शनिवार, ३ नोव्हेंबर, २०१८

हे ‘तिला’ कळलं तर ?

कॉलेजच्या कट्टयावर आमचं आठ-दहा जणांचं टोळकं, नेहमीप्रमाणे टवाळक्या करत आणि येणार्‍या प्रत्येकावर काहीतरी कॉमेंट्स करत आनंद लुटत बसलं होतं. ‘कोण्या गावाचं आलं पाखरू,’ असं म्हणतं एका मित्राने माझं लक्ष एका कन्येकडे आकर्षित केलं. मीही आकर्षित झालो. तिचं व्यक्तिमत्त्वच तसं होतं. दिसायला ती सुंदर तर होतीच; पण त्या सुंदरतेतही एक प्रकारचा प्रगल्भपणा तिच्या चेहर्‍यावरून जाणवत होता. डोळ्यावर चढवलेला बारीक काडीचा चष्मा तिला अधिकच शोभून दिसत होता. मित्राची वरील कॉमेंट मला नाही आवडली. ती जवळ आल्यावर टारगटांनी मात्र गलका केलाच. ती आमच्याजवळ आली, क्षणभर थांबली आणि गोड स्मित देऊन निघून गेली. आम्ही सर्वजण अवाक.

दुसर्‍या दिवशी तोच किस्सा. लेक्चर तर आम्ही करत नव्हतोच. त्यात कॉलेज सुरू होऊन फार दिवसही झाले नव्हते. एक दिवस मी तिला रस्त्यातच गाठलं.  
‘हॅलो’ तिने छानसा प्रतिसाद दिला.
‘व्हॉट्सगोईंग ऑन’ मी.
‘एव्हरीथिंग इज ओके’ ती.
‘तुम्ही कोणत्या क्लासमध्ये?’
मला मध्येच कोणीतरी हाक मारली. आमचा संवाद तेथेच थांबला.

मध्यंतरी 75 टक्के प्रेझेंटी कम्पलसरी असल्यामुळे कॉलेजचे लेक्चर मनाविरुद्ध अटेन्ड करावे लागायचे. एक दिवस तिनंच मला थांबवलं.
‘मी तुम्हाला नेहमी क्लासच्या बाहेर बघते, तुम्ही नेमकं करता काय?’
मला अशा पद्धतीने विचारण्याचा तिला हक्क नव्हता; पण मी गप्प राहिलो.
‘लिसन... यू शूड अटेंड दि क्लास’
तिने जरबेनं बोलत; पण हसत मला बजावलं.
मी हा किस्सा ग्रुपमध्ये सांगितला. सर्वांनी माझी मनसोक्त चेष्टा केली आणि शेवटी तिच्या मनात माझ्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर (हा कॉर्नर नेमका कसा असतो हो?) निर्माण झाला आहे, या निष्कर्षाप्रती ती सभा आली.

‘न जान, न पहचान, और इतने जल्दी मुझपर राज’ अशी परिस्थिती माझी झाली.
मग मलाही लेक्चर्स अटेंड करावे असं वाटू लागलं. मी तसा बर्‍यापैकी हुशार. (फर्स्ट क्लास कधी सोडला नाही.) आपली शिक्षणपद्धती एवढी विचित्र आहे, बापरे लेक्चरला बसणे ही शिक्षा वाटायला लागते. अर्थात काही विषय मस्त जमून यायचे. प्राध्यापकही छान होते. एकदा तीन लेक्चर्स अटेंड करून अतिशय कंटाळून मी बाहेर पडलो, बाहेर ती उभी.
‘हॅलो’ मी.
‘हॅलो, यू आर इन टीवाय मायक्रो?’ 
‘यस’
‘यू इडियट, देन व्हाय डिडन्ट यू अटेंड ऑदर क्लासेस?’ तिच्या बोलण्यावर ती माझी नवीन लेक्चरर होती हे कळून चुकले.

‘सॉरी मॅम, बट यू कान्ट स्कोल्ड मी. अँड अगेन यू हॅव नॉट एनी राईट टू से मी इडियट’ मी थोडा आव आणून तिला बजावले.
‘ओके माय इडियट, नाऊ सीट इन दि क्लास.’

पंधरा दिवसातलं हे स्थित्यंतर मला बरंच काही शिकवून गेलं. विजयश्री वर्षापूर्वीच एम. एमएस्सीचं गोल्डमेडल मिळवून पहिली आली होती. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात आता एका रिसर्चवर काम करत होती. माझ्यापेक्षा जास्तीत जास्त दोन वर्षांनी मोठी असेल ती. एका प्राध्यापिकेच्या लिव्ह व्हॅकेन्सीवर दोन महिन्यांसाठी आली होती.

जेनेटीक्समधली माझी रुची विजयश्रीमुळेच वाढली. तिच्यासोबत माझी एवढी गट्टी जमली की क्लासच्या बाहेर मी तिला ‘विजू’ म्हणत संबोधू लागलो, ती मला ‘विनय.’

दोन महिन्यांचा कालावधी संपूनही गेला. विजयश्रीने सर्व वर्गाची मने केव्हाच जिंकली होती. मला चांगलं आठवतं, तो दिवस होता ‘टिचर्स डे’चा. आम्ही एक मोठ्ठा बुके विकत घेतला होता. तो तिला भेट दिला. तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. शेवटी ती ‘डोन्ट फिल दॅट आय एम लिव्हिंग यू’ एवढंच बोलली. आणि त्याच दिवशी संध्याकाळी तिने मला रुमवर बोलावलं. एक छानशी भेट वस्तू घेऊन मी तिला भेटायला गेलो.

‘गुड... आलास?’
‘.............’ मी नि:शब्द, मला काय बोलावं हे समजत नव्हतं.
‘विनय, तुला महितीये मी तुला इथे का बोलावलं आहे?’
मी प्रश्‍नार्थक चेहर्‍याने तिच्याकडे पाहत राहिलो.
‘विनय, डोन्ट नो व्हाय; पण काही दिवसांपासून वाटतंय,’ ती बोलावं की नाही बोलावं या द्वंद्वात... फिरत्या टेबलफॅनकडं बघत, ‘काय वाटंत विजू?’
‘तुझा गैरसमज तर होणार नाही ना?’
‘नाही विजू.’
‘विनय, मला असं वाटतंय, मी तुझ्यात खूप गुंतलेय.’

ती माझ्यात गुंतलीय हे मला कळायला लागलं होतंच; पण एवढ्या स्पष्टवक्तेपणाची मी अपेक्षा केली नव्हतीच. तिच्या या बोलण्यावर काहीतरी प्रतिसाद द्यावा म्हणून मी विचारलं’
‘कोणत्या दृष्टीने म्हणते आहेस तू हे विजू?’
‘वुई....’ ती शब्द जुळवतेय....
‘विनय, जेव्हा त्या टारगट मुलांच्या घोळक्यात तुला बघितलं, तेव्हाच मला तुझ्याबद्दल एक अनामिक आकर्षण वाटू लागलं होतं. यापूर्वी आपण कोठेतरी भेटलो किंवा नाही हे आठवत नाही. पण, निश्‍चितच कशाचा तरी संदर्भ आहे. आय फिल, जो चेहरा मी शोधत होते, तो तुझाच आहे.’ मी अक्षरश: शहारून गेलो.

‘यू आर माय सिनियर विजू, अँड डोन्ट फरगेट, टिचर आल्सो...’ मी हे औपाचारिकतेसाठी बोलतो. बाकी मलाही काहीतरी वाटू लागलं होतंच हे नाकारण्यात अर्थ नाही.

‘लिव्ह इट यार, वुई आर फ्रेन्डस्, देअर इज नॉट अ पॉइंट ऑन टिचर-स्टुडन्टस् रिलेशनशिप.’ ती माझ्याकडे रोखून पाहत बोलली.
‘थँक्स गॉड मला भलतंच वाटलं.’ मी हसत उत्तरलो.
‘मी माझं बोलणं संपवलं नाही. विनय, आय... आय फिल... मी तुझ्या प्रेमात पडलेय.’ ती अधिकच भावनाप्रधान झाली. तिच्या चेहर्‍यावरचे भाव पाहून मला भडभडून आलं. अतिशय करुण भाव, तिला नक्कीच माझ्या आधाराची गरज होती.

‘एनीवे, मी मनात काही ठेवत नाही, तुला हे सांगितलं नसतं तर मी मनातच धुसफुसत राहिले असते. उद्याचं रिझर्वेशन आहे. रेल्वेस्टेशनवर सोडायला येशील ना रे?’ तिचा शेवटचा ‘रे’ एवढा भावनाप्रधान होता, की माझे  हात तिच्याभोवती केव्हा लपेटले गेले हे मला कळालेच नाही.

द्वंद्व, भयानक द्वंद माझ्या डोक्याच्या ठिकर्‍या उडताहेत की काय एवढे विचार. विजयश्री आणि मी दोन महिन्यातले सर्व क्षण उजळून काढले. प्राध्यापिका, विद्यार्थी, मित्र-मैत्रीण, प्रियकर-प्रेयसी, सर्व बाजूंनी मी विचार केला.

या वयात हे काय भलतंच. डिग्री घेतल्यावर एक प्रश्‍नचिन्ह होतंच. आयुष्याचा एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा होता. ती माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने मोठी होती. तिच्या ज्ञानाची बरोबरी मी करू शकणार होतो? पण, शेवटी ती माझी दोन महिन्यांसाठी का होईना माझी प्राध्यापिका होती आणि मी मुर्खपणा करून बसलो होतो. तिला काल प्रतिसाद देऊन.

मनातल्या संपूर्ण भावना कागदावर जिवंत झाल्या. शब्द न् शब्द माझ्या भावनेची झिलई घेऊन सजीव झाला. सर्व विचार करून मी विजयश्रीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. पत्र पाकिटात बंद केलं.

रेल्वेस्टेशनवर तिच्याकडे ते पत्र सोपविताना एकच अट टाकली. पत्र दिल्लीला पोहोचल्यावरच फोडायचं. मध्ये कुठेही नाही. जड अंत:करणाने विजू माझ्या आयुष्यातून निघून गेली.

मी काहीसा निर्धास्त झालो. मनावरचं एक दडपण कमी झाल्याचं जाणवत होतं. विजयश्रीला विसरण्याचा प्रयत्न करू लागलो. क्लासमध्ये, कॉलेजमध्ये, कट्ट्यावर विजयश्रीचा विषय निघाला की मी निर्विकारपणे त्यात भाग घ्यायचो. एक जाणवलं, हे संपूर्ण प्रकरणच कठीण होतं.

आणि एक दिवस माझ्या नावावर एक पत्र नोटीस बोर्डवर लटकल्याचं मला दिसलं. विजयश्रीचंच होतं ते पत्र. ते पत्र वाचून मी अक्षरश: वेडाच व्हायचो बाकी राहिलो. पत्र थोडक्यात होतं, तिनं लिहलं होतं...
‘माय डियर विनय,
तुझं पत्र वाचून दु:ख वाटलं. प्रेमभंगांचे दु:ख काय असतं हेही अनुभवलं. मॅच्युअर आहेस. माय इडियट, तू सायन्सऐवजी फिलॉसॉफी घ्यायला पाहिजे होतं. म्हणजे मीही सुटले असते. एनिवे, मी माझा रिसर्च प्रोजेक्ट संपल्यावर नाशिकला येणार आहेच. तूर्त कोणाच्या प्रेमात पडायचा विचार नाही. तुझ्यावर दबाव टाकण्याचा प्रश्‍नच नाही, तसं तू समजूही नकोस. तू बाकी नंतर उत्तर दे... तुझीच...
- विजू’

विजूचा रिसर्च संपलाय. तिला एक-दोन महिन्यांत पीएचडी मिळेल. नावापुढे डॉक्टर लागेल तिच्या. माझंही पोस्टग्रॅज्युएशन झालंय. धसका घेऊन मी बीएस्सीनंतर मॅनेजमेंटकडे वळलो. आता मॅनेजमेंटमधला नामांकित ‘रिसर्चर’ म्हणून प्रसिद्ध पावतोय. एका बड्या कंपनीची नोकरी, गाडी, कंपनीने दिलेला बंगला सर्व दिमतीला आहेत. विजयश्री आणि मी लग्नाच्या बंधनात लवकरच अडकण्याची चिन्हे आहेत. पण...

माझ्या बॉसची मुलगी माझ्या प्रेमात पडली आहे. आणि बड्या कंपनीच्या अपरिहार्य राजकारणात मी माझ्या नकळत ओढला गेलो आहे.

उज्ज्वल भवितव्यासाठी बॉसची मर्जी सांभाळणं गरजेचं आहे. माय गॉड, परत द्वंद्व... भयानक द्वंद्व.


‘प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, पण हे त्याच्या बायकोला सांगू नका हं,’ असं एक वाक्य आहे. राधिका, बॉसची मुलगी माझ्या यशाचं कारण होण्याची शक्यता आहे; पण हे विजयश्रीला कळलं तर...?

 (काल्पनिक) 

विनोद बिडवाईक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा