एक दिवस अचानक रोटे मॅडमनी मला स्टाफ रूम मधे बोलावले. त्या आमच्या वर्गशिक्षिका होत्या आणि हिंदी हा विषय आम्हाला शिकवायच्या. स्वभावाने अतिशय छान, त्यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय ग्रेसफुल होते. वर्गात मी पहिला येत असल्यामुळे त्यांची बरीचशी शैक्षणिक कामे मी करत असे, उदाहरणार्थ, त्यांची पुस्तके आणून देणे, वर्गात मॉनिटर चा रोल प्रभावीपणे साकार करणे, दंगामस्ती करणाऱ्या मुलांची नावे त्यांना सांगणे वगैरे वगैरे वगैरे. अर्थात त्यांची शिकवण्याची स्टाईल पण छान होती. कविता मस्तपैकी सांगायच्या, अगदी गावुन दाखवायच्या. तशा त्या प्रसिद्ध होत्या.
माझ्या आई-बाबांसोबत सुद्धा त्यांची चांगली ओळख होती. त्यामुळे कधीतरी आई- बाबा भेटले की माझ्याबद्दल त्यांना सांगायच्या. त्या स्वभावाने अतिशय छान होत्या. गावातील काही मुलांना त्या आऊट ऑफ द वे जाऊन शिकवायच्या. त्यावेळेस ट्युशन वगैरे असा काही प्रकार नव्हता. काही एक्स्ट्रा शिकवायचं असेल तर शाळेमध्ये बोलावून शिकवावे लागायचे. आमच्या गावांमध्ये त्या एका भाड्याच्या घरात राहत असत.
त्या दिवशी त्यांचा क्लास झाला आणि त्यांनी मला स्टाफ रूम मधे बोलावले. काय काम असावे या विचारातच मी स्टाफरूममध्ये गेलो. बाकीचे शिक्षक क्लास वर गेले होते. त्या त्यांच्या खुर्चीवर बसल्या होत्या. मला बघतास त्यांनी विचारले. "आलास? ये अरे विनु, तुला पेपर तपासायचे करायचे आहेत? करशील का?
मी विचारले, "पेपर तपासायचे? कोणते? आणि का?"
मॅडम, "अरे आपली हिंदी ची सहामाही परीक्षा झाली आहे ना, त्याचे पेपर चेक करायला तू मला मदत करशील का? माझ्याकडे त्या सहावीच्या पण वेगळा भर आहे, त्यामुळे तू मला हिंदीचे पेपर तपासायला मदत कर."
"पण मॅडम, मला कसे कळणार चूक काय आणि बरोबर काय?" मी
"कळेल हो, तुला सर्व माहीत आहे, मी तुला एक उत्तरपत्रिका देते, त्याप्रमाणे उत्तर असतील तर गुण द्यायचे."
"मग ठीक आहे, करेन मी तुम्हाला मदत."
"हो, पण मित्रांचे पेपर जास्त काळजीने तपासायचे, नाहीतर, देशील जास्त गुण त्यांना." त्या हसत म्हणाल्या.
खरंतर पेपर चेक करणे अतिशय जिकरीचे काम होते आणि मॅडमनी ते काम माझ्यावर सोपवले हे बघून मला अतिशय आनंद झाला. अर्थात तो परीक्षेचा मोसम होता, दिवाळीच्या आधी सहामाहीचा निकाल लावायचा होता.
"आणि हो, हे मात्र बाकी कोणाला सांगू नको की तू पेपर तपासणार आहेस म्हणून. फक्त आई बाबांना सांग. अभिमान वाटेल तुझा त्यांना." एवढे म्हणून त्या जागेवरून उठल्या दुसरा तास घेण्यासाठी. पेपर तपासायची एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर आली हे ऐकून मला दोन बोटे स्वर्ग राहिली. पेपर तपासणे हे काम शिक्षकांचे असते आणि तेच काम करतोय म्हणजे मी अर्धा शिक्षक झालो की काय असे मला वाटायला लागले आणि त्याच आनंदात मी क्लास मध्ये आलो.
खरं तर एवढी मोठी जबाबदारी मॅडमनी माझ्यावर टाकली आणि ही जबाबदारी कोणालाच माहीत होऊ नये हे कसं काय. इतर मुलांनी, वर्गमित्रांनी आपल्याला भाव द्यावा. त्यांनी आपल्याशी चांगलं वागावं, भाव द्यावा, म्हणून तरी मी मॅडमने पेपर तपासायची मोठी जबादारी माझ्यावर टाकली हे त्यांना माहीत होणे गरजेचे होतं. पण जर मी ही गोष्ट आत्ताच सांगितली आणि त्याचा बोभाटा झाला व मॅडम विद्यार्थ्यांकडून पेपर तपासून घेतात हे जर लोकांना कळले तर मॅडमचे महत्व कमी होईल असे मला वाटले. कदाचित मॅडम माझ्या हातातून हे काम काढून घेतील आणि कदाचित दुसऱ्या वर्गातील मुलाला ते सांगतील त्यापेक्षा काही दिवस बघावे आणि मग नंतर सांगावे असे मी ठरवले.
पण आमच्या गावातली मुलं आणि त्यातही माझे वर्गमित्र अशा गोष्टीवर विश्वास ठेवतील असे मला वाटले नाही. त्यांना ही गोष्ट कळल्यावर मुळात ती ते उडवून लावतील. तुला कशाला सांगतील पेपर तपासायला मॅडम काहीपण सांगतोस वगैरे वगैरे ते म्हणतील. आणि त्यांनी विश्वास जरी ठेवला ठेवला आणि जर त्यांनी हे त्यांच्या आई-वडिलांना सांगितले आणि त्यांना त्या परीक्षेमध्ये कमी मार्क पडले तर उगाचच मॅडमला त्रास व्हायचा त्यापेक्षा हे कोणाला न सांगितलेच बरे असे मला वाटले. खरंतर आई-बाबांना हे सांगावे असं मॅडम म्हणाल्या होत्या पण आपला मुलगा परीक्षेचे पेपर तपासतो याचा अभिमान त्यांनाही वाटला असता आणि मग ही गोष्ट त्यांनी कदाचित लपवली नसती कारण त्या अभिमानाच्या भरात त्यांनी हे दुसऱ्या कोणाला सांगितले तर हे पेपर तपासायचे गुपित उघडगुपित होईल आणि मॅडम चे महत्व कमी होईल, त्यांच्याबद्दलचा आदर गावांमध्ये कमी होईल असे मला वाटले. त्यापेक्षा पेपर मी तपासतोय हे गुपितच ठेवावे या निष्कर्षाप्रत मी आलो.
दुसऱ्या दिवशी शाळेला सुट्टी होती. पेपर तपासायला मी मॅडमच्या घरी गेलो. त्यांनी मस्तपैकी पोहे बनवले होते. एक प्लेट हातात देत म्हणाल्या, "पोहे खा आणि मग आपण आपले मिशन सुरु करू."
आम्ही पोहे संपवले आणि पेपर तपासायला बसलो. एक मॉडेल उत्तरपत्रिका त्यांनी माझ्याकडे दिली.
"तसे तुला सर्व उत्तरे माहित आहेत, पण ह्या मॉडेल वरून क्रॉस चेक कर आणि मार्क्स दे."
मी जवळपास सर्व डिव्हिजन चे शंभर पेपर तरी तपासले असतील. मॅडमनी पण त्यांच्या हातात असणारे इतर विषयाचे पेपर तपासून हातावेगळे केले. कंटाळवाणा असला तरी तो अनुभव खूप छान होता. यात दोन-तीन तास कसे गेले हे कळलेच नाही.
घराबाहेर पडून खूप उशीर झाला होता. मी कुठे जाणार हे मी घरी सांगितले नव्हते. घराच्या बाहेर मी खूप वेळ असलो तर माझ्या घरच्यांना खूप चिंता असायची. बाबाआणि माझी मोठी बहीण हे मला बाहेर शोधायला पडत असत आणि नेमकं याचीच मला भीती होती. आता जवळपास तीन तास झाले होते आणि मी जर घरी पोहोचलो नाही, तर माझी बहीण किंवा बाबा मला शोधायला बाहेर पडतील; मी कुठे आहे त्यांना कळणार नाही आणि एवढे तीन तास मी बाहेर काय करत होतो हे कसे सांगावे या चिंतेत मी होतो.
"विनू, आता जेवायची वेळ झाली आहेच, जेवूनच जा" मला मॅडम म्हणाल्या. पण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून, "नाही. मी आता घरी जातो." असे म्हणून घरी जाण्यासाठी धूम ठोकली.
घरी पोहोचलो, तेव्हा बाबा दुकानातून घरी आले होते, सर्वांच्या नजरा माझ्याकडे होत्या, "काय रे. एवढा वेळ का लावला? सकाळपासून तू बाहेर आहेस, काही अभ्यास वगैरे नाही का? आणि सांगून का नाहीस गेलास? किती शोधायचे तुला? ताईने प्रश्नांचा भडीमार केला, मी अशीच काहीतरी उडवाउडवीची उत्तरे दिली.
"जर अभ्यास केला नाही तर गावातील गाई आणि बकऱ्या राखायचे काम करावे लागेल" आई बोलली.
"मी नाही करणार, त्यापेक्षा मी कपडे शिवीन." मी बोललो.
"तुझी तुझ्या शिक्षिकेकडे तक्रार करायला हवी, अन त्यांनाच विचारायला हवे काय शिकवतात त्या? आईने सुनावले.
शेवटी माझी तक्रार रोटे बाईंना करायची असे आई आणि ताईने ठरवले. ताईने स्वयंपाक बनवलेला होता. ती ताटे वाढायची तयारी करायला गेली आणि मी मनातल्या मनात हसत जेवायला पाटावर बसलो.
विनोद बिडवाईक
Childhood memories and experiences are precious.
उत्तर द्याहटवाI had this experience, but I was checking Final term papers and got Ice Cream of Rs. 5.00 (too costly that time)
आठवणीचा कोलाज खूप सुंदर आहे.
उत्तर द्याहटवामाझ्या वर्गशिक्षक काळे सर त्यांचे नाव. 8 वित असताना त्यांनी student attendance muster दिलेलं मला. ते स्वतः हजेरी घ्यायचे पण मला पण दिवसभराचे मार्किंग करायला सांगायचे. . आज हा किस्सा वाचून त्याची आठवण झाली. . शिक्षकांनी एखाद काम सांगणं म्हणजे फुल्ल रुबाब आणि डोक्यात शंभर विचार 😂 . . सोनेरी काळच तो. .
उत्तर द्याहटवा- आदित्य ढोबळे
हटवा