दूरवर पसरलेलं पाणी, उन्मत्त मस्तीने खेळणारं, कधीकधी शांतपणे आपल्याच जगात थिजून गेलेलं. त्याहीपलीकडे क्षितिज. धरतीच्या आकाशासोबत मिलनाच प्रतीक. आपल्याला वाटतं धरतीचे आणि आकाशाचं मिलन झालंय. जसंजसं जवळ जावं तसतसं ते दूरच जातं. तो निव्वळ आभास असतो. अस्तित्वात नसणारं जग असतं ते. आपण मग त्याला क्षितिजाची उपमा देतो. वाटत राहतं कधीतरी दृष्टीस पडेल की हे क्षितिज. आयुष्य संपून जाते; पण क्षितिज भेटत नाही. धरतीचं आकाशासोबत मिलन कधीच होत नाही. आकाश वाट बघतो त्या वेळेची, जी कधी येणारच नसते. वेडी धरित्री मात्र मनात आशा ठेवून असते...
...अगणित घटिका असतात हृदयात जपून ठेवलेल्या. सोबत फक्त या आठवणींचीच... धरतीलाही आणि आकाशालाही. आकाश कोसळू शकत नाही. धरती उडू शकत नाही. कर्तव्याच्या बंधनात जखडलेली असतात दोघंही. जे आयुष्य वाट्याला आलं ते जगावंच लागतं.
रुक्ष वाळवंट, सूर्याची किरणं धरतीवर चहूबाजूंनी वर्षाव करताहेत प्रेमाचा. दोघांच्या या प्रणयात आपण मात्र जळतो. अंगाची लाही-लाही होते. धरती आणि सूर्याची किरणे यांच्या मिलनातून जन्म होतो एका आभासाचा... मृगजळाचा! दोघांसाठीच असतं ते मृगजळ. एकमेकाला चटका देण्यासाठी, खोड्याच काढायच्या असतात एकमेकांच्या एकमेकाला. आपण मात्र नक्कीच वेडे. हरणं बिचारी, तहानलेली असतात. पाणी पाणी म्हणून शोधत असतात. एखाद्या पाणथळ जागेला भेटत नाही. वेडी हरणं शोधत राहतात त्या मृगजळाला. जे अस्तित्वातच नसतं.
वेडा चकोर, चातकासारखा वाट बघत राहतो प्रियतमेची. पौर्णिमेची आणि चांदण्यांची, चांदण्यांची आणि चांदरात्रीची, चांदरातीची आणि मिलनाची. एखाद्याचं आयुष्यच असतं दुसर्यासाठी. चंदाराणी मात्र खूप फिरवते चकोराला. बिचारा चकोर वेडा झालेला. एकदाचं चांदणं पडतं... चकोर येतो, आनंद गगनात मावत नाही, चांदणं आणि चकोराचं मिलन होतं का? परत आभासंच... चकोराला वाटत आपण चांदणं पितोय. शक्य आहे? रात्र संपते. चांदण संपते. चंदाराणी निघून जाते चकोराला हूरहूर लावून... चकोर वेडाच, वाट बघत राहतो... आयुष्यभर.... कित्येक योजने.... मिलन होतच नाही.
त्याचं अस्तित्व आहे, सभोवती, चहूकडे, त्याचं प्रेम निष्कपट आहे. पण वेडा एवढा छळतो की दिसतच नाही. दासी विचारते, ‘राजकुमारी तो येईल नक्कीच, स्वप्तात तरी.’
वेडी उषा, स्वप्न कसं पडणार, त्याने झोपच उडवलीय की. आणि आश्चर्य... पापणी मिटली तसा... तो आला स्वप्नात ! पांढर्या अश्वावर स्वार होऊन... हवेच्या वेगानं... सुंदर, रुबाबदार चेहरा... कोण बरं हा? नाही ओळखता येत... वेडा हात देतो आणि स्वप्न तुटतं... खंड पडतो... हूरहूर अनामिक, कोण बरं हा?
उषाची चित्रकला छान. सकाळी हातात ब्रश घेऊन ती चित्र काढते, त्याचं... स्वप्नातल्या राजकुमाराचं... आणि आत्मविश्वास असतो, सकाळची स्वप्ने खरी होतातच की! दासीच्या हातात देते ते चित्र आणि सांगते... मला माझा राजकुमार हवाय....
स्वप्नातला राजकुमार शोधते उषा अशा पद्धतीने. श्रीकृष्णाचा नातू अनिरुद्ध.
अनिरुद्ध आणि उषेचं मिलन होतं...
स्वप्नं, स्वप्नंच स्वप्नं... गोड... अंधूक... आशावादी... काही खरी... काही खोटी... आभासी क्षितिजासारखी... मृगजळासारखी... चकोर आणि चांदण्यांच्या प्रेमकहाणीसारखी...
...एखादंच स्वप्न उषा आणि अनिरुद्धच्या मिलनाचं.
विनोद बिडवाईक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा