गुरुवार, ६ डिसेंबर, २०१८

एका इंटरव्ह्यूची गोष्ट

(दामू दानपुळे  ह्याने स्वतःच्या भाषेत सांगितलेली एका इंटरव्ह्यूची गोष्ट.)

एका सुस्थापित फॅक्टरीसाठी ऑफिस मॅनेजर या पदासाठी उमेदवार पाहिजेत. पदवीधर, ऑफिस कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य. इच्छुकांनी समक्ष भेटावे.

प्रत्येक वृत्तपत्रात ठळक अक्षरात असणारी जाहिरात बघून मीही येथे प्रयत्न करण्याचं ठरवलं. यापूर्वीच्या कोणत्याच नोकरीमध्ये मी टिकलो नव्हतो. अर्थात कारणं वेगळी होती. पहिल्यांदा ज्या जागी नोकरीला होतो, तेथील मॅनेजरच्या मुलीमुळे नोकरी सोडावी लागली होती. त्यापेक्षा नोकरीनेच मला सोडलं असं म्हणावं लागेल. मॅनेजर खडूस होता. त्याला एक सुंदर मुलगी आहे, हे कळल्यावर नोकरी पक्की करण्याच्या इराद्याने मी प्रयत्न सुरू केले. पण माझ्यासारखेच अनेक होतकरू तरुण तेथे होते. ‘मी तिला गुलाबाचे फुल दिलं’ ही साधी घटना अशाच एका होतकरू तरुणाने तिखटमीठ लावून सांगितली. मी न केलेल्या गुन्ह्यामुळे मी बाहेर पडलो. नैतिक जबाबदारी स्वीकारून मला राजीनामा द्यावा लागला.

दुसरी नोकरीही मुलीमुळेच सोडावी लागली. येथे मॅनेजरच त्यांच्या मुलीसाठी माझ्या मागे लागला. त्या मुलीला बघितल्यावर अंदमान-निकोबारला माझी बदली करण्याची विनंती मी हेडऑफिसकडे केली. पण तिथं कंपनीचं ऑफिसच नसल्यामुळे नाईलाजाने मीच नोकरी सोडली.

अशासारख्या अनेक कारणांमुळे मी नोकरी सोडत गेलो किंवा नोकरी मला सोडत गेली. त्यामुळे बायोडेटामध्ये अनुभव या सदरात ‘नोकरी सोडण्याचा आणि मिळवण्याचा पर्यायाने मुलाखती देण्याचा दीर्घ अनुभव’ असा एक कॉलम मी टाकला.

गुलझारीलाल स्टील कंपनीत प्रयत्न करावा म्हणून मी मुलाखतीच्या दिवशी बाहेर पडलो. एमआयडीसी एरियामध्ये ही कंपनी शोधूनही सापडेना. थकून मी एका कोपर्‍यावर झाडाखाली उभा राहिलो. तेवढ्यात माझ्याच वयाचा एक तरुण माझ्याकडे येताना दिसला. कपडे वगैरे चांगले असले तरी चेहरा निस्तेज व निर्जीव होता. 

त्यांनं विचारलं, "झेड 501 हा नंबर कोठे आहे, सांगू शकाल?"

"तुम्हाला गुलझारीलाल नंदा... सॉरी स्टील कंपनीत जायचंच?"

"हो, तुम्ही कसं ओळखलं?"

"कारण मीही तोच पत्ता शोधतोय."

"अच्छा म्हणजे तुम्ही ऑफिस मॅनेजरपदासाठी आलात...?" असं म्हणतं तो हसला.

आम्ही दोघंही हसलो. आमचं हसणं संपताच तिसरा तरुण आमच्याकडे येताना दिसला.

"एस्क्यूज मी" त्याच्या हसण्याचा केविलवाणा प्रयत्न.

मी प्रश्‍नार्थक नजरेने त्याच्याकडे बघितलं.

"झेड 501 हा प्लॉट कुठं आहे हो?"

"तुम्हाला गुलझारीलाल कंपनीत जायचं?" आम्ही दोघेही उत्तरलो. प्रारंभी तो तरुण घाबरला. पण नंतर सावरून घेतलं त्यानं.

"ऑफिस मॅनेजर पदासाठी," असं म्हणत आम्ही तिघांनी एकमेकांना टाळी दिली.

"मला वाटतं पंधरा-वीस मिनिटं इथं थांबावं. आपल्यासारखे खूप होतकरू येतील. मग सोबतच झेड 501 ला शोधू." मी बोललो.
"ठीक आहे" असे म्हणत आम्ही उभे राहिलो. पंधरा-वीस मिनिटात तेथे पंचवीस-तीस जणांचा मोठा गट जमा झाला. आम्हा सर्वांत एक साम्य होतं. कपडे जरी व्यवस्थित असले तरी चेहरा निस्तेज होता. डोळ्यात आशा होती आणि वैतागलेला मूड होता.

थोड्या वेळाने आम्ही पंचवीस-तीस जण एखाद्या मुकमोर्चाप्रमाणे 501 शोधायला चालू लागलो. एखाद्या मेलेल्या माणसाच्या मृत्यूची चौकशी करण्याचं निवेदन देण्यासाठी कलेक्टर कचेरीवर जाणार्‍या त्या मूकमोर्चासारखा आमचा मोर्चा बघून काही जण थबकत होते.

शेवटी झेड 501 हा नंबर सापडला. त्याहून गुलझारीलाल स्टील कंपनी सापडली. आम्ही आमचे नाव, गाव, पत्ता वगैरे रिसेप्शनिस्टकडे लिहून दिला. इंटरव्ह्यू नावाचा प्रकार सुरू झाला. माझा नंबर येईपर्यंत मी रिसेप्शनिस्टकडे टक लावून पहात होतो. पहिल्यांदा तिने ‘स्माईल’ दिली; पण अर्ध्या तासानंतर ती घाबरली आणि तिनं आपलं तोंड कोठल्यातरी फायलीत खुपसलं. मी आजुबाजूला बघितलं. सर्वजण तिच्याकडे टक लावून बघत होते.

Related image
चार तासानंतर माझा नंबर आला. एका मोठ्या हॉलमध्ये तिघेजण बसले होते. चेहर्‍यावरून ते आक्राळविक्राळ राक्षसाची आठवण करून देत होते. नाव, गाव, शिक्षण वगैरे विचारल्यावर त्यातल्या एकाने विचारलं.

"लग्न झालं?"

"नाही" मी.

"का?"

"अजून सेटल झालो नाही. पहले नोकरी बादमे छोकरी."

"तुम्ही इंटरव्ह्यू कोणत्या तरी एका भाषेत द्या."

"......." मी गप्प.

"पूर्वीच्या नोकर्‍या का सोडल्या?"

"आवडल्या नाहीत म्हणून."

"नोकरी आवडली नाही म्हणून सोडली? बेगर्स ऑर नॉट चुझर्स."

"आय अ‍ॅम नॉट अ बेगर. मी नोकरी आवडली नाही असं नाही म्हणालो. मुली आवडल्या नाहीत असं म्हणायचं होतं मला."

"मुली आवडण्याचा आणि नोकरीचा काय संबंध?"

"आहे."

"बरं ते जाऊ द्या. तुम्ही काय करू शकता?"

"काहीच नाही."

‘"तुम्हाला काहीतरी करावंच लागेल. कारण काहीच न करणार्‍याच्या जागा आधीच भरल्यात आणि त्यांच्यावर आम्हीच विराजमान आहोत.’

"ठीक आहे... काय करावं लागेल?"

"सर्व काही."

"करेन."

तिघांपैकी एकाने दुसर्‍याला विचारलं.

"मला वाटतं, या पोस्टसाठी हाच लायक आहे. बुद्धु आहे. बाकीचे हुशार आहेत.’ सहकार्‍याने मान हलवली. नंतर माझ्याकडे वळून तो म्हणाला, ‘तुम्ही या पदासाठी अतिशय लायक आहात, कारण तुम्ही बावळट आहात. पुरेसे मूर्ख आहात. वरून अविवाहित आहात. तुम्ही इमानदारीनने काम केलं तर प्रमोशनही मिळेल."


‘बरं पगाराबद्दल?’ मी चाचरत विचारलं.

"पगार काय हो, तो नक्की मिळेल , किती ते विचारू नका "

अर्थात नोकरी मी स्वीकारली.

विनोद बिडवाईक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा