शुक्रवार, २३ नोव्हेंबर, २०१८

मुलाखतीची वेळ येता...

कंपन्या मल्टिनॅशनल असल्या तरी या विभागात काम करणारी मंडळी मल्टिनॅशनल नसतात. ती अगदी अस्सल प्रादेशिकवाद बाळगणारी आपली भारतीय मंडळी असतात. येथे फार्स खूप चांगल्या पद्धतीने रंगवला जातो. आणि मग या जागेवर कोणाची निवड केली जाते हे सांगायला नको. त्यापेक्षा आपल्या अस्सल भारतीय कंपन्या हा फार्स करत नाही. केला तर ‘हा जवळचा, उपयोग होईल,’ म्हणून दूरदृष्टीचा (?) विचार करतात. खुपसे बॉस, ‘हा आपल्या विचारांच्या बाहेर जाणार नाही,’  हा धोरणी विचार करून उमेदवार निवडतात. त्यामुळे व्यवस्थापन तत्त्वे पुस्तकातच राहतात.

आजच्या तरुणांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग मुलाखती देण्यातच जातो. एकंदर मुलाखत त्याच्या आयुष्याचा अविभाज्य घटक झालेली आहे. अगदी जन्माला आल्यापासून बाळाला विचारण्यात येणारी वाक्ये कॉमन असतात. ‘अलेले कोण तू? मम्मी कोण? पप्पा कुठे आहेत? काका कोण?.... ’ वगैरे वगैरे. येथून त्याला मुलाखतीची ओळख होते. त्यानंतर थोडसं वय वाढलं, की मग त्याला कॉन्व्हेंटमध्ये ज्युनिअर के.जी.त ‘अ‍ॅडमिशन’ घेतेवेळी मुलाखतीला तोंड द्यावं लागतं. शाळा संपल्यानंतर कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशनच्या वेळेस या मुलाखतीचा सोपस्कार पार पडतो. काही जणांना इंजिनीरिंगला अ‍ॅडमिशन हवी असते, काही जणांना मेडिकलला. जे मेरिटमध्ये आले त्यांना फारसा त्रास पडत नाही. परंतु तरीही इंजिनीअर अथवा डॉक्टर व्हायची हौस असते, त्यांच्या मुलाखती मात्र भन्नाट होतात. तेथे मुलाखती घेणारे पांढर्‍या कपड्यातील सभ्य प्रतिष्ठित असतात. आणि कोट्यातील जागांसाठी असणार्‍या मुलाखती साधारणतः ‘बार्गेनिंग’सारख्या असतात. अर्थात बार्गेनिंगचा पहिला धडा त्यांना येथे मिळतो.

त्यानंतर व्यवस्थापन महाविद्यालयात होणार्‍या मुलाखती, गटचर्चा वगैरे सोपस्कारातून पार पडल्यानंतर नोकरीसाठी मुलाखती सुरू होतात. ‘कॅम्पस इंटरव्ह्यू’मध्ये सिलेक्ट होणारे काही भाग्यवान वगळता, बहुतांशी इंजिनीअर, व्यवस्थापन तज्ज्ञ (?) यांच्या वाट्याला आलेले मुलाखतीचे भोग मग काही केल्या चुकत नाहीत. काही जणांच्या बायोडेटावर तर अनुभव या सदरात ‘मुलाखती देण्याचा प्रदीर्घ अनुभव’ टाकायला हरकत नाही. एवढ्या मुलाखती त्यांनी दिलेल्या असतात. मुलाखतीच्या वेळेस विचारण्यात येणारे प्रश्‍न आणि त्या जागेसाठी आवश्यक असणारं नॉलेज याचा संबंध, हा पीएचडीचा विषय होऊ शकेल. या विचारण्यात येणार्‍या प्रश्‍नांवरून प्रश्‍नकर्त्याला काय जाणून घ्यायचे असते माहीत नाही! 

आजकाल  कंपनीत मानव संसाधन विभागात रिक्रूटमेंट नावाच्या प्रकाराचा एक विभाग असतो. ‘एखाद्या जागेसाठी आवश्यक असणारा उमेदवार कसा असावा,’ याचं वर्णन आधीच तयार असतं. विशेषतः ती जागा आणि त्या जागेचे वर्णन हे आधी ‘डिझाईन’ केलेलं असतं. मग मुलाखतीच्या वेळेस त्या जागेसाठी योग्य वाटणारा उमेदवार निवडला जातो. ‘राईट पर्सन अ‍ॅट राईट जॉब’ हे तत्त्व कसोशीने पाळण्याचा प्रयत्न केला जातो. 

पण होतं काय; कंपन्या मल्टिनॅशनल असल्या तरी या विभागात काम करणारी मंडळी मल्टिनॅशनल नसतात. ती अगदी अस्सल प्रादेशिकवाद बाळगणारी आपली भारतीय मंडळी असतात. येथे फार्स खूप चांगल्या पद्धतीने रंगवला जातो. आणि मग या जागेवर कोणाची निवड केली जाते हे सांगायला नको. त्यापेक्षा आपल्या अस्सल भारतीय कंपन्या हा फार्स करत नाही. केला तर ‘हा जवळचा, उपयोग होईल,’ म्हणून दूरदृष्टीचा (?) विचार करतात. खुपसे बॉस, ‘हा आपल्या विचारांच्या बाहेर जाणार नाही,’  हा धोरणी विचार करून उमेदवार निवडतात. त्यामुळे व्यवस्थापन तत्त्वे पुस्तकातच राहतात.

आता मानसोपचारतज्ज्ञांचा शिरकावही या मुलाखतीच्या क्षेत्रात झाला आहे. मोठ्या कंपनीत मुलाखतीच्या वेळेस एखादा मानसोपचारतज्ज्ञ नेमतात. मानसिक चाचण्या घेतल्या जातात. एकदा अशाच कंपनीत एका अधिकारीपदासाठी मुलाखती सुरू होत्या. शेवटच्या राउंडमध्ये तीन मुली शॉर्टलिस्ट करण्यात येतात. 

मानसोपचारतज्ज्ञ एकेकीला प्रश्‍न विचारतो-
‘एक आणि एक किती?’
‘दोन’ पहिली उत्तर देते.
‘दोन किंवा अकरा’ दुसरी उत्तर देते.
‘अकरा’ तिसरी उत्तर देते.

कोणाची नेमणूक करावी, म्हणून तज्ज्ञ आपली मते सांगतो. ‘पहिली प्रामाणिक आहे, दुसरी सावध स्वभावाची आहे आणि तिसरी धूर्त आहे. तुम्हाला कोणती निवडायची?’

‘ती नव्हती का? त्या  प्रियांका चोप्रा सारखी दिसत होती, ती? ती सिलेक्ट करायची म्हणतो’ - बॉस सांगतो.

मुलाखतीनंतर ही अशी निवड केली जाते. म्हणजे आजही त्या तरुणीच्या हुशारीपेक्षा तिच्या दिसण्याला महत्त्व देण्यात येतं.
शंभर मुलाखतींत पन्नास  मुलाखती अशा पद्धतीने होत असतील.

कंपनीच्या मते, चांगला उमेदवार हा थेट भरतीतून सहसा मिळत नाही. त्यामुळे प्लेसमेंट एजन्सीचे फॅड दिवसेंदिवस वाढत चालले आहे. येथे आर्थिक व्यवहाराचाही प्रश्‍न आहे. त्यामुळे ओळख हा महत्वाचा भाग झाला आहे. या प्लेसमेंट्सचे कार्यही कधीकधी विनोदाचा विषय होतो. ज्यांना पैसेच उकळायचे आहेत, ते काहीही करू शकतात.

मानव संसाधन विभागात प्रशिक्षणार्थी म्हणून काम करणारी एक तरुणी होती. माझा एक मित्र वकिलीची प्रॅक्टिस करत होता. ती तरुणी त्या माझ्या मित्राची प्राथमिक मुलाखत घेत होती. त्याने काही असे फंडे मारले, ती बिचारी रडवेली होऊन म्हणाली, ‘अहो मला मुलाखत घ्या म्हणून सांगितलं, म्हणून मी तुमची घेते हो.’ 

अर्थात, काही खमकी मंडळीही असतात. प्रश्‍नकर्त्यालाच ती पेचात टाकतात. एकदा एका उमेदवाराला प्रश्‍न विचारण्यात आला-

‘सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर सांगू शकाल?’
‘नाही सर, बट आय अश्योर  ...’ 
‘काय? व्हॉट विल यू अश्योर  ’ 
‘माझ्या कामात लुडबूड करणार नाही, एवढ्या दूर अंतरावर सूर्य हमखास आहे, सर.’ त्यानं उत्तर दिलं.

दुसर्‍या एका व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्याला प्रश्‍न विचारण्यात आला.
‘कंपनी कायद्याच्या कोणत्या कलमाखाली कंपनीच्या संचालकाला शिक्षा होऊ शकते?’

कंपनी कायदा असो की कामगार कायदा, एवढी कलमे असतात, की ती लक्षातच राहत नाही. अशा वेळी अशा प्रश्‍नाचं उत्तर प्रश्‍नकर्त्त्यालाही कधीकधी माहीत नसतं. मग बिचारा उमेदवार काय उत्तर देणार? त्याचं उत्तर तरीही भन्नाट असतं. 
‘सॉरी सर, पण जर तुम्ही माझी निवड केलीच, तर कंपनीच्या संचालकाला शिक्षा होणारच नाही, इतपत माझं काम अचूक असेल.’
हजरजबाबीपणा असा हवा. अर्थात ‘बायफ्ल्युक’ अशा उत्तराने एखाद्या उमेदवाराची निवडही होऊन जाते.

विनोद बिडवाईक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा