बॉम्बे, रोजा, अभिमान, आनंद आणि दृष्टी, सृष्टी, सूत्रधार या चित्रपटांबद्दल तुमचं मत काय आहे? यातील किती चित्रपट तन्मयतेने तुम्ही बघितलेत? बरोबर (जर तुम्ही आर्ट फिल्म आवडणे म्हणजे स्टेटस् ‘हाय’ होणे असं मानत नसाल तर) बॉम्बे, रोजा, अभिमान आणि आनंद या चित्रपटात तुमची इनव्हॉलमेंट जास्त असेल. वरील चित्रपट हे कमर्शियल म्हणून हिणवले गेले, पण माझ्या मते हे सर्व चित्रपट उत्कृष्ट आर्ट फिल्मचा नमुना होती. माझ्या या वाक्यावर आक्षेप घेण्यापूर्वी आर्ट फिल्म्स म्हणजे काय, याचा अर्थ आपण समजून घ्यावा. आर्ट फिल्म म्हणजे रटाळपणा आणि संथ कहाणी नव्हे. आर्ट फिल्मला प्रेक्षक का लाभत नाहीत, यातच सर्व आलं.
आर्ट फिल्मचा एक नमुना बघा. स्थळ कोणत्याही जागा (लोकेशनला महत्त्व नाही) हिरो निवांतपणे बसलाय. सुरक्षित अंतर ठेवा, या सूचनेला जागून हिरॉईन बसलेली आहे. कॅमेरा हिरोच्या पायावर (बिचार्याच्या चेहर्यालाही किंमत नाही). हिरॉईन पुटपुटते, ‘क्या सोच रहे हो?’ दीर्घ शांतता. पुढचा डायलॉग डिलिवरीपर्यंत प्रेक्षक चहा पिऊन येतो. ‘मोसम अच्छा है.’ हिरोचं उत्तर. हा हिरो प्रत्येक वार्षिक परीक्षेत नियमित फेल होत गेला असावा. धड उत्तरही देता येत नाही. हा शॉर्ट किमान पंधरा मिनिटे. आता मला सांगा, असा रटाळ चित्रपट प्रेक्षकांनी का म्हणून बघावा? आर्ट फिल्म म्हणजे रटाळ, हा समज प्रेक्षकांचाच नाही तर प्रोड्यूसर्सचाही आहेच. प्रतिभात्मक घटनांतून कॅमेर्याच्या अँगल्समधून याचं दिग्दर्शन दिसतं. परंतु अशा घटनांना अर्थ, मतितार्थ लावण्यासाठी प्रेक्षक येतात का? वीस रुपये भरून पब्लिक चित्रपटांतून करमणूक करायला येते. दोन घटका स्वतःच्या आयुष्याला ब्रेक लावून मजा मारायला येते. ते असे रटाळ चित्रपट पाहण्यासाठी नाही. विशिष्ट ‘क्लास’साठीच काढण्यात येणारे हे आर्ट चित्रपट इतरांबाबत नाहीत, तर मग ओरडण्यात काय अर्थ आहे? परंतु या सदरात ‘आर्ट चित्रपट’ बघणे, हा एक विषय टाकला, तर तो एक ‘प्रेस्टिजियस इश्यू’ होतो. आर्ट चित्रपट बघणे किंवा त्यावर चर्चा करणे, हा एक उच्च अभिरुचीचे दर्शन घडविण्याचा मार्ग किंवा माध्यम आहे. फिल्म हा क्लासही खरंच तेवढ्या रुचीने बघतो का? मला शंका आहे. कारण ‘दृष्टी’ आणि ‘’रुदाली’ला आलेली तथाकथित मंडळी मी बघितली आहेत. (एक प्राध्यापक, दोन पत्रकार आणि चौघं एका इंटरनॅशनल क्लबचे सभासद) या दोन पत्रकारांनी मग यावर समीक्षाही लिहिली आहे, हा तसा विनोदाचा भाग
माझ्या मते, आर्ट फिल्मच्या आजच्या स्थितीला कारणीभूत ही मंडळीच नव्हे का? एकतर आर्ट फिल्म काढणे फारसे कठीण नाही. लो बजेट, ‘सर्व काही लो’मुळे दर्जाही ’लो’च. असो. याउलट एखाद्या कमर्शियल फिल्मध्ये प्रेक्षकांचा विचार करावा लागतो, तर आर्ट फिल्ममध्ये डायरेक्टर्सचा विचार होतो. (आणि प्रेक्षकांना विचार करावा लागतो.) मुळात आर्ट फिल्म आणि कमर्शियल फिल्म असा भेदच करू नये. पण, तरीही वेगळा विचार केल्यास उत्कृष्ट कमर्शियल फिल्म आर्ट फिल्मही ठरूच शकते, त्याप्रमाणे आर्ट फिल्मही कमर्शियल फिल्म का ठरू नये? ऋषीदांचा ‘अंगूर’, ‘अभिमान’, ‘चुपके चुपके’, ‘आनंद’, मणिरत्नमचा ‘बॉम्बे’, ‘रोजा’, राजकुमार संतोषीचा ‘दामिनी’, सूरज बडजात्याचा ‘हम आपके है कौन’, शेखर कपूरचा ‘मासूम’ आणि ‘बँडिट क्वीन’, मन्सूर खानचा ‘अकेले हम अकेले तुम’ असे काही चित्रपट आणि आर्ट फिल्म यांचा तुलनात्मक विचार केल्यास वरील चित्रपट आर्ट फिल्ममध्ये समाविष्ट केल्यास अयोग्य होणार नाही. विस्फोटक कहाणी, तसंच दिग्दर्शन, त्याच दर्जाचा अभिनय. यातील काही चित्रपट वादग्रस्त ठरतील. मग आर्ट फिल्मवाले हा विचार करीत नाहीत. केतन मेहताचा ‘माया मेमसाब’, ‘ओह डार्लिंग यह है इंडिया’ हे प्रयोग उत्कृष्ट होते. परंतु आपल्या मराठीत ‘सामना’, ‘जैत रे जैत’, ‘उंबरठा’, ‘सिंहासन’ असे चित्रपट देणारे जब्बार पटेल असो किंवा मग हिंदीतील काही तथाकथित आर्ट फिल्म डायरेक्टर अडगळीत का पडत चालले आहेत, याचं आत्मपरीक्षण त्यांनीच करावं.
विनोद बिडवाईक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा