"अॅलोपथी, आयुर्वेदिकपासून ते होमियोपथीपर्यंत खूप डॉक्टरांची प्रॅक्टिस या एकट्या सर्दीवर आणि या सर्दीच्या संबंधित आजारावर चालत असावी."
वर्ष २००२-२००३
माझी सर्दी ही माझ्या धर्मपत्नीची सख्खी सवत आहे असं तिला वाटतं, ती डॉक्टर असूनही , शक्य आहे. अर्थात त्याचं कारणही तसंच आहे. वर्षातून बहुतांशी दिवस मी अॅलर्जीच्या सर्दीने बेजार असतो. आता आता तर त्याची मला सवय होत चालली आहे. ऐन मोक्याच्या वेळी येऊन ती खूपदा विश्वासघात करते. फजितीही करते. अगदी सुंदर मैत्रिणीने बायको असताना प्रेमाने गालावर टिचकी मारावी तशी. पण खरं पाहता आता मी या सर्दीला खूप कंटाळलो आहे.
जगातील 85 टक्के लोकांना या सर्दीचा त्रास आहे, असं संशोधकांचं मत आहे. प्रत्येक डॉक्टरकडे या सर्दीचे नेहमीच पेशंट असतात. अॅलोपथी, आयुर्वेदिकपासून ते होमियोपथीपर्यंत खूप डॉक्टरांची प्रॅक्टिस या एकट्या सर्दीवर आणि या सर्दीच्या संबंधित आजारावर चालत असावी.
अर्थात या सर्दीवर कोणताच उपाय नाही. त्यासाठी ज्यामुळे ही सर्दी होते, त्या संबंधित गोष्टीच टाळणे योग्य, असं डॉक्टरांचं मत असतं. एखादी anti-allergic गोळी अथवा इंजेक्शन मारून तेवढ्यापुरती सुटका होते. हे एवढं असूनसुद्धा याच सर्दीवर प्रत्येकाकडे आपापला उपाय असतो.
लाल झालेलं नाक आणि सतत येणार्या शिंका बघून खूप जण वेगवेगळे उपाय सुचवतात.
‘तुम्ही असं करा, रात्री झोपायच्या वेळेस फुटाणे खाऊन झोपा.’
‘तांब्याच्या पात्रात रात्रभर पाणी ठेवून ते पाणी प्या.’
‘रात्री तीन वाजता उठून एक तांब्या पाणी गटागटा प्या.’
एक तांब्या पाणी गटागटा पिण्यासाठी रात्री तीन वाजता उठणे आणि परत झोपणे, हा उपाय ऐकून उन्हाळ्यातही थंडी वाजते आणि थंडीच्या दिवसात उन्हाळा आठवतो.
काही जण वेगवेगळे डॉक्टर सूचवतात. काही जण हमखास होमियोपॅथीचा उपाय सूचवतात. अर्थात वरील उपाय सुचवणार्यांची सर्दीही कोणत्याच उपायांनी बरी झालेली नसते. तरीही मी ते उपाय करण्याचा प्रयत्न करतो. त्यापैकी एक सुंदरसा उपाय मात्र बहुतेकांना आवडत असावा. तो म्हणजे ब्रँडी घेण्याचा.
‘डॉक्टरर्स ब्रँडी हे सर्दीवर रामबाण उपाय आहे.’ माझ्या एका मित्राने एक दिवस हा उपाय मला सांगितला. ही ब्रँडी फक्त एक चमचा एक महिना घ्यायची. नंतर लक्षात आलं. एक ब्रँडीची बाटली एक महिना पुरायला तर हवी. फक्त एक चमचा ब्रँडी घेऊन सर्दी कशी बरी होईल? असो.
पण असे कित्येक उपाय केले तरी सर्दी काही जात नाही.
अॅलोपॅथी, अॅण्टिअॅलर्जिक गोळ्यापर्यंत मर्यादित आहे. आयुर्वेदिक लॉन्ग टर्म प्रक्रिया आहे , मग होमियोपॅथी ती अगदी वेळखाऊ पद्धती आहे. काट्याने काटा काढण्याचं होमियोपॅथीचं तंत्र मात्र भन्नाट आहे.
एका होमियोपॅथी डॉक्टरने माझ्या एका मित्राला एक ट्रीटमेंट दिली. तो सतत दोन दिवस दुप्पट सर्दीने शिंकत होता. शेवटी कंटाळून सर्दी थांबवण्यासाठी त्याने एक सीपीएम अॅलोपॅथीच्या डॉक्टरकडे टोचून घेतला.
" एखाद्या विशिष्ट गोष्टीने तुला सर्दी होते. हा तुझा Mental Block आहे." एका मानसशास्त्रज्ञ मित्राने हे वाक्य माझ्यावर फेकलं. त्याच्या मते अॅलर्जीची सर्दी Psychic उपायांनी (?) (म्हणजे मानसशास्त्रीय उपायांनी) बरी होऊ शकते. त्यामुळे धुळीमुळे, भाजीच्या फोडणीच्या वासाने अथवा वातावरणातील बदलांमुळे तुला सर्दी होते, हे डोक्यातून काढून टाक. तू हमखास धुळीत लोळ, फोडणीचा वास घे, न घाबरता बघ तुझी सर्दी कशी बंद होते ती!
हा उपाय भयंकर महागात पडला. कारण रोगापेक्षा उपाय भयंकर होता.
एका मित्राने एक फॉर्म माझ्याकडे दिला. "तू हा फॉर्म भर. तुझी सर्दी आपोआप कमी होईल."
"निव्वळ फॉर्म भरल्यामुळे सर्दी कशी काय गायब होणार?"
"अरे तुझा हा फॉर्म भरल्यानंतर डॉक्टर त्यावर अगदी योग्य निदान करून उपाय करतील. परंतु यामध्ये माहिती संपूर्ण सत्य आणि पूर्ण असावी. नाहीतर you will be in trouble," अशी धमकी देणे तो विसरला नाही. मी फॉर्म घेतला आणि भरायला सुरुवात केली. कठीण होतं. फॉर्ममध्ये माझी संपूर्ण माहिती, माझ्या पूर्वजांची माहिती, ते कशाने मेले याची माहिती, माझ्या सवयी, माझ्या घरच्यांच्या सवयी, मी रोज सकाळपासून झोपेपर्यंत काय काय करतो त्याचे टाईमटेबल, माझ्या खाण्याच्या सवयी, माझ्या तक्रारी, त्या कशा सुरू झाल्या... बापरे! हा फॉर्म माझ्यावर एक अहवाल होईल एवढा मोठा होता.
"This is a psychomopath remedy' ’ मित्र हसत उतरला !
माझी सर्दी केव्हा गायब होईल ते होवो, पण आता मला त्या सर्दीपेक्षा त्यांच्यावरचे उपाय किचकट वाटायला लागले होते.
_______________________________________________________________
_______________________________________________________________
वर्ष २००५ नंतर
शेवटी हि सर्दी माझ्या डॉक्टर बायकोला शरण आलीच.
शेवटी हि सर्दी माझ्या डॉक्टर बायकोला शरण आलीच.
माझ्यावर पूर्ण स्टडी करून, आयुर्वेदाची खास ट्रीटमेंट आणि खाण्यापिण्याचे अनेक healthy प्रयोग येथे कामी आलेत.
विनोद बिडवाईक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा