भारताच्या इतिहासात कित्येक क्रांत्या घडून गेल्या असतील; कित्येक बंड झाले असतील. त्यातील कित्येक बंड फसली असतील. परंतु एक असे बंड, एक क्रांती अशीही आहे जी इतिहासाच्या कोणत्याही रुपेरी पानावर लिहिल्या गेली नाही. त्याबद्दल फारसे बोलल्या गेले नाही. इतिहासाच्या पुस्तकांवरून नजर टाकली तर आपल्या लक्षात एक गोष्ट येईल ती म्हणजे भारतामध्ये झालेली सर्व क्रांत्या अथवा बंड इंग्रजांच्या अथवा देशाबाहेरील शत्रुंच्या विरोधात होते. परंतु हे बंड आपल्याच लोकांविरुद्ध करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली होती.
स्वकियांविरुद्ध लढण्याची हौस कोणालाच नसते. महाभारतात घडल्याप्रमाणे स्वकीयांविरुद्ध, आपल्या परिजनाविरुद्ध, गुरूजनांविरुद्ध लढण्याची वेळ त्या लहान विद्यार्थ्यांवर आली होती. हि अभूतपूर्व परिस्थिती बहुरडा नदीच्या दोन्ही काठावर वसलेल्या कविठा आणि घोडगाव या गावी निर्माण झाली होती. त्यासाठी जबाबदार होते शाळेतील गुरुजन.
आम्हा सर्व विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश घालावा लागत असे. खाकी हाप पॅन्ट, पांढरा शर्ट, त्यावर लाल टाय असा हा गणवेश सक्तीचा असे. शर्ट इन् करून टापटीप राहावे लागत असे. बुट आणि सॉक्स हे मात्र सक्तीचे नव्हते. आम्ही स्लीपर अथवा चप्पल घालूनच शाळेत जात असू. काही सधन मुले शुज घालून येत असत. दररोज हा गणवेश घालणे सक्तीचा असे, अर्थात शुक्रवारी आम्हाला आमच्या आवडीचे कपडे घालावयाचे स्वातंत्र्य होते. अर्थात या गणवेश याबद्दल तक्रार करण्याचे कोणतेही कारण नव्हते. दहावीपर्यंत हा गणवेश चालत असे. एकदा कपडे शिवले कि दोनतीन वर्ष हमखास चालत असत. प्रश्न मुळात गणवेशाचा नव्हताच. प्रश्न होता प्रतिष्ठेचा.
त्याचे झाले असे कि सातवीनंतर आठवीत गेल्यानंतर मुले थोडी थोराड दिसत असत, त्यामुळॆ आठवी ते दहावीच्या विध्यार्थ्यांना हाप पॅन्ट ऐवजी फुल पॅन्ट ची परवानगी द्यावी अशी मागणी काही विद्यार्थ्यांनी पीटीच्या सोनार सरांकडे केली. हिवाळा सुरु होणार होता आणि थंडीही खूप पडत असे. हेही एक कारण ह्या मागणीमागे होते.
हि मागणी उर्मटपणे धुडकावून देण्यात आली. सोनार सर हे आमचे पीटी चे सर होते. कधीकधी ते चित्रकलेचा क्लास घेत असत. जेव्हा ते शाळेत नसत तेव्हा ते दारूच्या गुत्त्यावर असत. शाळेत येणे आणि पीटीचा तास घेणे हि त्यांची हौस असावी. पण बऱ्याचदा ते दारू पिऊन झिंगत पडलेले असत. त्यादिवशी कदाचित ते नशेतच असावेत त्यामुळे अतिशय अपमानास्पद पणे त्यांनी विद्यार्थ्यांची मागणी धुडकावून दिली.
हा अपमान जयेश तडस, श्रीकृष्ण तनपुरे, दिनेश गायकवाड, रावसाहेब कावरे आणि विजय अकोलकर ह्यांच्या जिव्हारी लागला. बरे हि मागणी तशी जुनीच होती. संस्थेच्या दुसऱ्या गावातील शाळेत सर्व मुलांना फुल पॅन्ट वापरण्याची मुभा मागच्या वर्षीच देण्यात आली होती. मग हीच मुभा आम्हाला का नाही हा प्रश्न तसा वाजवी होता.
सोनार सरांनी काहीही कारण न देता, काहीही समजावून न सांगता, चर्चेची भूमिका न घेता मागणी धुडकावून लावल्यामुले प्रत्येकाचा इगो दुखावल्या गेला. पुढचे दोन दिवस अतिशय तणावाचे होते. जयेश, दिनेश, श्रीकृष्ण, रावसाहेब आणि विजय हे माझे मित्र होते. त्यांनी हि मागणी अनौपचारिकपणे केली होती. आता ह्या लढ्याला औपचारिक स्वरूप देणे गरजेचे आहे असे मी सुचवले. त्यामुळे हि मागणी मुख्याध्यापकांकडे लेखी स्वरूपात करण्याचे ठरले.
मागणीपत्रात इतरही विषय टाकावेत का, जसे, शाळा छडीविरहित करणे, गृहपाठ फक्त एकच दिवसाचा असावा, गणिताचा एक्सट्रा क्लास थांबवण्यात यावा, पीटी चा तास न घेता तो खेळण्याचा तास जाहीर करावा वगैरे वगैरे, ह्यावर बरीच चर्चा झाली. परंतु इतर मागण्यापुढे फुल पँटची मागणी मागे पडू शकते आणि वरील मागण्या कधीच मान्य होणार नाहीत, पालकांना हे समजले तर हे सर्व उलट अंगावर येऊ शकते अश्या नित्कर्ष्याप्रत सर्वजण आहेत. त्यामुळे सध्यातरी फक्त पँटची मागणी पुढे ठेवावी हे ठरले.
लिखित स्वरूपात अर्ज लिहिण्यात आला, ही मागणी करण्याचे कारण लिहिण्यात आले. आठवी पासून ते दहावी पर्यंत सर्व वर्गातील मुलांच्या सह्या घेण्यात आल्या. सर्वानी वरील मुलांना प्रतिनिधी आणि शिष्टमंडळ म्हणून मान्यता दिली.
ठरलेल्या दिवशी, मधल्या सुट्टीत वरील शिष्टमंडळ मुख्याध्यापकाकडे भेटायला जायला तयार झाले. ग्राऊंड वर जवळपास १५० विध्यार्थ्यांच्या गर्दीसमोर जयेश तडस ह्याने जोशपूर्ण भाषण केले. सर्व मुलांनी “ले लेंगे, ले लेंगे, फुल पॅन्ट लेकर रहेंगे” अश्या घोषणा देऊन शिष्टमंडळाला आपला पाठिंबा दर्शवला. ह्या घोषणा ऐकून मडघे, काकड आणि वर्हेकर सर, च. ह. रसे ह्या आमच्या मुख्याध्यापकासोबत बाहेर आले. त्यांच्यामागे रोटे आणि काकड मॅडम पण बाहेर आल्या. सोनार सर अर्थात दोन दिवसापासून गायब होते. काकड सरांनी येताना एक झुडुपाचा फोक तोडून सोबत आणला.
गुरुजन स्वतःच आपल्या बाहेर भेटायला येतात हे बघून मुलांमध्ये चलबिचल सुरु झाली. दहावीचे मुले हळूच मागे सटकली. सर्व जमाव पूर्ण ग्राउंड वर पांगला. शिष्टमंडळ एकटेच पडले. त्यात विजय अकोलकरने हळूच माघार घेतली. जयेश तडस च्या हातात मागणीचा कागद होता. काकड सरांचा रागीट चेहरा बघून रावसाहेब चाचपडला. आता फक्त जयेश, दिनेश आणि श्रीकृष्ण मागे उरले.
"काय गोंधळ आहे रे?" रसे सरांनी विचारले.
"सर, आमची एक मागणी आहे?" जयेश घाबरत उत्तरला.
"क्या है रे मागणी तेरी?' वर्हेकर सर, हे सर आम्हाला हिंदी शिकवायचे.
"आणि मागणी कोणाची आहे? तू आमची म्हणालास, आमची म्हणजे कोणाची? तुम्हा तिघांची? सर्व विद्यार्थ्यांची? की फक्त तुझी रे?" काकडे सर आपल्या नेहमीच्या खर्जातल्या आवाजात बोलले. "आणि घोषणा काय देताय. ले लेंगे, ले लेंगे म्हणून? काय ले लेंगे रे?" असे म्हणून काहीही ऐकून न घेता काकड सरांनी आणलेल्या फोकाने तिघांच्या पायावर फटके मारले. हे सुरु असताना इतर मुले डोळ्याच्या कोपऱ्यातून हा सर्व प्रकार बघत होती.
"सर, ऐकून तर घ्या,"
"ह सांग" रसे सर.
"सर हे आमचे लेखी निवेदन. ह्यावर सर्व मुलांच्या सह्या आहेत." जयेश ने रसे सरांकडे कागद सुपूर्द केला.
रसे सरांनी निवेदन घेतले. आणि त्यांनी वाचायला सुरुवात केली. वाचल्यावर तो कागद, निवेदन रोटे मॅडमनी घेतला. वाचून त्या हसायला लागल्या.
"घ्या, ह्यांना आता फुलपॅण्ट वापरण्याचाही परवानगी हवीय." ते हसत बोलले.
"काय रे चड्डी घालायची लाज वाटते का?" काकड सर. ह्यावर सर्व गुरुजन जोरजोरात हसले.
"चला पळा. कश्याला बापांना खर्चात पाडता. काही परवानगी मिळणार नाही." रसे सर म्हणाले. रसे सर तसे चांगले होते, शांत होते, पण ते का रागावले काही कळले नाही.
"आणि गोंधळ घातला तर सटकावून काढेल आता." सर्वाना ऐकू जाईल अश्या आवाजात काकड सर बोलले.
हा सर्व प्रकार क्लास मधील मुली बघत होत्या आणि खिदळत होत्या. त्यामुळे सर्वाना अपमान जरा जास्तचं लागला.
संध्याकाळी घरी जाताना सर्वांनी नदीकिनारी भेटायचे ठरले. नदीकिनारी मोठी सभा भरली. ७० मुले तरी होती. दहावीत असणाऱ्या मुलांनी ह्या सर्व प्रकाराला विरोध दर्शवला.
"तुमचे आता फक्त ५-६ महिने राहिले. पण आम्हाला अजून पुढचे ३-४ वर्ष काढायचे आहेत." दिनेश बोलला.
"काय एक वर्गात किती वर्ष राहायचे ठरवलेत." मागून कोणीतरी ओरडले.
"ये गप, विषय काय आहे? आम्ही काय हे स्वतःसाठी करतोय का?" जयेश ने झापले.
"हो, हे असे चालणार नाही. आताच ठरवा आपली एकजूट आहे की नाही." रावसाहेब म्हणाला.
"हो, तूच आधी सटकला मघाशी." परत कोणीतरी पुटपुटले.
"ज्यांना फुल पॅन्ट साठी लढाई सुरु ठेवायची त्यांनी हात वर करा." दिनेश
ह्यावर दहावीचे विद्यार्थी सोडून सर्वांनी हात वर केला. दहावीत शिकणारे दिनेशचे मित्र पण सभा सोडून निघून गेले.
"ठीक आहे, जे गेले ते कावळे आणि जे राहिले ते मावळे." रावसाहेब ओरडला. त्यावर सर्व मुलांनी टाळ्या वाजवल्या.
ले लेंगे, ले लेंगे, फुल पॅन्ट लेकर रहेंगे, ह्या घोषणेने नदीकाठ दणाणून निघाला.
"आता पुढे काय करायचे?" एकाने विचारले.
"सर्वांत आधी सर्वांनी एकजुटीची शपथ घ्यावी. हो आणि पहिल्या बेंच बसणाऱ्या मुलांनी ती आधी घ्यावी. जयेश माझ्याकडे बघत बोलला. आठवी आणि नववी मधील आम्ही चारपाच हुशार आणि पहिल्या बेंचवर बसणारी मुले होतो. आम्ही उभे राहिलो आणि एकजुटीची शपथ घेतली.
"आणि हो, त्यांनी काकड मॅडमला येथे काय ठरले हे काहीही झाले तरी काहीही सांगणार नाही अशीही शपथ घ्यावी." मागून श्रीकृष्ण तनपुरे बोलला.
अश्याप्रकारे प्रत्येकाला एकजुटीची शपथ देण्यात आली.
"हे सर्व, ठीक आहे, पण पुढे काय?" मी विचारले.
"सविनय कायदेभंग." कोणीतरी बोलले.
"हो, सविनय कायदेभंग," सर्वजण जोरजोरात ओरडले. पण नेमके काय करायचे कोणालाच कळले नाही.
"उद्यापासून शर्ट इन करायची नाही."
दुसऱ्या दिवशी खूप मुलांनी शर्ट इन केला नाही, काही मुलांनी तो क्लास मध्ये गेल्यावर केला आणि बाहेर येताना काढून टाकला. सोनार सर त्यादिवशी नेमके आले होते, प्रार्थनेच्या वेळी त्यांच्या शिट्टीच्या दोरीने
विद्यार्थीच्या पायावर अमानुषपणे हल्ला केला. क्रांतीची ज्योत आता पूर्ण पेटली होती. काही जण डबल गेम करत होते. पण बहुतांश विध्यार्थ्यांना फुल पँटची परवानगी हवी होती.
सविनय कायदेभंग चा दुसरा भाग पुढील आठवड्यात सुरु झाला.
आता शर्ट इन सोबत टाय पण न घालायचे ठरले. आता मुले गबाळ दिसू लागली. शर्ट इन नाही, टाय नाही. हे पाहून पाचवी ते सातवीची मुलेही तसे वागू लागली. हे बंड पूर्ण शाळेत पसरते आहे ह्याची जाण आता गुरुजनांना येऊ लागली. सोनार सर आपल्याच विश्वात होते. ते जेव्हा येत. तेव्हा अमानुषपणे सपासप पायावर फोकाचें अथवा शिट्टीच्या दोरीचे वर करत. त्यात काकड सर पण आता आपली मारण्याची हौस भागवून घेऊ लागले.
एक दिवशी प्रार्थनेच्या वेळी, रसे सरांनी प्रार्थना झाल्यावर भाषण केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी शिस्त पाळावी असे भावनिक आवाहन केले. आपले आई वडील आपल्याला शिकवण्यासाठी किती कष्ट करतात हे सांगून एक जुनी इमोशनल गोष्ट सांगितली. काही मुली ती गोष्ट ऐकून मुसमुसू लागल्या. काही मुलांना उगाचच गिल्टी वाटायला लागले.
काकड मॅडम ने मला बोलावून घेतले आणि ह्या मुलांच्या मागे लागू नको अशी तंबी दिली, अर्थात अतिशय प्रेमळपणे. शाळेतील बातमी माझ्या घरी केव्हाच पोहोचली होती. सर्व क्लास मधील हुशार मुलांना बोलावून समज देण्यात आली, काहींना समजावून सांगण्यात आले. दहावीची मुले आता उघडपणे, चळवळीविरुध्द आवाज उठवू लागली. "आम्ही एवढी वर्ष काढली, काय बिघडले आमचे. आयुष्यभर फुल पँटच घालायची आहे वगैरे". असे बोलून खिल्ली उडवू लागली. मुली मुलांना बघून उगाचच फिदीफिदी हसू लागल्या. त्याचे हसणे जरा जास्तच वाढले.
संध्याकाळी घरी गेल्यावर आई बाबानी माझी हजेरी घेतली. श्रीकृष्णाला त्याच्या वडिलांचे फटके खावे लागले.
हे बंड संपवण्याचे सर्व प्रयत्न गुरूजनांकडून होऊ लागले. पालकांना निरोप गेले. शिष्टमंडळातील प्रतिनिधी आणि त्यांचे मित्र ह्यांच्यावर विशेष नजर होती. आता गुरुंजन आणि पालक एकत्र आले होते.
पाचवी तो सातवी चे मुले आता टीपटाप गणवेश करून येऊ लागली. आम्हीही आता शर्ट इन आणि टाय घालून शाळेत येऊ लागलो होतो. काही दिवसानंतर शिष्टमंडळातील महत्वाचे प्रतिनिधी, जयेश आणि श्रीकृष्ण अगदी टिपटॉप, गणवेश करून आले.
दुसऱ्या दिवशी शाळेत संपूर्णपणे शिस्त प्रस्थापित करण्यात रसे सर आणि इतर गुरुजनांना यश मिळाले.
आणि विद्यार्थ्यांचे बंड दोन आठवड्यात थंड पडले.
अजून पुढील दोन वर्ष तरी हाफ पॅन्ट मधेच काढावी लागणार होती.
व्वा!.... उत्कृष्ट कथा
उत्तर द्याहटवा