त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. त्यांच्या प्रेमाला कशाचीही मर्यादा नव्हती. आयुष्यात काही कमावलं नाही, पण प्रेमाचं राज्य आपण जिंकलं, या धुंदीत आयुष्याचे कित्येक क्षण एकमेकांच्या सहवासात घालवताना, भविष्याच्या गुजगोष्टी करताना ते भारावून जात. ती त्याच्याशिवाय अपूर्ण होती. तो तिच्याशिवाय राहणे ही कल्पनाही त्याला सहन होत नव्हती.
कॉलेजच्या जीवनात फुलणारं प्रेम हळूहळू प्रगल्भ होत गेलं. शारीरिक आकर्षणाच्या सीमा नव्हत्याच. भावनिक प्रेमातून त्यांनी एकमेकाला समजून घेतलं. दुसर्यांसाठी त्यांचं प्रेम हा चर्चेचा विषय आणि चघळण्याचा विषय झाला. प्रेम हे अळवावरच्या पाण्यासारखं असतं. ते घसरलं, की मग संपलं. आळवाच्या पानावर मोत्यासारखं दिसणार पाणी घसरून गेलं, की मग त्याचं सौंदर्यही संपून जातं. पण शेवटी असली मोत्याची सर त्या अळवावरच्या पाण्याला येणार कोठून? त्याचं मन, हृदय, सांभाळता सांभाळता ती भावनिक व्हायची. तिची मर्जी सांभाळता सांभाळता तोही हळवा व्हायचा.
एकदा तिनं त्याला विचारलं, ‘तुझं प्रेम असचं राहील का रे माझ्यावर?’
तो हसला. तिच्या रेशमी केसांत बोट फिरवत त्याने प्रश्न विचारला,
‘माझ्या प्रेमाची व्याप्ती नाही सांगता येणार वेडे; पण चंद्राच्या कमी होणार्या कलेप्रमाणे तुझं प्रेम मला दगा तर देणार नाही ना?’ त्याच्या या प्रश्नाने ती दुखावली. डोळ्यातून टचकन पाणी गालावर ओघळलं.
‘म्हणजे तू मला समजूनच घेतलं नाही?’ ती म्हणाली. ‘नाही पण व्यवहाराच्या कसोट्यांवर आपलं प्रेम यशस्वी होईल?’ त्यानं विचारलं.
‘तू असं का बोलतोस?’ तिने रडवेली होऊन विचारलं.
‘उलट या कसोट्यांवर आपलं प्रेम हिर्यासारखं उजळणार नाही का?’
‘बोलते छान !’ तो हसला.
त्याच्या आयुष्यात असे कित्येक प्रसंग आले, धक्के आले. तिचं बोलणंच सत्य ठरलं. हिर्याला घासल्यावर जशी चकाकी येते, तसं त्यांचं प्रेमही उजळून निघालं. अशा धक्क्यांनी त्यांचे संबंध एवढे घट्ट झाले, की ते शरीराने जरी दोन असले तरी मनाने एक झाले.
भविष्याच्या गर्भातली स्वप्ने फुलतच होती. आयुष्य असंच आनंदाच्या उन्मत्त शिखरावर होतं. तो परिस्थितीने पिचला होता. त्याच्या स्वतःच्या आयुष्याचे कित्येक प्रश्न त्यालाच सुटले नव्हते. संघर्ष करण्यासाठी एक जोडीदारीण मिळाली होती. तिला कशाचीही अपेक्षा नव्हती. त्याचं प्रेम तिच्यासाठी सर्वात मोठी दौलत होती.
त्याच्या मनात एक शल्य नेहमीच टोचत राहायचं. आपण आयुष्याची एवढी वर्ष शिकण्यात घालवली, करिअरची स्वप्ने फुलवली; पण हातात फारसं आलं नाही. प्रयत्न कमी पडले होते कदाचित; पण आयुष्याच्या धावत्या शर्यतीत इतरांपेक्षा आपण मागे आहोत, हे शल्य त्याची झोप उडवून लावत असे. इतरांसाठी तो उच्चविद्याविभूषित, प्रगल्भ, दुसर्यांना समजून घेणारा, एक सोज्वळ आणि धडपड्या तरुण होता. त्यांच्या मते, अतिशय लहान वयात त्याने खूप काही कमावलं होतं; पण त्याला पाहिजे ते यश मिळतच नव्हतं. तो स्वतःच्या करिअरबद्दल समाधानी नव्हता. त्याला स्वतःच्या कर्तृत्वाचं उदाहरण जगासमोर दाखवायचं होतं.
हे शल्य त्याने तिच्याजवळ कित्येकदा बोलून दाखवलं होतं. तिने दिलेला दिलासा, हळूवार आत्मविश्वास तो विसरू शकत नव्हता. त्याला रस्ता सापडत नव्हता. त्याला चिंता होती, ती आयुष्याच्या खडतर प्रवासात त्याच्या हातात हात घालून ती चालू शकेल काय? तिने त्याच्यामागं फरफटत यावं, अशी त्याची मुळीच इच्छा नव्हती. तिच्या इच्छेविरुद्ध त्याला काहीही करायचं नव्हतं; पण तिच्या इच्छेत स्वतःला बांधूनही घ्यायचं नव्हतं. एखादा निर्णय घेतल्यावर त्या निर्णयात तिचा सहभाग हवाच, असं त्याला वाटायचं.
त्याची मानसिक स्थिती तीच समजून घेऊ लागली. त्याचं मन तिला संपूर्णपणे उमजू लागलं होतं. काचेसारख्या पारदर्शक संबंधात दोघंही एकमेकांच्या विश्वासातं मग्न होते. आयुष्याच्या अशाच एका वळणावर त्याला स्वतःचा रस्ता सापडला. स्वतःमधील ‘स्व’ चा शोध लागला. खूप दिवसांनी जे समाधान पाहिजे होतं, ते त्याला मिळालं होतं. यशाचा प्रश्नच नव्हता. येथे त्याला यशाची अपेक्षाच नव्हती. तो केवळ कार्य, कर्म करणार होता. या वाटेवर ती त्याला सोबत करेल, याची त्याला खात्री होती. पण तिचं आयुष्य त्याला वाया घालवायचं नव्हतं आणि म्हणून त्या रस्त्यावरुन एकटंच चालण्याचा त्याने निर्णय घेतला. भविष्यात त्याच्यामागून त्याच्या पावलावर पाऊल टाकून चालणारे खूप असतील, याची त्याला खात्री होती.
‘तू मला कधी घेऊन जाणार आहे?’ तिने लडीवाळपणे विचारले.
‘माझ्यासोबत तू नाही येऊ शकणार.’ त्याने तिला सर्व काही समजून सांगितलं. स्वतःचं आयुष्य, प्रेम यापेक्षा दुसरं जग आहे.
‘मग तुझा काय निर्णय झाला?’ तिने विचारले.
‘माझ्या आयुष्यात संसार नाही, प्रेम नाही.’
‘म्हणजे मी जे प्रेम केले ते उगाचच?’ ती म्हणाली.
‘तसं नाही, पण मला माझ्या जीवनाचा अर्थ कळालाय. तू माझ्या हृदयात आहेस, पण... हा रस्ता माझा एकट्याचाच आहे आणि एकट्यालाच पार पाडावा लागणार आहे.’
एवढं बोलून तो झपाझप पावलं टाकत निघून गेला. ती कित्येक वेळापर्यंत त्याच्या पाठमोर्या आकृतीकडे बघत होती. मावळत्या सूर्याच्या प्रतिबिंबाकडे चालत जाताना त्याची कृष मूर्ती एखाद्या तपस्वीप्रमाणे भासत होती.
‘मी मात्र तुला एकटी सोडू शकत नाही वेड्या,’ ती मनाशी पुटपुटली आणि त्याच्यामागे पळत सुटली.
विनोद बिडवाईक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा