रविवार, १६ डिसेंबर, २०१८

मूल्ये ठरवितात ‘कल्चर’

‘कल्चर चेंज’ हा प्रत्येक संस्थेमध्ये परवलीचा शब्द झाला आहे. संस्थेची मूल्ये ही ‘कल्चर’वर प्रभाव टाकत असतात आणि ही मूल्ये कधी बदलतात, तर कधी नाही. स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी वेगवेगळ्या ‘ट्रिक्स’ कराव्या लागतात. नवीन संस्था काही वर्षांनंतर ‘कल्चर प्रॉब्लेम’मध्ये अडकू शकतात. बदलत्या काळाप्रमाणे स्पर्धा बदलत असते. आणि माणसाची वर्तणूकही.
Image result for organizational values & culture

काही संशोधकांनी माकडांवर एक प्रयोग केला. पाच-सहा माकडांचा एक समूह एका खोलीत ठेवला आणि खोलीच्या बाहेर जाण्यासाठी एक झरोका ठेवला. एका हुशार माकडाला तो झरोका दिसला आणि तो तिथंपर्यंत जायला तयार झाला. तो वर चढायला लागणार, तोच इतर माकडांवर थंड पाणी टाकण्यात येई. ते बघून ती इतर माकडे वर जाणार्‍या माकडाला खाली ओढत. संशोधकांनी नंतर एका माकडाला बाहेर काढलं आणि मग नवीन माकडाला आत सोडण्यात आलं. नव्या दमाच्या त्या माकडानं परत प्रयत्न केला. परत इतर माकडांनी त्याला खाली ओढलं. असं करत करत सर्व माकडे एका मागून एक बाहेर काढली गेली. आणि एक-एक नवीन माकडाने त्याची जागा घेतली. खोलीतल्या इतर माकडांनी नव्या माकडाला काही वर चढू दिले नाही. शेवटी त्या खोलीमध्ये सर्व नवीन माकडे होती, पण त्यांनाही त्यांच्या वागण्याचा मथितार्थ कळला नाही.

कोणत्याही संस्थेमध्ये असंच असतं. जुन्या मंडळींना नवीन मंडळींनी आपल्यासारखंच वागावं असं वाटतं. आणि नवीन मंडळी तशीच वागायला लागतात. कल्चर असं बनतं, तयार होतं. या जगात मुखवटेच खूप असतात. माणूस मुखवटे लावूनच जगत असतो. व्यक्तिमत्त्व तयार होतं, ते अशा अनेक मुखवट्यांचं. आणि असे अनेक मुखवटे एकत्र येऊन स्वतःचं एक वेगळं ‘कल्चर’ बनवत असतात. 

कल्चर म्हणजे नेमकं काय?

संस्थेमधील व्यक्ती ज्या गोष्टी करतो, वागतो त्या करण्याच्या आणि वागण्याच्या पद्धती म्हणजे कल्चर. समूहातील व्यक्तीच्या एकमेकांच्या वागण्याच्या, कामे करून घेण्याच्या, कामाच्या पद्धती आणि एकत्रितपणे जोपासलेली मूल्ये म्हणजे ‘कल्चर’. खूपदा या सर्व पद्धती अलिखित असतात. त्या कोणत्याही ‘सिस्टिम्स’ आणि ‘स्टँडर्ड ऑपरेटिंग’ प्रोसिजरमध्ये बांधता येत नाहीत.

खूपदा आपण प्रोफेशनलिझमबद्दल ऐकतो. हाही एक कल्चरचाच भाग असतो. ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व हे युनिक असतं, तसंच संस्थेचं कल्चरही युनिक असतं. हे सर्व आपसूकच घडत जातं. मूळात ‘प्रोफेशनिलझम’ची व्याख्या बर्‍याचदा व्यक्तिसापेक्ष असते. एखाद्याला दुसर्‍याचं वागणं ‘प्रोफशन’ल वाटत नाही. परंतु तो दुसर्‍यांशी वागताना अगदी विरुद्ध वागतो. मूळातचं कॉर्पोरेट कल्चर हे ‘डिफाईन’ करता येतं का, हा महत्त्वाचा प्रश्‍न प्रत्येकाला भेडसावतो. प्रत्येक संस्थेमध्ये काही वाक्ये नेहमी बोलली जातात. उदा : इथे ‘पॉलिटिक्स’ खूप आहे. ही संस्था खूप ‘अनप्रोफेशनल’ आहे. इथले लोक एकमेकांचे पाय ओढतात, वगैरे वगैरे. मूळातचं हे सर्व ‘परशेप्शन’वर अवलंबून असतं आणि हे ‘परशेप्शन’ कोणत्या तरी चांगल्या-वाईट अनुभवांवर आणि तेही प्रथमदर्शनी कोणत्यातरी चांगल्या-वाईट अनुभवांवर तयार झालेलं असतं. हे कदाचित चुकीचंही असू शकतं. अगदी अमेरिकेतील व्यक्तीचं वागणं भारतात चुकीचं वाटू शकतं. संस्थेतील कल्चरचंही तसंच आहे. यामध्ये व्यवस्थापन आणि कर्मचारी दोघांचाही सारखाचं वाटा असतो. जग हे कधीच ‘परफेक्ट’ असत नाही. त्यामुळे कल्चरची व्याख्या चांगलं कल्चर किंवा वाईट कल्चर अशी करता येत नाही. जी व्यक्ती या कल्चरमध्ये ‘फीट’ होते, ‘सूट’ होते ती त्या संस्थेमध्ये टिकते. आपला स्वभाव आणि आपली प्रवृत्ती कशी आहे, यावर हे अवलंबून आहे. 

कल्चर हे सर्वस्वी एकमेकांच्या ‘रोल मॉडेल’पासून तयार होतं. व्यवस्थापनाशी व्यक्ती कशा वागतात, यावरून कल्चर कसे आहे, हे समजू शकते. ‘बीपीओ’ आणि ‘आयटी’सारख्या संस्थातील कल्चर आणि एखाद्या ‘ट्रॅडिशनल’ संस्थेतील कल्चर हे संपूर्णपणे वेगळं असतं असे नव्हे. कदाचित एखादी ‘ट्रॅडिशनल’ कंपनी खूपदा ‘प्रोफेशनल’ही असू शकते आणि एखादी आयटी कंपनी पूर्णपणे ‘अनप्रोफेशनल’ही असू शकते. एकंदरीत सर्व गोष्टींचा विचार करता ‘कल्चर’ एकूण तीन प्रकारचं असू शकतं.

1) कन्स्ट्रक्टिव्ह (विधायक) कल्चर

अशा प्रकारच्या संस्थेतील कर्मचारी ‘क्रिएटिव्ह’, ‘इनोव्हेटिव्ह’ असतात. इथे कर्मचार्‍यांच्या समाधानाचे प्रयत्न होताना दिसतात. संस्थेची ध्येयधोरणे साध्य करण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्नशील असतो. त्यावर विचार करून काम केलं जातं. नवनवीन ‘इनेसिएटिव्ह’ घेतात. जर काही अडचणी आल्या, तर त्या योग्य ‘प्लॅटफॉर्म’वर सोडवल्या जातात. ‘कन्स्ट्रक्टिव्ह कल्चर’मध्ये गुणवत्ता आणि कल्पकतेला जास्त महत्त्व दिलं जातं. सहकार्‍यांवर व ‘टीमवर्क’वर याचा पाया असतो. स्पर्धा असते; पण जीवघेणी नसते. स्पर्धा ‘रिझल्ट’ मिळविण्यासाठी असते. ‘कन्स्ट्रक्टिव्ह कल्चर’मध्ये समाधान, टीमवर्क, सर्वोच्च क्वॉलिटी, कंपनीची प्रगती खूप प्रमाणात असते. अशा संस्थेमधील कर्मचार्‍यांच्या ‘डेव्हलपमेंट’वर तितकाच ‘फोकस’ असतो. अशा पद्धतीचं कल्चर प्रत्येकाला हवंहवंसं वाटतं. ‘पॉलिटिक्स’ येथेही असतं; पण ते ‘वाईट’ या व्याख्येत मोडणारं नसतं. ‘ऑर्गनायझेशनल पॉलिटिक्स’ हा तसा गोड शब्द आहे आणि तोही ‘कल्चर’चाच भाग आहे. ‘पॉलिटिक्स’ला मूळातच आपण वाईट कंगोरे दिलेले आहेत. ‘पॉलिटिक्स’ म्हणजे वाईटचं असतं, हा आपला समज असतो. दुसर्‍यांचं वाईट होत असेल, तर ते वाईट ‘पॉलिटिक्स’; पण बर्‍याचदा कर्मचार्‍यांना ‘डिप्लोमॅटिक’ राहावं लागतं. ‘हेल्दी पॉलिटिक्स’ हे कधी कधी ‘ऑर्गनायझेशन’ची गरज असते.

2) पॅसिव्ह-डिफेन्सिव्ह कल्चर

अशा संस्थेमध्ये रुल्स, प्रोसिजर, ऑडर्स अगदी काटेकोरपणे पाळल्या जातात. वरिष्ठांना खूष ठेवणे एवढाच उद्देश येथे असतो. नातेसंबंध बिघडू नयेत याची काळजी घेतली जाते. ‘इंटरपर्सनल कन्फ्लिक्टस्’ टाळल्या जातात. येथे मॅनेजर हा कर्मचारी कधी चुकतो हे बघत असतो. अशा प्रकारचे वातावरण सरकारी किंवा ‘प्रोटेक्टेड’ कंपनीमध्ये हमखास आढळते. पण स्पर्धेमध्ये अशा कंपन्यांना बदलावे लागणार आहे.

3) अ‍ॅग्रेसिव्ह-डिफेन्सिव्ह कल्चर

अशा संस्थेमध्ये नात्यापेक्षा ‘रिझल्ट’ला महत्त्व जास्त दिलं जातं. पॅसिव्ह-डिफेन्सिव्ह कल्चरमध्ये बर्‍याचदा व्यक्तिसापेक्षता येते. येथे ती येत नाही. येथे ‘करा अथवा जा’ हा एकच मंत्र असतो. स्वतःची ‘पोझिशन मेंटेन’ करणे, सांभाळणे हे येथे आवश्यक ठरते. गुणवत्ता कधीकधी दुय्यम ठरते. ‘शॉर्ट टर्म’चा विचार करण्यात येतो. बदल सहजासहजी स्वीकारला जात नाही. प्रत्येकाचा एक वेगवेगळा ग्रुप असतो. आणि वेळोवेळी तो संस्थेवर अधिराज्य गाजवत असतो.

अतिशय आक्रमकपणे यांची वाटचाल असते. वेगाने वाढणार्‍या आणि स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी आवश्यक असणार्‍या संस्थेमध्ये असं ‘कल्चर’ खूप असतं. अशा संस्थेमध्ये आक्रमकपणा आपोआप येतो आणि जी गोष्ट मार्केटमध्ये वापरली जाते, ती कर्मचार्‍यांसोबत वापरल्यामुळे या संस्था वेगाने मागे पडतात. अशा संस्थांमध्ये सर्व निर्णय वरिष्ठ पातळीवर होतात. इतरांनी ते फक्त ‘फॉलो’ करायचे असतात.

मग कोणतं ‘कॉर्पोरेट कल्चर’ चांगलं? कोणत्या संस्थेमध्ये नोकरी करणं चांगलं?

कन्स्ट्रक्टिव्ह - चांगलं?

अ‍ॅग्रेसिव्ह-डिफेन्सिव्ह : खराब? का

पॅसिव्ह-अ‍ॅग्रेसिव्ह : अतिशय वाईट?

हे सर्वस्वी त्या- त्या ‘ऑर्गनायझेशन’नं ठरवायचं आहे. संस्थेची ध्येयधोरणे साध्य करण्यासाठी कोणतं ‘कल्चरं’ मदत करणार आहे आणि सध्याचे कल्चर हे कितपत उपयोगी आहे, हे सर्वस्वी संस्थांनी ठरवायला हवं. म्हणून ‘कल्चर चेंज’ हा प्रत्येक संस्थेमध्ये परवलीचा शब्द झाला आहे. संस्थेची मूल्ये ही ‘कल्चर’वर प्रभाव टाकत असतात आणि ही मूल्ये कधी बदलतात, तर कधी नाही.

स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी वेगवेगळ्या ‘ट्रिक्स’ कराव्या लागतात. नवीन संस्था काही वर्षांनंतर ‘कल्चर प्रॉब्लेम’मध्ये अडकू शकतात. बदलत्या काळाप्रमाणे स्पर्धा बदलत असते आणि माणसाची वर्तणूकही. म्हणूनच अगदी ‘कल्चर’ही बदलतं. तुम्हाला कोणत्या ‘कल्चर’मध्ये नोकरी करायला आवडेल?

विनोद बिडवाईक

शनिवार, १५ डिसेंबर, २०१८

ऋणानुबंध

"ऋणानुबंध"  शहरातल्या मध्यवस्तीतील एक अपार्टमेंट. अपार्टमेंटचं नाव "ऋणानुबंध " असलं तरी फ्लॅटचं दार लावल्यानंतर शेजारचा संबंध संपला. दर महिन्याला मीटिंगच्या निमित्ताने एकत्र येत असतील तेव्हाच काय ते या अपार्टमेंटमधील व्यक्ती एकत्र येत. आणि त्याही मोजक्याच. एका फ्लॅटमधील घडामोडी दुसर्‍या फ्लॅटमध्ये कळू नये यासाठी सर्वांचा आटापिटा. प्रायव्हसी डिस्टर्ब होऊ नये म्हणून काळजी घेणार्‍या या अपार्टमेंटमध्ये एकमेकांचे नावच काय ते माहीत होतं. बाकी इथं प्रत्येकाचं आयुष्य आपलं असं स्वतःचं विश्‍व होतं. आणि त्यात कोणी ढवळाढवळ करू नये अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. तसं साहजिकच आणि स्वाभाविकच.

परंतु या अपार्टमेंटमध्ये एक अशी व्यक्ती होती जी व्यक्ती प्रत्येक फ्लॅटला परिचित होती. या व्यक्तीशिवाय कोणत्याही फ्लॅटमधील व्यक्तीचं पानही हलू शकत नव्हतं. ती व्यक्ती म्हणजे काका, ‘ऋणानुबंध’चा चौकीदार.

Online, Art, Art Gallery, Online Art Gallery, Sri Lanka, Karunagama, Watercolor, Water Colour, Old People, Old People Paintings, Watercolor Portraits, Portrait Paintings, Sri lanka paintings,

आणि म्हणूनच सकाळी पाचला उठून अंघोळ करणार्‍या मिस्टर शर्माच्या नळाला पाणी आलं नाही, तेव्हा काकांच्या नावाचा घोष करत शर्मा टॉवेलवरच बाहेर पडले. ‘काका मोटर शुरू करो. आज इतने देर हो गई ऑफिस जाना है,’ वगैरे वगैरे. त्यांच्या आवाजाने अपार्टमेंटमधील अनेक जणांना जाग आली. काहींनी तोंड वेंगाडत कूस बदलली. तर मिसेस पटवर्धन समोरून येणार्‍या मिसेस देसाईंकडे पाहून समजायच्या ते समजल्या.

मिसेस पटवर्धन, देसाई आणि शर्मा ओरडतच खाली आल्या. त्यांनी आत डोकावून पाहिलं, तर काका झोपलेले होते. सर्वांना आश्‍चर्य वाटलं. नाईट शिफ्टवरून येणारे अय्यंगार यांनी तेथे तोंड खूपसलं. तेवढ्यात घोष आपल्या कन्येसोबत तेथे आले. त्यांना पिकनिकला जायचं होतं आणि तयारीसाठी त्यांना भाजी आणायची होती.

काका शांत झोपले होते. सकाळी साडेचारलाच उठणारे काका सात वाजले तरी झोपलेलेच होते. हे बघून अय्यंगार आत गेले. त्यांनी काकांना हलवलं आणि ‘अय्यो रामा’ म्हणत त्यांनी हात झाडला. परत काकांच्या कपाळावर हात ठेवत ते पुटपुटले. ‘काका को तो तगडा बुखार है.’ एक-एक करत पटवर्धन, देसाई यांनी हात लावून बघितला. तोपर्यंत काकांना जाग आली होती. कण्हत ते उठायला लागले. तोच देशपांडेंच्या साठ वर्षांच्या आई आल्या. त्यांनी काकांना उठू नका, असं बजावलं. हळूहळू काका आजारी पडलेत ही खबर संपूर्ण ‘ऋणानुबंध ’ अपार्टमेंटमध्ये पसरली. पुरुष मंडळींपैकी काकांना दवाखान्यात कोणी न्यावं याची चर्चा सुरू झाली. मिस्टर शर्मांनी स्कूटर बाहेर काढली. परंतु पटवर्धन यांनी आपली कार बाहेर काढली आणि काकांना हवा लागू नये म्हणून कारनेच नेणं कसं योग्य आहे हे त्यांनी समजावून सांगितलं. शर्मांना थोडं वाईट झालं. पुढच्या वर्षी कार घ्यायचीच असं त्यांनी मनात ठरवलं आणि ब्लॉककडे गेले.
कोणीतरी मोटर सुरू केली. काकांची जी कामे होती ती प्रत्येकाने आटोपून घेतली.

पटवर्धन आणि घोष यांनी काकांना दवाखान्यात नेलं. औषध-पाणी वगैरे करून घेऊनही आले. काकांचा स्वभाव बसणार्‍यांपैकी नव्हता. हे सर्वांना माहीत होतं. त्यामुळे पूर्णपणे विश्रांती घ्यायची, असं बजावून सर्वजण आपापल्या कामाला लागले.

दुपारी बारा-एकच्या दरम्यान मिसेस देसाई खाली आल्या. त्यांच्या लक्षात आलं काकांना भूक लागली असेल. त्यांनी काकांसाठी लापशी करून आणली. थोड्या वेळाने मिसेस शर्माही येऊन गेल्या.

‘काका आता आराम करा पाच-सहा दिवस,’ मिसेस पटवर्धन.

‘काका इथे कसा आराम मिळेल तुम्हाला, गावाला जावून येता का? राजूला तुम्हाला सोडवायला सांगते,’ मिसेस देशपांडेंच्या या सूचनेवर सर्वांनी सहमती दर्शवली. यावर काका विषण्णतेने हसले.

‘नाही बेटा, तेथे जाऊन काय आराम होणार? येथेच बरा आहे,’ असं म्हणतं काकांनी तोंड फिरवलं. 

मिसेस शर्मांनी ‘आता ताप उतरला का?’ असं म्हणत त्यांचं कपाळ चाचपलं. ‘उतरला आहे,’ म्हणतं त्या निघून गेल्या. हळूहळू ‘ऋणानुबंध ’ अपार्टमेंटमधल्या सर्व महिलांनी येऊन काकांची आपुलकीने विचारपूस केली. काकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. 

त्यांना मागचं आठवलं तेव्हा ते गावी होते. तेव्हा शेती करून कसंबसं पोट भरायचे. मुलं मोठी झाली. शिकली-सवरली. पण आई-बापाकडं लक्ष द्यायला त्यांना वेळ नव्हता. लग्न झाल्यावर नोकरीच्या निमित्ताने दूर उडून गेली. काही दिवसांत बायकोचं निधन झालं. गावाकडं मन रमलं नाही. म्हणून मुलाकडं गेले. तिथं सुनेशी पटलं नाही. त्यामुळे त्यांनी एकटंच राहणं पसंत केलं. मुलं पैसे पाठवायची; पण नंतर नंतर तेही बंद झालं. काकांच्या नशिबी परत मजुरी आली. त्यांनी गाव सोडलं. काम मागत मागत एका बिल्डरकडे आले. बिल्डरने वॉचमन म्हणून त्यांना ठेवून घेतलं. ‘ऋणानुबंध ’ अपार्टमेंटच्या जन्मापासूनचे ते साक्षीदार राहिले. अपार्टमेंट गजबजली तेव्हा बिल्डरसोबत न जाता अपार्टमेंटला वॉचमन म्हणूनच राहायचं त्यांनी ठरवलं.

आणि आता ‘ऋणानुबंध’ अपार्टमेंटशी त्यांचे ऋणानुबंध पुरते जुळले होते. या फ्लॅटसंस्कृतीशी त्यांना काहीही घेणं नव्हतं. परंतु त्यांच्याशिवाय प्रत्येक फ्लॅट हा पोरका होता. लहान मुलांना खेळवून, बारीक सारीक कामं करून ते मनाला रिझवत होते. या फ्लॅटच्या संस्कृतीत कोणाचाच कोणावर विश्‍वास नसतो; पण काकांवर प्रत्येकाचा विश्‍वास होता.

रात्री सहज शर्मांनी हाक मारली. ‘काका कैसे हो?’ त्यांना प्रत्युत्तर मिळालं नाही. पण कण्हण्याचा आवाज आला. त्यांनी काकांच्या खोलीत डोकावून पाहिलं. हाताने चाचपत दिवा लावला. काकांचा ताप वाढला होता. त्यांनी देसाई, पटवर्धन, बंगारप्पा, घोष यांना हाका मारल्या. काकांचा ताप वाढला, हे पाहून त्यांनी डॉक्टरांना फोन केला. डॉक्टरांनी येऊन इंजेक्शन, औषधे देऊन गेले.

या परिस्थितीत काकांना एकटं सोडू नये, या मताचे होते देशपांडे. पण काकांना आपल्या फ्लॅटमध्ये न्यायला खूप जणांच्या चेहर्‍यावर नाखुषी जाणवली. त्यात ती जबाबदारी देशपांडेंनी उचलली. काकांना देसाईंच्या फ्लॅटवर हलविण्यात आले.

रात्र वाढत होती. मिसेस देसाईंनी पाण्याच्या पट्ट्या करून काकांच्या कपाळावर ठेवल्या. तिकडे अय्यंगारही आले. मिसेस पटवर्धन गरम पाण्याची बॅग शेकण्यासाठी घेऊन आल्या. आणि देशपांडेंनी राजूला सफरचंद आणायला पिटाळलं.

मध्यरात्रीनंतर काकांचा ताप उतरला. हळूहळू सर्वजण पांगले. 

दोन-तीन दिवसांत काकांची तब्येत सुधारली. काही दिवसांतच ते ठणठणीत बरे झाले. सर्वांनी आपल्यासाठी केलेले कष्ट बघून त्यांचे डोळे पाणावले.

एका अनोळखी व्यक्तीशी काहीही संबंध नाही. अशा व्यक्तीचे संबंध जुळतात. रक्ताच्या नात्यापेक्षा हीच नाती कशी खरी याची ‘ऋणानुबंध’ देतात. हळूवार भावना असतात त्या.

काकांच्या आजारानंतर मात्र प्रत्येकजण या घटनेवर विचार करू लागला. काकांचे आपण एवढं केलं. त्यामागचं कारण काय? हा प्रश्‍न त्यांना भेडसावू लागला. पण या प्रश्‍नातच त्यांचं उत्तरही लपलेलं होतं. ‘ऋणानुबंध ’ अपार्टमेंट आता खर्‍या अर्थाने ‘ऋणानुबंध’ जाणवत होता .

विनोद बिडवाईक

लॉटरी

Image result for indian village people sketchगणप्याला लॉटरी लागली ही बातमी संपूर्ण पंचक्रोशीत पसरली. हजाराची नव्हे, तर तब्बल दहा लाखांची लॉटरी गणप्याला लागली. ही बातमी गावात पसरायला तसा फारसा वेळही लागला नाही. गणप्या हा एक न्हावी. छोटीशी शेतीही होती त्याच्याकडे; पण नेहमीचा धंदा होता हजामतीचाच. त्यामुळे गणप्या एकदम दहा लाख रुपयांचा मालक होणार, हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला. त्यात गणप्याकडून पैसा कसा उकळावा या कामगिरीवर सर्वजण लागले. एखाद्या व्यक्तीकडे आलेला पैसाच शेवटी त्या माणसाची किंमत वाढवतो. गणप्याचंही तसंच झालं. त्याची किंमतही एकदम दहा लाख पटीने वाढली. गणप्याचा गणपतराव झाला. थोरामोठ्यांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला. त्याला मिळणारा सन्मान बघून त्याच्या बायकोला आणि मुलांनाही सर्वात जास्त आनंद झाला. कारण गणप्याची बायको म्हणून पुकारली जाणारी आता वहिनी म्हणून पुकारली जाऊ लागली आणि ‘शेंबड्या’ म्हणून हिणवून त्याच्या पोरांना हकलून देणारे आता गणप्याच्या पोरांना कडेवर घेऊन त्यांना खाऊ देऊ लागली. त्यातही या गोष्टीचं सर्वात आश्‍चर्य वाटत होतं ते स्वतः गणप्यालाच. कारण गावात कोणत्याही व्यक्तीशी स्वतः चांगलं बोलल्यावरही चेष्टा आणि अपमानच वाटेला यायचा; त्या जागी आता भरमसाठ सन्मान मिळू लागला. गणप्या गावातून चालायला लागल्यावर त्याच्यावर नमस्कार-चमत्काराचा वर्षाव होऊन लागला. पायरीवर उभी न करणारे माणसे त्याला चहासाठी तासन्तास बसवून घेऊ लागले. लॉटरी लागल्याची बातमी पसरल्यापासून गणप्याचा ‘गणपतराव’ होणे हे गणप्यालाही एक न समणजारं; पण उघड असणारं एक कोडं होतं.

सकाळी उठल्यानंतर नेहमीप्रमाणे प्रात:विधीस जात असताना सरपंचांचा घरगडी मोतीराम पळत पळत आला. ‘साहेबांचा बुलावा आला आहे,’ असा महत्त्वाचा निरोप दिला. अंघोळ वगैरे करून गणप्या धोपटी, वस्तारा वगैरे सगळं सामान घेऊन सरपंचाकडे निघाला. त्याला वाटलं सरपंचांना तालुक्याला मिटिंगला जायचं असणार म्हणून एवढा तातडीचा बुलावा आला.

आलिशान बैठकीत बसून सरपंच गणप्याची वाट बघत होते. गणप्या लांबून येताना दिसताच सरपंच लगबगीने उभे राहिले. गणप्याला सामोरे गेले. इकडे गणप्या पुरता चकीत झालेला. सरपंचांनी त्याला चक्क अलिंगन दिले. त्याला अवघडल्यासारखं झालं. सरपंचाच्या बलदंड शरीरातून सुटण्याची धडपड करीत असतानाच गणप्याला अफजलखान -शिवाजी महाराजांची, त्याच्या पाचवीत जाणार्‍या पोराने सांगितलेली कथा आठवली. तस तो ‘शिवाजी महाराज की जय!’ असं ओरडत बाहेर पडण्याची धडपड करू लागला. पण सरंपचांच्या पकडीमुळे त्याच्या तोंडातून ते उद्गार उंदराच्या चीचीसारखे वाटले. एका हातात धोपटी आणि दुसरा हात हलवता येईना शेवटी सरपंचानी सोडल्यावर त्याची सुटका झाली.

‘शिवाजी महाराज की जय’ काय त्यांच्या कृपेनेच आम्ही सरपंच झालो,’ बसाबसा गणपतराव.

गणप्याने धोपटी खाली ठेवली आणि हातरी पसरू लागला ते बघून सरपंच बोलले. ‘गणपतराव आम्ही तुम्हाला याच्यासाठी नाही बोलावलं. अहो, तुमच्याकडून हजामत करून घ्यायला आम्ही येडं का खुळं,’ असं म्हणत त्यांनी त्याला सोफ्यावर बसवलं. गणप्याच्या लक्षात येईना. आपल्याबद्द्ल सरपंचांचा काही गैरसमज तर नाही ना झाला, अशी शंकाही त्याच्या मनात चमकून गेली.

‘गणपतराव तु्म्हाला भेटून आम्ही अतिशय आनंदित झालो.’ काही महिन्यांपूर्वी गावातील मुतारीच्या उद्घाटनासाठी गृहनिर्माणमंत्री आले होते. तेव्हा शहरामध्ये कॉलेजाला जाणार्‍या गावातल्या सुधीरनं पढवलेलं वाक्यच सरपंचांनी गणप्यावर फेकलं.

‘मी पण,’ असं काहीतरी गणप्या पुटपुटला.

तेवढ्यात सरपंचांची कन्या फराळाचं ताट घेऊन आली. आयुष्यात कधीही न बघितलेले काजू, बदाम, निरनिराळी फळ-फळावळे आणि त्यावर चटपटीत पोहे. सरपंचांनी आयुष्यात गणप्याला साधा चहाही पाजला नव्हता. गणप्याने फराळावर यथेच्छ ताव मारला.

‘मग गणपतराव काय करणार पैशाचं?’  सरपंचांनी हळूच विषय काढला.

‘काय करणार बघाव लागेल. पुढच्या महिन्यात बायकोचं बाळंतपण. पावसाळा सुरू होतोय, घराची डागडुजी करावी लागेल. माझ्यासमोर तर चिंताच आहे,’ गणप्या आशाळभूतपणे सरपंचांकडे बघत उत्तरला.

‘अरे चिंता कसली, मी कशाला हाय? जनतेची सेवा करण्यासाठीच तर मी सरपंच झालो व्हयकी.’ सरपंचांनी गणप्याच्या पाठीवर जोरात थाप मारली.

‘बरं तिकीट कुठाय?’ सरपंचांनी हळूच विचारलं.

‘तिकीट? ...हा ते व्हय, हाय पैजाम्याच्या खिशात,’ गणप्या बोलला.

‘सांभाळून ठेव, ममईला जावं लागंल. मी ईन सोबत,’ सरपंचांनं गणप्याला सांगितलं.

गणप्या अजूनच गोंधळून गेला. सरपंचांनी तिकीट कशाला सांभाळून ठेवायला सांगितलं, याचा विचार करून त्याच्या डोक्याचा पार फालुदा होऊन गेला. एसटीचं तिकीट आणि तेही कालचं. हं बरोबर आहे. सरपंच मुंबईला जाण्याबद्दलही बोलत होते. म्हणजे काही सवलत-बिवलतीचं प्रकरण असणारं. प्रकरणांमध्ये सरपंच आहेत. सरकारी माहिती झाली असेन, असा विचार करून त्याने तो विचार सोडून दिला.

गणप्याने स्वतःच्या घराकडे प्रयाण केलं. तोच पारसमल सामोरे आले. गावातला एक नंबरचा चिक्कू माणूस. ‘या-या गणपतराव,’ म्हणत गणपतच्या घरातच गणप्याचं स्वागत केलं.

गणप्या बेशुद्ध पडायचाच काय तो बाकी होता. पारसमल आणि चक्क आपल्या घरी? काही महत्त्वाचं काम असणार असं समजून तो खाली ओटीवर बसला.

‘अगं शेठसाठी चा-बी टाक,’ त्यानं बायकोला ऑर्डर सोडली.

‘गणपतराव, म्हटलं चला तुमची थोडी विचारपूस करून येऊ. आताच आलो. वहिनी म्हणाल्या. तुम्ही संरपंचांकडे गेलात. गणप्याला धक्क्यावर धक्के जाणवत होते. गणपतराव काय आणि आता वहिनी प्रकरण काय? त्याची बायकोही खुश झाली. त्या खुशीत तिने चहात दोन चमचे साखर जास्तच टाकली.

‘तिकीट व्यवस्थित आहे ना गणपतराव?’ पारसमलने हळूच विचारलं.

‘हो व्यवस्थित आहे; पण शेठ तुम्ही हे का विचारताय?’ गणप्या थोडा वैतागलाच होता.

‘नाही तुम्ही सरपंचाकडे गेला होता ना म्हणून विचारलं.’

‘व्हय, गेलतो. तेबी तिकिटाबद्दल इचारत व्हते.’

‘मग दिलं नाही ना त्यांना?’

‘न्हाय.’

‘गणपतराव सरपंच महाचालू माणूस आहे. तिकीट घेऊन मुंबईला त्याच्यासोबत जाऊ नका. मी येईन सोबत.’

गणप्याला हे तिकीट प्रकरण काय आहे, ते कळंना. तो दहा-बारा दिवसांपूर्वी शहरात गेलो होता. तेव्हा सिनेमा बघितला होता आणि एक एसटीचं तिकीट होतं. आता या दोन तिकिटांपैकी कोणत्यातरी एका तिकिटाबद्दल या लोकांना एवढी काय चिंता पडली हे त्याला कळंना. 
गणप्याकडे दिवसभर माणसांचा राबता चालू होता. त्याचं तोंडही न बघणार्‍या व्यक्ती त्याच्याकडे येऊन गेल्या. तेव्हा तर गणप्याच्या बायकोला गणप्या खरंच मोठा माणूस झाला आहे, असं वाटू लागलं. ती नदीवर धुणं धुवायला गेली तेव्हा वाड्यातून आलेल्या बायका झेडपीच्या इलेक्शनबद्दल बोलत होत्या. आपला नवराही गणेशोत्सवात काम करतो, हे ती जाणून होती. त्यामुळे झेडपीचं इलेक्शन आलेत, तिकीट मिळालं असेल असेही तिला वाटून गेलं. अशा व्यक्तीची आपण बायको आहोत, हे उमजून तर तिला अतिशय अभिमान वाटला. आपण उगाचच त्यांना शिव्या घालतो, या विचाराने ती शरमली. आता यापुढे अशा मोठ्या महान नवर्‍याची सेवा करायची असंही तिने ठरवून टाकलं.

इकडे गणप्याचा संयम सुटला. त्याने पैजाम्याच्या खिशातलं बसचं आणि सिनेमाचं तिकीट घेतलं आणि शहरात शिकायला जाणार्‍या सुधीरला गुपचूप पकडलं. सर्व हकीकत त्याला सांगितली. गणप्याला लॉटरी लागली, ही बातमी सुधीरलाही कळली होती. सगळं एकेून घेतल्यावर त्याने विचारलं, ‘म्हणजे तू लॉटरीचं तिकीट घेतलंच नव्हतं?’

‘नाय. लॉटरी कशी खेळाची तेपण मला म्हाइत नाय. आमचा बाप म्हणायचा, लॉटरी खेळणं लय खराब.’ गणप्याने तोंडावर हात मारून सांगितलं. आपल्याला एवढा मानमराताब का मिळत होता हे शेवटी गणप्याला कळलं.

गणप्याला लॉटरी लागली, ही अफवा कोणी आणि का पसरवली हे मात्र गुपितच राहिलं. शेवटी गणप्याला लॉटरी लागलीच नाही ही बातमीही दुप्पट वेगाने गावात पसरली. पण आता या बातमीवर विश्‍वास ठेवायला कोणीही तयार नव्हतं. गणप्या महाचालू माणूस आहे आणि हे पैसे मदत म्हणून आपल्याला देता येऊ नये म्हणून त्याने ही बातमी मुद्दाम पसरवली, असा समज प्रत्येकाचाच झाला.

पण तरीही सर्व जण गणप्याला मान देतात. त्यांची खात्री आहे, गणप्याला लॉटरीचे पैसे मिळाल्यावर त्याला बोलण्यात गुंडाळून, त्याच्याकडून पैसै उकळता येतील याची.

विनोद बिडवाईक

मंगळवार, ११ डिसेंबर, २०१८

एका साप्ताहिकाचा मृत्यू

मी, माझे तीन मित्र, माझा मोठा भाऊ आणि त्याच्या वयाचा त्याचा एक मित्र. त्यात माझे दोन मित्र एका गावातल्या एका वृत्तपत्रात नोकरी करतात. त्यांचा संपादक किती "डॅम्बीसआहे आणि मालक कसा  "चोर आहे याबाबत त्यांचं एकमत आहे. तिथली वृत्तपत्र ‘XXX प्लस’ या गटात मोडतात. याबाबत त्यांना आणि माझ्या भावाच्या मित्रालाही शंका नाही. मी मात्र वृत्तपत्र राष्ट्रीय स्तरावरच्या मासिकातून मजकूर कॉपी करून लिहितात म्हणून नाराज आहे. भावाचा मित्र अधूनमधून ‘पत्रकारही अतिशय नतद्रष्ट आणि आतल्या गाठीची जमात असते,’ हे त्याच्या एका दूरवरच्या काकांचं वाक्य वारंवार ऐकवतो.

‘राजकारणी नसते, तर पत्रकार उपाशी मेले असते,’ असं एकजण वारंवार सांगतो; पण तो रसायनशास्त्राचा पदवीधर आहे. तसाच तो एका वृत्तपत्रात वितरण विभागात सहव्यवस्थापकही आहे. सकाळी साडेचार वाजता उठून बाहेरगावी जाणारे पेपरचे गठ्ठे मोजावे लागतात म्हणून अख्खे जग त्याच्या वाईटावर टपलं आहे, असं त्याला वाटतं. भावाचा मित्र कॉमर्सचा पोस्ट ग्रॅज्युएट आहे. ‘तसल्या’ एका छायाचित्र मासिकाच्या विभागातील प्रमुखाच्या तृतीय सहाय्यकाची नोकरी त्याला चालून आली होती. पण बापानं आपल्या पोरगा कुठल्या मासिकात, काय करणार आहे म्हणून ‘ते’ मासिक चार ठिकाणी चौकशी करून आणलं, चाळलं आणि त्या मासिकाच्या कार्यालयाच्या आसपासही फिरकायचं नाही, असा दम देऊन टाकला. ‘प्रगतीचे खरे शत्रू आपले पालकच असतात,’ असं सुभाषित माझा मित्र प्रत्येक चर्चेत तेव्हापासून ऐकवतो. माझ्या मित्रांपैकी एक बारावी पास आहे. घरी 14 म्हशी आहेत. त्यांच्याकडे लक्ष देणारं कोणीच नव्हतं म्हणून शिक्षण सोडलं, असं त्याचं म्हणणं आहे. पण आपल्यात खूप संपादकीय क्षमता आहे, असं त्याला वाटतं.

ही सर्व मंडळी नेहमीच्या हॉटेलमधल्या कोपर्‍यात टेबल अडवून माझ्यासोबत चर्चा करत होती.
विषय होता एक नवीन साप्ताहिक काढायचा. ‘साप्ताहिकाला नाव काय द्यायचं?’ आम्ही साप्ताहिक काढणार, असं निश्‍चित समजून माझ्या मित्राने सरळ मुद्द्याला हात घातला.
"पुणे पोस्ट’
"पुणे हेराल्ड’
"पुणे एक्स्प्रेस’
‘द  पुणे  गार्डियन’
‘वगैरे वगैरे...’

बिळातून उंदीर बाहेर पडावे अशी एकेकाच्या तोंडून प्रस्तावित नावे बाहेर पडू लागली. ‘नावाचं नंतर ठरवू. आपण प्रथम साप्ताहिकाच्या अर्थव्यवस्थेवर चर्चा करू. मी सोडून तुम्हाला सगळ्यांना वृत्तपत्रात काम करण्याचा अनुभव आहे. वितरण, जाहिरात, छपाई यातील अर्थविषयक समीकरणे तुम्हाला माहिती असतील.’ माझा भाऊ हुशार. त्याने तात्काळ सर्वांना प्रशस्तीपत्रक देऊन टाकलं होतं.

‘सर्वप्रथम आपल्याला दर आठवड्याला प्रारंभिक अवस्थेत किती प्रती काढायच्या हे ठरवलं पाहिजे.’ मी 
‘मीन्स प्रायमरी सर्क्युलेशन टार्गेट.’ एकजण. मराठीत सांगितलेलं कोणाला काहीही कळत नाही, असा त्याचा समज आहे.

‘एक लाख प्रती’ भावाचा मित्र. मी कोसळता कोसळता वाचलो. मी त्याच्याकडे बावचळून पाहिलं.
‘ हैदोस  मधील  चित्रं विसर... येथे मराठी साप्ताहिकाची चर्चा चालू आहे.’ भावाने त्याला जमिनीवर आणलं.
‘दोन हजार’ एक जण.
‘किती पानांचं?’
‘सोळा पानाचं टॅब्युलाईट साईज.’
‘मोठं होतं...’
‘लहान वाटतं. उलट तीस पानं पाहिजेत.’
‘तीस?’
‘मग हैदोसची , चाळीस असतात.’
‘छापायला खर्च किती येईल?’
‘दोन हजार प्रती गृहीत धरल्यावर प्रत्येक पंधरा पानाचं साप्ताहिक छापायला कागदासह दहा रुपये खर्च येईल.’
‘दहा  रुपये म्हणजे मग हे साप्ताहिक विकायचं केवढ्याला?’ माझ्या घशाला ताबडतोब कोरड पडली.
‘दहा  रुपये? अरे मग आपण ते विकायचे केवढ्याला. स्टाफचा पगार. संपादकाचा पगार वगैरे?’
‘मग तर साप्ताहिकाची किंमत तीस रुपयांवर जाईल. मग दोन हजारांतून चार प्रतीसुद्धा विकल्या जाणार नाहीत.’
‘खरं तर तीस  रुपयांचं काय, दोन रुपयाचं साप्ताहिकही विकणं कठीणच आहे पुण्यामध्ये. लोक साप्ताहिक वगैरे घेतच नाहीत,’ भावाचा मित्र. 
‘लोक किराणा सोडून स्वतःहून काहीच घेत नसतात. त्यांना विकत घ्यायला भाग पाडावं लागतं.’ इति म्हशीवाला मित्र.
‘आपल्याला सुरक्षित पद्धतीने नियतकालिक काढायचे असेल, तर आपल्याला दोन हजार वार्षिक सदस्य मिळवले पाहिजेत.’ मी.
‘ते कसे मिळवणार?’
‘प्रत्येकाने आपाल्याला अशा संबंधितांची यादी करायची. जे भाव न खाता वार्षिक वर्गणी देतील.’
‘पण तीस रुपयांचं साप्ताहिक घेणार कोण? त्यापेक्षा ते दहा रुपयांचं  हैदोस नाही का घेणार?’
‘हे साप्ताहिक जास्तीत जास्त सात रुपयांचं ठेवायचं.’
‘तोट्यात विकायचं?
‘नाही. छपाई व स्टाफचा पगार हा जाहिरातींतून वसूल करायचा. उरलेला निव्वळ नफा म्हणजे दर आठवड्याला दहा  हजार रुपये नफा.’ माझे डोळे लुकलुकले. मग त्या प्रीत्यर्थ तिसरा चहा आला.
‘आता छपाई व स्टाफ पेमेंट.’
‘दोन हजार रुपये प्रतींचे दहा रुपये प्रतींप्रमाणे 20 हजार रुपये.’
‘संपादकाचा पगार 10000 रुपये.’
‘काय? संपादकाला एवढाच पगार? माझा मित्र एवढ्या मोठ्यानं ओरडला की हॉटेलमधल्या बर्‍याच जणांनी एकाच वेळी वळून पाहिलं. 
‘मग?’
‘अरे, त्याला कमीत कमी पन्नास  हजार पगार नको का?’ मी.
‘किती? ’
‘पन्नास हजार.’
दोन मित्रांना भोवळ आली. मी त्यांना पाणी दिले. आणखी चहा मागवला. भावालाही श्‍वास लागला होता.
धक्का ओसरल्यावर काही वेळाच्या चर्चेने संपादकाचा पगार दहा हजार रुपयांपेक्षा जास्त नसेल हे ठरले. संपादकापेक्षा जाहिरात व्यवस्थापक महत्त्वाचा आहे, हे मला नव्याने कळले होते.
‘त्याला किती पगार?’
‘वीस  हजार.’
‘रिसेप्शनिस्ट.’ भावाचा मित्र.
‘ती कशाला?’
‘ती लागते ना!’
‘अरे, पण ती कशाला लागते?’
‘ती दुसरेही काम करेल की!’
‘ठीक आहे; पण ती पहिले कोणते काम करेल?’
‘इतर स्टाफचा खर्च दहा हजार रुपये धरू,’ माझ्या भावाने चर्चेवर पडदा पाडला.
‘म्हणजे 20000 + 10000+ 20000 = 30000.’
‘अधिक 3000.’ म्हशीवाला.
‘हे अधिक तीन हजार रुपये कसले?’
‘आकस्मिक खर्च.’
‘ठीक आहे. आकस्मिक तर आकस्मिक.’
‘म्हणजे दर आठवड्याला तीस हजार रुपयांच्या जाहिराती मिळवाव्या लागतील.’
बाप रे! मला पुन्हा भोवळ आली. विशेषांकाच्या जाहिराती गोळा करण्याचा अनुभव माझ्या गाठीशी होता आणि लोक सरळ बोलत नाहीत, हे मला माहिती होतं.
‘आता...’
‘आता काय?’ मी दुःखी अंतकरणाने म्हणालो. आमच्या साप्ताहिकाचे काय होणार हे मला कळले होतेच.
‘आता एका मासिकात एकूण जास्तीत जास्त 16 पाने धरली, तर एक तृतीयांश म्हणजे पाच पाने जाहिरातीची मिळतील. प्रत्येक पानाच्या जाहिरातीची किंमत 2000 रुपये धरली, तरी कितीही उठाठेव केली तरी जाहिरातींमधून दहा हजार रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळत नाही. म्हणजेच वीस हजार रुपयांची तूट.’ माझ्या भावाच्या विवेचनाने माझी पूर्ण हवा निघून गेली.
‘प्रशासकीय खर्चात...’ भावाचा मित्र.
‘कुठल्या खर्चात?’ मी. 
‘प्रशासकीय खर्चात दहा हजार रुपयांची कपात केली तरी दहा हजार रुपये प्रत्येक आठवड्यात तूट शिल्लक राहते. म्हणजे महिन्याला चाळीस हजार रुपये.’
‘असू द्या, असू द्या.’ साप्ताहिक काढायचे नाही, असे मी मनोमन ठरवून टाकले होते.
‘दर आठवड्याला दहा हजार रुपयांच्या जाहिराती मिळेलच असं नाही.’
पुढे मी ऐकलेच नाही. पुणे शहराची साहित्य व वृत्तसेवा करण्याचे व एका साप्ताहिकाचा मालक बनण्याचे मनसुबे त्या चहाच्या टेबलावर कोसळून पडले...

पंधरा कप चहाचे पैसे देऊन मी बाहेर पडलो. भावी साप्ताहिक  पुणे  गार्डियनचा जन्मापूर्वीच मृत्यू झाला होता.
‘आपण मधली पाने ‘हैदोस’ मासिकासारखी ठेवली, तर तुझा खप खूप वाढू शकतो.’ भावाचा मित्र पुटपुटला. आम्ही संतापाने त्याच्याकडे बघितलं.
तो हळूच सटकला.

माझं वधू संशोधन !

(दामू दानपुळेचं वधू संशोधन)

"सारांश, ही साईडपोझने सुंदर दिसणारी मुलगी नाकारण्यात आली; पण मी एक मुलगी नाकारावी तोच अजेंड्यावर दोन मुली याव्यात, असं व्हायला लागलं. त्यात चांगल्या चांगल्या, सुंदर सुंदर मुली कोणत्या कारणासाठी नाकाराव्यात हेही कळेना. माझ्या विभाचा माझ्यावर विश्‍वास होता. माझ्यावर एवढं प्रेम होतं की, या मुली नाकारणे आवश्यकच होतं. एका क्षणाला विभाबद्दल घरी सांगावं, असाही विचार मनात येऊन गेला. पण एवढ्या लवकर हे प्रकरण मला सांगायचं नव्हतंच आणि लग्नाआधीच आमचं प्लॅनिंग करून ठेवलं होतं. त्यात ती दुसर्‍या धर्माची असल्यामुळे जे महाभारत, रामायण, पहिलं महायुद्ध ते दुसरं महायुद्ध घडणार होतं, ते एवढ्या लवकर घडू नये म्हणून मीच हा निर्णय घेतला होता. यामुळे तोंड दाबून बुक्क्याचा मार मला बसत होता. हे सर्व ढोंग आहे, हे मला माहीत होतं; पण हे ढोंग करण्यावाचून गत्यंतरही नव्हतं."
मोठ्या भावाचं ते पत्र वाचताच मी आयुष्यात कधी नव्हे एवढा दचकलो. पाल अंगावर पडली तरी मी एवढा दचकल्याचं आठवत नाही. कारणही तसंच होतं. ताबडतोब निघून ये. अमुक अमुक तारखेला, अमुक अमुक ठिकाणी, अमुक अमुक मुलगी बघायचा कार्यक्रम योजला आहे. या सूचनेतील गर्भित अर्थ उमजून माझ्या डोळ्यांसमोर काजवे की काय चमकायला लागले. नोकरीची अजून खात्री नव्हती आणि माझ्या घरच्यांना माझ्या लग्नाची काळजी पडली होती. माझं लग्न करून मला बंधनात अडकवण्याची त्यांची चाल होती आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी ज्या सुंदरीबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, त्या माझ्या प्रियतमेची विभाची माहिती घरी कशी द्यावी, या भयंकर पेचात मी होतो. अर्थात तिचं शिक्षण सुरू होतं आणि माझ्या नोकरीचं नक्की झाल्याशिवाय आम्हीही लग्न करणार नव्हतोच.
पण तरीही मुलगी बघायला काय हरकत आहे, पसंतीचा तर प्रश्‍नच नव्हता. भावाच्या आणि आई-वडिलांच्या समजुतीसाठी वधूसंशोधनाचा फार्स करण्याचा निर्णय मी घेतला. ‘मुलगी बघण्यासाठी येतो,’ हे उलट टपाली कळवून मी या सर्व मुली कशा नाकारायच्या याचा विचार करू लागलो.

‘काका, तुला हे नाटक करण्याची गरजच काय? सध्या तुझा लग्नाचा विचार नाही हे तू कळवू शकत नाही का?’ पुतण्याचा हा प्रश्‍न योग्य असला तरी त्याच्या प्रश्‍नावर मी मौनच धारण केले. पण एखादी गोष्ट नाकारल्यानंतर तीच गोष्ट करण्याची माझ्या भावाची सवय होती. कारण जवळपास एक वर्षापासून मी हे लचांड पुढे ढकलत होतो आणि भाऊ खाली हात टेकायला तयार नव्हता. त्यांना कोणत्याही परिस्थितीत माझ्या लग्नाची काळजी होती. आणि सुंदर, गोड, उच्चविभूषित, प्रगल्भ मुलीच्या शोधात ते होते. वरील निकष लावून त्यांनी मुलींची लिस्टही बनवली होती.

मी लग्नाच्या बाजारात उभा आहे, हे कळल्यानंतर उपवर कन्यांचे आई-वडील तर भावाच्या मागेच लागले होते. त्यामुळे मध्यस्थांची संख्याही वाढली होती. मी काहीतरी ‘व्हीआयपी’ आहे याची जाणीव मला व्हायला लागली. 

मी जेव्हा घरी गेलो तेव्हा माझ्या लग्नाची हौस माझ्यापेक्षा घरच्या मंडळींना असल्याचं जाणवलं. प्रत्येकजण आपापल्या स्वप्नात मश्गुल होते. मी मात्र भयानक दडपणाखाली होतो. कारण घरच्यांचा उत्साह आणि हौस मोडू नये म्हणून मीच लग्नाला होकार देणार की काय, अशी परिस्थिती येण्याची भीती. तो लग्नाचाच सिझन होता आणि असं झालं असतं तर मला जिवंत सोडलं नसतं.

उपवर तरुणाला आयुष्यात दोन वेळाच सन्मान मिळतो. लग्नाआधी उपवर तरुणींच्या बापांकडून आणि लग्नात. बाकी लग्न झाल्यानंतर तो टिपिकल नवरा होतो. बायको ही त्याची शेवटची नियती होते आणि मग नवर्‍याचा सन्मान बायकोवर अवलंबून राहतो. भावाच्या लिस्टमध्ये, त्यांच्या मते सुंदर तरुणींची, शिकलेल्या तरुणींची नावे होती आणि विशेष म्हणजे श्रीमंत बापाच्या मुलींची नावे होती. या लिस्टमधील सर्व मुलींचे फोटोग्राफ्स माझ्यासमोर टाकण्यात आले. मला फारसा इंटरेस्ट नव्हताच. मला मुली बघण्याचं केवळ नाटक करायचं होतं. पन्नास-साठ मुलींच्या फोटोंपैकी दहा-बारा सुंदर मुली मी स्क्रिनिंग करून निवडल्या आणि एका शुभमुहुर्तावर माझा मुली पाहण्याचा कार्यक्रम सुरू झाला.

सुरुवात एका श्रीमंत बापाच्या मुलीपासून झाली. मी, वहिनी, भाऊ आणि पुतण्या असा जामानिमा होता. आमची कार बंगल्यासमोर येऊन उभी राहिली. मुलीचे वडील, दोन भाऊ आमच्या स्वागताला हजर होते. प्रथमदर्शनीच झालेलं हे स्वागत बघून वहिनी आणि भाऊ भारावून गेले. मीपण भारावणार होतो; पण पुतण्या  चिमटा काढून मला विभाची आठवण करून दिली. त्यामुळे आताच भारावण्याचा निर्णय मी बाजूला ठेवला.

मुलीच्या घरच्यांनी कशातच कमी ठेवली नाही. दहा-बारा मुलींचा राबता ड्रॉईंगरूम ते किचनपर्यंत सुरू होता. त्यातील उपवर मुलगी कोणती हे ओळखणं अवघड होतं. अर्ध्या-एक तासानंतर एक सुंदर तरुणी ड्रॉईंगरूममध्ये आली. मुलगी खरंच सुंदर होती. वहिनीने माझ्याकडे बघून पसंतीची मान हालवली. भाऊ मोठ्या कौतुकाने तिच्याकडे बघत होता. फोटोत आणि प्रत्यक्षात तसं खूप अंतर असतं. तिने लाजत नमस्कार केला. ‘नमस्कार, मी आर्चीची आई...’ असं म्हणत तिने वहिनीचा हात धरला आणि त्यांना आत घेऊन गेली. आम्ही सर्व जण धाडकन जमिनीवर कोसळलो.

‘मला वाटतं हा ट्रेलर असावा. मुलगी कशी असेल याची कल्पना मला आली,’  पुतण्या  माझ्या कानात पुटपुटला.
‘कल्पना कशीही असू दे, लेकिन इसको कटाये कैसे?’ मी त्यांच्याकडे बघत विचारलं.
‘मुलीचं नाव आर्ची आहे, कल्पना नाही.’ भावाने मधेच तोंड खूपसत आमचा संवाद थांबवला.

यजमान आमच्याकडे बघत हसत होते. त्यांचं ते हसणं बघून मला उगाचच अवघडल्यासारखं होत होतं. मग उगाचच हवा-पाण्याच्या गप्पा सुरू झाल्या. मग राजकारणाच्या गप्पा सुरू झाल्या. त्यानंतर यजमानांचं स्वतःच्या यशाचं पुराण सुरू झालं आणि त्यानंतर ‘आर्ची’पुराण सुरू झालं.

जेवण आटोपलं. आर्ची कोण आहे, हे वहिनींनी दाखवलं.
‘काका, क्या करे, मैंही मेरी ऑफर आगे कर दू?’ ‘शटअप. नो जोक्स,’ मी त्याला गप्प बसवलं.
शेवटी मुलाखतीचा कार्यक्रम सुरू झाला. भावाला अशी मुलाखत घेण्याची चांगली सवय होती. त्यांनी तो सोपस्कार पार पाडला. ‘तुम्हा दोघांना काही बोलायचं असेल तर बोलून घ्या,’ असं सांगून सर्वांनी आम्हा दोघांना चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यूपेक्षा माझी वाईट परिस्थिती होती. ‘तुझं इथं काय काम,’ अशा शब्दात झापून पुतण्या लाही बाहेर काढण्यात आले.

फायनल इंटरव्ह्यू सुरू झाला... काही क्षण दीर्घ स्तब्धता. ओपनिंग मलाच करावी लागणार, हे उमजून मी सुरुवात केली. ‘हॅलो मायसेल्फ दामोदर!’
‘हाय! आर्ची.’
‘आर्ची?’
‘आर्ची मला सर्वजण प्रेमानेच म्हणतात. अर्चना माझं नाव.’ पोरीचं मराठी अगाध होतं. ‘मला सर्वजण प्रेमाने आर्चीच म्हणतात,’ मी मनातल्या मनात तिच्या वाक्याची दुरुस्ती केली. तिचा दोष नव्हता, ती कॉन्वेंट शिक्षित होती.
‘एनीवे, तुमच्या भावी पतीबद्दल तुमच्या अपेक्षा काय आहेत?’
‘अपेक्षा? हं होप्स का? त्याने मला फुलासारखं ठेवावं आणि खूप प्रेम द्यावं.’ हाताने खूप म्हणजे किती दाखवत तिनं उत्तर दिलं, अगदी लहान मुलींसारखं. एकंदर हे प्रकरण अवघड आहे, हे मला जाणवायला लागलं. काही जुजबी संभाषण झालं आणि मी हॉल सोडला. आर्ची सुंदर होती; पण जगण्याबद्दलच्या तिच्या संकल्पना वेगळ्या होत्या. एखाद्या चित्रपटातील नायिकेसारखं जीवन तिला मी देऊ शकलो नसतो.
यजमानांचा पाहुणचार घेऊन भारावलेल्या अवस्थेत (मी सोडून) सर्वजण बाहेर पडलो.

‘मुलगी सुंदर आहे.’ (विभाएवढी नाही)
‘शिवाय चंट आहे.’ (विभासारखी नाही)
‘दामोदरला सांभाळून घेईल.’ (विभाची सर येणार नाही)
‘हुंडाही भरपूर मिळेल.’ (मला विकायचं ठरवलेलं दिसतंय)
वरीलप्रमाणे संभाषण सुरू होतं. कंसातील वाक्ये माझ्या मानतच सुरू होती...
‘दामोदर , मग?’ भावाने मला विचारलं.
‘भाऊ, तुम्हांला मुलगी कशी वाटली?’ मी त्यांना विचारलं.
‘सुंदर आहे, छान आहे.’ त्यांच उत्तर.
‘भाऊ, तुम्ही त्यांच्या वागणुकीवर जाऊ नका. माझ्या आयुष्याचा विचार करा.’
‘हो पप्पा, मुलीचं वागणं तुम्हाला वेगळं वाटलं नाही?’ पुतण्याने टोला हाणला. ‘गुड!’ मी त्याची पाठ थोपटली.
‘तुम्हाला वहिनी?’ मी.
‘आठव मम्मी, स्वतःच्याच तंद्रीत असल्यासारखं तिचं ते भांडं खाली सांडणं आणि स्वतःशीच हसणं,’ पुतण्याचं हे निरीक्षण आचरट होतं.
‘......’ वहिनी गहन विचारात पडल्या.
‘मम्मी. ती मंदबुद्धी आहे,’ पुतण्यानं टोला हाणला.
‘तुला काय वाटतं?’ मला भाऊने विचारलं.
‘यस, आय अ‍ॅग्रीड.’ मी मग हॉलमधील काल्पनिक किस्सा सांगितला. आणि मग वहिनींनीही त्यांना काय जाणवलं ते आम्हाला सांगितलं. थोडक्यात, एका मुलीच्या कचाट्यातून मी बचावलो होतो. पुतण्या अभ्यासात कसाही असो, तसा व्यवहारात हुशार आहे. माझं माझ्या पुतण्याबद्दल मत बदललं. 

परंतु एकंदर हे सर्वच प्रकरण अवघड जागेचं दुखणं होणार असल्याची जाणीव मला व्हायला लागली. भाऊच्या लिस्टवरील पहिलं नाव रिजेक्ट झाल्यानंतर मला थोडफार बरं वाटलं. पुतण्याचा आधार आवश्यक वाटायला लागला.

दुसरा किस्सा मजेदार होता. एका नातेवाईकाच्या मुलीच्या लग्नातला. लग्न अटेंड करण्याला माझा विरोध नव्हता. उपवर मुला-मुलींचे नातेवाईक आणि पालक लग्नात हमखास भेटतात. मी या लग्नाला येणार ही माहिती खूप जणांना कळली असावी. दर दोन मिनिटांनी कोणीतरी अनोळखी माणूस भाऊजवळ येत असे. ‘नमस्कार’ मला हात जोडून अभिवादन करत असे. मीही मोठ्या विनम्रतेने हात जोडून त्याला प्रतिसाद देत असे. हे सर्व उपवर मुलींचे पिताश्री होते, हे कळायला मी वेडा नव्हतो. त्यात भाऊ, वहिनी, वहिनींच्या माहेरचे नातेवाईक, मेहुणे इत्यादी संपूर्ण फौज सुंदर मुलगी शोधण्यात गढलेली.

‘ती बघ काय सुंदर मुलगी आहे.’ भाऊ त्यांच्या मेहुण्यांना एक मुलगी दाखवत होते.
‘लग्न झाल्यावरही सुंदर मुलींचे आकर्षण संपत नाही का रे काका?’ पुतण्याने स्वतःच्या वडिलांकडे बघत मला हळूच विचारलं.
‘माझं लग्न अजून झालं नाही, पप्पांना विचार,’ मी त्याला झापलं. तो मिश्किलपणे हसला. इकडे भाऊने मेव्हण्यांना ती मुलगी दाखवल्यानंतर मेहुणे त्या मुलीमागे थोड्या वेळाने विजयीमुद्रेने परत आले. त्या मुलीची सर्व माहिती ते घेऊन आले होते. माझ्या डोळ्यासमोर कॉलेज तरुणांचे चित्र उभे राहिले. लग्न जुळवणं काय प्रकार असतो, याचा अनुभव मला येऊ लागला होता. मला लग्न करायची इच्छा नसतानाही.

‘अच्छा, ही मुलगी तुझ्यासाठी होती तर...’ पुतण्यानं मला विचारलं.
‘पण भाऊ, ही अजेंडावर नसणारी मुलगी का विचारात घेता आहात?’ मी माझी नाखुषी दर्शवली.
‘संबंधात असं चालत नाही. आपण आपलं धोरण लवचिक ठेवायला पाहिजे.’ भाऊंनी एखाद्या कसलेल्या राजकारण्याप्रमाणे माझ्या निषेधाची वाट लावली. माझ्या सुदैवाने ‘ती सुंदर मुलगी’ दुसर्‍या जातीची निघाली. अर्थात, मला जात जरी महत्त्वाची नसली तरी भाऊंना होती. विभा आणि मी तरी कोठे एका जातीचे होतो? पण येथे आणखी एका मुलीच्या तावडीतून मी बचावलो. पण हे प्राक्तन मीच माझ्या हाताने तयार केलं होतं. या वधूसंशोधनाच्या नाटकातून माझी सुटका होणं अवघड दिसत होतं. एखादी मुलगी नाकारल्यानंतर भाऊ, मेव्हणे, जिजाजी, वहिनी, ताई आणि सर्व नातेवाईक, मध्यस्थ दुप्पट जोमाने दुसरी मुलगी घेऊन माझ्यासमोर येत होते.

जिजाजी आणि भाऊसोबत आणखी एक मुलगी बघितल्यानंतर ही मुलगी कोणत्या कारणाने नाकारावी या विचारात मी असतानाच, जिजाजींनीच विचारलं.
‘मुलगी छान आहे ना,’ त्यांना ही मुलगी अतिशय आवडली होती.
‘मला एवढी चांगली वाटली नाही.’ मी ‘बरोबर आहे ना भाऊ?’ मी भाऊकडे बघितलं ते ‘नाही’ म्हणणारच हे मला माहीत होतं.
‘बरोबर आहे,’ त्यांचा दुजोरा.
‘पण ती साईडपोझने चांगली दिसते,’ जिजाजींचं उत्तर.
मी डोक्यावर हात मारून घेतला.
‘म्हणजे काय, तिला मी आयुष्यभर साईडपोजनीच बघत राहू?’ मी विचारलं.
‘काय हरकत आहे? माणूस बहुधा कडेवरच झोपतो ना?’ हे उत्तर मात्र भन्नाट होतं.

सारांश, ही साईडपोझने सुंदर दिसणारी मुलगी नाकारण्यात आली; पण मी एक मुलगी नाकारावी, तोच अजेंड्यावर दोन मुली याव्यात, असं व्हायला लागलं. त्यात चांगल्या चांगल्या, सुंदर सुंदर मुली कोणत्या कारणासाठी नाकाराव्यात हेही कळेना. माझ्या विभाचा माझ्यावर विश्‍वास होता. माझ्यावर एवढं प्रेम होतं की, या मुली नाकारणे आवश्यकच होतं. एका क्षणाला विभाबद्दल घरी सांगावं, असाही विचार मनात येऊन गेला. पण एवढ्या लवकर हे प्रकरण मला सांगायचं नव्हतंच. आणि लग्नाआधीच आमचं प्लॅनिंग करून ठेवलं होतं. त्यात ती दुसर्‍या धर्माची असल्यामुळे जे महाभारत, रामायण, पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध घडणार होतं. ते एवढ्या लवकर घडू नये, म्हणून मीच हा निर्णय घेतला होता. यामुळे तोंड दाबून बुक्क्याचा मार मला बसत होता. हे सर्व ढोंग आहे, हे मला माहीत होतं; पण हे ढोंग करण्यावाचून गत्यंतरही नव्हतं. घरातील सर्वांनाच माझ्या लग्नाबद्दल माझ्यापेक्षा जास्त उत्साह आणि हौस होती. त्यामुळे पुढे त्यांच्यावर मोठ्ठा बॉम्बगोळा पडणारच आहे तर त्यांना थोडं समाधान तरी का मिळू नये? त्यामुळे वधू संशोधनाची मोहीम जोरात राबवली जाऊ लागली.

अशीच एक उपवर कन्या माझ्याजवळ आली. समाजातील लग्न असल्यामुळे मला तेथे असणे भाऊंच्या मते आवश्यक होतं. त्या लग्नात ‘हम आपके है कौन’, ‘दिलवाले दुल्हनिया...’ वगैरेसारखे प्रकार घडायला लागल्यामुळे आम्हालाही अ‍ॅक्टिव्ह पार्टिसिपेशन देणे भाग पडले. अशातच अंताक्षरीच्या एका मैफिलीमध्ये तिने माझ्यावर एक फासा टाकला. या सर्व स्थितीत पुतण्या मला सोडायला तयार नव्हता. जणूकाही विभानेच माझ्या पाळतीवर त्याला ठेवला की काय अशा तर्‍हेने मी थोडाजरी घसरलो की, तो मोठ्या नाटकी शब्दात विभाचं स्मरण करून देत असे. विभा माझ्या हृदयातच होती. त्यामुळे तिचं विस्मरण कसं होणार? असो, ही कन्या एका साखर कारखान्याच्या चेअरपर्सनची कन्या होती. दिसायला सुंदर होती आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आमच्या वहिनींना पसंत पडली होती.

‘मला वाटतं, मी तुम्हाला ओळखतेय?’ तिने लंचच्या वेळेस मला विचारलं.
‘हो, आपण काल रात्री समोरासमोर बसून गाणी गायलीत.’ मी.
‘ते नाही हो, याआधीसुद्धा मी तुम्हांला पाहिलंय.’
‘व्हॉट डू यू मिन? म्हणजे खूप आधी जन्मापासून?’ मी मिश्कीलपणे उत्तरलो. पुतण्या या वेळेस खाकरला. ती गोडपणे लाजली.
‘तुमचं लग्न झालं?’ पुतण्याने आगाऊपणा केला.
‘वेड्या, तुला यांचं लग्न झालंय असं वाटतं का? गळ्यात लायसन नाही, काही नाही,’ मी म्हणालो.
ती परत हसली.
‘ओके, मी येतो, काकू कुठाय काका?’ पुतण्याने विचारलं.
‘काकू? ... हाहा... काकू?’  मी.
‘तुमचं लग्न झालं?’ तिनं विचारलं
‘नाही, हो नाही...’
‘काय?’
‘आय एम नॉट मॅरीड, बट एंगेज,’ मी स्पष्टपणे सांगितलं.

थोडक्यात चेअरपर्सनची कन्याही मी कटवली. पण हा प्रकार थोडा विचित्रच होता.
उपवर कन्या आता बिनधास्तपणे माझ्यावर गळ टाकण्याचा प्रयत्न करीत होत्या.
मी वधूशोधनात नाईलाजाने सामील होत होतो. मुली रिजेक्ट करत होतो. एकतरी मुलगी माझ्या पसंतीला उतरेल म्हणून घरची मंडळी प्रयत्न करत होती. सर्वजण माझ्या लग्नात कशी मौज करायची, मानपान कसा घ्यायचा, कोणी कपडे कसे घ्यायचे, याच्या प्लॅनिंगमध्ये व्यस्त होती.

हा सर्व प्रकार मला विचित्र वाटत होता. मी वाईट आहे, मला मॅनर्स नाहीत हे पटवून देण्याचाही प्रयत्न करू लागले. पण सर्वांना माझंच कौतुक वाटत होतं. एखादी मुलगी परत कटवावी म्हणून तिच्या बापाने थोडं उद्धट बोलावं तर स्पष्टवक्तेपणाचं कौतुक वाट्याला यायचं. ‘मनाने स्ट्रेट फॉरवर्ड आहे मुलगा,’ हा निष्कर्ष असायचा.

शेवटी लग्नाचा सिझन संपायची वेळ आली. आता मुली बघण्याची माझी इच्छा नाही म्हणून घरून परत फिरलो.
भाऊ-वहिनी, ताई, आई, वडील सर्वांच्या भावना दुखावल्यासारखं वाटत होतं मला. हा सर्व प्रकार मी विभाला सांगितला. विभाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. मी अवाक झालो ‘काय झालं?’
‘तू खरंच लग्न करून घेणार नाहीस ना?’ तिने रडत-रडत विचारलं.
तिला मिठीत घेत मी उत्तरलो.
‘वेडे, आयुष्याची दोरी तुझ्या हातात दिली असताना लग्न कोणाशी करणार?’
तिने लटक्या रागाने, माझ्या छातीवर ठोसे मारले.
यापुढे वधूसंशोधनाचा असा फार्स कधीच न करण्याचा निर्णय मी घेतला. माझी वधू तर संशोधन न करताच मला मिळाली होती ना!

तिचं ‘वुड बी’ पुराणं...

(दामू दानपुळे च्या प्रेमाची शोकांतिका त्याच्याच भाषेत) 

"ती फोनवर बोलत राहिली आणि माझी गत भरलेल्या फुग्याला टाचणी लावल्यागत झाली. ती काहीबाही सांगत होती... मी एचएमव्हीच्या भोंग्यासमोर बसलेल्या श्‍वानासारखं इमानीपणे ऐकत होतो."
कॉन्फरन्स हॉलमध्ये एन्ट्री घेतली तेव्हा हॉलमधील प्रत्येकाचे डोळे क्षणभर माझ्यावर रोखले गेले.

स्वतःकडे लक्ष वेधून घ्यायचं असेल तर खूप जणांच्या गराड्यात उठून दिसेल अशा पद्धतीने कार्यक्रम सुरू झाल्यावर पंधरा मिनिटाने हमखास उशिरा जावं. अशा वेळेस सर्व मॉबचं लक्ष तुमच्यावर केंद्रित होऊन जातं. 

मी ही संधी सोडली नाही. परिणामी हॉलमधील सुंदर कन्यांच्या नजरेत रोखून बघता येईल तेवढं बघून मी पाच-सहा मित्रांच्या गराड्यात समोरच्या खुर्चीत स्थानापन्न झालो. आपली प्रत्येक स्टाईल लक्षात घेतली जातेय हे लक्षात आल्यावर स्टाईल मारण्याची संधी तरी का सोडावी? एक पाय दुमडून, खास लकबीमध्ये विराजमान (?)  झाल्यावर मागच्या खुर्चीवर चुळबूळ जाणवली. संयोजकांनी माझंही स्वागत केलं. वक्त्यांची नेहमीप्रमाणे रटाळ भाषणे सुरू झाली. माझ्या खांद्याला मागून कोणाचातरी हलकासा स्पर्श झाला. संपूर्ण मान वळवणंही जमत नव्हतं, अर्धवटपणे चेहरा बघितला. त्यात मी समोरच्या रांगेमध्ये बसलेलो. एक चष्मीस तरुणी माझ्याशी बोलायला उत्सुक होती.
बारीक काडीचा गोल्डन फ्रेमचा चष्मा, लांब लाल रंगाचा टी-शर्ट, दिसायला अतिशय सुंदर अशा या कन्येनं (आजूबाजूच्यांसह) माझं लक्ष वेधून घेतलं. ‘हाय, फ्रॉम विच कंपनी डू यू?’ प्रश्‍न अर्थातच मलाच होता.
मी कंपनीचं नाव सांगितलं 

नंतर माझं सर्व लक्ष डायसवर केंद्रित झालं. मॅनेजमेंटच्या प्रोफेशनलसाठी असणारी ही कॉन्फरन्स माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची होती. कारण मला माझा थिसिस सादर करायचा होता.

एखाद्या मुलीसोबत थोडी दोस्ती वाढायला लागल्यावर माझ्या मित्रांचे चेहरे अशा वेळेस होतात तसेच झाले. माझे काही ज्युनिअर्स, तर काही सोबतचे कंपनीत वेगवेगळी डिपार्टमेंट सांभाळणारे, सर्व तरुण 24 ते 26 च्या दरम्यानचे. काही ट्रेनीज, तर काही एक्झिक्युटिव्हज त्यांच्यात खाणाखुणा सुरू झाल्या.

डिनरच्या वेळेस ती आमच्या ग्रुपजवळ आली. माझे केस विस्कटून टाकत तिनं विचारलं, ‘खाना कैसा है?’ 
‘तुम्हारी पुरी होने के लिए ठीक है।’
‘मतलब?’
‘खास ओळखी या जेवणाच्या वेळेसच घट्ट होतात.’
‘अच्छा।’
‘बोलो, बोलो शुरू हो जावो।’
‘बोअर हो जायेंगे आप?’
‘हम हसीनों से बोअर नही होते।’
तिनं रसमलाईचा एक तुकडा तोंडात टाकला. मी विचारलं, ‘डिनर लिया?’
‘नही, मै बाहर जा रही हूँ, कोई लेके जा रहा है?’
‘कौन हे वो बदनसीब?’ मी हसत विचारलं.
तीही हसली. 

मी माझं डिनर संपवलं. मित्रांनी, माझ्यासोबत गराडा घातला. मूर्ख लेकांचे, माझं अभिनंदन करत होते. 

एक तासानंतर, एक सेशननंतर.

‘क्या चल रहा हे मीताजी?’ मी विचारलं.
‘यह क्या, मुझे मीताजी, यह ‘जी’ मत कहीए’
मी फक्त हसलो, तिनंच विचारलं, ‘माझं वय काय असावं?’ आता इथं माझं खरं स्किल होतं. तरुण मुलगी ही कधीच अठराच्यावर जात नाही. अठराच्या वर्षानंतर तरुणींचं वय ब्रेकस लागल्यासारखं थांबतं. मला चतुराई दाखवणं गरजेचं होतं.
‘तरुणीच्या, त्यातही सुंदर मुलींच्या वयाबद्दल चर्चा करायलाच नको.’ मी उत्तरलो. अर्थात ‘पीजे’ होता माझा.
‘जाऊ द्या हो, तुम्ही कितीचे?’
बापरे, ही बया स्वतःला समजते तरी काय? 
‘पच्चीस’ मी.
‘आय अ‍ॅम अ‍ॅट ट्वेंटी थ्री।’ 
‘दामोदर ..’ ती लाजली.’ मग या सोळा वर्षांच्या पोरीला आप, तुम्ही, जी वगैरे क्या लगा रखा है...’
‘मी काय बोलणार?’ ती बोलण्यात चतूर होती. 
रात्री कॅम्पफायरमध्ये आम्ही धमाल केली. कामाच्या वेळी प्रचंड तणावाखाली काम करणारे आम्ही व्यवस्थापनाचे लोक गंमतीदार, मिश्किल आणि वात्रटही असतो. बेहोश होऊन नृत्याचा आनंद अनुभवला. पुण्याची गीता, नागपूरची रविना, नाशिकची चांदणी या पोरींसोबत बेधुंद नाचलो. मीता एका कोपर्‍यात बसून हे सर्व निर्विकारपणे बघत होती. माझं लक्ष तिच्याकडं गेलं, ती हसली. मी तिच्याजवळ गेलो. हात समोर केला, ती लाजत उठली आणि... केव्हातरी ड्रम्सची धून थांबली.

माझी संपूर्ण रात्र तळमळत गेली. नजरेसमोरून मीताचा चेहरा हलायलाच तयार नव्हता. दुसर्‍या दिवशी मला माझा परफॉर्मन्स द्यायचा होता. मार्केटिंग क्षेत्रातलं आघाडीचं नाव. मोठ मोठ्या कंपनीचे पदाधिकारी, डायरेक्टर्स, प्रमुख आमंत्रित होते आणि या सर्व दिग्गजांसमोर मला माझा लघुनिबंध सादर करायचा होता. मी गर्दीत नजर फेकली. कोपर्‍यात मीता उभी होती. तिनं हात दाखवला.
‘मला तुमचा रिसर्च ऐकायचंय.’
‘मला फक्त शुभेच्छा दे.’
‘दे आर ऑल्वेज ऑलरेडी विथ यू.’ मी माझा लघुप्रबंध आरामात वाचून काढला. नंतर खुल्या फोरममध्ये त्यावर चर्चा झाली. प्रमुख पाहुण्यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रश्‍नोत्तरे झाली. मी सराईतपणे या प्रकारातून तावून सुलाखून बाहेर पडलो. हा प्रकार मीता तटस्थपणे; पण अतिशय उत्सुकतेने बघत होती.
स्टेशन संपलं. मी बाहेर पडलो.

रस्त्यात मीताने माझ्या हाताचे चुंबन घेतलं आणि सर्वांना एक भयानक धक्का दिला. माझ्यापेक्षा माझे सहकारीच आनंदित होत होते. माहीत नाही का... पण माझे ‘पाऊल घसरावंच’ या उद्देशाने ते मला प्रोत्साहन देऊ लागले. लंचच्या वेळी तिनं माझ्याच प्लेटमधला गुलाबजाम माझ्या तोंडात घातला.

हा बुफे प्रकार विचित्र असतो. निवांतपणे, मन लावून, अस्वाद घेत खाताच येत नाही. कसरत करावी लागते अक्षरशः! ती या गडबडीत गायब झाली. थोड्या वेळाने ती मलाच शोधताना आढळली.
‘आय अ‍ॅम रिटर्निंग.’ ती.
‘इतने जल्दी? अभी तो  concluding बाकी है।’
‘नही, अभी जाना है, घरसे फोन आया था।’
‘अर्जंट?’
‘बस,’ तिचा आवाज बसला होता. त्यामुळे बोलताना त्रास होत होता आणि इकडे रात्री कॅम्पफायरमध्ये ओरडल्याने माझ्याही घशाने दगा दिला होता. आमचा संवाद काही जण मन लावून ऐकत होते आणि आमच्या स्वरयंत्राच्या बिघाडाने त्यांचा गैरसमज जास्त होत होता.
‘चिठ्ठी लिखना, मेरा पता देती हूँ,’ तिनं स्वतःचा पत्ता दिला.
‘भुलोगी तो नही?’ मी.
‘कभी नही. आप नही भूलना.’ तिच्या डोळ्यातून दोन आसवं गालावर ओघळली. मी गोंधळलो. हा प्रकार मला नवीन होता. मुलगी रडल्यावर कोणती काळजी घ्यावी, हे आमच्या व्यवस्थापनात कुठेच सांगितलं नव्हतं. 
‘रो रही हो, मीता?
‘.........’ ती स्तब्ध.
मी माझ्या कोटातला रुमाल काढून तिचे डोळे पुसले. हिंदी चित्रपटातील नायकाप्रमाणे एक डायलॉग फेकावा अशी तीव्र इच्छा झाली. पण वातावरण थोडं वेगळंच होतं. मी वर्कसचे संप हाताळले होते. मोठमोठ्या डिलिंग्ज हाताळल्या होत्या; पण हे प्रकरण वेगळंच होतं. तिच्या हाताला हलकंसं दाबलं. ती निघून गेली. राहिलेलं जेवण मी कसंबसं संपवलं.

नंतरच्या कार्यक्रमातला जिवंतपणाच संपून गेल्यासारखा वाटला. माझा प्रबंध मान्य झाला होता आणि त्याला चक्क पहिलं बक्षीस मिळालं होतं. अ‍ॅवॉर्ड डिस्ट्रीब्युशनच्या वेळी राजूने मला धक्का मारून मला भानावर आणलं. टाळ्यांच्या कडकडाटात मी डायसवर माझं अ‍ॅवॉर्ड घेण्यासाठी गेलो.... पण ते घेतानाही मी बैचेन होतो... तेथे मीता असायला पाहिजे होती.

कॉन्फरन्स संपली. एक नवा अनुभव देऊन गेली. मीताबद्दल विचार करायला हरकत नव्हती. घरून दबाव वाढत होताच. स्वतःच्याच क्षेत्रातील लाइफ पार्टनर भेटली तर बरंच होतं. आमचे आचार-विचार जुळत होते आणि आता तर वेव्हलेन्थही जुळली होती. मी स्वप्नात गढून गेलो. टेलिफोनच्या रिंगने माझी तंद्री भंग पावली. रिसीव्हर कानाला लावला. रिसेप्शनिस्टने सांगितलं. मुंबईवरून फोन आहे मीताचा. मीता बोलत होती. इकडचं-तिकडचं बोलणं झालं. तिचा ट्रेनी पिरियड संपला होता. आणि ती तिच्याच कंपनीत कन्फर्म झाली होती. मी आणि तीही मोठ्या उत्साहात बोलत होतो. 
‘सॉरी उस दिन जल्दी निकल पडी।’
‘बात क्या थी? हमने मिस किया तुम्हे।’
‘सॉरी बाबा, उस दिन मेरे वुड-बी आनेवाले थे स्टेटसे। मम्मीका अर्जंट फोन था।’ मी अवाक.
‘वुड-बी, मतलब? तुम्हारी एंगेजमेंट....’
‘या, वो तो दो साल पहलेही हो गयी थी...’


‘बाकी...’ मीता तिच्या भावी नवर्‍याबद्दल बोलत होती. माझी परिस्थिती भरलेल्या फुग्याला टाचणी लागल्यावर होते, अगदी तशीच झाली होती. ती बोलत होती आणि मी ‘हिज मास्टर्स व्हाईस’च्या तबकडीवर भोंग्यासमोर बसलेल्या श्‍वानाप्रमाणे टेलिफोनवरून तिचं ‘वुड-बी’ पुराण ऐकत होतो.