रविवार, १४ ऑक्टोबर, २०१८

लिखाणाची ऊर्मी

Related imageआम्हाला लिहिण्याची खूप ऊर्मी येते (काही जणांना ती गुर्मी वाटते, तो भाग वेगळा, त्याची कारणंही वेगळी) त्याचबरोबर लिहिलेलं कुठंतरी एका कोपर्‍यात छापून तरी यावं ही इच्छाही प्रबळ होते. आताच्या वृत्तपत्रात प्रकाशित होणारे कित्येक लेख, असंख्य कविता आणि अगणित चारोळ्या (चारोळ्या कसल्या आरोळ्या मारायलाच लावणार्‍याच त्या) वाचून वाचून तर आम्हाला आमचे साहित्य कोणत्याही वृत्तपत्रात प्रकाशित होऊ शकते याची खात्री पटते. 




Related imageतरीही आमचे साहित्य प्रकाशित करायला संपादक ऐवढे आढेवेढे का घेतात, हा प्रश्‍न आम्हाला असंख्य वेळा पडायला लागला आहे. अर्थात इतर गोष्टीमुळे त्यांना काही वाचायला वेळच सापडत नसावा. कारण त्यांचा बहुतांश वेळ वेगवेगळ्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जात असतो. असो, पण तरीही आमचे लिहणं थांबत नाही. मराठीसृष्टीत घडलेली प्रचंड उलथापालथ याला कारणीभूत आहे. अर्थात चारोळ्या या साहित्य प्रकारात मोडतात असं म्हणणारे आहेत म्हटल्यावर प्रचंड उलथापालथ म्हणावं लागेल ना? या गोष्टीचा एक फायदा झाला, तो म्हणजे गल्लीगल्लीत चारोळ्या रचणारे ‘चारोळी’कार तयार झाले. ‘चंगो’ना या क्रांतीबद्दल श्रेय जरूर द्यायला हवं. आम्ही आवश्यक चारोळ्या पाडायला लागलो आहोत. एकूणच या सर्वांगीण उन्नतीमुळे आमची लिहिण्याची ऊर्मी अधिकाधिक प्रबळ होत चालली आहे. चक्क प्रतिक्रिया येऊ लागल्यात की, आमच्या साहित्यावर मागे एका कथेवर प्रतिक्रिया देताना एका महिला वाचकाने ‘तुम्ही विनोदी का लिहीत नाही,’ असा प्रश्‍न विचारला होता. फक्त त्यांनी प्रश्‍नाआधी ‘त्यापेक्षा’ हा शब्द वापरला होता. त्या महिला वाचकाचा प्रश्‍न ऐकून आम्ही मनातल्या मनात डोक्यावर खूपदा हात मारून घेतला. कारण आम्ही लिहिलेली कथा ही चक्क (आमच्या मते तरी) विनोदी होती. खूप जणांना आमचे विनोदी, खुसखुशीत लिखाण गहिवर वगैरे आणते. आम्ही लिहितो उत्कृष्ट हे एकूण सर्वांचंच मत, पण गहिवर येण्याइतपत आमचं लेखन गंभीर वाटते, याचा अर्थ समाजातून विनोदीपणा हद्दपार होत चालला आहे की काय? पण मग आमचं गंभीर लेखन त्यांना विनोदी का वाटावं? त्यामुळेच की काय गंभीर लेखन आम्ही विनोदी म्हणून देतो आणि विनोदी हे गंभीर म्हणून. आमच्या एका मैत्रिणीने आमचा एक लेख विनोदी लेख खूपच गंभीरपणे घेतला होता. ‘विवाह हा पुरुषांना जन्मठेप आहे’ या वाक्यावर मैत्रिणीचा आक्षेप होता. तो एवढा की त्यांनी आमचा निषेध केला. या मैत्रिणीचं लिखाण मात्र आम्ही मनापासून वाचतो. स्त्रियांना विनोदबुद्धी नसते हा समज त्यांचे लेख वाचून खोटाच पडतो.


सांगायचा मुद्दा एवढाच की आमची लिहिण्याची उबळ दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. आमचे विनोदी लेखन हे गंभीर म्हणून आणि गंभीर म्हणून निदान वाचले तरी जाते हा आनंद आम्ही का म्हणून लपवावा?
Related imageआम्ही कविता मात्र खरंच लिहित नाही. कधी कधी कविता करतो, त्या केवळ स्वतःसाठी. प्रकाशित झाल्यावरही स्वतःच वाचतो. कारण त्या दुसरे वाचू शकतात यावर आमचा विश्‍वास नाही. अर्थात इतर कवींच्या कविता आम्ही याच कारणासाठी वाचतो, ऐकतो. कारण त्यांनाही हक्काचा वाचक व श्रोता हवा असतो. नावापुढे नवोदित हा शब्द चिकटल्यामुळे उगाचच कुत्सितपणा व उपेक्षा वाट्याला येते, हा प्रस्थापितांचा डाव आहे. प्रत्येकाचा उमेदवारीचा काळ असतो, म्हणून काय जन्मभर त्याला नवोदित म्हणायचं?
आमचं लिखाण हे स्वयंभू आहे, कोणाची नक्कल आम्ही कधीच करीत नाही (शू ! चूप) आणि वाचक बोअर होतील एवढे आम्ही लिहीतही नाही. प्रकाशित होतं म्हणून काय वाचकांच्या माथी काहीही मारावं?
वृत्तपत्रे आमचे लेखन प्रकाशित करतात हे बघून आमचा वृत्तपत्रांबद्दलचा विश्‍वास अधिकच वाढीला लागतो आहे . वृत्तपत्रे ही लोकशाहीतील महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत, हे आमचे लेखन प्रकाशित होऊ लागल्यापासून खरंच वाटू लागलं आहे.

सारांश एवढाच की आमची एवढ्यात लेखनाची ऊर्मी जास्तच प्रबळ झाली आहे. त्यामुळे कोणी काही म्हणो,

आम्ही लिहित राहू नेमाने
पानपान लेख आणि कथा 
जमलं नाही तरी लिहू नुसत्या 
कविता आणि चारोळ्या 
शेवटी, मराठी साहित्य ‘वाचा’यला हवं नाहीतर पुस्तकविक्रेते,  वृत्तपत्रविक्रेते रद्दीवाले काय खातील?

विनोद बिडवाईक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा