रविवार, २१ ऑक्टोबर, २०१८

गुर्‍हाळ चर्चेचे

चर्चा करणं हा प्रत्येक मनुष्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे. चर्चा कशावर करावी याला बंधन हवेच अशातला भाग नाही. चर्चेतून काहीतरी हातात यावं असा हेतू असतोच असेही नाही. निरुपयोगी चर्चा करणे ही अन्न, वस्त्र, निवारा या गरजेसारखी एक गरज आहे. 
अनेक वर्षांपूर्वी लग्नात शिवलेला ठेवणीतला कोट घालून अखंड बडबड करणारी मंडळी आपण टीव्हीवर खूपदा बघतो. अशा चर्चा घडवून आणण्यात ते तत्पर असतात.

Image result for panel discussion sketch

अमेरिकेने इराकवर आक्रमण केलं... इकडे दोघे कोणीतरी त्यावर चर्चा करणार, कंबोडियात निवडणुका झाल्या... इकडे काही जण कॅमेर्‍यासमोर तयार! सोमालियात दुष्काळ पडला... टीव्हीवर हसरे चेहरे हजर...

चित्रपटातील हिरॉइनच्या चोळीपासून डोनाल्ड ट्रम्पपर्यंत विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांची चर्चा ऐकणे म्हणजे शिक्षाच असते. एखादी घटना घडली की त्यावर परिसंवाद होतात. अर्थात या परिसंवादाला श्रोतावर्ग किती आणि कसा येतो हा तसा वादाचा (की चर्चेचा?) विषय. जपानमधील भारतीयांचे राहणीमान किंवा बोस्नियामधील कम्युनिस्ट राजवट अशा विषयावर चर्चा करत बसणारे विचारवंत आपल्याला परिचित असतात.

सार्वजनिक जीवनातलं जाऊ द्या; आपल्या सभोवतालची उदाहरणेही खूप आहेत. सामान्य माणसांना चर्चेला तसा कोणताही विषय चालतो. माधुरी दीक्षितची चोळी, दीपिका पदुकोण आणि करिना कपूरचे कपडे, नरेंद्र मोदी यांची बुद्धिमत्ता इथपासून अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापर्यंत कोणातही, कोणत्याही क्षेत्रातला विषय त्यांना चालतो.

माझा एक मित्र श्याम. हा विचारवंत व्हायचा, तर साधा कारकून झाला. त्याला आम्ही फिलॉसॉफर म्हणत असू. एकदा कॅन्टीनमध्ये त्याने चहाच्या प्याल्यावर स्वतःच एक भाषण सुरू केलं आणि ते थेट ‘सुवर्णरोखे व्यवहार आणि तोटे’ या विषयावर संपवलं. एक महान विचारवंत बँकेत स्वतःचं दुःख बरबाद करतोय याचं दुःख वाटलं, बाकी काय?

संजय दत्त दोषी की निर्दोष, महागाई, अमिताभची पांढरी दाढी, हजरतबल इथंपासून शेजारची सुलोचना आणि आपला विनू यांचं लफडं असे शेकडो विषय चर्चेत येतात. रेल्वे जशी रुळावरून ट्रॅक बदलंत, वळण घेत इप्सित स्थळी पोहोचते, तशी चर्चाही अनेक वळणं घेते.
स्त्रियांच्या चर्चा ऐकणे हा एक करमणुकीचा प्रकार असतो. टीव्हीवरच्या निवेदकेच्या गळ्यातला नेकलेस यावर दिवसभर  चर्चा रंगू शकते. पाच-सहा मैत्रिणी अथवा ओळखीच्या जेव्हा एकत्र येतात, तेव्हा त्या वेळी अनुपस्थित असलेल्या सभासदावर चर्चा चालते. तसेच साड्या, अमकीचा नवरा, तमकीची सासू या विषयावर तर हमखास चर्चा चालतेच.

कॉलेजमधील दीपिका , स्मार्ट, सुंदर जेथे सौंदर्यही क्षणभर स्तब्ध होते! (घाबरू नका सौंदर्यावर मी चर्चा करणार नाहीय.) या दीपिकाला  फक्त एकच वाईट खोड होती, चर्चा करण्याची. आणि तिचा हक्काचा श्रोता (किंवा पार्टनर-चर्चेचा) होता रणवीर . बाकी ती  बोलायची छान. तिच्या सहवासात राहून-राहून रणवीरराव  तिच्या प्रेमात पडले. प्रत्येक प्रेमात पडलेल्या व्यक्तीला जो प्रश्‍न पडतो, तोच प्रश्‍न त्यालाही  पडला. ‘हाऊ टू एक्सप्रेस इमोशन्स’ (मध्ये-मध्ये इंग्रजी पेरण्याने चर्चा थोडी इफेटिव्ह होते) आपलं प्रेम व्यक्त करावं कसं, हा गहन प्रश्‍न त्याच्या समोर असायचा. तो  तसा प्रयत्नही करायचा. 

Related image

‘दिपू  मला काही सांगायचंय' 
‘बोल ना.’ ती. 
रणवीर क्षणभर गप्प बसायचा . शब्दाची जुळवाजुळव करायचा आणि...
‘दिपू  ...दिपू  आज वातावरण काय छान आहे नाही?’ तो पटकन बोलून जायचा आणि मग दिपू  वातावरण, प्रदूषण यावर खूप वेळपर्यंत बोलत राहायची. म्हणजे प्रेम व्यक्त करण्याची रणवीरची  तशी हिंमतच व्हायची नाही. शेवटी एकदा काहीही करून प्रेमाचा ‘इजहार’ दीपिका जवळ करायचाच असं  त्याने ठरवलं. तिला एका छान सायंकाळी, एका चांगल्या हॉटेलमध्ये जेवणासाठी निमंत्रित केलं.
जेवण सुरू करायच्या अगोदर त्याने कोटात लावलेलं गुलाबाचं फूल तिच्या हातात दिलं. तिला ते वेणीत लावायला सांगितलं.  प्रेम व्यक्त करण्यासाठी वातावरण निर्मिती होत होती. त्याने तिचा हात हातात घेतला, तो तयारी करूनच आला  होता . त्याने शब्दांची जुळवाजुळव केली आणि मोठ्या स्टायलीशपणे वाक्य फेकलं, ‘दिपू ...  काश्मिरसारख्या...’ पण त्याचे वाक्य पूर्ण होण्याच्या आत तिने छान स्मित केलं आणि सुरुवात केली.

‘नाही रणवीर , काश्मिरचा प्रश्‍न भारताचा आहे, मेहबूबा  प्रकरणाने त्याला वेगळी कलाटणी मिळाली. तो भाग वेगळा; पण ती चूक आपल्या राज्यकर्त्यांची आहे. पाकिस्तानने आपला डाव पद्धतशीरपणे टाकलाय. प्रश्‍न काश्मीरच्या जनतेच्या मानसिकतेचा आहे. असे, सूप पीना! तर प्रश्‍न कोणताही असो...’
दिपू  अखंड बोलत होती आणि रणवीर ऐकत होता .
खरंतर ‘दिपू काश्मिरसारख्या स्वर्गीय निसर्गात तुला कवेत घेऊन मला धुंद व्हावंसं वाटतं,’ असं खूपसं काहीतरी रणवीर ला  सांगायचं होतं.

आता आता मला कळले आहे कि दीपिकानेच  रणवीरला प्रपोज केले आहे आणि  दोघे जण लवकरच लग्न करणार आहेत. 

विनोद बिडवाईक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा