शनिवार, २० ऑक्टोबर, २०१८

चोरी

चहाचा पेला घेऊन जाणार्‍या त्या हॉटेलमधल्या पोर्‍याला माझा धक्का लागला आणि पेला त्यावरच्या बशीसहित जमिनीच्या ‘मिलनासाठी’ वेगाने खाली गेला!

क्षणभर खळ्ळऽऽऽ आवाज कानात घुमला. माझी घाई तशी नेहमीचीच. घड्याळ्याच्या काट्यावर चालणारे आपण कधी कधी या वेळेचा ‘टाइम मनेजमेंट’ म्हणून उगाचच बाऊ करतो. मी त्या मुलाकडे लक्ष दिले नाही. मला तेवढा वेळ नव्हता. त्यावेळी कदाचित क्षणभरच. क्षणभर मी मागे वळून बघितलं, तो मुलगा काहीतरी पुटपुटतं उभा राहिला. निश्‍चितच त्या मला शिव्या होत्या. अर्थात चूक त्याची नव्हती! मी क्षणभर थबकलो. तोच शेजारी उभा असलेला घोळका माझ्याकडे आकर्षित झाला. त्यातला एक उत्तरला, ‘अशा वेळेस सरळ पुढे निघायचं, मागे बघायचंच नाही.’ तो बोलला उपरोधिकपणे. नेमकं मला काही कळालं नाही. मी नंतर सरळ, तेवढ्याच वेगाने चेहर्‍यावरची सुरकुती आणि कपड्यावरचीही न बिघडवता पुढे निघालो! वरील सर्व घटना काही सेकंदात घडल्या. शेजारून येणारी सिटी बस पकडली आणि निवांतपणे सीटवर बसलो. खिडकीतून बाहेर बघितलं. मघाचा मुलगा दुसरा पेला घेऊन चालला होता...

Related image

बस सुरू झाली, खिडकीतून येणारा गार वारा अंगाला झोंबू लागला. खिडकी वैतागाने खाली ओढली आणि डोकं टेकलं. नजरेसमोर मघाचं दृश्य उभं राहिलं. फुटलेला पेला घेऊन हॉटेलमध्ये परत गेल्यावर काय घडलं असेल, याची कल्पना करता करता माझ्या मनात चलबिचल सुरू झाली. टोचणीचा भुंगा मन पोखरायला लागला. त्या मुलाचा काही दोष नसताना बिचार्‍याला मालकाची बोलणी खावी लागली असतील. कदाचित आधीच तुटपुंज्या मिळणार्‍या पैशातून त्याचे पैसेही कापून घेतले असतील. त्याचं वय तरी फारसं नव्हतं. 12 ते 13 वर्षांपेक्षा जास्त नसावं. चेहरा तरतरीत पण दरिद्री परिस्थितीने त्याच्यावर वेठबिगारी लादली गेली. ज्या वयात शाळेत जायचं, खेळायचं त्या वयात हॉटेलमधल्या टेबलावर फडकं मारणं आलं.

दोन दिवसांपूर्वी एका परिसंवादात ‘भारत आणि बालमुजरी’ या विषयावर मांडलेले विचार मोठमोठ्या वक्त्यांनी स्वीकारले होते. ‘हे करायला पाहिजे’, ‘दशा, दिशा आणि बरंच काही !’ माझा पेपर उत्कृष्ट ठरला होता आणि मानव संसाधन व विकासमंत्र्यांनी या पेपरवर विचार करण्यासाठी समिती नेमण्याची घोषणा केली होती. आणि आज एका बालमुजराच्या कष्टाच्या कमाईआड मी आलो होतो. धक्का लागल्यावर उभं राहून त्याची समजूत घालण्याचे कष्टही (?) घेतले नव्हते. माझं ‘वेळेचं व्यवस्थापन’ त्या आड आलं होतं. माझं मन मलाच खाऊ लागलं. दोन-तीन मिनिटे थांबून ती घटना घडल्यावर मी त्या मुलासाठी काहीतरी करायला पाहिजे होतं, असं मनापासून वाटू लागलं.

मुळात गरिबी, बापाची जबरदस्ती, घरातल्याचा या मुलांकडे ‘कमाईचे साधन’ म्हणून बघण्याचा दृष्टिकोन आणि एकंदर सरकारची उदासीन वृत्ती या सर्व प्रकारचं हे अपत्य होतं! बालमुजरी संपवा, संपवू या, वगैरे घोषणा घोषणाच ठरल्यात की. वरवरची उपचारपद्धती सोडून आपण मुळाकडे जातच नाही. असो; पण या घडलेल्या घटनेत मी त्या मुलाची नुकसान भरपाई म्हणून पेल्याचे पैसे, त्याच्यासोबत सहानुभूतीचे दोन शब्द, एवढंच करू शकणार होतो. कारण काहीतरी कमाई करून घरी पैसे देणं त्याला गरजेचं होतं.

दुसर्‍या दिवशी निव्वळ कुतुहलापोटी मी त्या हॉटेलमध्ये गेलो. त्या पोरला भेटता आलं तर बरं होईल हाही विचार होता. हॉटेलचा मालक भेटला. नेहमीचा ग्राहक म्हणून मी त्याचा ओळखीचा झालेलो. त्याने चहा मागितला. मी सहज विचारलं, ‘तुझ्याकडे एक मुलगा आहे ना?’
‘मुलगा’ 
‘चहा वगैरे...’
‘हा हा, तो. काढलं त्याला कालच...’
‘का रे?’ 
‘माजोर असतात हो हे. फुकटचं खायची यांची सवय...’
‘.............’  मी
‘त्याचं कामात लक्ष राहत नव्हतं. इकडे-तिकडे बघत राहायचा. कधी कप फोड, कधी बशी. कामात लक्ष नाही. काही उपयोग नव्हता.’
‘लहान होता खूप.’
‘महाहुशार असतात लेकाचे. एका नेहमीच्या कस्टमरचे पैसे चोरले.’
‘पैसे चोरले?’
‘हो. आपल्या हॉटेलातून पैसे चोरीला जाणे म्हणजे नाव खराब होतं हो.’
‘त्यानेच पैसे चोरले कशावरून?’
‘त्याच्या हातात सापडले ना, वरून म्हणतो, माझेच आहेत म्हणून.’
ते पैसे त्याचे नसतील कशावरून, हा प्रश्‍न जिभेवर आला. मी विचारला नाही. कारण त्याचं उत्तर कोणतं मिळणार हेही माहीत होतं. मी फक्त विचारलं,
‘किती पैसे होते?’
‘दोन रुपये.’

मी बाहेर पडलो. पैसे कदाचित त्याने चोरले असतील किंवा नसतीलही. त्याच्या चेहर्‍यावरून तरी तो खूप निरागस दिसत होता. त्याने पैसे चोरले असतीलही तरी त्याला तो जबाबदार नव्हता.

रस्त्याच्या दुसर्‍या टोकाला असलेल्या सुपरमार्केटमध्ये घुसलो. तेथे एक गाडी उभी होती. एक छोटा मुलगा, चौदा-पंधरा वर्षांचा. गाडीतून मोठी पुडकी खाली उतरवत होता. सुपरमार्केटच्या दारातून एक जोडपं बाहेर पडलं. जाताना त्यांनी एक मोठी बाहुली विकत घेतली होती. तो मुलगा क्षणभर थबकला. त्या जोडप्याला न्याहाळत... आणि परत आपल्या कामात गर्क झाला.

विनोद बिडवाईक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा