चित्रपटांचा पूर्वीपासून मानवी मनाशी तेवढाच नातेसंबंध आहे, जेवढा आता आहे. कल्पनाविलास, अतिशयोक्ती, स्वप्नरंजन या पायांवर उभी असणारी ही मायावी दुनिया प्रत्येकाची पहिली आवड आहे. आता प्रत्येकाची आवड कोणत्या प्रकारची हा दुय्यम भाग. पण तरीही कधी कधी मला प्रश्न पडतो की, मनोरंजनाचे साधन प्रभावीपणे आपलं मनोरंजन करता करता थांबलं तर?
सामान्य माणूस आपलं रूपडं या जगात शोधण्याचा प्रयत्न करतो. हिरो आणि हिरोईनच्या जागी स्वतःला इमॅजिन करून स्वतः त्या स्वप्नरंजनात रंगून जातो. मुकपटानंतर बोलपटांचा जमाना आला. पात्रांना शब्द मिळाले. तंत्र प्रगत होत गेलं. तशी भावनांनाही उत्कटता लाभू लागली. थिएटरात पडणार्या टाळ्या आणि शिव्या या उत्कट भावनांचा अविष्कार आणि दाद असतात. समाजात दुष्ट आणि सुष्ट दोन्ही प्रवृत्तीच्या व्यक्ती असतात. त्याच प्रवृत्ती चित्रपटांतून पात्र म्हणून येतात. नायक-खलनायकांचा संघर्ष हा यातलाच. फक्त अतिशयोक्ती आणि संघर्ष त्यात अमाप असतो.
नायक, खलनायक, नायिका, चरित्र अभिनेते यांच्या जोडीला गाणी, उत्कृष्ट कथासूत्र आणि या सर्व गोष्टींना एका सूत्रात गुंफणारा दिग्दर्शक या सर्वांच्या परिश्रमातून चित्रपट जन्माला येतो. एक चित्रपट समीक्षक आणि काही मोजके चोखंदळ प्रेक्षक, चाहते सोडले तर सामान्य माणसांना काय लागते. तो अभिनय आणि दिग्दर्शनावर बोलत नाही. हिरो-हिरोइनच्या तोंडी असणारे डायलॉग त्याला भावतात. दिग्दर्शन काय असतं, त्यांना काहीही घेणं नसतं. त्यांना हवी असते फक्त तीन तासांची करमणूक. विचार करायला लावणारी पटकथा. थोडक्यात बोअर न होणारी कहाणी. त्यात संघर्ष, फोडणीला गाणी आली की, मग तो त्या चित्रपटात गुंतून जातो. तेव्हा ही कहाणी कोणती आहे, याचा विचार तो करत नाही. तसं असतं, तर पडद्यावर कित्येकदा येणार्या त्याच त्याच प्रेमकहाण्या त्यांनी नाकारल्या असत्या? त्याच बाटलीत नवी दारू किंवा जुन्या बाटलीत रंग बदलून पेश केलेली शराब. यात फारसा फरक नसतो.
एका प्रसिद्ध समीक्षकला मी एक प्रश्न विचारला होता. उत्कृष्ट समीक्षा लाभलेला चित्रपट चालेलच असं नाही. माझा प्रश्न होता सामान्य चित्रपट चाहता या समीक्षा कितपत वाचतो किंवा त्यांना भाव देतो? तेव्हा त्या समीक्षकानं मोठ उत्तर दिलं होतं. ‘चित्रपट पाहणारे तीन प्रकारचे असतात. जे समीक्षा वाचून चित्रपट बघतात आणि समीक्षा चांगली असली म्हणजे कितीही फालतू चित्रपट असला, तरी त्यांना तो चांगला वाटतो. थोडक्यात समीक्षेवरून स्वतःचं मत बनवणारी नवउच्चवर्गीय मंडळी, सो कॉल्ड तथाकथित उच्च मध्यमवर्गीय मंडळी, दोन चित्रपट बघितल्यानंतर स्वतःचं मत बनवणारी ही खरी चोखंदळ आणि चित्रपट, दिग्दर्शन यावर वगैरे चर्चा करणारी मंडळी. आणि तिसरी म्हणजे जे कोणतेही चित्रपट बिनधास्तपणे एन्जॉय करणारी. बहुतांश मंडळी तिसर्या कॅटेगरीत मोडतात आणि चित्रपट चालवणारी किंवा पाडणारी हीच मंडळी असतात. तसं नसतं तर प्रत्येक फालतू दिग्दर्शकाचा पिक्चर एक दिवसही चालला नसता. उदाहरण घ्यायचे झाले तर ‘कुली नंबर 1’ वगैरे अशा चित्रपटांची द्यावी लागतील. डेव्हीड धवनला उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणण्याचं धाडस मी करणार नाही. याउलट केतन मेहता, श्याम बेनेगल यांची चित्रपट खूप चालली असती. या सर्व गोष्टींचा सांगोपांग विचार केलाच तर प्रेक्षकांना नेमकं काय आवडतं? एक हिरो, एक हिरोईन, पन्नास टक्के प्रेम, सुराई खलनायक आणि संघर्ष. चटपटीत किंवा झणझणीत संवाद आणि गुणगुणवणारी किंवा थिरकायला लावणारी गाणी. एवढं करूनही पिक्चर यशस्वी होतीलच याची शाश्वती नाही!
प्रेक्षकांचं विभाजन हाही चित्रपटांच्या यशस्वीतेवर परिणाम करतो. ग्रामीण भागात किंवा शहरी भागात चालणारे पिक्चर्स त्याचे विभाजन होतं ते आश्चर्यकारक आहे. ‘अंदाज अपना अपना’ किंवा ‘हम है राही प्यार के’ हे दोन चित्रपट ग्रामीण भागात किंवा विशिष्ट भागात मुळीच चालले नाहीत. याउलट शहरी आणि नागरी संस्कृतीत हे चित्रपट धंदा करून गेले. याउलट सध्याच्या काळातील दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा अनेक पुरस्कारप्राप्त चित्रपट ‘फँड्री’, भाऊसाहेब कर्हाडेचा अनेक पुरस्कारप्राप्त चित्रपट ‘ख्वाडा’, ‘बबन’ यांसारखे कित्येक चित्रपट ग्रामीण प्रेक्षकांनी स्वीकारले, तेवढे ते शहरी लोकांना मानवले नाहीत.
महाराष्ट्र (विशेष करून पश्चिम महाराष्ट्र) केरळ, गुजरात या राज्यातील पिक्चर्स बघणारी मंडळी आणि यूपी, बिहारी या रेटारेटीत येणारे चित्रपट आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद यावरून प्रेक्षकांचं विभाजन त्या-त्या विभागानुसार, प्रगल्भतेच्या चोखंदळपणानुसार होतं, हे मानावच लागतं.
चित्रपट येतात आणि जातात, परंतु मनात रुतून बसणारे चित्रपट फारच कमी असतात. कमालीचा चित्रपट शौकीन असणार्या एका मित्राला त्याचा आवडणारा चित्रपट विचारलं. तो म्हणाला, ‘हम आपके है कौन.’ शिवाय त्याच्या मते सर्व चित्रपट फालतू होते.
सामान्य प्रेक्षकांना काय लागतं याचा विचार या लेखात केला गेला असला, तरीही ते ‘डिफाईन’ करणं सोपं आहे. पण काहीही असो दोन-तीन घटका करमणूक देणारी ‘मायावी दुनिया’ तुम्हा सर्वांना दुर्दम्य आशावाद शिकवते, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती होणार नाही.
विनोद बिडवाईक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा