गुरुवार, १ नोव्हेंबर, २०१८

पडद्यावरील तारे प्रत्यक्षात दिसतात

वयाच्या तेराव्या वर्षी मी पहिला चित्रपट बघितला ‘सतीसावित्री’. त्यावेळेस पिक्चर काय प्रकार असतो, तो कसा दिसतो, हा सर्व प्रकार मला नवीन होता. नाही, चित्रपट हा प्रकार त्या वेळेस नवीन नव्हता; परंतु विदर्भातील त्या खेडेगावातला तो नवीन होता. आमच्या गावात पहिला चित्रपट आला तो ‘सतीसावित्री’. ‘टुरिंग टॉकीज’ नावाचा लोप पावलेला प्रकार त्यावेळेस अस्तित्वात होता. खेडोपाडी फिरत चित्रपट दाखविणारे ते ‘मोबाईल थिएटर’ गावात उवतरले. गावात अमाप उत्साह संचारला. खरंतर नेहमी शहरात जाणार्‍या मंडळीना चित्रपट हा प्रकार माहीत होता. परंतु 90 टक्के जनतेने आयुष्यात कधीही पिक्चर बघितला नव्हता. आम्ही सर्व काम सोडून थिएटरच्या तंबूकडे काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करू लागलो. एक मोठा पडदा टांगण्यात आला होता. संपूर्ण मैदान पडद्याने बंदिस्त करण्यात आलं. लाकडी बाबूंचे कठडे बसवण्यात आले. आम्ही बच्चेमंडळी हा सर्व प्रकार कुतूहलाने बघत होतो. गावातील मोठी माणसं पाठीमागे हात बांधून हा प्रकार उत्सुकतेने बघत होती. संध्याकाळी लाउडस्पीकरवर घोषणा होऊ लागली. चालू होत आहे, सुरू होत आहे. महाधार्मिक बोलपट ‘सतीसावित्री.’


मी ‘सतीसावित्री’ चित्रपट पंधरा मिनिटेच बघितला. कारण नंतर इरसाल गावाप्रमाणेच गावातील मंडळींनी तो पिक्चर बंद पाडला. कोणीतरी दारू पिऊन फूकट आत आला आणि मग प्रचंड मारामारी झाली. परंतु या अर्धवट पाहिलेल्या पिक्चरने मला पिक्चर कसा दिसतो, हे ज्ञान (वयाच्या मानाने खूप उशिरा) मिळालं.

काळ बदलला, नंतरनंतर गावातही चित्रपट नियमित येऊ लागले. काळ जसा बदलला, तसे काही बदल होत गेले. गावात एक थिएटर बांधलं गेलं. व्हिडीओ हॉलचं तर पीकच आलं. गावात थिएटर येण्यापूर्वी व्हिडिओ हॉलमध्ये जाऊन आम्ही कित्येक चित्रपट बघितले. कोणते आणि कसे याचं तारतम्य नसायचं. या चित्रपटाची जाहिरात मात्र मजेदार असायची. आम्ही चेहर्‍यावरून कलावंत ओळखायला शिकलो अर्थात त्यावेळेस या चेहर्‍यासोबत प्रत्यक्ष भेटीचा योग येईल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.

हे सर्व चित्रपट बघताना आम्ही अगदी त्यात ‘ Involve’ होऊन जायचो. एखादा इमोशनल प्रसंग पडद्यावर आल्यावर जणू काही आमच्या आयुष्यातील प्रसंग आहे, असं वाटून मी खूपदा सेन्सेशनलही झालो आहे. खूपदा माझ्या डोळ्यातून माझ्या नकळत अश्रूही गळली आहेत.

आता हे सर्व आठवल्यानंतर हसू येतं. ती अभिनेत्यांची अ‍ॅक्टींग होती आणि वास्तव वेगळं होतं, हे नंतर जाणवू लागलं. जयाप्रदा या अभिनेत्रीवर होणारे अन्याय बघून आम्हाला नेहमी सहानुभूती वाटायची. एकदा एका शुटिंगच्या वेळेस तिची सही घ्यायला गेल्यावर तिने माझ्या हातात सिगरेट ठेवली होती. सोज्वळ जया सिगरेट पिते हे बघून त्या वेळेस मला अतिशय धक्का बसला होता. 

पण त्यावेळेस तो एक भन्नाट प्रकार असायचा. एक वेगळा अनुभव असायचा. आणि उत्साहाच्या भरात मी खूप घोटाळेही केले आहेत. एखाद्या हिरोच्या कर्तबगारीवर खुश होऊन मी त्या हिरोचे अनुकरण करण्याच्या नादात स्वतःवर फजितीही ओढवून घेतली आहे. अर्थात लहानपणी हा सर्व प्रकार घडत होता. हा सर्व प्रकार बालिशपणातून घडत होता. एखादा चित्रपट बघितल्यावर त्या चित्रपटावर आम्हा मित्रांची एक साधक बाधक चर्चा व्हायची. या चर्चेत कोणी कोणाला खाल्लं आणि कोण चांगला एवढा विषय असायचा. माझा आवडता हिरो होता अमिताभ बच्चन. अमिताभवर केलेली टीका मला मुळीच आवडायची नाही. त्यावेळी जितेंद्र आणि श्रीदेवी या कवायतकारांचा आणि बप्पी लहरी नामक गर्दभचा जमाना होता. अर्थातच माझ्या प्रत्येक मित्राला जितेंद्रचं नाचणं आणि श्रीदेवीला पटवण्याची तर्‍हा पसंत असायची. या चर्चेत मग तो अमिताभपेक्षा कसा श्रेष्ठ आहे, हे त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करायचे. जितेंद्रसोबत श्रीदेवी आहे त्यामुळेच तोच ग्रेट असं त्यांचा समज होता. काहीका असेना, जितेंद्रचाही एक काळ होता.

विनोद बिडवाईक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा