‘तू माझ्यावर संशय घेतोस,’ ती संतापाने बोलली आणि तेथेच ठिणगी पडली. एकमेकाला समजावून घेण्याचा दावा करणारे दोघेही घसरले. खूप दिवसांपासून जपून ठेवलेल्या स्वप्नांना काजळी लागली. ती त्याला नेहमी ‘मी तुला शंभर टक्के समजावून घेतलं,’ अशा शब्दांत दिलासा द्यायची. पण वरील वाक्याने घोटाळा केला आणि त्याच्या विश्वासाला आणि प्रेमाला तडा गेल्याचं त्याला वाटायला लागलं.
कधी-कधी माणूस खूपच अपेक्षा ठेवतो. एवढ्या अपेक्षा तो स्वतःबद्दलही ठेवत नाही. तिचं प्रेम विशुद्ध होतं हे त्याला माहीत होतं. तिच्यावरचं त्याचं प्रेमही वादातीत होतं. आयुष्यात त्याने स्वतःवर जेवढा विश्वास ठेवला नव्हता, तेवढा विश्वास तिच्यावर त्याने टाकला होता. म्हणून जेव्हा तिने त्याला अशा पद्धतीने डिवचलं, तेव्हा त्याची प्रतिक्रिया अपेक्षित अशीच होती. तो चरफडला, संतापला, स्वतःवरच. त्याच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा अतिशय वाईट पद्धतीने अपमान झाला असं त्याचं मत झालं.
मग ती त्याच्या भावनाच अशा पद्धतीने तुडवत आहे, असा त्याचा समज झाल्यावर संबंधात निर्माण होणारी कटुता कोण दूर करणार? त्याला जाणवलं, आपण आयुष्यात जी चूक केली नाही ती येथे केलीय. ती त्यांच्या जीवनाची जोडीदारीण झालीय. याचा अर्थ तिचं स्वातंत्र्य आपण हिरावून घेऊ शकतं नाही. तिचा स्वभाव हा तिच्या वयाच्या शून्य वर्षांपासून तिचा सोबती आहे. आपण तर तिच्या आयुष्यात जेमतेम काही दिवसांपासून प्रवेश केला आहे. त्यामुळे आपण सांगतो तसंच तिने वागावं ही अपेक्षा करणंच चूक होतं.
दुसर्या बाजूने ती प्रत्येक गोष्ट मनावर घ्यायची. कदाचित ती चुकून संतापली असेन; पण ती तिच्या मनात उमटलेली उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती.
प्रेम हे काचेसारखं असतं. आयुष्यात जगताना या प्रेमावरच जगाची, जगण्याची भिस्त असते. प्रेमाला थोडाफार जरी तडा गेला की संपलं. संबंधातली कमतरता ती नंतर-नंतर जाणवायला लागते. प्रेमाच्या नात्याने एकमेकांवरचा हक्क हा गृहीतच असतो, येथे तिने त्याला अशा पद्धतीने बोलायला नको होतं, हे त्याला मात्र राहून-राहून वाटायला लागलं.
तिच्या मनात भविष्यातही असा प्रश्न उभा राहणार नाही याची खात्री काय? या विचाराने त्यांचं डोकं बधिर झालं. तो संवेदनशील असल्यामुळे तिचं हे बोलणं त्याने गंभीरपणे मनावर घेतलं. तिच्या प्रेमाबद्दल त्याच्या मनात शंका नव्हती; पण प्रेमाला संशयाचं ग्रहण लागलं की मग वाद वाढतात. संबंधात कटुतेचं बीज पेरलं जातं. त्याने तिच्यावर संशय घेतला नव्हताच. कारण त्याचा तिच्यावर असणारा विश्वास. त्यामुळे आपला विश्वासच पुराने दुथडी भरणार्या वाहत्या नदीतील भोवर्यात सापडला आहे, असं त्याला वाटायला लागलं. प्रेमाचा पाया हा विश्वासावरच मजबूत होत असतो. त्या विश्वासालाच तडा गेला की प्रेम हे पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडतं.
तिला आपण हे उगाचच बोललो असं राहून-राहून वाटायला लागलं. तिला पश्चाताप व्हायला लागला; पण तिच्या मनात यायलाच नको असं त्याचं मत होतं. त्याला दोन-तीन दिवसांपूर्वीचा किस्सा आठवला.
‘तुझे माझ्याकडे लक्षच नाही,’ तिने लाडीवाळपणे तक्रार केली.
‘अगं नाही, तसं काही नाही. तुझ्याकडेच तर माझं लक्ष लागलेलं असतं’, तो.
‘काही सांगू नको, तू फक्त माझ्यावर नजर ठेवतो.’ तिची प्रतिक्रिया.
तो गोंधळला, ‘नजर ठेवणे’ याचा अर्थ न समजण्याइतकी ती खुळी नव्हती. म्हणजे आपल्यामुळे तिच्या स्वातंत्र्यावर गदा येते की काय? या विचाराने तो अस्वस्थ झाला. आपल्याला आवडतं, तसंच तिनं राहावं, ही अपेक्षा प्रेमातून आलेली होती. पण तिला जर ती ‘नजर ठेवणे’ वाटत असेल, तर संबंधात कोठेतरी मिठाचा खडा पडलाय. तिला असं वाटणं म्हणजे आपला जाच वाढत असल्याची लक्षणं आहेत आणि जेथे जाच वाढतो तेथे तक्रार येते. तक्रार आली की विश्वास डळमळतो आणि शेवटी आपले संबंधही एका काळ्या पायावर उभे होते, याची जाणीव होते.
आयुष्यात जगण्यासाठी खूप काही लागतं. काही जणांच्या अपेक्षा वेगळ्या असतात. त्याला तिच्याकडून विश्वास आणि त्यावर भरभक्कम असणार्या प्रेमाची अपेक्षा होती. तडजोड करायची इच्छा नव्हती. कित्येक उदाहरणं त्याच्या समोर होती. मागच्याच महिन्यात त्याच्या मित्राने बायकोशी घटस्फोट घेतला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांचा ‘प्रेमविवाह’ झाला होता. प्रेमात एकमेकाला संपूर्ण समजून घेणं आवश्यक असूनही ‘प्रेमविवाह’ अयशस्वी का ठरतात, या प्रश्नाने तो अधिकच गोंधळून जात होता.
मुळात प्रेमात अपेक्षाच जास्त असतात. त्या अपेक्षा प्रत्यक्षात उतरल्या नाही की मग अपेक्षाभंग होतो. अपेक्षाभंग विश्वासाला तडा देऊन जातो आणि मग एकमेकांबद्दल जीवापाड प्रेम असूनही प्रेम बाजूला पडतं, एकटं..... पोरकं होऊन.
त्याच्या डोक्यातलं विचाराचं थैमान काही संपत नाही. पण तिच्याबद्दलचं प्रेमही कमी होत नाही. तिची काळजी दुपटीने वाढते. कारण आता तिच्याबद्दल त्याला चिंता वाटायला लागते.
बारमधील एका कोपर्यात एक मनुष्य एकटाच पीत बसलेला असतो. कानात हेडफोन लावून, मोबाईलवर मंद आवाजात हरिहरनच्या आवाजातील गझल सुरू असते. शेवटचा पेग मारून तो उठायला लागतो. तोच त्याच्या कानावर शब्द पडतात...
‘शहर दर शहर लिए फिरता हूँ तनहाई को
कौनसा नाम दूँ मै तेरी शनासाई को...’
विनोद बिडवाईक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा