Culture लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Culture लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १३ मार्च, २०१९

लक्ष्मणरेषा

घटना फारशी चर्चिली न जाणारी. घराण्याची आणि मुलीची अब्रू जाईल या भीतीने बाहेरच मिटवलेली; पण तरीही अतिशय किळसवाणी आणि मानवी संस्कृतीला कलंक असणारी. सुसंस्कृत समजणार्‍या समाजाबद्दल विचार करायला लावणारी...

एक पाच जणांचा, मित्र-मैत्रीणींचा ग्रुप. मैत्रीण एकच, चार मित्र, दुसर्‍यांच्या नजरेत भरणारा. कॉलेजमध्ये फुलणार्‍या निरागस (?) मैत्रीचं प्रतीक (हेही त्या ग्रुपच्या मतेच). एक मुलगा आणि एक मुलगी सोबत फिरत असली, की ते अफेयर समजलं जातं(!). एक मुलगी आणि चार मुलगे फिरत असतील, तर मतं वेगळी असू शकतील. काही समजदार आणि प्रगल्भ व्यक्ती निखळ मैत्रीचं नाव देतील, काही संकुचित लोक त्या मुलीच्या ‘बोल्डनेस’ला नावं ठेवतील. मुलीच्या घरच्यांना या मैत्रीबद्दल आक्षेप नाही. सर्व मुलं ओळखीचीच. उलट आपली मुलगी अशा मित्रांत सुरक्षित आहे, हीच त्यांची भावना. त्यामुळे सर्व काही आनंदी आनंद. चार मित्रांची मैत्रीही घट्ट. दुवा ती मुलगीच. थोडक्यात, त्या चौघांना एकत्र बांधून ठेवणारा बिंदू तीच. कॉलेजला जाणं, फिरायला जाणं, जणू काही पाच मित्रच. लिंगभेद नाहीच, अशा पद्धतीचं ते वागणं. इतरांना खटकलं, तरी घरचा आणि त्या मुलीचा-मुलाचा पाठिंबा असताना सर्वच बेफिकीर... पण अचानक एक दिवस अवचित घडतं... मित्रत्वाचं नातं गळून पडतं. फुलवलेली मैत्री दुर्गंध देऊ लागते. शारीरिक आकर्षण वाटू लागतं आणि त्या चार मुलांतला मित्र कोठेतरी गायब होतो. शिल्लक राहतो तो फक्त नर. आता उरतात दोन नाती, नर आणि मादी.

मैत्रीण अचंबित होते... हे रूप तर या मित्रात तिनं कधी बघितलं नव्हतं. आजच काय झालं? यांच्या नजरा अशा का झाल्यात? कोठे गेली ती मैत्री? ती हतबल होते आणि चौघांकडूनही कुस्करली जाते. मित्र पशु बनतात. मैत्री या नात्याला कलंक लागलो. तिला काहीच सूचत नाही. काय करावे उमजत नाही? हा प्रकार नवीन होता. आयुष्यात असा प्रसंग वाट्याला येईल, असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण काय करणार? विश्‍वासघात तर झालेला आहेच.

त्या चौघांविरूद्ध पोलिस स्टेशनमध्ये तक्रार जाते, आई-वडील अगतिक, मुलगी उद्ध्वस्त झालेली. मुलीची अब्रू तर गेलीच; पण अजून धिंडवडे निघू नयेत, विटंबना होऊ नये म्हणून समजदार (?) आई-वडील केस मागे घेतात. पण अशा गोष्टी लपतात कोठे? गवगवा तो झालाच...

ती मुलगी उद्ध्वस्त आहे. चूक कोणाची हा वादाचा मुद्दा; पण ती चार मुलं आता बिनधास्त वावरताहेत.

********

ती त्या शहरात नवीन. घरी जाण्यासाठी बसस्टॉपवर उभी. या मार्गावर जाणार्‍या बसेसची तिला काही माहिती नाही. ती गोंधळते. एक तरुण उभा. त्याला ती विचारते. तो योग्य ती माहिती सांगतो.

हे आता रोजचंच. ती मुलगी थोडीशी अल्लड. आयुष्यात कोणाशी कसं वागायचं, याचा अनुभव घेण्याचा कधी प्रयत्न केला नाही. एका अनोळखी व्यक्तीसोबत कसे संबंध ठेवायचे याचं भानही राहिलं नाही. अशा भेटी रोजच्याच झाल्या. दोघांनाही वाटलं आपली खूप ओळख झाली.

एका क्षणाला तिला त्याचा हेतू कळून चुकला. तिनं स्वत:ला सावरलं आणि स्पष्ट शब्दात त्याला उडवून लावलं. त्याचा जाच कमी झाला नाही. आता तो तिला हटकून छळू लागला. फोनवर, बसमध्ये, घरी जाताना, वेळी-अवेळी. अर्थात तो भीत्राच होता. तिच्या सुदैवानं तिनं यातूनही मार्ग काढला. एका मित्राच्या सहाय्यानं हा जाचही मिटला; पण सर्वच मुली अशी लकी ठरतात?

वरील दोन घटना प्रातिनिधिक आहेत. समाजात वावरताना असे अनुभव खूप मुलींना येत असतील. काही मुली या परिस्थितीतूनही मार्ग काढतात. स्वत:चं स्वत्व आणि महत्त्व राखतात. स्वत:ची जरब दाखवून देतात; पण प्रत्येकीलाच हे जमतं?

खरं तर सामाजिक परिस्थितीबद्दल विचार करताना काही गोष्टी कालानुरूप बदलत असतात. स्त्री-पुरुष, मुलगा-मुलगी हे भेद आज मानणं म्हणजे मागासलेपणाचं लक्षण समजलं जातं. मुलाला किंवा मुलीला तशी वागणूक देऊही नये. पण समाजात वावरताना मुलींना व्यवस्थित प्रशिक्षित करण्याची गरज आहे. काही प्रतिबंध मुलांवरही जेथे आहेत, तेथे मुलींनीही स्वत:च्या मर्यादा का ओळखू नयेत?

स्त्रीमुक्ती वगैरे ठीक आहे. स्त्रीला हा तिचा दर्जा मिळायलाच हवा; परंतु आपली सामाजिक स्थिती फारशी सुधारलेली नाही, प्रत्येकाचा स्वत:चा दृष्टिकोन असतो. आपल्यातील हा दृष्टिकोन बदलणं खूप कठीण आहे. कारण आपण आधुनिकतेकडं जरी प्रवास करीत असलो, तरी प्रवृत्तीनं आदीमतेकडं प्रवास करीत आहोत. आजच्या समाजात संस्काराला फारसं महत्त्वच उरल नाही. मुलं शाळेत जातात, शिकतात, आई-वडील मुलांनी चांगलं शिकावं, त्यांनी नाव कमवावं म्हणून हाल-अपेष्टा काढतात; परंतु दुसर्‍या बाजूनं आपली मुलं काय दिवे लावतात याबाबत अनभिज्ञ असतात. तेवढा वेळही त्यांना मिळत नाही. विभक्त कुटुंबपद्धतीमुळं कोणाचा कोणावर दबाब-धाकही राहिलेला नाही. आणि म्हणूनच समाजात विकृती वाढत चालली आहे. 

वरील घटना घडतात त्या केवळ आपल्या अवाजवी अपेक्षांमुळे. म्हणून समाजात वावरताना मर्यादेची लक्ष्मणरेषा तरुणींनीती तर आखून घ्यावीच; पण त्याच बरोबर मुलांनीही ती आखून घ्यावी. आई-वडील जसे आपल्या मुलीला मर्यादेत राहायला शिकवतात, तसेच त्यांनी मुलांनाही त्यांच्या मर्यादा शिकवायला हव्यात. आणि ही काळाची गरज आहे. मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांपुढं ठेवायला हवा. कल्याणच्या सुभेदाराची सून मावळ्यांनी शिवाजी महाराजांपुढं आणून उभी केली. त्या मुस्लिम स्त्रीमध्येही शिवाजी महाराजांनी ‘आई’ पाहिली. तिचा यथोचित गौरव करून तिला सुखरूप पाठवणी केली. या अशा शिकवणुकीची मुलांना गरज आहे. 

मुलींनो, मुलांसोबत बरोबरी करण्यासाठी खूप क्षेत्रं आहेत. आपल्या सहाव्या इंद्रियाला सतत जागृत ठेवून आपण आपलं मार्गक्रमण करत राहा!

विनोद बिडवाईक

रविवार, १६ डिसेंबर, २०१८

मूल्ये ठरवितात ‘कल्चर’

‘कल्चर चेंज’ हा प्रत्येक संस्थेमध्ये परवलीचा शब्द झाला आहे. संस्थेची मूल्ये ही ‘कल्चर’वर प्रभाव टाकत असतात आणि ही मूल्ये कधी बदलतात, तर कधी नाही. स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी वेगवेगळ्या ‘ट्रिक्स’ कराव्या लागतात. नवीन संस्था काही वर्षांनंतर ‘कल्चर प्रॉब्लेम’मध्ये अडकू शकतात. बदलत्या काळाप्रमाणे स्पर्धा बदलत असते. आणि माणसाची वर्तणूकही.
Image result for organizational values & culture

काही संशोधकांनी माकडांवर एक प्रयोग केला. पाच-सहा माकडांचा एक समूह एका खोलीत ठेवला आणि खोलीच्या बाहेर जाण्यासाठी एक झरोका ठेवला. एका हुशार माकडाला तो झरोका दिसला आणि तो तिथंपर्यंत जायला तयार झाला. तो वर चढायला लागणार, तोच इतर माकडांवर थंड पाणी टाकण्यात येई. ते बघून ती इतर माकडे वर जाणार्‍या माकडाला खाली ओढत. संशोधकांनी नंतर एका माकडाला बाहेर काढलं आणि मग नवीन माकडाला आत सोडण्यात आलं. नव्या दमाच्या त्या माकडानं परत प्रयत्न केला. परत इतर माकडांनी त्याला खाली ओढलं. असं करत करत सर्व माकडे एका मागून एक बाहेर काढली गेली. आणि एक-एक नवीन माकडाने त्याची जागा घेतली. खोलीतल्या इतर माकडांनी नव्या माकडाला काही वर चढू दिले नाही. शेवटी त्या खोलीमध्ये सर्व नवीन माकडे होती, पण त्यांनाही त्यांच्या वागण्याचा मथितार्थ कळला नाही.

कोणत्याही संस्थेमध्ये असंच असतं. जुन्या मंडळींना नवीन मंडळींनी आपल्यासारखंच वागावं असं वाटतं. आणि नवीन मंडळी तशीच वागायला लागतात. कल्चर असं बनतं, तयार होतं. या जगात मुखवटेच खूप असतात. माणूस मुखवटे लावूनच जगत असतो. व्यक्तिमत्त्व तयार होतं, ते अशा अनेक मुखवट्यांचं. आणि असे अनेक मुखवटे एकत्र येऊन स्वतःचं एक वेगळं ‘कल्चर’ बनवत असतात. 

कल्चर म्हणजे नेमकं काय?

संस्थेमधील व्यक्ती ज्या गोष्टी करतो, वागतो त्या करण्याच्या आणि वागण्याच्या पद्धती म्हणजे कल्चर. समूहातील व्यक्तीच्या एकमेकांच्या वागण्याच्या, कामे करून घेण्याच्या, कामाच्या पद्धती आणि एकत्रितपणे जोपासलेली मूल्ये म्हणजे ‘कल्चर’. खूपदा या सर्व पद्धती अलिखित असतात. त्या कोणत्याही ‘सिस्टिम्स’ आणि ‘स्टँडर्ड ऑपरेटिंग’ प्रोसिजरमध्ये बांधता येत नाहीत.

खूपदा आपण प्रोफेशनलिझमबद्दल ऐकतो. हाही एक कल्चरचाच भाग असतो. ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व हे युनिक असतं, तसंच संस्थेचं कल्चरही युनिक असतं. हे सर्व आपसूकच घडत जातं. मूळात ‘प्रोफेशनिलझम’ची व्याख्या बर्‍याचदा व्यक्तिसापेक्ष असते. एखाद्याला दुसर्‍याचं वागणं ‘प्रोफशन’ल वाटत नाही. परंतु तो दुसर्‍यांशी वागताना अगदी विरुद्ध वागतो. मूळातचं कॉर्पोरेट कल्चर हे ‘डिफाईन’ करता येतं का, हा महत्त्वाचा प्रश्‍न प्रत्येकाला भेडसावतो. प्रत्येक संस्थेमध्ये काही वाक्ये नेहमी बोलली जातात. उदा : इथे ‘पॉलिटिक्स’ खूप आहे. ही संस्था खूप ‘अनप्रोफेशनल’ आहे. इथले लोक एकमेकांचे पाय ओढतात, वगैरे वगैरे. मूळातचं हे सर्व ‘परशेप्शन’वर अवलंबून असतं आणि हे ‘परशेप्शन’ कोणत्या तरी चांगल्या-वाईट अनुभवांवर आणि तेही प्रथमदर्शनी कोणत्यातरी चांगल्या-वाईट अनुभवांवर तयार झालेलं असतं. हे कदाचित चुकीचंही असू शकतं. अगदी अमेरिकेतील व्यक्तीचं वागणं भारतात चुकीचं वाटू शकतं. संस्थेतील कल्चरचंही तसंच आहे. यामध्ये व्यवस्थापन आणि कर्मचारी दोघांचाही सारखाचं वाटा असतो. जग हे कधीच ‘परफेक्ट’ असत नाही. त्यामुळे कल्चरची व्याख्या चांगलं कल्चर किंवा वाईट कल्चर अशी करता येत नाही. जी व्यक्ती या कल्चरमध्ये ‘फीट’ होते, ‘सूट’ होते ती त्या संस्थेमध्ये टिकते. आपला स्वभाव आणि आपली प्रवृत्ती कशी आहे, यावर हे अवलंबून आहे. 

कल्चर हे सर्वस्वी एकमेकांच्या ‘रोल मॉडेल’पासून तयार होतं. व्यवस्थापनाशी व्यक्ती कशा वागतात, यावरून कल्चर कसे आहे, हे समजू शकते. ‘बीपीओ’ आणि ‘आयटी’सारख्या संस्थातील कल्चर आणि एखाद्या ‘ट्रॅडिशनल’ संस्थेतील कल्चर हे संपूर्णपणे वेगळं असतं असे नव्हे. कदाचित एखादी ‘ट्रॅडिशनल’ कंपनी खूपदा ‘प्रोफेशनल’ही असू शकते आणि एखादी आयटी कंपनी पूर्णपणे ‘अनप्रोफेशनल’ही असू शकते. एकंदरीत सर्व गोष्टींचा विचार करता ‘कल्चर’ एकूण तीन प्रकारचं असू शकतं.

1) कन्स्ट्रक्टिव्ह (विधायक) कल्चर

अशा प्रकारच्या संस्थेतील कर्मचारी ‘क्रिएटिव्ह’, ‘इनोव्हेटिव्ह’ असतात. इथे कर्मचार्‍यांच्या समाधानाचे प्रयत्न होताना दिसतात. संस्थेची ध्येयधोरणे साध्य करण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्नशील असतो. त्यावर विचार करून काम केलं जातं. नवनवीन ‘इनेसिएटिव्ह’ घेतात. जर काही अडचणी आल्या, तर त्या योग्य ‘प्लॅटफॉर्म’वर सोडवल्या जातात. ‘कन्स्ट्रक्टिव्ह कल्चर’मध्ये गुणवत्ता आणि कल्पकतेला जास्त महत्त्व दिलं जातं. सहकार्‍यांवर व ‘टीमवर्क’वर याचा पाया असतो. स्पर्धा असते; पण जीवघेणी नसते. स्पर्धा ‘रिझल्ट’ मिळविण्यासाठी असते. ‘कन्स्ट्रक्टिव्ह कल्चर’मध्ये समाधान, टीमवर्क, सर्वोच्च क्वॉलिटी, कंपनीची प्रगती खूप प्रमाणात असते. अशा संस्थेमधील कर्मचार्‍यांच्या ‘डेव्हलपमेंट’वर तितकाच ‘फोकस’ असतो. अशा पद्धतीचं कल्चर प्रत्येकाला हवंहवंसं वाटतं. ‘पॉलिटिक्स’ येथेही असतं; पण ते ‘वाईट’ या व्याख्येत मोडणारं नसतं. ‘ऑर्गनायझेशनल पॉलिटिक्स’ हा तसा गोड शब्द आहे आणि तोही ‘कल्चर’चाच भाग आहे. ‘पॉलिटिक्स’ला मूळातच आपण वाईट कंगोरे दिलेले आहेत. ‘पॉलिटिक्स’ म्हणजे वाईटचं असतं, हा आपला समज असतो. दुसर्‍यांचं वाईट होत असेल, तर ते वाईट ‘पॉलिटिक्स’; पण बर्‍याचदा कर्मचार्‍यांना ‘डिप्लोमॅटिक’ राहावं लागतं. ‘हेल्दी पॉलिटिक्स’ हे कधी कधी ‘ऑर्गनायझेशन’ची गरज असते.

2) पॅसिव्ह-डिफेन्सिव्ह कल्चर

अशा संस्थेमध्ये रुल्स, प्रोसिजर, ऑडर्स अगदी काटेकोरपणे पाळल्या जातात. वरिष्ठांना खूष ठेवणे एवढाच उद्देश येथे असतो. नातेसंबंध बिघडू नयेत याची काळजी घेतली जाते. ‘इंटरपर्सनल कन्फ्लिक्टस्’ टाळल्या जातात. येथे मॅनेजर हा कर्मचारी कधी चुकतो हे बघत असतो. अशा प्रकारचे वातावरण सरकारी किंवा ‘प्रोटेक्टेड’ कंपनीमध्ये हमखास आढळते. पण स्पर्धेमध्ये अशा कंपन्यांना बदलावे लागणार आहे.

3) अ‍ॅग्रेसिव्ह-डिफेन्सिव्ह कल्चर

अशा संस्थेमध्ये नात्यापेक्षा ‘रिझल्ट’ला महत्त्व जास्त दिलं जातं. पॅसिव्ह-डिफेन्सिव्ह कल्चरमध्ये बर्‍याचदा व्यक्तिसापेक्षता येते. येथे ती येत नाही. येथे ‘करा अथवा जा’ हा एकच मंत्र असतो. स्वतःची ‘पोझिशन मेंटेन’ करणे, सांभाळणे हे येथे आवश्यक ठरते. गुणवत्ता कधीकधी दुय्यम ठरते. ‘शॉर्ट टर्म’चा विचार करण्यात येतो. बदल सहजासहजी स्वीकारला जात नाही. प्रत्येकाचा एक वेगवेगळा ग्रुप असतो. आणि वेळोवेळी तो संस्थेवर अधिराज्य गाजवत असतो.

अतिशय आक्रमकपणे यांची वाटचाल असते. वेगाने वाढणार्‍या आणि स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी आवश्यक असणार्‍या संस्थेमध्ये असं ‘कल्चर’ खूप असतं. अशा संस्थेमध्ये आक्रमकपणा आपोआप येतो आणि जी गोष्ट मार्केटमध्ये वापरली जाते, ती कर्मचार्‍यांसोबत वापरल्यामुळे या संस्था वेगाने मागे पडतात. अशा संस्थांमध्ये सर्व निर्णय वरिष्ठ पातळीवर होतात. इतरांनी ते फक्त ‘फॉलो’ करायचे असतात.

मग कोणतं ‘कॉर्पोरेट कल्चर’ चांगलं? कोणत्या संस्थेमध्ये नोकरी करणं चांगलं?

कन्स्ट्रक्टिव्ह - चांगलं?

अ‍ॅग्रेसिव्ह-डिफेन्सिव्ह : खराब? का

पॅसिव्ह-अ‍ॅग्रेसिव्ह : अतिशय वाईट?

हे सर्वस्वी त्या- त्या ‘ऑर्गनायझेशन’नं ठरवायचं आहे. संस्थेची ध्येयधोरणे साध्य करण्यासाठी कोणतं ‘कल्चरं’ मदत करणार आहे आणि सध्याचे कल्चर हे कितपत उपयोगी आहे, हे सर्वस्वी संस्थांनी ठरवायला हवं. म्हणून ‘कल्चर चेंज’ हा प्रत्येक संस्थेमध्ये परवलीचा शब्द झाला आहे. संस्थेची मूल्ये ही ‘कल्चर’वर प्रभाव टाकत असतात आणि ही मूल्ये कधी बदलतात, तर कधी नाही.

स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी वेगवेगळ्या ‘ट्रिक्स’ कराव्या लागतात. नवीन संस्था काही वर्षांनंतर ‘कल्चर प्रॉब्लेम’मध्ये अडकू शकतात. बदलत्या काळाप्रमाणे स्पर्धा बदलत असते आणि माणसाची वर्तणूकही. म्हणूनच अगदी ‘कल्चर’ही बदलतं. तुम्हाला कोणत्या ‘कल्चर’मध्ये नोकरी करायला आवडेल?

विनोद बिडवाईक

बुधवार, ५ डिसेंबर, २०१८

आपली बदललेली जीवनमूल्ये

"टीमवर्क’मधील माणसाला नोकरी, व्यवसायातील बदलांची बित्तंबातमी असते. मात्र, घरातल्या किंवा शेजारच्याला काय हवे, हे कुठे माहीत असते. वेगवान बदलांच्या लाटेत जीवनमूल्येही बदलत आहेत."
परिस्थिती संपूर्णपणे बदलली आहे. जगण्याची मूल्ये बदलत आहेत. ‘संस्कार’ या शब्दाची व्याख्या सोयीप्रमाणे बदलते आहे. जगण्याचे नियम बदलताहेत. मैत्रीचे परिमाण बदलताहेत. प्रेमाच्या व्याख्या बदलताहेत. सर्व काही बदलत आहे. काही गोष्टी बदलाच्या संपूर्ण वाटेवर आहेत. कुटुंबातील संबंध वेगवेगळ्या स्तरावर आहेत. हे सर्व होते आहे निखळ आणि अगदी वेगाने झालेल्या प्रगतीमुळे. महागडे कपडे, मोबाईल, टेक्निक्स, लॅपटॉप, शॉपिंग मॉल निर्माण होणार्‍या प्रगतीमुळे बदल झपाट्याने होत आहेत.

Related image

सर्वच क्षेत्रांत एक वेगळेच कल्चर तयार होण्याच्या मार्गावर आहे. काही वर्षांपूर्वी सुरू झालेला हा प्रगतीचा वेग अनाकलनीय असा वाढतो आहे. पुढे जातो आहे. परिस्थिती चांगली की वाईट माहीत नाही; पण सपोर्ट ग्रुप स्थापन करण्याची गरज निर्माण झाली आहे, हे निश्‍चित! ‘जगा आणि जगू द्या; काही झालं तरी माझ्याकडे येऊ नका,’ हे  आजचं ब्रीद वाक्य झालं आहे. भावना व्यक्त करण्याच्याही पद्धती बदलताहेत. शहरी भागातील नागरिकांनी हे सर्व स्वीकारलं आहे.

लहान वयात प्रगतीची ओढ लागली आहे.  Information Technology मुळे सर्वांचाच फायदा झाला आहे. दिल्लीत काय होतं आहे, हे का क्लिकवर कळतं आहे. फिलिपीन्सच्या मित्राच्या (सोशल मीडियावर मैत्री झालेल्या) आवडीनिवडी कळताहेत; पण शेजारच्या फ्लॅटमध्ये कोणी आजारी आहे, त्याला मदतीची गरज आहे, हे मात्र कळत नाहीये. मोबाईलवर तासन्तास बोलले जाते आहे. घरात आई-वडिलांना काय हवंय, हे मात्र माहीत नाही.

नक्कीच आपल्या जगण्याच्या व्याख्याच बदलताहेत. आपली जीवनशैली खरंच बदलली आहे आणि मूल्येही बदलली आहेत. ‘बदल’ हा सृष्टीचा नियम आहे आणि फक्त बदल स्थायी आहे हे मान्य करूनही एवढ्या वेगाने होणार्‍या बदलामुळे सर्व जण identity crisis मध्ये सापडले आहेत. कसं  मॅनेज  करायचं हे सर्व? आणि ते सर्व करणे आवश्यकही आहे. नाहीतर या स्पर्धेच्या युगात तुम्ही केव्हा मागे पडाल हे तुम्हालाही सांगता येणार नाही. आपण खरंच बदललोय? अल्लाउद्दीनच्या कथेसारखं आपलं झालं आहे. इच्छा व्यक्त करा, समोर हजर! घर हवंय - बँका द्यायला तयार, गाडी हवी - एक फोन करा, पैसे नाहीत - हरकत नाही, क्रेडिट कार्ड आहे. चैनीच्या सर्व वस्तू मिळताहेत आणि तेही आता फारसे पैसे न घालवता. पुढचं पुढं बघू. आयुष्यभर कर्ज फेडत राहू; पण चैनीत जगू. हे कर्ज फेडण्यासाठी नोकरी करणं आवश्यक आहे. पगार कमी मिळत असेल, तर नोकरी बदलण्याची आवश्यकता आहे. एका वर्षात दोन-तीन नोकर्‍यांमध्ये बदल, संस्थेत बदल, आत्मीयता नाही की  loyalty नाही. माझं पॅकेज माझं प्रोफाइल , टीम, माझे के. आर. ए. (टार्गेट) मी... मी.... मी. सगळीकडे स्वयंकेंद्रित व्यक्तिमत्त्वे.

काम करा,  परफॉर्म  करा. ‘हार्ड वर्क नव्हे, तर स्मार्ट वर्क करा,’ हाच एक संदेश आहे आणि (कल्चर)  कार्यसंस्कृती  ही असंच तयार होते आहे. पगार वाढवा नाहीतर सोडून जातो. कामाचा ताण आहे, आमचं  Work Life Balance  होत नाही, काहीतरी करा. Fun at work  आलंय. Picnics, Out Bound training, Parties, डान्सेस, वेगवेगळे डेज, सर्व साजरे करा; पण कामाच्या जागी आम्हाला मजाही करू द्या. पूर्वीचं  कल्चरचं कसं वेगळं होतं. कामाच्या जागी ‘काम’ हा शब्द हद्दपार झाला.
खुल्या मैत्री वाढल्या, आणि कामाच्या जागी रोमान्सही वाढला. त्यामुळे येणारे प्रॉब्लेमही वाढले. घटस्फोटाचे प्रमाण वाढले. विवाहबाह्य संबंध वाढले, सर्व जण वयाने एकदम मोठे आणि मनाने आणि विचाराने लहान झाले. कॉर्पोरेट कल्चर बदलतंय आणि जुन्या लोकांचा मानसिक मनस्तापही (स्वतःमुळेच) वाढला. चेहर्‍यावरचं कृत्रिम हसू वाढलं, सिग्नलवरची भांडण वाढलीत. हे सर्व बदलांमुळे झालं.
बदल झाला आणि जीवनशैली बदलली; पण आपण या बदलाला सामोरे जाण्यासाठी तयार होतो? आहोत? माहीत नाही.

Professionalism वाढला; पण त्याच्याही व्याख्या मनाप्रमाणे झाल्या. प्रत्येकाला आता Professional व्हायचं आहे आणि तसंच वागायचं आहे.

अमेरिकेमध्ये 1960-65च्या दशकात  Baby-Boomerची लाट आली होती. ही पिढी टीव्हीसोबत वाढली. त्यामुळे निर्माण झालेल्या सामाजिक परिस्थितीमुळे अमेरिकेला वेगळीच ओळख मिळाली.

तुलना करणं अशक्य आहे; पण संदर्भ तोच आहे आणि त्याचे परिणामही तेच आहेत. आता  Millennial generation चा जमाना आहे. सगळीकडे  Z factorचं महत्त्व एवढं वाढलं आहे, की  Z-factorचं marketing बर्‍याच कंपन्यांना नफा कमावण्याचा मार्ग झाला आहे. पूर्वी ‘दिखावे पे मत जाओ’ असायचं. आता ‘देश बदला, भेस बदला’चा जमाना आहे. ही एक लाट आहे. अशा लाटा येतच राहणार. 

प्रश्‍न आहे तो याही परिस्थितीत मूल्ये जोपासून बदलाला सामोरे जाण्याचा. याचं उत्तर मात्र ज्याचं त्यानंच शोधायचं आहे.

विनोद बिडवाईक