कार्ल मार्क्स कधीतरी, "धर्म ही अफूची गोळी आहे!" असे सांगून गेला आणि आपल्या देशातील काही अतिहुशार लोकांनी, बाजारू विचारवंतांनी आणि त्याच्या काही जागतिक शिष्यांनी त्याचा वापर आपली सत्ता बळकट करण्यासाठी आणि बुद्धिभेद वाढवण्यासाठी केला. कार्ल मार्क्सची विचारसरणी ही तेव्हा धर्मसत्ता आणि राजसत्तेने भोळ्या आणि गरीब लोकांवर केलेल्या अन्यायाच्या संदर्भात होती. धर्मसत्तेने राजसत्तेवर ठेवलेला अंकुश तेव्हा राजकारणातील ढवळाढवळ ठरत होता तेव्हाची ही गोष्ट आहे. इंग्लड, युरोप मध्ये तेव्हा धर्मसत्तेने कहर माजविला होता. तिकडे अरब मध्ये तर धर्मसत्ताच राजकीय सत्ता झाली होती. भारतातही काही गोष्टींचा अतिरेक झाला होता.
धर्म नैतिक चौकट तयार करण्यात आणि दररोजच्या जीवनातील मूल्यांसाठी आवश्यक ठरते. काही गोष्टी कालबाह्य होतात, तेव्हा समाजातील विचारवंतांनी एकत्र येऊन त्या कालबाहय गोष्टीबद्दल विचारमंथन करून समाजजागृती करायला हवी. धार्मिक दृष्टीकोन एखाद्या व्यक्तीचे चरित्र निर्माण करण्यास मदत करतो. दुसर्या शब्दांत, धर्म समाजकारणाची संस्था म्हणून काम करते. अशा प्रकारे, प्रेम, सहानुभूती, आदर आणि सुसंवाद यासारख्या मूल्ये निर्माण करण्यास धर्म मदत करतो.
परंतु आजकाल हे तथाकधीत विचारवंत एखाद्या धर्मातील विशिष्ट प्रथांवर आघात करताना त्या धर्माला आरोपीच्या पिंजऱ्यात जमा करतात. हिंदू धर्म हा नेहमी प्रवाही राहिलेला आहे. इतर सर्व धर्मात कोणीतरी एक प्रेषित आहे. हिंदूंचा असा कोणताही प्रेषित नाही. जैन, बुद्ध, बसवराज इत्यादी प्रेषितांनी वेगळे धर्म प्रस्थापित केले असतील. परंतु त्यांच्या तत्वज्ञानाचा पाया हिंदू तत्वज्ञावरच आधारित आहे. ख्रिस्ती आणि इस्लाम धर्मांचे प्रेषित हे बंडखोर होते आणि त्यांनी तेव्हाच्या प्रचलित धर्माच्या वाईट प्रथेविरुद्ध आवाज उठवला. शेवटी प्रत्येक धर्माच्या पद्धती वेगळ्या असतील, मार्ग वेगळे असतील परंतु ध्येय एकच आहे. मनाची शांतता आणि मोक्ष हे दोन उद्देश प्रत्येक धर्माचा सार आहेत. अनिष्ट प्रथांच्या विरुद्ध जन्माला आलेले, प्रेषितांनी निर्माण केलेल्या धर्मांचा आणि धर्मग्रंथांतील अर्थांचा अनर्थ दुर्दैवाने त्यांच्या अनुयानांनी काढला आणि केवळ धर्मप्रसार एवढाच उद्देश ह्या धर्माचा राहिला. त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी त्यांनी ठेवली.
हिंदू धर्म मुळात धर्म नव्हे, तो एक जगण्याचा मार्ग आहे. हिंदू धर्माचा कोणी एक प्रेषित नाही. त्यामुळे ज्या काही चालीरीती धर्मात आहेत त्या लोकांच्या मनाप्रमाणे त्यावेळेस असणाऱ्या परिस्थितीनुसार आलेल्या आहेत. विशेष म्हणजे हिंदू धर्म लवचिक आहे, कारण काय करायचे आणि काय नाही ह्याचे स्वातंत्र ते प्रत्येकाला देते.
हिंदू धर्म मुळातच प्रवाही आहे, तो काळाप्रमाणे बदलत गेला आहे. अजूनही इंग्लडची राणी हि चर्चची प्रमुख आहे. जगातील बहुतांश देश हे धर्माधित आणि धर्माधीन आहेत. हिंदू धर्माने राजसत्ता होण्याचा कधी प्रयत्न केला नाही. जेवढे प्रबोधन हिंदू धर्मातील संतांनी केले तेवढे कोणीही केले नसेल. हिंदू धर्मातील चुकीच्या पद्धतीवर संतांनी आघात केले आणि लोकांनी ते मानले, अंगिकारले. बुवाबाजी, अंधश्रद्धा ह्या गरिबीमुळे आणि लोकांच्या असहायतेमुळे निर्माण होतात आणि काही धर्ममार्तंड त्याचा फायदा घेतात, परंतु केवळ मूठभर लोकांसाठी संपूर्ण धर्म वाईट आहे हे ठरवणे हा आताच्या विचारवंताचा आणि तथाकथित पुरोगामी मंडळींचा हलकटपणा आहे.
हिंदू धर्मात मूर्तिपूजा आहे, इतर धर्मात ती मानल्या जात नाही, मूर्ती एक प्रतीक आहे, भाव व्यक्त करण्याचे साधन आहे. प्रत्येक धर्माचे असे एक प्रतीक अथवा साधन आहे. क्रूस, चर्च, मस्जिद, अग्यारी वगैरे वगैरे हीही साधने नव्हेत का? मानलेल्या देवापर्यंत, जाण्याचे हे सर्व साधने आहेत, मार्ग आहेत, प्रतीके आहेत. फक्त त्या त्यांच्या कीती आहारी जायचे हे ज्याने त्याने ठरवायचे आहे.
हिंदू धर्म जगण्याचा मार्ग असल्यामुळे, सर्व प्रकारची जीवन कौशल्ये आपण जगत आलेलो आहोत.
हिंदू धर्म ही एक वैविध्यपूर्ण प्रणाली आहे ज्यामध्ये तत्वज्ञान आणि सामायिक संकल्पना, धार्मिक विधी, विश्वविद्या प्रणाली, तीर्थक्षेत्र आणि ज्ञान आहेत. धर्मशास्त्र, मेटाफिजिक्स, वेगवेगळे वेद, पौराणिक कथा, वैदिक यज्ञ, योग, गतिशील धार्मिक विधी आणि मंदिर बांधणी ह्यासारखे अनेक विषय हिंदू धर्मात आहेत. अगदी जगण्याच्या पद्धतीपासून तर वैद्यकीय पर्यंतचे शिक्षण वेगवेगळ्या ग्रंथात सांगितलेले आहे.
हिंदू श्रद्धास्थान असणाऱ्या विषयांमध्ये चार पुरुषार्थ, मानवी जीवनाचे ध्येय किंवा उद्दीष्टे यांचा समावेश आहे. खालील तत्वज्ञान बघा.
- नीतिशास्त्र आणि कर्तव्ये,
- अर्थ:समृद्धी आणि आर्थिक जबाबदाऱ्या
- काम: इच्छा आणि आकांक्षा
- मोक्ष: मृत्यू आणि पुनर्जन्म
हिंदु धर्मात प्रामाणिकपणा, अहिंसा, धैर्य, सहनशीलता, संयम, सद्गुण आणि करुणा यासारख्या इतर कर्तव्याचे वर्णन केले गेले आहे. मला वाटते वरील तत्वज्ञान हे प्रत्येक धर्मात समान असावे.
काही विधी आणि पद्धती ह्या मनाच्या समाधानासाठी आणि मनशांतीसाठी आवश्यक आहेत. हिंदू धर्म लोकांना गुन्हा आणि पाप करण्यापासून परावृत्त करते. प्रत्येक धर्म जगायला शिकवतो आणि अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग दाखवतो. फक्त तो समजून घ्यायला हवा.
त्यामुळे मी प्रत्येक धर्माचा आदर करतो परंतु हिंदू धर्माचा मला अभिमान आहे कारण माझ्यामते माझ्यासाठी हा धर्म नव्हे तर जगण्याचा एक मार्ग आहे. अध्यात्माचे देणे जगाला देण्याचे महान कार्य हिंदू संस्कृतीने केले आहे. माझ्या धर्मातील चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याचा आणि आजच्या काळात योग्य नसणाऱ्या गोष्टी त्यागण्याचा पूर्ण अधिकार मला हिंदू धर्म देतो.
धार्मिक असणे आणि धर्मांध असणे ह्यात फरक आहे. अध्यात्मिक उन्नती करण्यासाठी धर्मांध असण्याची गरज नाही. त्यामुळे धर्म, हिंदू संस्कृती तरी, ही अफूची गोळी नाही, तर आयुष्याला एक उद्देश देण्याचे साधन आहे.
(विनोद बिडवाईक ह्यांची सर्व पुस्तके फ्लिपकार्ट आणि बुकगंगा वर उपलब्ध आहेत. इंग्रजी मध्ये लिहिली पुस्तके किंडल फॉरमॅट मध्ये ऍमेझॉन वर उपलब्ध आहेत.)
खूप सुंदर विचार सर ..बरे वाटले
उत्तर द्याहटवाआपला नम्र पांडुरंग गांजवे