रविवार, ५ सप्टेंबर, २०२१

माझे गुरु

माझी शाळा ही माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे. माझी जडणघडण झाली ती माझ्या शाळेत. तुळशीरामजी मडके विद्यालय आणि त्याआधीची जिल्हा परिषद शाळा माझ्या अजूनही आठवणीत आहेत. त्यांचा चेहरामोहरा बदलला असेल. मी सुदैवी आहे असे म्हणावे लागेल कि मला चांगले शिक्षक मिळाले. मी शाळेत हुशार होतो. दरवर्षी पहिला नंबर कधी सोडला नाही. पण सर्वात महत्वाचे म्हणजे माझे शिक्षक, ते खऱ्या अर्थाने गुरु होते. चौथी आणि सातवी मध्ये मी स्कॉलरशिपच्या परीक्षा दिल्या होत्या आणि चांगल्या नंबरने त्या परीक्षांमध्ये उत्तीर्णही झालो होतो. त्यावेळेचे शिक्षक खरंच निरपेक्ष भावनेने काम करीत असताना, परिस्थिती तशी कोणाचीही चांगली नसायची. कित्येक शिक्षकांच्या घरची मंडळी शेतामध्ये पेरणी अथवा पीक काढावयाच्या वेळेस दुसऱ्यांच्या शेतात काम करायची. त्याची कोणालाही लाज वाटत नसे. मला वाटते त्या वेळच्या शिक्षकांवर जरा जास्तच अन्याय झाला असावा. 

चौथीपर्यंत आमच्या प्रायमरी शाळेचे मुख्याध्यापक होते बोबडे सर. त्यांची मुले आणि आम्ही एकत्र शिकलो. कशाचीही अपेक्षा न करता बोबडे गुरुजींनी माझी स्कॉलरशिप ची तयारी करून घेतली. रोज संध्याकाळी सात ते नऊ पर्यंत कोणतीही फी न घेता गुरुजींनी आम्हाला शिकवले. त्यांचा सर्वात मोठा मुलगा आता मोठ्या पदावर आहे. पण दुर्दैवाने इतर तीन मुले फार शिकलेले नाहीत. गुरुजी मुख्याध्यापक तर होतेच पण गावातील पोस्टाचे पोस्टमास्तरही होते, त्यामुळे गावातील प्रत्येक घरांसोबत त्यांचा या ना त्या कारणाने संबंध यायचा. पांढरा सदरा, पांढरा पायजमा आणि खांद्यावर पांढरे उपरणे असा त्यांचा पेहराव असायचा. गावातील प्रत्येक मुलगा त्यांच्या तालमीतून पुढे गेलेला आहे. 

माझ्याकडे त्यांचे विशेष लक्ष असायचे. त्यामुळे शाळेत मला फारशा उचापति करता येत नसे. त्यांचा सर्वात लहान मुलगा आणि मी एकाच वर्गात होतो. आमची दोघांची छान मैत्री होती, पण आमच्यात कधी कधी भांडणेही झालेली आहेत. गुरुजी त्यांच्या घरी नेहमी माझे नाव काढायचे, माझे उदाहरण द्यायचे, म्हणून त्याचा माझ्यावर विशेष राग असायचा.

मी चौथीतुन पुढे हायस्कूलमध्ये गेलो. गजाननही माझ्या सोबत होता. पुढे गुरुजींनी कुटुंबियांसोबत गाव सोडले. त्यानंतर माझा त्यांचा संबंध संपला, पण बोबडे गुरुजी अजूनही मला आठवतात. दुपारी शाळेमध्ये सर्व शिक्षक स्वतःसाठी चहा बनवायचे, त्यासाठी दूध आणायला ते कोणाला तरी पाठवत असत. तसेच गावातील प्रत्येक मुलांनी शिकून पुढे जावे अशी त्यांची तळमळ असायची, पण दुर्दैवाने गावातील वातावरण पोषक असे नव्हतेच. शिवाय गुरुजी किती प्रयत्न करणार? बोबडे गुरुजी सारखे शिक्षक मला नाही वाटत आता असतील.

आमचे वर्गशिक्षक होते खाटकडे गुरुजी. ते दुसऱ्या गावात राहात असत. दररोज सायकलवरून शाळेत येत असत आणि कधीही रजा घेत नसत. गुरुजी वेळेच्या बाबतीत खूप पक्के होते. त्याचा आवडीचा विषय होता गणित. त्यावेळेस एक शिक्षक सर्व विषय शिकवत असत. 

त्यांचा आवडीचा विषय गणित असल्यामुळे ते मनात येईल तेव्हा गणित शिकवत असत. मराठी, इतिहास, भूगोल हे विषय त्यांचा मूड झाला तर शिकवत असत. गणित हा विषय मला मुळी आवडलाच नाही. परंतु गुरुजींनी माझी गणिताची एवढी तयारी करून घेतली, की बारावीपर्यंत मला गणितामध्ये ९५ ते ९८ पर्सेंट मार्क मिळायचे. कदाचित पुढील शिक्षणासाठी गणिताचा जास्त उपयोग होऊ शकतो हे त्यांना चांगलेच माहीत होते. गणित हा विषय त्यांची पॅशन होता. पण त्यामुळे ते आमच्यासारख्या निरागस लहान मुलांवर अतिशय अन्याय करत असत.  त्यांच्या नावाप्रमाणेच ते मुलांना सपासप मारण्यात पटाईत होते. पहिली ते चौथीपर्यंत गुरुजी माझे वर्गशिक्षक होते. त्यामुळे त्यांनी आम्हाला किती छळले असावे हे तुमच्या लक्षात आले असेलच. त्यात मी शाळेतील हुशार मुलगा; त्यामुळे चुका करण्याची मुभा मला नव्हती. इतर मुलांपेक्षा दुप्पट मार मला बसायचा. छडी वाजे छम छम, विद्या येई घमघम या म्हणीवर त्यांचा कमालीचा विश्वास होता. वर्गात तीस-पस्तीस छोटी चिल्ले पिल्ले. त्यात गणित हा विषय आणि दररोज खाटकडे गुरुजी त्यांच्या हातातील छडी. दर दोन तीन मिनिटांनी छडीचा फटका. त्यावेळेस बाल हक्क आयोग वगैरे नसावेत. हे आताचे फॅड आहे आणि तसे असते तर कदाचित त्या वेळेस गुरुजींवर बालहक्क आयोगाने हजारो केसेस केल्या असत्या. शाळेतील भिंतीवर, गणितातील फार्मूले लिहिलेले असायचे. एखाद्याला एखादे गणित समजले नाही, तर फार्मुले मुलांना वाचायला सांगायचे. मुलींची वेणी पकडून तर ते त्यांना वर उचलत असत आणि फार्मूले वाचायला लावत असत. खाटकडे गुरुजींचा कहर सुरू होता आणि आम्ही तो निमूटपणे अन्याय सहन करत होतो. बोबडे गुरुजी त्यांना अधेमध्ये समजून सांगत असत. मला तर शाळेत जायची इच्छाच व्हायची नाही. छडीचे फटके, पाठीवर बुक्क्या यामुळे आम्ही वैतागलेले असायचो. काही मुलांना त्याचा काहीही त्रास व्हायचा नाही, त्यांनी हे सर्व स्वीकारलं होते. पाठीवरील बुक्के थोडे कमी लागावेत म्हणून मी हिवाळ्यात माझे जाड स्वेटर घालायचो. त्यामुळे मला फारसे लागायचे नाही, पण उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात मात्र त्रास होत असे. एकदा एका मुलाच्या डोक्यावर त्यांनी पट्टीने मारले, दुर्दैवाने मुलगा दोन दिवसांपूर्वी खेळताना पडला होता; त्यामुळे डोक्यावर थोडी जखम झाली होती. गुरुजींचा फटका नेमका त्या जागेवर बसला आणि त्यातून रक्त वाहायला लागले. रडत रडत तो घरी गेला आणि मग मोठे महाभारत घडले. 

त्यानंतर बोबडे सरांनी खाटकडे गुरुजींना शेवटचा अल्टिमेटम दिला. गुरुजींनी हात थोडा आखडता घेतला. मला अजूनही माझे गणित चांगले की वाईट हे कळले नाही. परंतु त्यानंतर मला गणितात प्रत्येक वर्गात चांगले मार्क्स पडायचे पण गणिताबद्दल फारसे प्रेमही वाटले नाही. बारावीनंतर गणित सोडून मी दुसरे विषय घेतले आणि आता मी आनंदी आहे.

शासकीय विद्यानिकेतनच्या (आताच्या नवोदय शाळेच्या) प्रवेश परीक्षा तेव्हा मी चौथीत असताना दिल्या.  त्याचवेळेस स्कॉलरशिप परीक्षा देऊन मी पास झालो होतो. शासकीय विद्यानिकेतन मध्ये माझी जाण्याची तयारी सुरू झाली. माझा मोठा भाऊ तेथे शिकत होता. पुढे त्याने दहावीनंतर नाशिकला प्रस्थान केले. मला होस्टेलवर राहायची. आणि शासकीय विद्यानिकेतनमध्ये प्रवेश घेण्याची प्रचंड उत्सुकता होती. पण आईबाबांना थोडी शंका होती. सध्या तेथील क्वालिटी खराब झालेली आहे, अशा बातम्या मध्ये मध्ये येत असत. प्रशासनाचे लक्ष तेथे नव्हते. म्हणून माझा तेथे प्रवेश न घेण्याचा निर्णय आई-बाबा आणि मोठ्या भावांनी घेतला. 

शेवटी नदीच्या पल्याड असणाऱ्या गावात हायस्कूलमध्ये पाचवीला मी प्रवेश घेतला. पाचवी ते दहावीपर्यंतचे शालेय प्रवास खूप छान होता. त्यावेळेस गावातील वातावरण एवढे बिघडले नव्हते. नदी पल्याडच्या गाव हे बाजाराचे ठिकाण होते. सर्व प्रकारची दुकाने तेथे होती. नदी ओलांडून तेथे जायचे आणि किराणा, भाजी वगैरे खरेदी कार्याचे आणायचा असा तो प्रकार होता.

पावसाळ्यात मात्र नेहमी टेन्शन येत असे, मी शाळेत गेलो आणि नदीला पूर आला तर कुठे राहायचे, हा मोठा यक्षप्रश्न मला पडायचा. पावसाळ्यात नदीला नेहमी घोट्यापर्यंत पाणी असायचे; मजा यायची पाण्यातून जाताना. चपला काढायच्या आणि पाण्यातून जायचे, खूप पाणी असेल तर, एकमेकांचा हात पकडून नदी पार करायची असा तो रोजचा दिनक्रम असायचा. 

पाचवी ते सातवी माझ्या वर्गशिक्षिका होत्या रोटे मॅडम. त्या हिंदी आणि इंग्रजी शिकवायच्या. मडघे सर गणित शिकवायचे. बाकी विषयांचे शिक्षक फारसे लक्षात राहिले नाहीत. पण रोटे मॅडमचे माझ्याकडे पूर्ण लक्ष असायचे. एकदा हिंदी चे पेपर तपासण्यासाठी मी त्यांना मदत केलेली आहे. मडघे सर दररोज सकाळी एक तास एक्स्ट्रा क्लास घ्यायचे विनामोबदला, गणित विषय अगदी सोपा करून सांगायचे. हिंदीचे सर होते वर्हेकर सर. त्यांचा एक डोळा बकरीचा आहे असे बरेच विद्यार्थी मानत असत. स्वभावाने ते मृदू होते.  दरवर्षी दसर्‍याला सोने द्यायला आम्ही त्यांच्या घरी जात असू.  त्या वेळेस प्रत्येकाच्या हातावर ते अत्तर लावत असत. 

सातवीनंतर मला वर्गशिक्षक म्हणून विजया उमाळे मॅडम आल्या. अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे त्यांनी मला प्रेम दिले. इंग्रजी आणि मराठी विषय अगदी मनापासून त्यांनी शिकवले. त्याचे पती काकड सर आम्हाला केमिस्ट्री आणि बायो शिकवायचे. खूप असा होमवर्क ते द्यायचे आणि दुसऱ्या दिवशी प्रश्न विचारायचे. छडीवर त्यांचाही कमालीचा विश्वास होता. उत्तर आले नाही तर हातावर छडी मारायचे. 

आज वयाच्या या टप्प्यावर मागे वळून बघताना वाटते कि ह्या सर्व शिक्षकांचा माझ्या आयुष्यात सहभाग नसता तर आम्ही कसे घडले असतो? अगदी निरपेक्ष भावनेने त्यांनी आम्हाला घडविले. दहावीनंतर मी गावाबाहेर पडलो. आता हे सर्व शिक्षक रिटायर होऊन आपले पुढील आयुष्य जगत असतील. चांगले वाईट हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला नाही, परंतु त्याच्याबद्दलची कृतज्ञाता व्यक्त करणे आपल्या हातात आहे.

शिक्षकदिनाच्या सर्वाना शुभेच्छा!

(विनोद बिडवाईक ह्यांची सर्व पुस्तके फ्लिपकार्ट आणि बुकगंगा वर उपलब्ध आहेत. इंग्रजी मध्ये लिहिली पुस्तके किंडल फॉरमॅट मध्ये ऍमेझॉन आणि पोथी.कॉम वर प्रिंटेड कॉपीज  उपलब्ध आहेत.)