रविवार, १८ जुलै, २०२१

माझ्या पहिल्या भाषणाची कथा

खरे तर आमच्या शाळेत अवांतर उपक्रम फारसे होत नसत. वर्षातून एकदा शालेय आणि जिल्हा स्तरावर क्रीडा स्पर्धा होत असत. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी चे कार्यक्रम वगळता इतर स्पर्धा फारश्या भरत नसत. सर्व स्पर्धा ह्या शैक्षणिक प्रकारात मोडत असत. परंतु मेश्राम नावाचे नवीन मुख्याधापक म्हणून रुजू झाले आणि त्यांच्या पुढाकाराने, वादविवाद, वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन सारख्या स्पर्धा घेण्याचे ठरले. आम्हा सर्व मुलांना हा अनुभव नवीन होता. स्पर्धेच्या तारखा जाहीर झाल्या. मी तेव्हा आठवीत होतो. सर्व वर्गशिक्षकांना वर्गातील चुणचुणीत स्मार्ट विद्यार्थ्यांना ह्या स्पर्धेसाठी तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मुलांना काय, अभ्यासातून विरंगुळा पाहिजेच असतो. त्यामुळे, मुलांचा अमाप प्रतिसाद मिळाला. ह्या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे तर होतीच पण त्यांना संस्थास्थरीय पुढील फेरीत शाळेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार होती.

मी माझे नाव वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धेत नोंदवले. वादविवादाचा विषय होता, "आपला गाव बरा की शहर”. मी माझ्या गावाच्या बाजूने बोलणार होतो.  वक्तृत्व स्पर्धेसाठी, महात्मा गांधींचा, "खेड्याकडे चला." हा विषय निवडला. मी दोन्ही विषयाची तयारी जोमाने केली. माझ्या ताई कडून, भावाकडून माहिती घेतली.  शाळेतील ग्रंथालयातील पुस्तके चाळली. काकड उर्फ उमाळे मॅडमचे मार्गदर्शन घेतले. आणि दोन्ही विषय रीतसर पणे कागदावर लिहून काढले. 

स्पर्धेचा दिवस उगवला. शाळेच्या मैदानावर तात्पुरते व्यासपीठ उभारल्या गेले होते. मेश्राम सरानी अश्या स्पर्धा का महत्वाच्या आहेत हे समजावून सांगितले. काकड सर, मडघे सर आणि वर्हेकर सर परिक्षक म्हणून नेमण्यात आले. 

स्पर्धेला सुरुवात झाली. वादविवाद स्पर्धा अडखडत पार पडली. खाली बसलेली मुले, हसत खिदळत दाद देत होती, तर कधी ट्रोलिंग करत होती. सर्व मुले व्यासपीठावर जाऊन पहिल्यांदाच बोलत होती. काही स्पर्धकांनी त्यांच्या मित्रांना काहीही बोलले तरी टाळ्या वाजवण्याची तंबी दिली होती. मुलांच्या ह्या वागण्यामुळे स्पर्धकांचे टेन्शन जरा जास्तच वाढले. सोनार सर मधेमधे मुलांत जाऊन शिटीच्या दोरीने सपासप पाठीवर वार करायचे, पण ते गेले की मुलांचा गोंधळ परत सुरु व्हायचा.  

दुसऱ्या दिवशी वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या. माझे भाषण तयार होतेच. मी ते पाठ केले होते, तरीही काही भाग मी वाचून दाखवला. इतरांच्या मानाने माझे भाषण चांगले झाले होते असेच म्हणावे लागेल. उज्वला बोबडे नावाची ९वी ची मुलगी मात्र मस्त बोलली. चौथी पर्यंत असणाऱ्या आमच्या मुख्याध्यापक बोबडे सरांची ती मुलगी होती.

शेवटी स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. वक्तृत्व स्पर्धेत उज्वलाला पहिले, मला दुसरे आणि संजय शिंदेला तिसरे बक्षीस मिळाले. आम्हाला आता संस्थेच्या पुढील फेरीत प्रवेश मिळाला होता. 

काकड मॅडमच्या सल्ल्याने तोच विषय घायचा हा निर्णय मी घेतला. विषयाचे तसे बंधन नव्हते. पण मॅडमने माझ्याकडून पूर्ण तयारी करून घेण्याचे ठरवले. संजय माझ्यापेक्षा एक वर्ष पुढे होता. उज्वलाच प्रश्नच नव्हता. ती बोलण्यात हुशार होतीच.

आमच्या गावापासून संस्थेच्या मुख्य कार्यालय असणाऱ्या शाळेत करजगाव येथे पुढील स्पर्धा होणार होत्या. आम्ही सर्वजण आदल्या दिवशी तेथे पोहोचलो. संजय माझा शेजारी होता, त्यामुळे माझी त्याच्यासोबत मैत्री होती. शाळेतच आमची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. संजय आणि मी एकत्र होतो. मी माझ्या विषयांची तयारी करत होतो. संजय मात्र बेफिकीर होता. त्याच्याकडे बघून त्याने हि स्पर्धा फारसी मनावर घेतली असे वाटत नव्हते. मी त्याला त्याच्या तयारीबाबत विचारले. "त्यात काय तयारी करायची, माझ्याकडे आहेत पॉईंट्स कागदावर लिहिलेले." असे बोलून तो गायब झाला. आमची रात्रीचे जेवण आटोपली. 

झोपायच्या आधी, मी लिहिलेले भाषण परत वाचावे असे ठरवले. कागद घेण्यासाठी पिशवीत हात घातला. चार पानाचे मोठया मेहनतीने लिहिलेले माझे भाषण गायब झाले होते. मी ते सगळीकडे शोधले, इतर मुलांनां विचारले. जेथे जेथे गेलो होतो ते तपासले. पण मला माझे कागद काही सापडले नाही. मी आता रडकुंडीला आलो होतो. भाषण बऱ्यापैकी पाठ झाले होते, परंतु कागद समोर पाहिजे होता. काही मुद्दे आठवण्यासाठी तो कागद महत्वाचा होता. मला आता रडू कोसळू लागले होते. आमच्या सोबत आलेल्या मडघे सरांना मी हे सांगितले. 

"तू भाषण पाठ केले आहेस ना? मग घाबरू नकोस, तुझा आत्मविश्वास गमावू नकोस." ते म्हणाले. पुढील पंधरावीस मिनिटे त्यांनी आत्मविश्वास, पाठांतर, प्रगती ह्या विषयावर माझे बौद्धिक घेतले.  

दिवस उजाडला. सकाळी लवकर उठून आम्ही तयार झालो. स्पर्धा नऊ वाजता सुरु होणार होती, प्रमुख पाहुणे उशिरा आले म्हणून उदघाटन उशिरा झाले आणि एकदाची ११ वाजता स्पर्धा सुरु झाली. सुदैवाने वक्तृत्वस्पर्धा आधी सुरु झाल्या. वेगवेगळ्या शाळेतून आलेली मुले छान बोलत होती. एकतर माझा कागद हरवला आणि ह्या मुलांची भाषणे बघून माझा आत्मविश्वास तेथेच ढासळला.

त्यात संजयचे नाव पुकारला गेले. तो मोठया आत्मविश्वासाने व्यासपीठावर गेला. त्याच्या हातात एक कागद होता. त्याने विषयाची माहित दिली आणि हे काय! मी लिहिलेले संपूर्ण भाषण त्याने वाचून दाखवले होते. अगदी शब्द न शब्द सारखा होता. म्हणजे संजय ने माझा कागद चोरला होता. मी मनातून संतापलो. संजयचा राग आलेला होताच.  मी पळत मडघे सरांकडे गेलो आणि त्यांना परिस्थिती सांगितली. त्यांचा माझ्यावर विश्वास होता. 

ते म्हणाले. "घाबरू नकोस, त्याने ते भाषण वाचून दाखवले आहे. तू तयारी केली आहेस, ते मुद्दे तू लिहिले आहेस, विषय तुला समजला आहे, त्यामुळे तू बिनधास्त जा आणि भाषण कर. घाबरू नकोस. आणि एखादा मुद्दा आठवला नाही तर लगेच दुसरा मुद्दा घे." त्यांनी माझ्या पाठीवर हात फिरवला. "आणि मी पुढे येऊन बसतो. मध्ये मध्ये माझ्याकडे बघ." त्यांच्या ह्या शब्दांनी मला धीर आला. 

थोड्या वेळाने माझे नाव पुकारल्या गेले. मी भाषणासाठी व्यासपीठावर गेलो. मडघे सर पुढे येऊन बसले होते. त्यांनी स्मित दिले. माझ्यासमोर मुलांचा महासागर बसला होता. मी शेवटच्या रांगेतील मुलाकडे बघितले. आणि मी बोलायला सुरुवात केली. "गाव, माझा गाव, तुमचा गाव, मुळातच गावातील माणसे रांगडे असली तरी मनाने भावनिक असतात. चेहऱ्यावर मुखवटे आपण लावत नाहीत, आणि मुखवटे लावले तरी ते आपल्याला झेपत नाहीत, आणि कदाचित म्हणूनच महात्मा गांधी म्हणाले असतील, खेड्याकडे चला." मी सुरुवात केली, क्षणभर थांबलो, प्रेक्षकांचा अंदाज घेतला. आणि दुसऱ्याच क्षणाला टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यानंतर पुढील वीस मिनिटे मी बोलत होतो. संजय ने माझेच भाषण वाचून दाखवले होते, अडखडत, आणि मी तेच माझे भाषण उत्स्फुर्तपणे केले होते. बोलण्याच्या ओघात, करजागावातील चांगल्या गोष्टींचा मला दिसलेला उल्लेखही मी केला. 

मी खाली उतरलो. मडघे सर, माझ्याकडे आले आणि त्यांनी माझी पाठ थोपटली. शेवटी संध्याकाळी स्पर्धेचा निकाल परीक्षकांनी जाहीर केला. त्यात त्यांनी माझ्या भाषणाचा उल्लेख केला. "विनोद बिडवाईक ह्या स्पर्धकाने केलेले स्पर्धेतील भाषण, आधी दुसऱ्या स्पर्धकाने पण केले, पण विनोद चे भाषण उस्फुर्त होते. एखाद्याने कितीही नक्कल केली तरी त्याला मूळ गुणवत्तेची सर येत नाही हे आपण लक्षात ठेवायला हवे. " परीक्षकाने संजयचे कान पण टोचले होते. पण हे ऐकायला संजय तेथे नव्हता, तो केव्हाच पसार झाला होता.  

मला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले. पुढील काही दिवस संजय माझी नजर चुकवत फिरत होता.

विनोद बिडवाईक

(विनोद बिडवाईक ह्यांची सर्व पुस्तके फ्लिपकार्ट आणि बुकगंगा वर उपलब्ध आहेत.  इंग्रजी मध्ये लिहिली पुस्तके किंडल फॉरमॅट मध्ये ऍमेझॉन वर उपलब्ध आहेत.)

शनिवार, १० जुलै, २०२१

वाघिणीचे दूध

मला इंग्रजीमध्ये चांगले गुण पडत असत. काकड मॅडम आमच्या वर्गशिक्षिका होत्या आणि त्या इंग्रजीही शिकवत असत. इंग्रजी चांगले लिहायला जमत असे, पण इंग्रजी बोलायची अर्थात पूर्ण बोंब होती. त्यावेळी मी सातवीत वगैरे असेन. माझा भाचा हा इंग्रजी माध्यमात पहिलीत वगैरे शिकत असावा. माझी मोठी बहीण आणि मोठे भाऊ नाशिक जवळ ओझर ला राहत असत. एकदा त्याने मला इंग्रजीत पोस्टकार्ड पाठवले. त्याला काय उत्तर द्यायचे ह्याचे मला टेन्शन आले होते. एवढा लहान मुलगा इंग्रजीत काय छान लिहितो याचा आनंद मानायचा की आपल्याला एवढे चांगले इंग्रजी येत नाही ह्याचे दुःख करावे ह्या द्विधा मनस्थितीत असताना माझ्या दुसऱ्या ताईने मला समजावले. "अरे तो इंग्रजी माध्यमाचा आहे. म्हणून त्याची इंग्रजी चांगली आहे. तुझे मराठी छान आहेच की, तू त्याला मराठीत उत्तर दे." 

मला हे पटले. आणि मी त्याला मराठीत उत्तर लिहिले.  

अर्थात मी पत्राची सुरुवात, "मला इंग्रजी जमत नसल्यामुळे, मी तुला मराठीत उत्तर देत आहे." अशी केली. त्याला ते पत्र माझ्या मोठया ताईने वाचून नक्कीच दाखवले असेन.   

दहावीनंतर शिकायला भावाकडे नाशिकला आलो. कॉलेज मध्ये माझ्या आजूबाजूला सर्वजण इंग्रजी कोळून प्यायलेले होते. निदान तसे ते भासवत तरी होते. माझी वऱ्हाडी मराठी आणि त्यात सुमार इंग्रजी ह्यामुळे मला कमालीचं न्यूनगंड वाटायला लागला.   

माझे काही चांगले मित्रही झाले. त्यांनी सांभाळून घेतले. पण नंतर सवय झाली. भाषेवरून खुपजण टोमणे मारायचे पण मी दुर्लक्ष करू लागलो. वाचायची आवड असल्यामुळे, वाचन सुरु होतेच, त्यात इंग्रजीही जोमाने वाचू लागलो. बारावीला प्रिलीम ला मला क्लास मध्ये सर्वात जास्त मार्क्स मिळाले. शेवाळे सर तेव्हा इंग्रजी शिकवत असत, त्यांनी मला स्टाफ रूम मध्ये बोलवून घेतले आणि माझे कौतुक केले. त्यानंतर अर्थात फायनल मध्येही मला वर्गात जास्त मार्क्स मिळाले.

स्केच: अथर्व बिडवाईक
(स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा ह्या पुस्तकातून)
काकड मॅडमने इंग्रजीचा पाया पक्का केला होताच. माझी इंग्रजीत लिहिण्याची अडचण नव्हतीच, इंग्रजीत बोलण्याची होती. पण शब्दसंग्रह वाढवावा लागणार होता. शिक्षण वगैरे झाले. नोकरी शोधताना मात्र आपल्या देशात अजूनही इंग्रजांचे वंशज आहेत ह्याची जाणीव पदोपदी होत असे. फॅक्टरीमध्ये, सर्व मराठी असणाऱ्या कामगारांसोबत फक्कड इंग्रजी का गरजेची आहे हे मला कळत नसे. शाळेत आणि कॉलेजात मी सिन्सियर विद्यार्थी होतो. माझ्याकडे ज्ञान होते, कन्टेन्ट होता, आत्मविश्वास होता पण माझ्याकडे एक्सपोजर नव्हते.  

मराठी आणि इंग्रजी पुस्तके मी अध्याश्यासारखी वाचली. कॉलेज पासून वृत्तपत्रात स्तंभ लेखन करू लागलो. मराठी वृत्तपत्रात वेगवेगळ्या विषयावर माझी लेखमाला प्रसिद्ध होत असे. माझे लेख लोकांना आवडतही असत. इंडियन स्टील मध्ये काम करत असताना करिअर ग्रोथ साठी मी बऱ्याच मुलाखती देत असे. खूपदा मी दुसरा आणि तिसरा राऊंड पार करत असे. बऱ्याचदा शेवटच्या राऊंड मध्ये दुसऱ्या बाजूला सुटाबुटात बसलेल्या मराठी आणि अमराठी लोकांना मात्र माझी मराठी स्टाइल ची इंग्रजी पचनी पडत नसे. 

असाच एकदा मी शेवटच्या राऊंड मध्ये साऊथ इंडियन मुलाखतकर्त्याला प्रश्न विचारला (अर्थात इंग्रजीत), "सर तुमचा मला काही सल्ला आहे का?"

"तुझे इंग्रजी पॉलिश नाही."

"तुमच्या औरंगाबाद च्या फॅक्टरी मध्ये माझा रोल हा फॅक्टरी एच आर ऑफिसर चा आहे, आणि माझ्या माहितीप्रमाणे तेथे सर्व कामगार मराठी आहेत, मला त्यांच्याशी मराठीत संवाद साधावा लागणार आहे ना."

"ते खरे आहे, पण कार्यालयीन भाषा इंग्रजी आहे."

"मला उत्तम इंग्रजी लिहिता येतं."

ह्यावर तो काहीही बोलला नाही. शेवटच्या राऊंड मध्ये माझा पत्ता कापला गेला. 

कॉर्पोरेट जगात लोकांना, दाक्षिणात्य पद्धतीचे इंग्रजी चालते, उत्तरेकडचे इंग्रजी चालते. परंतु मराठी पद्धतीचे इंगजी चालत नाही. 

परदेशातील, इंग्रजी बोलणारे देश सोडून, सर्व देश आपल्या मातृभाषेत व्यवहार करतात. त्यांची इंग्रजीही फारसी चांगली नसते. पॉलिश इंग्रजीच्या अवास्तव अपेक्षांचा कोरोना काही लोकांच्या डोक्यामध्ये इतका भिनलाय की इंग्रजी म्हणजे विद्वत्ता असा त्यांचा समज झालेला आहे.  अनेक विद्वान आणि ज्ञानी लोक इंग्रजी बोलता येत नाही म्हणून आत्मविश्वास गमावून बसलेत किंवा त्यांना बाजूला टाकण्यात आलेले आहे. अनेक डिझायनर लोक फक्त इंग्रजी बोलता येते म्हणून विद्वान समजले जाताहेत.

अर्थात ह्या लोकांची थोबाड बंद करण्यासाठी मी माझ्या भाषेवर लक्ष दिले. वरिष्ठ पदापर्यंत जायचे असेल तर इंग्रजीवर प्रभुत्व महत्वाचे ठरते.  इंग्रजी हि जागतिक व्यवहाराची भाषा आहे आणि प्रयत्न केला तर ती अतिशय सोपी आहे हे मी माझ्या अनुभवावरून सांगू शकतो.

इंग्रजी ही चांगली नोकरी मिळण्यात अडथळा आहे हे जाणून मी इंग्रजी पॉलिश करायला सुरुवात केली. शब्द उच्चारणा वर भर दिला इंग्रजी भाषा आणि शब्दसंग्रह विकसित करण्यासाठी टीव्ही वर इंग्रजी कार्यक्रम, वृत्तवाहिन्या, वर्तमानपत्रे आणि पुस्तके वाचण्यात माझ्या रात्र जागवल्या.  कोणताही नवीन इंग्रजी शब्द शिकला की मी तो एका वहीमध्ये लिहून काढत असे. पुढील संभाषणात मी तो शब्द मुद्दामून वापरण्याचे सुनिश्चित करत असे. माझ्या बॉसच्या परवानगीने, मी एका इंग्रजी दैनिकात रात्रपाळीची नोकरी पत्करली. तेथे मी आतील काही पाने संपादित करत असे. मी इंग्रजी भाषा कौशल्ये शिकलो; मी माझ्या शब्दसंग्रहात सुधारणा केली; मी ह्या विषयांवर ज्ञान मिळविले. 

मी एकच केले, मी हे सर्व सकारात्मकतेने घेतले आणि आत्मविश्वासाने सुधारणेला सामोरे गेलो. आज मी वेगवेगळ्या फोरम वर लोकांशी तेवढ्याच ताकदीने इंग्रजीतून संवाद साधत असतो.

नवीन आरोग्यमंत्री श्री मनसुख मंडाविया ह्यांचे काही जुने ट्विट काढून त्यांच्या इंग्रजीची थट्टा उडवणारे लोक नवीन नाहीत. देशाला स्वातंत्र मिळून ७३ वर्षे झाली, परंतु अजूनही इंग्रजांची पिलावळ परकीय मानसिकता सोडायला तयार नाही.    

असे लोक तुम्हाला आयुष्याच्या प्रवासात क्षणोक्षणी मिळतील. त्याचे बोलणे निश्चित ऐका आणि त्यांना दाखवून द्या तुम्ही त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे आहात.

विनोद बिडवाईक

(विनोद बिडवाईक ह्यांची सर्व पुस्तके फ्लिपकार्ट आणि बुकगंगा वर उपलब्ध आहेत.  इंग्रजी मध्ये लिहिली पुस्तके किंडल फॉरमॅट मध्ये ऍमेझॉन वर उपलब्ध आहेत.)