आजच्या तरुण पिढीला झालं तरी काय? या घटनेला अनेक वर्षे झाली असतील. जेव्हा चैन्नई येथे रॅगिंग करायला नकार दिल्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेणार्या मद्रास विद्यापीठातील कुलगुरूंच्या मुलाचे मस्तक आणि इतर अवयव तोडून-फोडून टाकले. त्यावेळी ही अंगावर शहारे आणणारी बातमी ऐकून मला काय प्रतिक्रिया व्यक्त करावी हेच कळत नव्हते. तरुण पिढीला नेहमीच मागची पिढी दोष देत असते. जनरेशन गॅपमुळे पिढीपिढीतील अंतर म्हणून अशा प्रकारच्या दुषणाला तरुणवर्ग उडवून लावतो. पण जेव्हा अशा भयानक घटना घडतात, त्या घटनांचं स्पष्टीकरण काय देणार? ही बातमी वाचून मी अतिशय हताश झालो. काही कळायला मार्गच नाही. आजच्या तरुण पिढीला झालं तरी काय? या प्रश्नाचा भुंगा पोखरायला लागला.
आपण एवढे वाया गेलो आहोत? नकळत अशा युवापिढीचं प्रतिनिधीत्व आपण करतोय आणि या घटनेनंतर ‘आजची युवापिढी’ असं कुत्सितपणे आणि वैतागाने ऐकलेले शब्द कानावर पडले. ‘इंडियन युथ कल्चर फोरम’च्या सचिव कु. मेघना पंचमी यांचा मुंबईवरून फोन आला. त्यावेळी त्यांना या घटनेबद्दल ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वार्ताहराने प्रतिक्रिया विचारली होती. मेघनाने दिलेली प्रतिक्रिया प्रत्येक तरुणाच्या मनातली, बोलकी प्रतिक्रिया म्हणता येईल. त्या म्हणाल्या, ‘या तरुणांवर आम्हाला जोखू नका. सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्ती समाजात असतातच. कधी दुष्ट प्रबळ होतात तेव्हाच सुष्ट त्यांना डॉमिनेट करतात. प्रश्न आहे, आम्हा तरुण पिढीचा. तर, या दोन तरुणांना भर रस्त्यात दगडाने ठेचून मारा. पण या घटनेचा बोजा युवापिढीवर टाकू नका.’ अध्यक्ष म्हणून माझी प्रतिक्रियाही तिने वृत्तपत्रासाठी रिलीज केली होती.
त्यानंतर दोनच दिवसांनी एक बातमी कानावर पडली. भाजपचे उत्तर प्रदेशचे तत्कालीन अध्यक्ष कलराज मिश्रा यांच्या सुपुत्राने (?) आणि त्याच्या दोन मित्रांनी (दोघेही सरकारी नोकरीत असणार्या बड्या धेंडांची कार्टी) राज्यपालांच्या सल्लागाराच्या मुलीचा विनयभंग केला, ही ती बातमी. त्याच्या महिन्याभरापूर्वी घडलेलं सोयगाव खून प्रकरण. खरंच या तरुण पिढीवर कोण हुकूम गाजवतोय?
त्याच वेळी नुकताच मायकल जॅक्सन मुंबईत नाचून गेला होता, तर तिकडे बेंगळुरूमध्येही विश्वसुंदरी स्पर्धा धूम माजवत होत्या. राजकीय परिस्थितीचा विचार करण्यासारखी नाही. नेता म्हणून बघावं, असा नेताच नाही. अण्णा हजारे ठाकरेंवर आरोप करत आहेत. तरुणांची स्थिती अतिशय बिकट झाली आहे. मायकेल नाचला, आपली संस्कृती कोलमडून पडली (?) पण या पलीकडे तरुणांचा विचार कोण करतोय?
एका बाजूने अभ्यास करून पास होणारी धडपडी पोरं आहेत. कष्ट करून शिकणारी मंडळी आहेत. निरनिराळ्या सामाजिक संस्थेत सहभाग देऊन सामाजिक बांधिलकी मानणारी मंडळीही आहेत. मग, त्यांचं कौतुक का नाही? चेन्नईची घटना एक घडली. छेडछाडीच्या, जाळपोळीच्या घटना कित्येक घडत असतील. मग, फक्त तरुणच जबाबदार या घटनांना? एका राजकीय संघटनेच्या तरुण युवा नेत्याची (?) परवड मी याच डोळ्यांनी बघितली आहे. या युवा नेत्याला फायरफायटिंग ट्रेनिंगसाठी एकाची चिठ्ठी पाहिजे होती आणि ही चिठ्ठी मिळवण्यासाठी दुसर्या नेत्याने या पहिल्या नेत्याकडे पाठवलं होतं. याचं काम करा म्हणून. विदर्भातून हा तरुण त्यासाठी नाशिकला आला होता. चिठ्ठी मिळालीच नाही. वागणूक मात्र वाईट मिळाली. मला अतिशय कीव आली त्या ‘युवा नेत्याची.’ वापरून घेताहेत तरुणांना प्रत्येकजण. 22 कोटीपेक्षा जास्त असणारी बेरोजगारी, गरिबी, पैसा आणि वशिल्याच्या जोरावर पुढे जाणारी बड्या धेंड्यांची मुलं. न्यूनगंड निर्माण व्हायला वेळ लागत नाही. आम्हा युवापिढीचंही चुकत असेल; पण त्याचबरोबर आमच्यावर नेहमीच ठपका ठेवणार्या पिढीचंही काहीतरी, कुठंतरी चुकतंच. आणि त्यांचं हे चुकणंच चैन्नईसारख्या घटना घडवतात.
जोपर्यंत तरुणांसमोर निश्चित ध्येय नाहीत, तोपर्यंत ही परिस्थिती सुधारणार नाही. तरुणांनो, स्वतःला आवरा... काहीतरी ध्येय नजरेसमोर ठेवा... आणि स्वत:वर संस्कार का झाले नाहीत, याचा विचारही करू नका. त्याची अपेक्षाही करू नये. आत्मपरीक्षण करा, हाच मार्ग खरा. स्वत:च स्वत:चे मार्गदर्शक व्हा!
(१९९६ मध्ये प्रथम प्रसिद्धी, दै. गावकरी)
विनोद बिडवाईक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा