बुधवार, २८ नोव्हेंबर, २०१८

सर्दीवरचे असेही उपाय !

"अ‍ॅलोपथी, आयुर्वेदिकपासून ते होमियोपथीपर्यंत खूप डॉक्टरांची प्रॅक्टिस या एकट्या सर्दीवर आणि या सर्दीच्या संबंधित आजारावर चालत असावी."
वर्ष  २००२-२००३

माझी सर्दी ही माझ्या धर्मपत्नीची सख्खी सवत आहे असं तिला वाटतं, ती डॉक्टर असूनही , शक्य आहे. अर्थात त्याचं कारणही तसंच आहे. वर्षातून बहुतांशी दिवस मी अ‍ॅलर्जीच्या सर्दीने बेजार असतो. आता आता तर त्याची मला सवय होत चालली आहे. ऐन मोक्याच्या वेळी येऊन ती खूपदा विश्‍वासघात करते. फजितीही करते. अगदी सुंदर मैत्रिणीने बायको असताना प्रेमाने गालावर टिचकी मारावी तशी. पण खरं पाहता आता मी या सर्दीला खूप कंटाळलो आहे.

Image result for common cold patient and doctor sketch

जगातील 85 टक्के लोकांना या सर्दीचा त्रास आहे, असं संशोधकांचं मत आहे. प्रत्येक डॉक्टरकडे या सर्दीचे नेहमीच पेशंट असतात. अ‍ॅलोपथी, आयुर्वेदिकपासून ते होमियोपथीपर्यंत खूप डॉक्टरांची प्रॅक्टिस या एकट्या सर्दीवर आणि या सर्दीच्या संबंधित आजारावर चालत असावी.

अर्थात या सर्दीवर कोणताच उपाय नाही. त्यासाठी ज्यामुळे ही सर्दी होते, त्या संबंधित गोष्टीच टाळणे योग्य, असं डॉक्टरांचं मत असतं. एखादी  anti-allergic  गोळी अथवा इंजेक्शन मारून तेवढ्यापुरती सुटका होते. हे एवढं असूनसुद्धा याच सर्दीवर प्रत्येकाकडे आपापला उपाय असतो.

लाल झालेलं नाक आणि सतत येणार्‍या शिंका बघून खूप जण वेगवेगळे उपाय सुचवतात.

‘तुम्ही असं करा, रात्री झोपायच्या वेळेस फुटाणे खाऊन झोपा.’

‘तांब्याच्या पात्रात रात्रभर पाणी ठेवून ते पाणी प्या.’

‘रात्री तीन वाजता उठून एक तांब्या पाणी गटागटा प्या.’

एक तांब्या पाणी गटागटा पिण्यासाठी रात्री तीन वाजता उठणे आणि परत झोपणे, हा उपाय ऐकून उन्हाळ्यातही थंडी वाजते आणि थंडीच्या दिवसात उन्हाळा आठवतो.

काही जण वेगवेगळे डॉक्टर सूचवतात. काही जण हमखास होमियोपॅथीचा उपाय सूचवतात. अर्थात वरील उपाय सुचवणार्‍यांची सर्दीही कोणत्याच उपायांनी बरी झालेली नसते. तरीही मी ते उपाय करण्याचा प्रयत्न करतो. त्यापैकी एक सुंदरसा उपाय मात्र बहुतेकांना आवडत असावा. तो म्हणजे ब्रँडी घेण्याचा. 

‘डॉक्टरर्स ब्रँडी हे सर्दीवर रामबाण उपाय आहे.’ माझ्या एका मित्राने एक दिवस हा उपाय मला सांगितला. ही ब्रँडी फक्त एक चमचा एक महिना घ्यायची. नंतर लक्षात आलं. एक ब्रँडीची बाटली एक महिना पुरायला तर हवी. फक्त एक चमचा ब्रँडी घेऊन सर्दी कशी बरी होईल? असो.

पण असे कित्येक उपाय केले तरी सर्दी काही जात नाही.

Image result for common cold patient funnysketchअ‍ॅलोपॅथी, अ‍ॅण्टिअ‍ॅलर्जिक गोळ्यापर्यंत मर्यादित आहे. आयुर्वेदिक लॉन्ग टर्म प्रक्रिया आहे , मग होमियोपॅथी ती अगदी वेळखाऊ पद्धती आहे. काट्याने काटा काढण्याचं होमियोपॅथीचं तंत्र मात्र भन्नाट आहे.

एका होमियोपॅथी डॉक्टरने माझ्या एका मित्राला एक ट्रीटमेंट दिली. तो सतत दोन दिवस दुप्पट सर्दीने शिंकत होता. शेवटी कंटाळून सर्दी थांबवण्यासाठी त्याने एक सीपीएम अ‍ॅलोपॅथीच्या डॉक्टरकडे टोचून घेतला.

" एखाद्या विशिष्ट गोष्टीने तुला सर्दी होते. हा तुझा  Mental Block आहे."  एका मानसशास्त्रज्ञ मित्राने हे वाक्य माझ्यावर फेकलं. त्याच्या मते अ‍ॅलर्जीची सर्दी  Psychic  उपायांनी (?) (म्हणजे मानसशास्त्रीय उपायांनी) बरी होऊ शकते. त्यामुळे धुळीमुळे, भाजीच्या फोडणीच्या वासाने अथवा वातावरणातील बदलांमुळे तुला सर्दी होते, हे डोक्यातून काढून टाक. तू हमखास धुळीत लोळ, फोडणीचा वास घे, न घाबरता बघ तुझी सर्दी कशी बंद होते ती!

हा उपाय भयंकर महागात पडला. कारण रोगापेक्षा उपाय भयंकर होता. 

एका मित्राने एक फॉर्म माझ्याकडे दिला. "तू हा फॉर्म भर. तुझी सर्दी आपोआप कमी होईल." 

"निव्वळ फॉर्म भरल्यामुळे सर्दी कशी काय गायब होणार?"

"अरे तुझा हा फॉर्म भरल्यानंतर डॉक्टर त्यावर अगदी योग्य निदान करून उपाय करतील. परंतु यामध्ये माहिती संपूर्ण सत्य आणि पूर्ण असावी. नाहीतर  you will be in trouble," अशी धमकी देणे तो विसरला नाही. मी फॉर्म घेतला आणि भरायला सुरुवात केली. कठीण होतं. फॉर्ममध्ये माझी संपूर्ण माहिती, माझ्या पूर्वजांची माहिती, ते कशाने मेले याची माहिती, माझ्या सवयी, माझ्या घरच्यांच्या सवयी, मी रोज सकाळपासून झोपेपर्यंत काय काय करतो त्याचे टाईमटेबल, माझ्या खाण्याच्या सवयी, माझ्या तक्रारी, त्या कशा सुरू झाल्या... बापरे! हा फॉर्म माझ्यावर एक  अहवाल  होईल एवढा मोठा होता.

"This is a psychomopath remedy’ मित्र हसत उतरला !

माझी सर्दी केव्हा गायब होईल ते होवो, पण आता मला त्या सर्दीपेक्षा त्यांच्यावरचे उपाय किचकट वाटायला लागले होते.

_______________________________________________________________

वर्ष २००५ नंतर

शेवटी हि सर्दी माझ्या डॉक्टर बायकोला शरण आलीच.

माझ्यावर पूर्ण स्टडी करून, आयुर्वेदाची खास ट्रीटमेंट आणि खाण्यापिण्याचे अनेक healthy प्रयोग येथे कामी आलेत. 

विनोद बिडवाईक

शुक्रवार, २३ नोव्हेंबर, २०१८

मुलाखतीची वेळ येता...

कंपन्या मल्टिनॅशनल असल्या तरी या विभागात काम करणारी मंडळी मल्टिनॅशनल नसतात. ती अगदी अस्सल प्रादेशिकवाद बाळगणारी आपली भारतीय मंडळी असतात. येथे फार्स खूप चांगल्या पद्धतीने रंगवला जातो. आणि मग या जागेवर कोणाची निवड केली जाते हे सांगायला नको. त्यापेक्षा आपल्या अस्सल भारतीय कंपन्या हा फार्स करत नाही. केला तर ‘हा जवळचा, उपयोग होईल,’ म्हणून दूरदृष्टीचा (?) विचार करतात. खुपसे बॉस, ‘हा आपल्या विचारांच्या बाहेर जाणार नाही,’  हा धोरणी विचार करून उमेदवार निवडतात. त्यामुळे व्यवस्थापन तत्त्वे पुस्तकातच राहतात.

आजच्या तरुणांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग मुलाखती देण्यातच जातो. एकंदर मुलाखत त्याच्या आयुष्याचा अविभाज्य घटक झालेली आहे. अगदी जन्माला आल्यापासून बाळाला विचारण्यात येणारी वाक्ये कॉमन असतात. ‘अलेले कोण तू? मम्मी कोण? पप्पा कुठे आहेत? काका कोण?.... ’ वगैरे वगैरे. येथून त्याला मुलाखतीची ओळख होते. त्यानंतर थोडसं वय वाढलं, की मग त्याला कॉन्व्हेंटमध्ये ज्युनिअर के.जी.त ‘अ‍ॅडमिशन’ घेतेवेळी मुलाखतीला तोंड द्यावं लागतं. शाळा संपल्यानंतर कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशनच्या वेळेस या मुलाखतीचा सोपस्कार पार पडतो. काही जणांना इंजिनीरिंगला अ‍ॅडमिशन हवी असते, काही जणांना मेडिकलला. जे मेरिटमध्ये आले त्यांना फारसा त्रास पडत नाही. परंतु तरीही इंजिनीअर अथवा डॉक्टर व्हायची हौस असते, त्यांच्या मुलाखती मात्र भन्नाट होतात. तेथे मुलाखती घेणारे पांढर्‍या कपड्यातील सभ्य प्रतिष्ठित असतात. आणि कोट्यातील जागांसाठी असणार्‍या मुलाखती साधारणतः ‘बार्गेनिंग’सारख्या असतात. अर्थात बार्गेनिंगचा पहिला धडा त्यांना येथे मिळतो.

त्यानंतर व्यवस्थापन महाविद्यालयात होणार्‍या मुलाखती, गटचर्चा वगैरे सोपस्कारातून पार पडल्यानंतर नोकरीसाठी मुलाखती सुरू होतात. ‘कॅम्पस इंटरव्ह्यू’मध्ये सिलेक्ट होणारे काही भाग्यवान वगळता, बहुतांशी इंजिनीअर, व्यवस्थापन तज्ज्ञ (?) यांच्या वाट्याला आलेले मुलाखतीचे भोग मग काही केल्या चुकत नाहीत. काही जणांच्या बायोडेटावर तर अनुभव या सदरात ‘मुलाखती देण्याचा प्रदीर्घ अनुभव’ टाकायला हरकत नाही. एवढ्या मुलाखती त्यांनी दिलेल्या असतात. मुलाखतीच्या वेळेस विचारण्यात येणारे प्रश्‍न आणि त्या जागेसाठी आवश्यक असणारं नॉलेज याचा संबंध, हा पीएचडीचा विषय होऊ शकेल. या विचारण्यात येणार्‍या प्रश्‍नांवरून प्रश्‍नकर्त्याला काय जाणून घ्यायचे असते माहीत नाही! 

आजकाल  कंपनीत मानव संसाधन विभागात रिक्रूटमेंट नावाच्या प्रकाराचा एक विभाग असतो. ‘एखाद्या जागेसाठी आवश्यक असणारा उमेदवार कसा असावा,’ याचं वर्णन आधीच तयार असतं. विशेषतः ती जागा आणि त्या जागेचे वर्णन हे आधी ‘डिझाईन’ केलेलं असतं. मग मुलाखतीच्या वेळेस त्या जागेसाठी योग्य वाटणारा उमेदवार निवडला जातो. ‘राईट पर्सन अ‍ॅट राईट जॉब’ हे तत्त्व कसोशीने पाळण्याचा प्रयत्न केला जातो. 

पण होतं काय; कंपन्या मल्टिनॅशनल असल्या तरी या विभागात काम करणारी मंडळी मल्टिनॅशनल नसतात. ती अगदी अस्सल प्रादेशिकवाद बाळगणारी आपली भारतीय मंडळी असतात. येथे फार्स खूप चांगल्या पद्धतीने रंगवला जातो. आणि मग या जागेवर कोणाची निवड केली जाते हे सांगायला नको. त्यापेक्षा आपल्या अस्सल भारतीय कंपन्या हा फार्स करत नाही. केला तर ‘हा जवळचा, उपयोग होईल,’ म्हणून दूरदृष्टीचा (?) विचार करतात. खुपसे बॉस, ‘हा आपल्या विचारांच्या बाहेर जाणार नाही,’  हा धोरणी विचार करून उमेदवार निवडतात. त्यामुळे व्यवस्थापन तत्त्वे पुस्तकातच राहतात.

आता मानसोपचारतज्ज्ञांचा शिरकावही या मुलाखतीच्या क्षेत्रात झाला आहे. मोठ्या कंपनीत मुलाखतीच्या वेळेस एखादा मानसोपचारतज्ज्ञ नेमतात. मानसिक चाचण्या घेतल्या जातात. एकदा अशाच कंपनीत एका अधिकारीपदासाठी मुलाखती सुरू होत्या. शेवटच्या राउंडमध्ये तीन मुली शॉर्टलिस्ट करण्यात येतात. 

मानसोपचारतज्ज्ञ एकेकीला प्रश्‍न विचारतो-
‘एक आणि एक किती?’
‘दोन’ पहिली उत्तर देते.
‘दोन किंवा अकरा’ दुसरी उत्तर देते.
‘अकरा’ तिसरी उत्तर देते.

कोणाची नेमणूक करावी, म्हणून तज्ज्ञ आपली मते सांगतो. ‘पहिली प्रामाणिक आहे, दुसरी सावध स्वभावाची आहे आणि तिसरी धूर्त आहे. तुम्हाला कोणती निवडायची?’

‘ती नव्हती का? त्या  प्रियांका चोप्रा सारखी दिसत होती, ती? ती सिलेक्ट करायची म्हणतो’ - बॉस सांगतो.

मुलाखतीनंतर ही अशी निवड केली जाते. म्हणजे आजही त्या तरुणीच्या हुशारीपेक्षा तिच्या दिसण्याला महत्त्व देण्यात येतं.
शंभर मुलाखतींत पन्नास  मुलाखती अशा पद्धतीने होत असतील.

कंपनीच्या मते, चांगला उमेदवार हा थेट भरतीतून सहसा मिळत नाही. त्यामुळे प्लेसमेंट एजन्सीचे फॅड दिवसेंदिवस वाढत चालले आहे. येथे आर्थिक व्यवहाराचाही प्रश्‍न आहे. त्यामुळे ओळख हा महत्वाचा भाग झाला आहे. या प्लेसमेंट्सचे कार्यही कधीकधी विनोदाचा विषय होतो. ज्यांना पैसेच उकळायचे आहेत, ते काहीही करू शकतात.

मानव संसाधन विभागात प्रशिक्षणार्थी म्हणून काम करणारी एक तरुणी होती. माझा एक मित्र वकिलीची प्रॅक्टिस करत होता. ती तरुणी त्या माझ्या मित्राची प्राथमिक मुलाखत घेत होती. त्याने काही असे फंडे मारले, ती बिचारी रडवेली होऊन म्हणाली, ‘अहो मला मुलाखत घ्या म्हणून सांगितलं, म्हणून मी तुमची घेते हो.’ 

अर्थात, काही खमकी मंडळीही असतात. प्रश्‍नकर्त्यालाच ती पेचात टाकतात. एकदा एका उमेदवाराला प्रश्‍न विचारण्यात आला-

‘सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर सांगू शकाल?’
‘नाही सर, बट आय अश्योर  ...’ 
‘काय? व्हॉट विल यू अश्योर  ’ 
‘माझ्या कामात लुडबूड करणार नाही, एवढ्या दूर अंतरावर सूर्य हमखास आहे, सर.’ त्यानं उत्तर दिलं.

दुसर्‍या एका व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्याला प्रश्‍न विचारण्यात आला.
‘कंपनी कायद्याच्या कोणत्या कलमाखाली कंपनीच्या संचालकाला शिक्षा होऊ शकते?’

कंपनी कायदा असो की कामगार कायदा, एवढी कलमे असतात, की ती लक्षातच राहत नाही. अशा वेळी अशा प्रश्‍नाचं उत्तर प्रश्‍नकर्त्त्यालाही कधीकधी माहीत नसतं. मग बिचारा उमेदवार काय उत्तर देणार? त्याचं उत्तर तरीही भन्नाट असतं. 
‘सॉरी सर, पण जर तुम्ही माझी निवड केलीच, तर कंपनीच्या संचालकाला शिक्षा होणारच नाही, इतपत माझं काम अचूक असेल.’
हजरजबाबीपणा असा हवा. अर्थात ‘बायफ्ल्युक’ अशा उत्तराने एखाद्या उमेदवाराची निवडही होऊन जाते.

विनोद बिडवाईक

डिबारा वरील शेवटचा संघर्ष

"पृथ्वीवरच्या अस्वलासारखे दिसणारे हे प्राणी एका शिस्तबद्ध कवायती सैन्याप्रमाणे उभे होते. त्यातला एक माझ्या दिशेने सरकला आणि एक डिकॉस्टीच्या दिशेने. तेवढ्यात कुठून तरी नौकेसारखे दिसणारे काहीतरी विद्युतगतीने पुढे आले. त्या दोघांनीही आम्हाला त्यात बसण्याची खूण केली. आम्ही बसताक्षणीच ती नौका आकाशात झेपावली. " 
Image result for science fiction bear like alien

पृथ्वीवरून संदेश येणे बंद होऊन सहा तास उलटले होते. 33 दिवस पुरेल एवढं इंधन यानात होतं आणि पृथ्वीवर जायचे म्हटले तर आम्हाला अडीच महिने लागणार होते. आम्ही अवकाशात वाट चुकलो असेच म्हणावे लागत होते. ज्या ग्रहाच्या कक्षेत आम्ही येऊन पोहोचलो होतो, तो पृथ्वीवर कुणालाही माहीत नव्हता, आम्हालाही माहीत नव्हता. पण अवकाशातच आश्‍चर्यकारकरित्या आमच्या यानाने मार्ग बदलला आणि त्या ग्रहाच्या कक्षेत आम्ही प्रवेश केला. आम्ही हतबुद्ध होऊन नुसतेच पाहत होतो. इलाज नव्हता. यान आमच्या नियंत्रणाबाहेर गेले होते.

शेवटी मी त्या ग्रहावर उतरण्याचा निर्णय घेतला. डिकॉस्टी (माझा सहकारी) त्यासाठी तयार नव्हता. अशा भलत्याच ग्रहावर उतरण्यापेक्षा मरण बरे, असा त्याच्या बोलण्याचा सूर; पण असे फुकट मरण्याची माझी तयारी नव्हती.

यानातून तरी ग्रह पृथ्वीसारखाच दिसत होता. हिरवे पट्टे, नद्या, सागर दिसत होता. याचा अर्थ त्या ग्रहावर वातावरण होते.

माझा अंदाज खरा ठरला. एका विस्तीर्ण मैदानावर आम्ही आमचे यान उतरविले. तांबडी माती होती. ग्रहावर खूप धूळ होती. येथे वादळाचा त्रास नेहमी होत असावा. डिकॉस्टी आणि मी बाहेर आलो. वार्‍याचा वेग प्रचंड होता. शिवाय गुरुत्वाकर्षण पृथ्वीपेक्षा कमीच होते. चालताना त्रास होत होता. बाहेर आल्यावर मी चहूकडे नजर फिरवली. दृष्टी जाईल तिथवर काहीच दिसत नव्हते. सगळीकडे तांबड्या मातीचे मैदान आणि मातकट हिरव्या रंगाची झाडे. काय करावे मला कळेना. आमच्या चेहर्‍यावर मास्क होते म्हणून, नाहीतर एकमेकांच्या डोळ्यातली दहशत वाचूनच आम्ही गतप्राण झालो असतो. पृथ्वीवरचा संपर्क तुटला होता आणि अशा ग्रहावर येऊन पोहोचलो होतो की, पृथ्वीवर जायचे दोरच तुटले होते.

अचानक माझ्यासमोर अगदी पुढ्यात, आपल्या पृथ्वीवर जागच्या जागी चक्रीवादळ होते तसा प्रकार दिसू लागला. तांबड्या मातीचे लोटच्या लोट उठू लागले. वार्‍याचा वेग प्रचंड होता. तोल सांभाळणे कठीण होते. डिकॉस्टीने सरळ बसूनच घेतले. अर्धा-एक तास या वादळात गेला असावा. हळुहळु हा जीवघेणा प्रकार शांत झाला आणि मी डिकॉस्टीकडे डोळे फाडफाडून बघायला लागलो.

आमच्या समोर शंभर एक विचित्र प्राणी होते. पृथ्वीवरच्या अस्वलासारखे दिसणारे हे प्राणी एका शिस्तबद्ध कवायतीला थांबलेल्या सैन्याप्रमाणे उभे होते. त्यातला एक माझ्या दिशेने सरकला आणि एक डिकॉस्टीच्या दिशेने. तेवढ्यात कुठून तरी नौकेसारखे दिसणारे काहीतरी विद्युतगतीने पुढे आले. त्या दोघांनीही आम्हाला त्यात बसण्याची खूण केली. आम्ही बसताक्षणीच ती नौका आकाशात झेपावली. आमच्यासोबत ते प्राणी होतेच. डिकॉस्टीने पहिल्यांदाच तोंड उघडले, ‘तुम्ही कोण आहात? तुम्हाला काय पाहिजे? हा ग्रह कोणता? आमचा प्रश्‍न त्यांना कळला होता की नाही कोणास ठाऊक; पण ते बोलले नाहीत. अत्यंत तीव्र गतीने ते नौकेसारखे विमान एका विवरात घुसले आणि तळावर उतरले. डोळे फाडून आम्ही पाहतच राहिलो. पृथ्वीवरील नासाची प्रयोगशाळासुद्धा इतकी सुसज्ज नसेन!

‘वेलकम टू डिबारा!’ कुठूनतरी शब्द कानावर आदळले. आम्हाला पुढे चलण्याची खूण करण्यात आली. डिकॉस्टीने चलण्यास नकार दिला. तत्काळ एका प्राण्याने आपले नख खाली केले. लेझरबीनचा एक मोठा किरण जमिनीत घुसला आणि जमिनीला छिद्र पडले. नंतर तेच नख डिकॉस्टीकडे दाखवून पुन्हा पुढे चलण्याची खूण करण्यात आली. आता नकाराचा प्रश्‍नच नव्हता.

‘पृथ्वीवरच्या रहिवाशांचे आम्ही स्वागत करतो.’ आमच्यासमोरील टीव्ही स्क्रीनवर ही अक्षरे उमटली. काही वेळाने अस्वलासारख्या दिसणार्‍या अतिप्रचंड माणसाने तो पडदा व्यापला.

Related image

‘विश्‍वाचे राजे होण्याची आमची क्षमता आहे. पृथ्वीशी आमचे वैर करोडो वर्षांपासून आहे. प्रत्येक क्षेत्रात आम्ही तुमच्यापेक्षा सरस आहोत आणि तुम्ही पृथ्वीवरील माणसांचा आमच्यापुढे टिकाव लागणे अशक्य. पण तुम्हाला दुसर्‍याच्या कामात लुडबुड करण्याची सवय झाली आहे. आम्हाला ही लुडबूड नकोय म्हणून आम्ही तुमच्या देखत पृथ्वी संपुष्टात आणू इच्छितो. तुम्ही दोघे पृथ्वीवरील शेवटचे मानव ठरणार आहात. या ग्रहावर तुमचे स्वागत आहे. तुम्हाला पृथ्वीवर जाता येणार नाही. आम्ही तुमची सर्व साधने केव्हाच उद्ध्वस्त केलीत. तुम्ही आमचे गुलाम आहात. आमच्या ग्रहावरील जंगलात राहा.’ मी आणि डिकॉस्टी भयाने कापू लागलो.

‘तुमचा ग्रह आम्ही नष्ट करणार आहोत.’

टीव्ही स्क्रीनवर पृथ्वी दिसू लागली. एक बाजूने काउंटडाउन सुरू झाले.
9...8...7...6...5...4...3...2...1...0 आणि

आणि टीव्ही स्क्रीनवर पृथ्वीच्या ठिकर्‍या ठिकर्‍या उडताना दिसल्या. विश्‍वमालेतून पृथ्वी हा ग्रहच नष्ट करण्यात आला होता. तोही आमच्या देखत.

‘हे आमच्या कोट्यवधी वर्षांच्या संशोधनाचे फळ आहे. आम्ही तुमच्या ग्रहाच्या अंतर्गत तापमानात वाढ केली. इतकी की त्या तापमानापुढे तुमचा टिकाव धरू शकला नाही.’  टीव्ही स्क्रीनचा पडदा कोरा झाला.

मला आणि डिकॉस्टीला पुन्हा त्या नौकेत बसवून विवरातून बाहेर आणण्यात आले.

तिथून जात असताना हजारो प्राणी आम्हाला पाहण्यासाठी जमले होते.

विनोद बिडवाईक

गुरुवार, २२ नोव्हेंबर, २०१८

एका समीक्षकाचा जन्म

‘तुम्ही नाटक का लिहित नाहीत?’

‘तुम्ही दीर्घकथा का लिहित नाहीत?’

‘तुम्ही कादंबरी का लिहित नाहीत?’

‘तुम्ही काहीच का लिहित नाहीत?’

Image result for author and aritique sketchअशासारखे कित्येक प्रश्‍न मला माझ्या परिचयातील हक्काची वाचक मंडळी विचारत असत. त्यांच्या या प्रश्‍नात एक मिश्कील, कुत्सितपणाची छटा असायची. प्रश्‍न विचारताना व फक्त प्रश्‍नाच्या आधी ‘त्यापेक्षा’ हा शब्द वापरायचे. त्यामुळेच की काय मी साहित्यातले सर्व काही केले. चक्क कविता लिहिण्याचा आणि छापून आणण्याचा अपराधही केला. माझं लेखन प्रकाशित झाल्यावर माझ्यावर एक आरोप हमखास व्हायचा आणि तो म्हणजे ‘माझा संपादकीय मंडळात तगडा वशिला आहे.’ अर्थात मीही नवसाहित्यिक (?) असल्यामुळे अशा प्रकारच्या कॉमेण्ट्स मला फारशा विचलित करीत नसत. कधी तरी आपला काळ येईल, प्रत्येक कुत्र्याचा स्वतःचा दिवस असतो, या इंग्रजी म्हणीप्रमाणे मी लेखन करत गेलो.

खूप वर्षांपासून लिहिण्याच्या सवयीमुळे मी सर्व क्षेत्रात लेखन करू लागलो. इतर साहित्यिकांसारखं माझंही एखादं पुस्तक प्रकाशित व्हावं, अशी इच्छा तीव्र होऊ लागली. त्याशिवाय आपणावर लेखकाचा शिक्का बसणार नाही, या धारणेनं माझ्या डोक्यात घर केलं आणि तिथेच मी फसलो. पुस्तक प्रकाशित करण्याची दुर्बुद्धी मला सुचली नसती, तर कदाचित मराठी आणि हिंदी साहित्यात कमालीची क्रांती घडली असती. कदाचित कित्येक तरुण लिहायला प्रवृत्त झाले असते. मी पुस्तक प्रकाशित केलं. प्रकाशक सापडेना. त्यामुळे स्वतःच्या पदरचे (सॉरी खिशातले) पैसे घालून मोठ्या हौसेने पुस्तक प्रकाशित केले.

पुस्तक तर प्रकाशित झालं; पण त्यानंतर काही दिवसांतच महाराष्ट्रातील सर्व समीक्षक माझ्यावर तुटून पडले. यात गल्लीबोळातील प्रकाशित होणार्‍या सायंदैनिकाचे लोकही होते. माझ्या पुस्तकावर खूप जणांनी अनुकूल समीक्षा लिहिली. हे सर्व माझ्या ओळखीचे होते म्हणून समीक्षा लिहिल्यावर पार्टी दिल्यावर ते खुश झाले. काही जणांनी माझी पार्टी झोडली. आणि दुसर्‍या दिवशी अतिशय वाईट शब्दात माझी कानउघडणी केली.

एक समीक्षक लिहितो, ‘हे पुस्तक झोपेवर प्रभावी औषध म्हणून वापरता येईल. हाच या पुस्तकाचा उपयोग. बाकी हे पुस्तक फुटपाथवरही विकण्याच्या लायकीचे नाही.’

दुसरा म्हणतो, ‘हे पुस्तक... काही न बोललेलेच बरे. या पुस्तकातील एका वाक्याचा दुसर्‍या वाक्याशी काडीचाही संबंध नाही. प्रस्तुत लेखकाने लेखन थांबवणेच उत्तम. परंतु ही त्यांची पहिली चूक आहे, म्हणून आम्ही माफ करतो. पुस्तकाचा टाईप, पेपर अतिशय वाईट. लेखकाने स्वतःचा फोटो का टाकला नाही?’

बहुतांशी समीक्षकांचा अभिप्राय याच पद्धतीचा होता. फक्त दोन-तीन स्थानिक वृत्तपत्रपत्रील उपसंपादकांनी चांगला अभिप्राय दिला होता. पण शेवटी त्यांनी एक वाक्य टाकायला नको होतं. ते वाक्य होतं, ‘प्रस्तुत लेखक सढळ हाताचा आहे. लोकांना पार्ट्या देऊन आपलंसं करण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे.’ खूप जणांनी माझ्या पुस्तकाऐवजी माझ्यावरच टिपण्णी केली होती.

सर्व समीक्षा वाचून मी अतिशय निराश झालो. वृत्तपत्रातच लेखन करणं बरं होतं, याची जाणीव झाली. मला आश्‍चर्य वाटत होतं ते म्हणजे रोज पुस्तकाचं प्रोडक्शन पाडणार्‍या लेखकांच्या समीक्षा उत्कृष्ट कशा छापून येतात?

अर्थात दहापैकी एकच समीक्षा अनुकूल असते हेही मला जाणवलं. मी हताश होऊन असाच बसलो असताना, एक मित्र घरी आला. त्याच्यासोबत एक टक्कल पडलेली, जाड भिंगाचा चष्मा घातलेली लहानमूर्ती होती. मित्राने त्यांची ओळख करून दिली. हे गृहस्थ पेशाने पत्रकार होते आणि त्यातही ते समीक्षक होते. त्यांनीही माझ्या पुस्तकांवर फारशी चांगली प्रतिक्रिया लिहिली नव्हती. परंतु या गृहस्थाच्या तेही लक्षात नव्हतं. मी त्यांना तसं विचारल्यावर त्यांनी पुस्तक न वाचल्याची कबुली दिली. मला आश्‍चर्याचा धक्काच बसला. त्यांनी आपली दिलगिरी व्यक्त केली आणि पुढच्या पुस्तकावर अनुकूल समीक्षा देण्याची ग्वाहीही दिली.

पुस्तक न वाचताच समीक्षा कशी लिहिता? हा प्रश्‍न विचारल्यावर ते गूढपणे हसले. म्हणाले, ‘सर्व समीक्षक अशीच समीक्षा लिहितात.’ मित्राने त्यांच्याबद्दल अधिक माहिती सांगितली. या गृहस्थांनी असे कित्येक नवोदित लेखक अकालीवयात आणि प्रीमॅच्युअर स्थितीतच मारून टाकले जातात. 

एका लेखकाच्या कादंबरीवर यांनी समीक्षा लिहिल्यावर तो लेखक पोलिस इन्स्पेक्टर झाला. दुसर्‍या लेखकाने वडापावचा स्टॉल उघडला. एकाने रिक्षा चालवायला सुरुवात केली. आता मलाही साहित्यक्षेत्र सोडून द्यावे असे तीव्रतेने वाटू लागले. छंद म्हणूनही लिहायचे नाही, या निष्कर्षाप्रत मी येऊन ठेपलो. चणे, शेंगदाणे विकण्याचा धंदा करावा असं तीव्रतेनं वाटू लागलं. माझी ही इच्छा हताशपणे मी मित्राला ऐकवली. मित्र हसत उत्तरला, ‘अरे वेड्या एवढं निराश कशाला होतोस. तू तुझी व्यंगात्मक लिहिण्याची हौस समीक्षक होऊन पूर्ण करू शकतोस. त्यापेक्षा समीक्षा का लिहीत नाही.’ मित्राच्या या सल्ल्याला वरील समीक्षकांनी दुजोरा दिला आणि समीक्षा कशा लिहायच्या याचं मार्गदर्शन करण्याची तयारी दर्शविली.

समीक्षा कशी करावी? याचे बाळकडू मला मिळाल्यापासून या समीक्षेवर समीक्षा लिहू लागलो. पुस्तके बघून, त्याचे कव्हर बघून आणि लेखकाचे नाव बघून समीक्षा लिहायची असते, हे मी सरावाने शिकलो. काही दिवसांतच मी समीक्षा लिहिण्यात तरबेज झालो.
पहिली समीक्षा मी एका काव्यसंग्रहाची केली. ही समीक्षा एवढी लोकप्रिय झाली की समीक्षेसाठी माझ्याकडे धडाधड पुस्तके येऊ लागली. ती समीक्षा थोडीफार खालीलप्रमाणे होती.

"जुन्या पुराण्या कवीकडे आणि त्यांच्या कवितांकडे बघितल्यावर तोचतोचपणा जाणवतो आणि निसर्ग, प्रेम, प्रेमभंग, चंद्र, मृत्यू यात सापडलेल्या कवींची कीव करावीशी वाटते. आयुष्याचा व्यासंगी दृष्टीने विचार करताना जीवनाची जी खोली असते ती कोणत्याच पद्धतीने या कवितेत प्रतिबिंबित होत नाही. परंतु आता रसिकांसाठी आणि काव्यप्रेमींसाठी आयुष्याचं व्यावहारिक सार सांगणारे कवी या भूतलावर आहेत. यांना नवकवी म्हणून कितीही हिणवलं तरी आयुष्याची तीव्रता, निरीक्षणशक्ती आम्ही जोरावर मिळवलेली अप्रतिम प्रतिभा याचा विचार केल्यास नवोदित कवींचं कौतुकच वाटतं. आता हीच कविता बघा. 
रात्रीच्या भेसूर क्षणी
कुत्रा भुंकतो
ओऽऽ त्याला दुसरा साद देता 
वेळ अशीच
साद देणारी
एका कुत्र्यासारखी
अंगावर येणारी 
व्वा. या कवितेत संपूर्ण आयुष्याचा अर्थ सामावलेला आहे. संगता-विसंगतीचा सुरेख मेळ या कवितेत साधला आहे. व्यावहारिक कसोटीवरच कुत्र्याचे ओरडणे आणि वेळेला अंगावर येणार्‍या कुत्र्याची उपमा देणे हे कवीच्या प्रतिभेचा अविष्कार घडवतात." 

या काव्यसंग्रहावर मी जवळपास ऐंशी पानाची समीक्षा लिहिली. काव्यसंग्रहाची पृष्ठसंख्या होती चाळीस. ही समीक्षा एवढी गाजली की बस्स. या समीक्षेला आधुनिक समीक्षा क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ समीक्षा मानण्यात येतं.

यानंतर मी समीक्षालेखन सुरू केलं. एका एका दिवसात आठ-दहा पुस्तकांवर समीक्षा लिहायला सुरुवात केली. दोन-तीन पानं वाचली की लेख तयार. पुस्तकाचा वास घेतला की समीक्षा तयार! आता-आता तर मी पुस्तकं न बघताच लिहायला लागलोय.
पुस्तक प्रकाशित व्हायच्या आधीच एका पुस्तकावरची समीक्षाही मी तयार करून ठेवली आहे.

विनोद बिडवाईक

मला करिअर करायचंय !

‘आयुष्यात मला यशस्वी व्हायचंय

आय वॉन्ट टू बिल्ड माय करिअर

छी, असं साधं आयुष्य मला नाही जगायचं

ईईई... फक्त वीस हजार रुपये महिना?’

करिअर... आय हॅव टू डेव्हलप मायसेल्फ

आय वॉन्ट इम्प्रुव्हमेंट...’

रोज कानावर आदळणारी ही परिचित वाक्ये. आयुष्याबद्दल फारसा अनुभव नाही, नुकतंच शिक्षण संपलंय, आयुष्याबद्दल, करिअरबद्दल आणि यशाच्या वेगळ्याच व्याख्या असणार्‍या तरुण-तरुणी जगताहेत एकाच आशेवर, ‘आय वॉन्ट टू बी सक्सेसफुल इन माय लाइफ.’

मागच्या आठवड्यात एका मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये पाहुणा म्हणून जाण्याचा योग आला. व्यवस्थापनशास्त्राच्या, विशेषकरून ‘एमबीएकरणार्‍या पोरांचा स्वतःबद्दल एक वेगळाच समज बहुधा गैरसमज असतो की, जगातील संपूर्ण ज्ञान, प्रगल्भता, निर्णयक्षमता आणि मॅनेजिंग पॉवर दोन-तीन सेमिनार घेतल्यावर लगेच अंगात येते. 

Image result for indian student and career

कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे वाढत जाणार्‍या व्यवस्थापन संस्थेसोबतच अशा विद्यार्थ्यांचीही संख्या वाढत आहे. मेडिकल आणि इंजिनिअरिंग नंतर आता प्रत्येकालाच व्यवस्थापन तज्ज्ञ व्हावयाचे असते आणि त्यासाठी व्यक्तिगत विकासापासून सर्वच development आवश्यक ठरते. या विद्यार्थ्यांचा कल, आणि एकंदर जगण्याबद्दलचे समज बघून फारसं समाधानकारक चित्र सध्या तरी दिसत नाही. ही मुलं राहतात ती आपण management expert झालो याच समजात. छान छान इंग्रजी बोलतात, ग्रुपमध्ये पिकनिक, पार्ट्या करतात आणि स्वतःचा व्यक्तिमत्त्व विकास करतात, डिग्रीही हातात घेतात आणि मग... यांना कळायला लागतं, ‘व्हॉट इज सक्सेस?’

मी एका विद्यार्थ्याला प्रश्‍न विचारला ‘तुझे करिअर, यशस्वी करिअरची डेफिनेशन काय?’ मुलगा चाचपडला, एव्हाना धीटपणे अंग घुसळीत, हाताची विचित्र हालचाल करीत आणि खांदे घुसळीत बोलणारा हा मुलगा गप्प झाला. क्षणभर थांबून तो बोलला. ‘यू नो, आय वॉन्ट टू बी अ सक्सेसफुल बाय एनी वेत्याच्या कानाखाली आवाज काढण्याचा मोह आवरत (त्याच्या तोंडात च्युईंगम होतं) मी परत विचारलं, ‘ते बरोबर आहे, पण करिअर म्हणजे तू काय समजतो?’

अ... विथ गुड पॅकेजेस आणि हाय डेसिग्नेशन.’

बस्स्? हाय डेसिग्नेशन, उच्चपद आणि उत्तम पगार, या दोनच गोष्टी आजच्या तरुणांना आकर्षित करीत आहेत. हीच यांची करिअरची व्याख्या?

करिअर म्हणजे नेमकं काय? हे कोणालाच समजलेले नाही. आजच्या तरुणांच्या मानसिकतेविरुद्ध बोलण्याचं कारण नाही; पण स्वतःबद्दलच्या अवाजवी समजातून निराशा जन्म घेते, हे माझ्या या मित्रांना माहीत नसावं. स्वप्न बघावित; पण आपण आपल्या कुवतीचा विचार करतच नाही. माझा एक मित्र ‘एमपीएससीच्या परीक्षा पास होऊन पोलिस इन्स्पेक्टर किंवा तत्सम ऑफिसर होण्याची स्वप्नं बघून बघून थकला. आता एका वृत्तपत्रात आहे. त्याचा फायदा झाला नाहीच; पण वयाची 29 वर्षे त्याने अशीच वाया घालवलीत. अर्थात त्याच्या कष्टाचं फळ त्याला मिळालं नाही; पण आपण कोठे आणि कोणत्या परिस्थितीत स्वतःला prove करू शकू याचं भान या मित्राला येणे आवश्यक होते. शिवाय वरून या सर्वांचं खापर, रिझर्वेशनवर फोडायचं. याला अर्थ नाही. 

स्वतःची कुवत ओळखून आणि परिस्थितीचाही अंदाज घेऊन करिअरचा विचार करणारी मंडळी खूप कमी आहेत. येथे या मित्राने करिअरची स्वतःची व्याख्या वेगळी केली, स्वतःप्रमाणे; पण हातात पडली साधी नोकरी.
आपल्या इच्छेचा कल लक्षात घेतला जाणे आवश्यक आहे; पण इच्छा आणि करिअरचे समज वेगवेगळे असतात. ‘तो व्यवस्थापन, डिग्री घेणार म्हणून मलाही तेच क्षेत्र आकर्षित करते,’ ही मेंढराची प्रवृत्ती वाढलेली आहे. मध्यंतरी सगळीकडे एक फॅड आलं होतं. इंजिनीअर होण्याचं. आज इंजिनिअर्स गल्लोगल्ली सापडतील. 

बीई डिग्रीनंतर मार्केटिंगला जाणारे विद्यार्थीही आहेत आणि आता ‘मॅनेजमेंटकडे! प्रत्येकाला आपण ‘एक्झिक्युटिव्हझाल्याचा भास होतो. ‘एमबीएला असणारी मंडळी तर कॉर्पोरेट सेक्टरच्या मॅनेजियरिअल केडरमध्ये प्रवेश केला असं गृहीत धरूनच वागतात. पण यापैकी किती जणांची स्वप्ने प्रत्यक्षात अवतरतात? हाय डेसिग्नेशन, उच्चपद आणि पैसा यांना आकर्षित करतो; पण स्वतःच्या क्षमते चा विचार यांच्या डोक्यात येत नाही.

एमबीए फायनान्सच्या विद्यार्थ्याला रुपयांची किंमत माहीत नसते. ‘एमबीए मार्केटिंगचा विद्यार्थी ‘मार्केट सेगमेंटेशनवर बोलू शकत नाही. हे एखादा धंदा यशस्वी करू शकतील? याचं ज्ञान पुस्तकीच राहणार; पण करिअर करताना हा विद्यार्थी तरीही उच्चपद आणि पैसा बघत राहतो. तो त्याला मिळतो; पण ‘यशस्वीहोत नाही.

करिअर म्हणजे उच्चपद, पैसा, बंगला, गाडी, सेक्रेटरी नाही. करिअरचं हे मृगजळ कोठेतरी थांबणार, असं वाटत असताना नवनवीन फॅड येतात. विद्यार्थी मेंढरासारखे त्या कोर्सेसमागे धावतात. ‘आउटपूटमात्र ‘झिरो

एखाद्या कंपनीच्या यशस्वीतेमध्ये आपला वाटा किती हे महत्त्वाचं. वैयक्तिक यश हे करिअरचं मोजमाप होऊ शकत नाही. इतरांसोबत आपण स्वतःची वेगळी इमेज तयार करू शकलो, तर मग उच्चपद, कॉम्पेन्सेशन पॅकेजेसची गरज पडत नाही आणि करिअर म्हणजे उच्चपद आणि पैसा नाही. यशस्वीतेची व्याख्या बदलायलाच हवी.

अनुकरणातून आलेला स्मार्टनेस, ओव्हरस्मार्टनेस! किती खरा, किती खोटा?

कचकड्याच्या बाहुल्या तुम्ही बघितल्या असतील. अशाच बाहुल्या सध्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला बघायला मिळतील. अतिशय कृत्रिमपणे जगणारी ही मंडळी राहतात मात्र पॉश. (पॉश राहायला हरकत नाही; पण त्यांचा हा पॉशपणा कृत्रिम आहे, हे प्रथमदर्शनीच जाणवतं) वागण्यात कसा सराईतपणा असावा, एखाद्या गर्भश्रीमंत व्यक्तीचं वागणं किंवा नवश्रीमंताचं वागणं यात खूप फरक असतो. त्याचप्रमाणे फसवेपण उघड होतो, त्यालाच ओव्हरस्मार्टपणा म्हणायला हवा.

वागण्यात सराईतपणा येण्यासाठी त्यातला मुरलेला असावा लागतो. ते मुरलेपण या मंडळीत नाही. एखादी बाईक घेऊन कॉलेजरोडवर उगाचच सेकंड गियरवर गाडी चालवणार्‍या कार्ट्याचा आगाऊपणा म्हणूनच मस्तकात संतापाची तिडीक आणतो. माणसानं जगावं आपल्या जगात, आयुष्य संपवावं आपल्या मर्यादेत; परंतु कचकड्यांचं अनुकरण जेव्हा काहीजण करतात, तेव्हा ते अधःपतन ठरते. तरुण पिढी या अशा बाईकवर गमजा करणार्‍या थर्डक्लास मानसिकतेच्या कृत्रिम जगावर अवलंबून नाही. आयुष्याची वर्षे जसजशी सरत जातात, तसतशी प्रगल्भता वाढायला हवी, हे कुठेच जाणवत नाही. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक येथे कारणीभूत आहे.

स्मार्टपणा हा नैसर्गिक असतो. ओव्हरस्मार्टनेस कृत्रिम असतो. ओव्हरस्मार्टनेस हा आव असतो आणि शहरात हा ओव्हरस्मार्टनेस जास्त जाणवतो. मम्मी-डॅडीचीही तीच इच्छा असते. आपला मुलगा मित्र-मैत्रिणींच्या गराड्यात असतो किंवा आपली मुलगी गाडी घेऊन बाहेर पडल्यावर काय करते हे त्यांनाही जाणून घेण्याची इच्छा नसते. हा आयुष्यात वाढत चाललेला कृत्रिमपणा स्वैराचारालाच आमंत्रण देऊ शकतो. एका वृत्तपत्राच्या युवा पुरवणीत प्रसिद्ध झालेल्या माझ्या लेखावर अनेकांनी प्रतिक्रिया केल्या. त्यातील बहुतांशी प्रतिक्रिया माझ्या विचारांवर आक्षेप घेणार्‍या होत्या. एका तरुणीने फोन करून ‘तुम्ही आधुनिक विचारांच्या तरुणींच्या विरुद्ध आहात का,’ असा डायरेक्ट प्रश्‍न विचारला. मी कोणत्याही विचारांच्या विरुद्ध नाही. माझा आक्षेप असण्याचं कारण नाही; परंतु स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे.

तथाकथित उच्चमध्यमवर्गीय वर्ग हा समाजाला अनैतिकतेच्या गर्तेत नेत आहे, असं म्हणता येणार नाही; पण समाजातील वाढत्या अनैतिक घटना नैतिकतेच्या पडद्याखाली कशा झाकाव्यात, हे याच वर्गाने समाजाला शिकवलं. एखादी मुलगी कुमारी माता होत असेल, तर हा दोष कोणाचा? खुलेपणा, आधुनिकता ही अशा पद्धतीने रुजत असेल, तर ते नक्कीच अंधानुकरण समजावे लागेल. एखाद्या ग्रुपमध्ये मुलगा-मुलगी याचं नातं फुलतं ते याच आधारावर. आणि म्हणूनच या आगाऊपणावर रोख. आमच्या मनात ‘असं’ काहीही नसतं, असं म्हणणारी मंडळी एकमेकांच्या अंगाला चिटकून बाईकवर फिरतात, याचा अर्थ काय? परंतु आधुनिकता म्हणजे स्वैराचार नव्हे.

अनुपलब्धतेचा सिद्धांत तुम्हाला माहीत असेल. ज्या गोष्टी आयुष्यात कधी मिळाल्या नाहीत, त्या गोष्टी संधी आल्यावर जेव्हा मिळतात, तेव्हा त्या गोष्टींचं अप्रुप जास्त असतं, अशातलाच हा प्रकार. त्याचं प्रदर्शन करण्याची इच्छाही अनावर होते. तसंच अनुभव घ्यावयाची इच्छाही वाढते. जगाच्या कानाकोपर्‍यात अशी असंख्य माणसं सापडतील. ही मंडळी अशातलीच. आपल्या संस्कृतीचा (?) कृत्रिमपणा प्रदर्शन करण्याची हौस याच मंडळींना जास्त असते. आक्षेप यांच्या श्रीमंतीवर नाही, उच्चमध्यमवर्गीय राहणीबद्दलही नाही, आक्षेप आहे तो त्यांच्या मतावर. कारण स्मार्ट असणार्‍याला आपण स्मार्ट आहोत हे सांगण्याची गरज पडत नाही. आपण आहोत असं दाखवणारीच ओव्हरस्मार्ट बनतात. ही संख्या कमालीची वाढली आहे.

परंतु प्रश्‍न या तथाकथित  नवश्रीमंतांच्या आणि उच्चमध्यमवर्गीयांच्या पिढीचा नाही, ती त्यांची नियती आहे. ते तसे वागतात, त्याला तेच जबाबदार ठरतात. प्रश्‍न आहे तो या पिढीचे अनुकरण करणार्‍या सामान्य (?) पिढीचा. जिल्ह्यातील एका विशिष्ट भागातील तरुणांबद्दल आज फारशी चांगली मतं नाहीत. कॉलेजरोडवर फिरणार्‍या या कल्चरलमधील तरुण-तरुणी हमखास ओळखू येतात. अर्थात आपण चर्चा करत आहोत ते याच कॅटेगरीत येणार्‍या सर्वच पिढीबद्दल. अनुकरण करणारी मंडळी मध्यमवर्गीय, थोडीफार संस्कारीत घरातील असतातच; परंतु आपणही त्यांच्यासारखे वागायला हवं असं प्रत्येकालाच वाटतं. प्रश्‍न या वाटण्याचा आहे. या अनुकरण करणार्‍या जमातीत एक प्रकारचा अधाशीपणा जाणवतो. यांचं वागणं अधाशी असतं, यांचं पाहणं अधाशी असतं आणि स्मार्टनेस उपजतच नसतो. मग ते ओव्हरस्मार्ट बनतात. चांगल्या घरातील संस्कारी मुलगी आपण आधुनिक आहोत हे दाखवण्यासाठी कपड्याची लांबी कमी करते, कपड्यांची फिटिंग अधिक टाइट/तंग करते आणि तरुणांच्या सोबत खुलेपणाने मैत्री स्वीकारते. ही तिची संस्कृती असते म्हणून नाही, तर या आधुनिकतेच्या आणि नवश्रीमंत/उच्चमध्यमवर्गीयांच्या नादाला लागून! मग अशा तरुणींच्या वर्जीनिटीवर एखाद्याने शंका घेतली की ती चडफडते; पण मुळात दोष कुणाचा? बलात्काराच्या केसेस चर्चिल्या जातात; परंतु याच कल्चरमध्ये एखाद्या ग्रुपमधील तरुण-तरुणी आपल्या मर्जीविरुद्ध स्वतःच्या आगाऊपणामुळे एखाद्याच्या मिठीत जाते आणि स्वतःचं स्वत्व गमावून बसते, तेव्हा दोष कोणाचा? या अनुकरणप्रियतेचाच ना? कॉलेजला दांड्या मारून बाईकवर चकरा मारत मुलींवर इम्प्रेशन मारणार्‍या तरुणाच्या थोबाडीत बसल्यावर त्याला वाईट वाटेल; पण दोष त्या अनुकरणप्रियतेचाच ना? आपलं अंगप्रदर्शन करण्याची इच्छा या अनुकरणप्रियतेतच ना?

माणसाने फक्त स्मार्ट बनावं, ओव्हरस्मार्ट नव्हे. पालकांनी आपली मुले रात्री उशिरा का येते, हे जरूर तपासून पाहावं. आपल्या कन्येचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत, हेही तपासून पाहावं आणि कार्ट असेल, तर याचा पॉकेटमनी एवढा आपण खरंच सहन करू शकू का, याचाही विचार करावा.

नैतिकतेच्या गप्पा मारण्यात अर्थ नाही; पण प्रश्‍न आहे हायब्रीड कल्चरचा आणि हायब्रीडला ओरिजनलची सर कधीच येणार नाही. माणसानं जगावं; पण मग याचा दोषही दुसर्‍यावर फोडू नये.

विनोद बिडवाईक

स्वप्न

Related image

दूरवर पसरलेलं पाणी, उन्मत्त मस्तीने खेळणारं, कधीकधी शांतपणे आपल्याच जगात थिजून गेलेलं. त्याहीपलीकडे क्षितिज. धरतीच्या आकाशासोबत मिलनाच प्रतीक. आपल्याला वाटतं धरतीचे आणि आकाशाचं मिलन झालंय. जसंजसं जवळ जावं तसतसं ते दूरच जातं. तो निव्वळ आभास असतो. अस्तित्वात नसणारं जग असतं ते. आपण मग त्याला क्षितिजाची उपमा देतो. वाटत राहतं कधीतरी दृष्टीस पडेल की हे क्षितिज. आयुष्य संपून जाते; पण क्षितिज भेटत नाही. धरतीचं आकाशासोबत मिलन कधीच होत नाही. आकाश वाट बघतो त्या वेळेची, जी कधी येणारच नसते. वेडी धरित्री मात्र मनात आशा ठेवून असते...

...अगणित घटिका असतात हृदयात जपून ठेवलेल्या. सोबत फक्त या आठवणींचीच... धरतीलाही आणि आकाशालाही. आकाश कोसळू शकत नाही. धरती उडू शकत नाही. कर्तव्याच्या बंधनात जखडलेली असतात दोघंही. जे आयुष्य वाट्याला आलं ते जगावंच लागतं. 

रुक्ष वाळवंट, सूर्याची किरणं धरतीवर चहूबाजूंनी वर्षाव करताहेत प्रेमाचा. दोघांच्या या प्रणयात आपण मात्र जळतो. अंगाची लाही-लाही होते. धरती आणि सूर्याची किरणे यांच्या मिलनातून जन्म होतो एका आभासाचा... मृगजळाचा! दोघांसाठीच असतं ते मृगजळ. एकमेकाला चटका देण्यासाठी, खोड्याच काढायच्या असतात एकमेकांच्या एकमेकाला. आपण मात्र नक्कीच वेडे. हरणं बिचारी, तहानलेली असतात. पाणी पाणी म्हणून शोधत असतात. एखाद्या पाणथळ जागेला भेटत नाही. वेडी हरणं शोधत राहतात त्या मृगजळाला. जे अस्तित्वातच नसतं.

वेडा चकोर, चातकासारखा वाट बघत राहतो प्रियतमेची. पौर्णिमेची आणि चांदण्यांची, चांदण्यांची आणि चांदरात्रीची, चांदरातीची आणि मिलनाची. एखाद्याचं आयुष्यच असतं दुसर्‍यासाठी. चंदाराणी मात्र खूप फिरवते चकोराला. बिचारा चकोर वेडा झालेला. एकदाचं चांदणं पडतं... चकोर येतो, आनंद गगनात मावत नाही, चांदणं आणि चकोराचं मिलन होतं का? परत आभासंच... चकोराला वाटत आपण चांदणं पितोय. शक्य आहे? रात्र संपते. चांदण संपते. चंदाराणी निघून जाते चकोराला हूरहूर लावून... चकोर वेडाच, वाट बघत राहतो... आयुष्यभर.... कित्येक योजने.... मिलन होतच नाही.



त्याचं अस्तित्व आहे, सभोवती, चहूकडे, त्याचं प्रेम निष्कपट आहे. पण वेडा एवढा छळतो की दिसतच नाही. दासी विचारते, ‘राजकुमारी तो येईल नक्कीच, स्वप्तात तरी.’

वेडी उषा, स्वप्न कसं पडणार, त्याने झोपच उडवलीय की. आणि आश्‍चर्य... पापणी मिटली तसा... तो आला स्वप्नात ! पांढर्‍या अश्‍वावर स्वार होऊन... हवेच्या वेगानं... सुंदर, रुबाबदार चेहरा... कोण बरं हा? नाही ओळखता येत... वेडा हात देतो आणि स्वप्न तुटतं... खंड पडतो... हूरहूर अनामिक, कोण बरं हा?

उषाची चित्रकला छान. सकाळी हातात ब्रश घेऊन ती चित्र काढते, त्याचं... स्वप्नातल्या राजकुमाराचं... आणि आत्मविश्‍वास असतो, सकाळची स्वप्ने खरी होतातच की! दासीच्या हातात देते ते चित्र आणि सांगते... मला माझा राजकुमार हवाय....
स्वप्नातला राजकुमार शोधते उषा अशा पद्धतीने. श्रीकृष्णाचा नातू अनिरुद्ध.
अनिरुद्ध आणि उषेचं मिलन होतं...

स्वप्नं, स्वप्नंच स्वप्नं... गोड... अंधूक... आशावादी... काही खरी... काही खोटी... आभासी क्षितिजासारखी... मृगजळासारखी... चकोर आणि चांदण्यांच्या प्रेमकहाणीसारखी...

...एखादंच स्वप्न उषा आणि अनिरुद्धच्या मिलनाचं.

विनोद बिडवाईक

मंगळवार, ६ नोव्हेंबर, २०१८

लसीकरण

मी पहिलीत असतानाची गोष्ट असावी. आमच्या लहानपणी शाळेत वेगवेगळ्या लसी देण्याच्या कार्यक्रम असायचा. त्यावेळेस आपल्या मुलांना ह्या लसी देणे किती महत्वाचे आहे हे कदाचित पालकानाही माहित नसायचे. मग हि भूमिका सरकार पार पाडायचे. सरकारी डॉक्टर, नर्सेस आणि त्यांचे सहकारी सकाळी शाळेमध्ये ठाण मारून असायचे . शिक्षकांची आणि डॉक्टरांची लगबग असायची. स्टोव्ह पेटवला जायचा. अभ्यासाला सुट्टी म्हणून आम्ही खुश. पण आता हि माणसे आपल्याला काहीतरी टोचणार म्हणून दुसर्या बाजूने आम्ही चिंतेत. "एका डोळ्यात आनंदाश्रू आणि दुसऱ्या डोळ्यात दुखाश्रू " हि म्हण तेव्हापासूनच आम्हाला समजायला लागली. दोन्ही डोळे भरून यायचे. त्यात काही मुले ते वातावरण बघून आधीच भोकांड पसरायचे . काहीजण हे मी काय घाबरतोय ? म्हणून दंडाच्या बेडक्या पुढे काढून सज्ज असायचे. पण सर्व वातावरण एकंदरीत गंभीर असायचे . काचेच्या सिरींज आणि सुया पाण्यात उकडायला सुरुवात व्हायची. कासायासमोर ओढत नेण्याआधी बकऱ्यांची मनस्थिती आणि आम्हा मुलांची परिस्थिती यात काहीही  फरक असणार नाही याची मला खात्री आहे.

Related image
सहाय्यक कधी प्रेमाने तर कधी खेचत मुलांना सरळ रेषेत उभा करायचा. डॉक्टर हसत चेहऱ्याने , काहीजण गंभीर चेहऱ्याने दंडावर खसखस  स्पिरीट घासायचे. आणि टचकन सुई आत टोचायचे. पहिली, दुसरीतील ती मुलं वेदनेने किंचाळायची , काहीजण फक्त अश्रुच काढायची, तर काहीजण बलदंड मुलं शौर्याचा आव आणायची. त्यांच्या डोळ्यात मात्र टचकन पाणी यायचे. 

एकंदरीत वातावरण युद्धभूमीवरील वातावरांसारखे असायचे. पानिपतच्या युद्धातही अशी कत्तल मराठ्याची झाली नसेल. अश्याच एका लसीकरणाच्या कार्यक्रमा दरम्यान लसीकरण टीम शाळेत आलेली होती. ते बघून आणि पूर्वाश्रमीचा अनुभव लक्षात घेत, काही मुलांनी भोकांड पसरायला सुरुवात केली. मीही त्यातला एक. वय सुमारे चार अथवा पाच. गाव लहान. 

माझे वडील तेथून जात होते. रस्त्यावरून त्यांनी तो गोंधळ ऐकला. आत काय सुरु आहे म्हणून त्यांनी शाळेत डोकावून बघितले. बघतात काय तर माझ्या डोळ्यात अजून जास्त अश्रू. ते बघून ते सरळ आत आले, मला उचलून घेतले, माझे अश्रू पुसले. समजावून सांगितले. वडिलांच्या आश्वासक स्पर्शानी आणि साब्दानी माझी भीती पळून केली.

आपल्या मुलाचे अश्रू आपल्या आईवडिलांना नको असतात. अश्रू बघून त्यांच्या काळजात धासा होतं. मला आठवत , माझी पत्नी डॉक्टर असूनही, माझ्या मुलाच्या, तो एक वर्षाचा असताना, ब्लड टेस्ट करताना तचे डोळे डबडबले होते. 

आपल्या मुलांना जपणाऱ्या, त्यांच्या अश्रुने केविलवाणे होणाऱ्या आपल्या आईवडिलांचे महत्व कदाचित आपण जाणत नाही. जेव्हा ते जाणवते तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते.



विनोद बिडवाईक

शनिवार, ३ नोव्हेंबर, २०१८

नसलेल्या मंगळसूत्रानं घात केला

Related image

तशी ही घटना काही वर्षांपूर्वीची. असंच जून महिन्यात आमच्या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संघटनेची घटक असलेल्या संघटनेचे विभाग पातळीवरचं अधिवेशन होतं. या अधिवेशनात मुंबई, पुणे, नाशिक, नगर वगैरे भागांतून दीडशेच्या आसपास सभासद होते. वातावरण अर्थातच उच्चभ्रू मंडळींना शोभेल असं.

पहिल्या दिवशी डिनरच्या वेळी एका सुंदर तरुणीने माझं लक्ष वेधून घेतलं. मी मित्रांसोबत गप्पा मारत असताना ती एकटक माझ्याकडे बघत होती. मी चपापलो. पण तिच्या डोळ्यांनी माझा पिच्छा सोडला नाही. माझ्या नकळत मी तिला एक छान स्मित दिलं आणि तिथेच फसलो. तिनंही खूप दिवसांची ओळख असल्यासारखं गोड हसू फेकलं आणि मी गारदच झालो.

मित्रांची नजर चुकवून मी तिच्याकडे गेलो. या बुफे डिनरच विचित्र असतं. ते ताट सांभाळत उभ्यानं जेवण करणं मला कधीही जमलं नाही. एवढ्या गर्दीत ते ताट सांभाळीत मी तिच्याकडे सरकलो. माझ्या ताटातला गुलाबजामून तिने पटकन उचलून स्वतःच्या तोंडात टाकला. 

‘डिनरच्या वेळेसच खूप ओळखी होतात, असं माझं वैयक्तिक मत आहे.’  तिनं शुद्ध इंग्रजीत संभाषण सुरू केलं. एकदा संभाषणाला सुरुवात झाल्यावर मीही लाजणं सोडून दिलं. 
‘आय अ‍ॅग्री.’ मी तिला अनुमोदन दिलं. ‘पण एक प्रॉब्लेम नेहमीच येतो. कसं बोलावं?’ तिचा प्रश्‍न.
‘कधी कधी मी प्रथम खावं की बोलावं, या विचारात असतो. दोन्ही काम मला एकदाच करता येत नाहीत,’ मी.
 ‘का?’
‘अहो, जेवण ठीक आहे; पण जेवताना बोलणं. तेही कसरत करत म्हणजे महादिव्यचं. पण तरीही कधीकधी मी जेवावं की निव्वळ बोलावं हे सोबत कोणाची कंपनी आहे, यावर ठरवतो.’
‘कसं काय?’
‘इफ द पार्टनर इज लाईक यू, देन आय विल डेफिनेटली इट फर्स्ट.’
‘ओ. नो.’
‘बिकॉज, व्हेन पार्टनर इज लेडी, आय रेअरली गेट अ चान्स टू स्पिक.’
‘ओ गॉड, तुम्ही तसं समजता?’ म्हणजे मी तुम्हाला बोअर करीन अशी तुम्हाला भीती वाटते?’ ती हसत-हसत म्हणाली.

भोजनाचा आस्वात घेत घेत मस्तपैकी हसत खेळत आमचा संवाद सुरू होता. मित्रांचे चेहरे अशा वेळेस जसे होतात तसेच झाले होते. रात्रीचा कार्यक्रम कोणता तिनेच विचारलं.
‘सेशन है कौनसा?’ 
‘सेशनकी नहीं मै आपकी बात कर रही हूँ?’ सेशन अटेंड करेंगे आप?’ 
विचित्र चेहरा करीत ती उत्तरली.

तिचं ते नदीच्या वाहत्या पाण्यासारखं हसू... माझ्या शाब्दिक कोटीवर ओठ दुमडून हसत छानसा दिलेला प्रतिसाद. तिचाही हजरजबाबीपणा, विनोदबुद्धी आणि बोलण्याची विशिष्ट पद्धत. आम्ही डायनिंग हॉलमधून खाली जायला निघालो. तेवढ्यात तिला कोणीतरी विचारलं. ‘हॅव यू टेकन युअर डिनर हनी?’ ‘हनी?’ चक्क माझ्यासमोर हनी? मी चडफडलो.

‘येस डार्लिंग.’ म्हणत तिने माझ्या खांद्यावर थपथपत विचारलं. ‘इन्हे पहचानतो हो?’ मी होकारार्थी मान हलवली.

‘मिलो, यह है मेरे हजबंड मिस्टर.... अँड डार्लिंग हि इज माय न्यू फ्रेंड. व्हेरी इंटरेस्टिंग पर्सनालिटी, समीर पोतदार.’ तिच्या नवर्‍याने हसत त्याचा राकट हात पुढे केला. टच्च भरलेला फुगा टाचणीने फुटावा तसं माझं झालं. आमच्या संघटनेच्या चेअरमन सोबतच मी भेटत होतो!

मंगळसूत्र हे भारतीय विवाहित स्त्रीच्या वैवाहिक जीवनात शाश्‍वत प्रतीक समजले जाते. पण आता मंगळसूत्र गळ्यात घालणे म्हणजे मागासलेपणाचं लक्षण समजलं जातं. किंवा नवर्‍याच्या बंधनाचे प्रतीक मानलं जातं. माझा 
नेमका इथेच घोटाळा झाला. कारण तिच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हतं आणि त्यानंच माझा घात केला होता.

मी तिच्याकडे बघितलं, ती हसत होती, पहिल्यासारखीच. पण मला मात्र त्या हास्यात मिश्किलतेची झाक दिसली.

(काल्पनिक) 

विनोद बिडवाईक

हे ‘तिला’ कळलं तर ?

कॉलेजच्या कट्टयावर आमचं आठ-दहा जणांचं टोळकं, नेहमीप्रमाणे टवाळक्या करत आणि येणार्‍या प्रत्येकावर काहीतरी कॉमेंट्स करत आनंद लुटत बसलं होतं. ‘कोण्या गावाचं आलं पाखरू,’ असं म्हणतं एका मित्राने माझं लक्ष एका कन्येकडे आकर्षित केलं. मीही आकर्षित झालो. तिचं व्यक्तिमत्त्वच तसं होतं. दिसायला ती सुंदर तर होतीच; पण त्या सुंदरतेतही एक प्रकारचा प्रगल्भपणा तिच्या चेहर्‍यावरून जाणवत होता. डोळ्यावर चढवलेला बारीक काडीचा चष्मा तिला अधिकच शोभून दिसत होता. मित्राची वरील कॉमेंट मला नाही आवडली. ती जवळ आल्यावर टारगटांनी मात्र गलका केलाच. ती आमच्याजवळ आली, क्षणभर थांबली आणि गोड स्मित देऊन निघून गेली. आम्ही सर्वजण अवाक.

दुसर्‍या दिवशी तोच किस्सा. लेक्चर तर आम्ही करत नव्हतोच. त्यात कॉलेज सुरू होऊन फार दिवसही झाले नव्हते. एक दिवस मी तिला रस्त्यातच गाठलं.  
‘हॅलो’ तिने छानसा प्रतिसाद दिला.
‘व्हॉट्सगोईंग ऑन’ मी.
‘एव्हरीथिंग इज ओके’ ती.
‘तुम्ही कोणत्या क्लासमध्ये?’
मला मध्येच कोणीतरी हाक मारली. आमचा संवाद तेथेच थांबला.

मध्यंतरी 75 टक्के प्रेझेंटी कम्पलसरी असल्यामुळे कॉलेजचे लेक्चर मनाविरुद्ध अटेन्ड करावे लागायचे. एक दिवस तिनंच मला थांबवलं.
‘मी तुम्हाला नेहमी क्लासच्या बाहेर बघते, तुम्ही नेमकं करता काय?’
मला अशा पद्धतीने विचारण्याचा तिला हक्क नव्हता; पण मी गप्प राहिलो.
‘लिसन... यू शूड अटेंड दि क्लास’
तिने जरबेनं बोलत; पण हसत मला बजावलं.
मी हा किस्सा ग्रुपमध्ये सांगितला. सर्वांनी माझी मनसोक्त चेष्टा केली आणि शेवटी तिच्या मनात माझ्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर (हा कॉर्नर नेमका कसा असतो हो?) निर्माण झाला आहे, या निष्कर्षाप्रती ती सभा आली.

‘न जान, न पहचान, और इतने जल्दी मुझपर राज’ अशी परिस्थिती माझी झाली.
मग मलाही लेक्चर्स अटेंड करावे असं वाटू लागलं. मी तसा बर्‍यापैकी हुशार. (फर्स्ट क्लास कधी सोडला नाही.) आपली शिक्षणपद्धती एवढी विचित्र आहे, बापरे लेक्चरला बसणे ही शिक्षा वाटायला लागते. अर्थात काही विषय मस्त जमून यायचे. प्राध्यापकही छान होते. एकदा तीन लेक्चर्स अटेंड करून अतिशय कंटाळून मी बाहेर पडलो, बाहेर ती उभी.
‘हॅलो’ मी.
‘हॅलो, यू आर इन टीवाय मायक्रो?’ 
‘यस’
‘यू इडियट, देन व्हाय डिडन्ट यू अटेंड ऑदर क्लासेस?’ तिच्या बोलण्यावर ती माझी नवीन लेक्चरर होती हे कळून चुकले.

‘सॉरी मॅम, बट यू कान्ट स्कोल्ड मी. अँड अगेन यू हॅव नॉट एनी राईट टू से मी इडियट’ मी थोडा आव आणून तिला बजावले.
‘ओके माय इडियट, नाऊ सीट इन दि क्लास.’

पंधरा दिवसातलं हे स्थित्यंतर मला बरंच काही शिकवून गेलं. विजयश्री वर्षापूर्वीच एम. एमएस्सीचं गोल्डमेडल मिळवून पहिली आली होती. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात आता एका रिसर्चवर काम करत होती. माझ्यापेक्षा जास्तीत जास्त दोन वर्षांनी मोठी असेल ती. एका प्राध्यापिकेच्या लिव्ह व्हॅकेन्सीवर दोन महिन्यांसाठी आली होती.

जेनेटीक्समधली माझी रुची विजयश्रीमुळेच वाढली. तिच्यासोबत माझी एवढी गट्टी जमली की क्लासच्या बाहेर मी तिला ‘विजू’ म्हणत संबोधू लागलो, ती मला ‘विनय.’

दोन महिन्यांचा कालावधी संपूनही गेला. विजयश्रीने सर्व वर्गाची मने केव्हाच जिंकली होती. मला चांगलं आठवतं, तो दिवस होता ‘टिचर्स डे’चा. आम्ही एक मोठ्ठा बुके विकत घेतला होता. तो तिला भेट दिला. तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. शेवटी ती ‘डोन्ट फिल दॅट आय एम लिव्हिंग यू’ एवढंच बोलली. आणि त्याच दिवशी संध्याकाळी तिने मला रुमवर बोलावलं. एक छानशी भेट वस्तू घेऊन मी तिला भेटायला गेलो.

‘गुड... आलास?’
‘.............’ मी नि:शब्द, मला काय बोलावं हे समजत नव्हतं.
‘विनय, तुला महितीये मी तुला इथे का बोलावलं आहे?’
मी प्रश्‍नार्थक चेहर्‍याने तिच्याकडे पाहत राहिलो.
‘विनय, डोन्ट नो व्हाय; पण काही दिवसांपासून वाटतंय,’ ती बोलावं की नाही बोलावं या द्वंद्वात... फिरत्या टेबलफॅनकडं बघत, ‘काय वाटंत विजू?’
‘तुझा गैरसमज तर होणार नाही ना?’
‘नाही विजू.’
‘विनय, मला असं वाटतंय, मी तुझ्यात खूप गुंतलेय.’

ती माझ्यात गुंतलीय हे मला कळायला लागलं होतंच; पण एवढ्या स्पष्टवक्तेपणाची मी अपेक्षा केली नव्हतीच. तिच्या या बोलण्यावर काहीतरी प्रतिसाद द्यावा म्हणून मी विचारलं’
‘कोणत्या दृष्टीने म्हणते आहेस तू हे विजू?’
‘वुई....’ ती शब्द जुळवतेय....
‘विनय, जेव्हा त्या टारगट मुलांच्या घोळक्यात तुला बघितलं, तेव्हाच मला तुझ्याबद्दल एक अनामिक आकर्षण वाटू लागलं होतं. यापूर्वी आपण कोठेतरी भेटलो किंवा नाही हे आठवत नाही. पण, निश्‍चितच कशाचा तरी संदर्भ आहे. आय फिल, जो चेहरा मी शोधत होते, तो तुझाच आहे.’ मी अक्षरश: शहारून गेलो.

‘यू आर माय सिनियर विजू, अँड डोन्ट फरगेट, टिचर आल्सो...’ मी हे औपाचारिकतेसाठी बोलतो. बाकी मलाही काहीतरी वाटू लागलं होतंच हे नाकारण्यात अर्थ नाही.

‘लिव्ह इट यार, वुई आर फ्रेन्डस्, देअर इज नॉट अ पॉइंट ऑन टिचर-स्टुडन्टस् रिलेशनशिप.’ ती माझ्याकडे रोखून पाहत बोलली.
‘थँक्स गॉड मला भलतंच वाटलं.’ मी हसत उत्तरलो.
‘मी माझं बोलणं संपवलं नाही. विनय, आय... आय फिल... मी तुझ्या प्रेमात पडलेय.’ ती अधिकच भावनाप्रधान झाली. तिच्या चेहर्‍यावरचे भाव पाहून मला भडभडून आलं. अतिशय करुण भाव, तिला नक्कीच माझ्या आधाराची गरज होती.

‘एनीवे, मी मनात काही ठेवत नाही, तुला हे सांगितलं नसतं तर मी मनातच धुसफुसत राहिले असते. उद्याचं रिझर्वेशन आहे. रेल्वेस्टेशनवर सोडायला येशील ना रे?’ तिचा शेवटचा ‘रे’ एवढा भावनाप्रधान होता, की माझे  हात तिच्याभोवती केव्हा लपेटले गेले हे मला कळालेच नाही.

द्वंद्व, भयानक द्वंद माझ्या डोक्याच्या ठिकर्‍या उडताहेत की काय एवढे विचार. विजयश्री आणि मी दोन महिन्यातले सर्व क्षण उजळून काढले. प्राध्यापिका, विद्यार्थी, मित्र-मैत्रीण, प्रियकर-प्रेयसी, सर्व बाजूंनी मी विचार केला.

या वयात हे काय भलतंच. डिग्री घेतल्यावर एक प्रश्‍नचिन्ह होतंच. आयुष्याचा एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा होता. ती माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने मोठी होती. तिच्या ज्ञानाची बरोबरी मी करू शकणार होतो? पण, शेवटी ती माझी दोन महिन्यांसाठी का होईना माझी प्राध्यापिका होती आणि मी मुर्खपणा करून बसलो होतो. तिला काल प्रतिसाद देऊन.

मनातल्या संपूर्ण भावना कागदावर जिवंत झाल्या. शब्द न् शब्द माझ्या भावनेची झिलई घेऊन सजीव झाला. सर्व विचार करून मी विजयश्रीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. पत्र पाकिटात बंद केलं.

रेल्वेस्टेशनवर तिच्याकडे ते पत्र सोपविताना एकच अट टाकली. पत्र दिल्लीला पोहोचल्यावरच फोडायचं. मध्ये कुठेही नाही. जड अंत:करणाने विजू माझ्या आयुष्यातून निघून गेली.

मी काहीसा निर्धास्त झालो. मनावरचं एक दडपण कमी झाल्याचं जाणवत होतं. विजयश्रीला विसरण्याचा प्रयत्न करू लागलो. क्लासमध्ये, कॉलेजमध्ये, कट्ट्यावर विजयश्रीचा विषय निघाला की मी निर्विकारपणे त्यात भाग घ्यायचो. एक जाणवलं, हे संपूर्ण प्रकरणच कठीण होतं.

आणि एक दिवस माझ्या नावावर एक पत्र नोटीस बोर्डवर लटकल्याचं मला दिसलं. विजयश्रीचंच होतं ते पत्र. ते पत्र वाचून मी अक्षरश: वेडाच व्हायचो बाकी राहिलो. पत्र थोडक्यात होतं, तिनं लिहलं होतं...
‘माय डियर विनय,
तुझं पत्र वाचून दु:ख वाटलं. प्रेमभंगांचे दु:ख काय असतं हेही अनुभवलं. मॅच्युअर आहेस. माय इडियट, तू सायन्सऐवजी फिलॉसॉफी घ्यायला पाहिजे होतं. म्हणजे मीही सुटले असते. एनिवे, मी माझा रिसर्च प्रोजेक्ट संपल्यावर नाशिकला येणार आहेच. तूर्त कोणाच्या प्रेमात पडायचा विचार नाही. तुझ्यावर दबाव टाकण्याचा प्रश्‍नच नाही, तसं तू समजूही नकोस. तू बाकी नंतर उत्तर दे... तुझीच...
- विजू’

विजूचा रिसर्च संपलाय. तिला एक-दोन महिन्यांत पीएचडी मिळेल. नावापुढे डॉक्टर लागेल तिच्या. माझंही पोस्टग्रॅज्युएशन झालंय. धसका घेऊन मी बीएस्सीनंतर मॅनेजमेंटकडे वळलो. आता मॅनेजमेंटमधला नामांकित ‘रिसर्चर’ म्हणून प्रसिद्ध पावतोय. एका बड्या कंपनीची नोकरी, गाडी, कंपनीने दिलेला बंगला सर्व दिमतीला आहेत. विजयश्री आणि मी लग्नाच्या बंधनात लवकरच अडकण्याची चिन्हे आहेत. पण...

माझ्या बॉसची मुलगी माझ्या प्रेमात पडली आहे. आणि बड्या कंपनीच्या अपरिहार्य राजकारणात मी माझ्या नकळत ओढला गेलो आहे.

उज्ज्वल भवितव्यासाठी बॉसची मर्जी सांभाळणं गरजेचं आहे. माय गॉड, परत द्वंद्व... भयानक द्वंद्व.


‘प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, पण हे त्याच्या बायकोला सांगू नका हं,’ असं एक वाक्य आहे. राधिका, बॉसची मुलगी माझ्या यशाचं कारण होण्याची शक्यता आहे; पण हे विजयश्रीला कळलं तर...?

 (काल्पनिक) 

विनोद बिडवाईक