कचकड्याच्या बाहुल्या तुम्ही बघितल्या असतील. अशाच बाहुल्या सध्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला बघायला मिळतील. अतिशय कृत्रिमपणे जगणारी ही मंडळी राहतात मात्र पॉश. (पॉश राहायला हरकत नाही; पण त्यांचा हा पॉशपणा कृत्रिम आहे, हे प्रथमदर्शनीच जाणवतं) वागण्यात कसा सराईतपणा असावा, एखाद्या गर्भश्रीमंत व्यक्तीचं वागणं किंवा नवश्रीमंताचं वागणं यात खूप फरक असतो. त्याचप्रमाणे फसवेपण उघड होतो, त्यालाच ओव्हरस्मार्टपणा म्हणायला हवा.
वागण्यात सराईतपणा येण्यासाठी त्यातला मुरलेला असावा लागतो. ते मुरलेपण या मंडळीत नाही. एखादी बाईक घेऊन कॉलेजरोडवर उगाचच सेकंड गियरवर गाडी चालवणार्या कार्ट्याचा आगाऊपणा म्हणूनच मस्तकात संतापाची तिडीक आणतो. माणसानं जगावं आपल्या जगात, आयुष्य संपवावं आपल्या मर्यादेत; परंतु कचकड्यांचं अनुकरण जेव्हा काहीजण करतात, तेव्हा ते अधःपतन ठरते. तरुण पिढी या अशा बाईकवर गमजा करणार्या थर्डक्लास मानसिकतेच्या कृत्रिम जगावर अवलंबून नाही. आयुष्याची वर्षे जसजशी सरत जातात, तसतशी प्रगल्भता वाढायला हवी, हे कुठेच जाणवत नाही. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक येथे कारणीभूत आहे.
स्मार्टपणा हा नैसर्गिक असतो. ओव्हरस्मार्टनेस कृत्रिम असतो. ओव्हरस्मार्टनेस हा आव असतो आणि शहरात हा ओव्हरस्मार्टनेस जास्त जाणवतो. मम्मी-डॅडीचीही तीच इच्छा असते. आपला मुलगा मित्र-मैत्रिणींच्या गराड्यात असतो किंवा आपली मुलगी गाडी घेऊन बाहेर पडल्यावर काय करते हे त्यांनाही जाणून घेण्याची इच्छा नसते. हा आयुष्यात वाढत चाललेला कृत्रिमपणा स्वैराचारालाच आमंत्रण देऊ शकतो. एका वृत्तपत्राच्या युवा पुरवणीत प्रसिद्ध झालेल्या माझ्या लेखावर अनेकांनी प्रतिक्रिया केल्या. त्यातील बहुतांशी प्रतिक्रिया माझ्या विचारांवर आक्षेप घेणार्या होत्या. एका तरुणीने फोन करून ‘तुम्ही आधुनिक विचारांच्या तरुणींच्या विरुद्ध आहात का,’ असा डायरेक्ट प्रश्न विचारला. मी कोणत्याही विचारांच्या विरुद्ध नाही. माझा आक्षेप असण्याचं कारण नाही; परंतु स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे.
तथाकथित उच्चमध्यमवर्गीय वर्ग हा समाजाला अनैतिकतेच्या गर्तेत नेत आहे, असं म्हणता येणार नाही; पण समाजातील वाढत्या अनैतिक घटना नैतिकतेच्या पडद्याखाली कशा झाकाव्यात, हे याच वर्गाने समाजाला शिकवलं. एखादी मुलगी कुमारी माता होत असेल, तर हा दोष कोणाचा? खुलेपणा, आधुनिकता ही अशा पद्धतीने रुजत असेल, तर ते नक्कीच अंधानुकरण समजावे लागेल. एखाद्या ग्रुपमध्ये मुलगा-मुलगी याचं नातं फुलतं ते याच आधारावर. आणि म्हणूनच या आगाऊपणावर रोख. आमच्या मनात ‘असं’ काहीही नसतं, असं म्हणणारी मंडळी एकमेकांच्या अंगाला चिटकून बाईकवर फिरतात, याचा अर्थ काय? परंतु आधुनिकता म्हणजे स्वैराचार नव्हे.
अनुपलब्धतेचा सिद्धांत तुम्हाला माहीत असेल. ज्या गोष्टी आयुष्यात कधी मिळाल्या नाहीत, त्या गोष्टी संधी आल्यावर जेव्हा मिळतात, तेव्हा त्या गोष्टींचं अप्रुप जास्त असतं, अशातलाच हा प्रकार. त्याचं प्रदर्शन करण्याची इच्छाही अनावर होते. तसंच अनुभव घ्यावयाची इच्छाही वाढते. जगाच्या कानाकोपर्यात अशी असंख्य माणसं सापडतील. ही मंडळी अशातलीच. आपल्या संस्कृतीचा (?) कृत्रिमपणा प्रदर्शन करण्याची हौस याच मंडळींना जास्त असते. आक्षेप यांच्या श्रीमंतीवर नाही, उच्चमध्यमवर्गीय राहणीबद्दलही नाही, आक्षेप आहे तो त्यांच्या मतावर. कारण स्मार्ट असणार्याला आपण स्मार्ट आहोत हे सांगण्याची गरज पडत नाही. आपण आहोत असं दाखवणारीच ओव्हरस्मार्ट बनतात. ही संख्या कमालीची वाढली आहे.
परंतु प्रश्न या तथाकथित नवश्रीमंतांच्या आणि उच्चमध्यमवर्गीयांच्या पिढीचा नाही, ती त्यांची नियती आहे. ते तसे वागतात, त्याला तेच जबाबदार ठरतात. प्रश्न आहे तो या पिढीचे अनुकरण करणार्या सामान्य (?) पिढीचा. जिल्ह्यातील एका विशिष्ट भागातील तरुणांबद्दल आज फारशी चांगली मतं नाहीत. कॉलेजरोडवर फिरणार्या या कल्चरलमधील तरुण-तरुणी हमखास ओळखू येतात. अर्थात आपण चर्चा करत आहोत ते याच कॅटेगरीत येणार्या सर्वच पिढीबद्दल. अनुकरण करणारी मंडळी मध्यमवर्गीय, थोडीफार संस्कारीत घरातील असतातच; परंतु आपणही त्यांच्यासारखे वागायला हवं असं प्रत्येकालाच वाटतं. प्रश्न या वाटण्याचा आहे. या अनुकरण करणार्या जमातीत एक प्रकारचा अधाशीपणा जाणवतो. यांचं वागणं अधाशी असतं, यांचं पाहणं अधाशी असतं आणि स्मार्टनेस उपजतच नसतो. मग ते ओव्हरस्मार्ट बनतात. चांगल्या घरातील संस्कारी मुलगी आपण आधुनिक आहोत हे दाखवण्यासाठी कपड्याची लांबी कमी करते, कपड्यांची फिटिंग अधिक टाइट/तंग करते आणि तरुणांच्या सोबत खुलेपणाने मैत्री स्वीकारते. ही तिची संस्कृती असते म्हणून नाही, तर या आधुनिकतेच्या आणि नवश्रीमंत/उच्चमध्यमवर्गीयांच् या नादाला लागून! मग अशा तरुणींच्या वर्जीनिटीवर एखाद्याने शंका घेतली की ती चडफडते; पण मुळात दोष कुणाचा? बलात्काराच्या केसेस चर्चिल्या जातात; परंतु याच कल्चरमध्ये एखाद्या ग्रुपमधील तरुण-तरुणी आपल्या मर्जीविरुद्ध स्वतःच्या आगाऊपणामुळे एखाद्याच्या मिठीत जाते आणि स्वतःचं स्वत्व गमावून बसते, तेव्हा दोष कोणाचा? या अनुकरणप्रियतेचाच ना? कॉलेजला दांड्या मारून बाईकवर चकरा मारत मुलींवर इम्प्रेशन मारणार्या तरुणाच्या थोबाडीत बसल्यावर त्याला वाईट वाटेल; पण दोष त्या अनुकरणप्रियतेचाच ना? आपलं अंगप्रदर्शन करण्याची इच्छा या अनुकरणप्रियतेतच ना?
माणसाने फक्त स्मार्ट बनावं, ओव्हरस्मार्ट नव्हे. पालकांनी आपली मुले रात्री उशिरा का येते, हे जरूर तपासून पाहावं. आपल्या कन्येचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत, हेही तपासून पाहावं आणि कार्ट असेल, तर याचा पॉकेटमनी एवढा आपण खरंच सहन करू शकू का, याचाही विचार करावा.
नैतिकतेच्या गप्पा मारण्यात अर्थ नाही; पण प्रश्न आहे हायब्रीड कल्चरचा आणि हायब्रीडला ओरिजनलची सर कधीच येणार नाही. माणसानं जगावं; पण मग याचा दोषही दुसर्यावर फोडू नये.
विनोद बिडवाईक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा