी शिस्त पाळावी असे भावनिक आवाहन केले. आपले आई वडील आपल्याला शिकवण्यासाठी किती कष्ट करतात हे सांगून एक जुनी इमोशनल गोष्ट सांगितली. काही मुली ती गोष्ट ऐकून मुसमुसू लागल्या. काही मुलांना उगाचच गिल्टी वाटायला लागले.

काकड मॅडम ने मला बोलावून घेतले आणि ह्या मुलांच्या मागे लागू नको अशी तंबी दिली, अर्थात अतिशय प्रेमळपणे.  शाळेतील बातमी माझ्या घरी केव्हाच पोहोचली होती. सर्व क्लास मधील हुशार मुलांना बोलावून समज देण्यात आली, काहींना समजावून सांगण्यात आले. दहावीची मुले आता उघडपणे, चळवळीविरुध्द आवाज उठवू लागली. "आम्ही एवढी वर्ष काढली, काय बिघडले आमचे. आयुष्यभर फुल पँटच घालायची आहे वगैरे". असे बोलून खिल्ली उडवू लागली. मुली मुलांना बघून उगाचच फिदीफिदी हसू लागल्या. त्याचे हसणे जरा जास्तच वाढले. 

संध्याकाळी घरी गेल्यावर आई बाबानी माझी हजेरी घेतली. श्रीकृष्णाला त्याच्या वडिलांचे फटके खावे लागले. 

हे बंड संपवण्याचे सर्व प्रयत्न गुरूजनांकडून होऊ लागले. पालकांना निरोप गेले. शिष्टमंडळातील प्रतिनिधी आणि त्यांचे मित्र ह्यांच्यावर विशेष नजर होती. आता गुरुंजन आणि पालक एकत्र आले होते. 

पाचवी तो सातवी चे मुले आता टीपटाप गणवेश करून येऊ लागली. आम्हीही आता शर्ट इन आणि टाय घालून शाळेत येऊ लागलो होतो. काही दिवसानंतर शिष्टमंडळातील महत्वाचे प्रतिनिधी, जयेश आणि श्रीकृष्ण अगदी टिपटॉप, गणवेश करून आले. 

दुसऱ्या दिवशी शाळेत संपूर्णपणे शिस्त प्रस्थापित करण्यात रसे सर आणि इतर गुरुजनांना यश मिळाले. 

आणि विद्यार्थ्यांचे बंड दोन आठवड्यात थंड पडले. 

अजून पुढील दोन वर्ष तरी हाफ पॅन्ट मधेच काढावी लागणार होती.

विनोद बिडवाईक

(विनोद बिडवाईक ह्यांची सर्व पुस्तके फ्लिपकार्ट आणि बुकगंगा वर उपलब्ध आहेत.  इंग्रजी मध्ये लिहिली पुस्तके किंडल फॉरमॅट मध्ये ऍमेझॉन वर उपलब्ध आहेत.)