एक विशिष्ट वय असतं, या वयात वेगवेगळे भास होत असतात. आपण काहीतरी ग्रेट आहोत आणि जगातील प्रत्येक तरुणी आपल्यावर फिदा आहे, असं वाटण्याचं हे वय असतं. याच वयात तरुणी आरशासमोर तासनतास वेळ घालवत बसलेली आढळते. तोंडातून रोमँटिक गाणी बाहेर पडतात. अशाच अजाण वयात प्रत्येकाला एक भयानक वाईट सवय जडते आणि ती सवय असते कविता करण्याची. मग, शेरोशायरी ओठावर खेळू लागते आणि चारोळ्या वहीच्या पानापानांवर उमटू लागतात.
हे वयच असं असतं, त्यामुळे त्यात असा सिरीयसनेस नसतो; परंतु या पलीकडे म्हणजे हा काव्यवेडेपणा कधी-कधी वाईट रूप घेतो. मुळातच कविता करण्याची, शेरोशायरी करण्याची, चारोळ्या करण्याची ऊर्मी काही दिवसच टिकत असते; पण जोपर्यंत या ऊर्मीची गर्मी दुसर्यांना जाणवत नाही, तोपर्यंत ठीक असते.
कॉलेजमध्ये एखादा सुंदर चेहरा नजरेस पडला की, या काव्यवीरांच्या प्रतिभेला बहर येतो आणि हा बहर वसंतातील बहराला मागे टाकणारा असतो. मुक्तछंदातील या कविता डायरीची शोभा वाढवतात. मूळातच या कविता उत्स्फूर्त असतात, असं नव्हे. कारण एखादी सुंदर मुलगी दिसली की, तिच्यावर कविता करावीच लागते. हा जो समज या अजाण वयात पसरलेला असतो, त्या समजानुसार प्रत्येकजण कवी होतो. ‘मी कवी होतो’ या उक्तीनुसार प्रत्येकाची प्रतिभा रंग धारण करते.
या समजाबरोबर आणखी एक समज या वयात पसरतो ‘हे वयच प्रेम करण्याचं असतं’, हा तो समज! प्रेम काय प्रकार असतो, याचा अर्थ समजलेला नसतो; पण सुंदर तरुणी दिसली की, ती प्रेमाचा पुतळा वगैरे आहे, असं वाटायला लागतं. अर्थात हे वाटणं काही गैर नाही. कारण वयात येताना ज्या अनामिक हुरहुरी जाणवतात, त्यातलाच हा एक भाग असतो. येथे मानसिक, भावनिक प्रेमाला फारसा अर्थ नसतो. कारण हे प्रेम फारसं उत्स्फुर्त नसतं. समोरून येणारी तरुण-तरुणी सुंदर किंवा हँडसम आहे, याच एका निकषावर ती मुलगी माझी पार्टनर किंवा तो मुलगा माझा पार्टनर व्हावा, ही सुप्त इच्छा या कवितेच्या रूपाने बाहेर पडते. बाकी प्रेम-बिम सर्व काही झुठ असतं. त्यामुळे राहतं निव्वळ शारीरिक आकर्षण. या सुंदरतेवरचं ते प्रेम असतं, व्यक्तीवरचं नव्हे. त्यामुळे ही नशाही लवकरच उतरते. एकदा प्रेमात पडल्यावर या कविता, शेरोशायरींच्या मैफिली रंगू लागतात. परंतु प्रत्येकाला आपली कविता कोठेतरी वापरायची असते. एकदा तरुणीला बघितल्यावर कवितेतून हिंदी चित्रपटातील गाण्यांच्या ओळी बाहेर पडत नसतील तर तो वयात येणारा तरुण नव्हे, असं म्हणतात ते उगीच नव्हे.
अर्थात खूप काहीतरी करून दाखवायचं, हे वयही तेवढंच धोकादायक. मला वाटतं, प्रेम दोन प्रकारचं असतं. एक या वयात होणार सुंदरतेवरचं, तर दुसरं प्रगल्भता आल्यावर होणारं ‘प्रगल्भ प्रेम’. येथे दोन मनांचे सूर जुळतात, असो.
आपण अशा वयात येणार्या काव्य प्रतिभेच्या बहरीवर चर्चा करत होतो.
‘तुझी भेट व्हावी अशी
श्रावणातील सर यावी जशी,
मनाचा पिसारा फुलवून जावी’
अशासारख्या अनेक चारोळ्या (चारोळ्या कसल्या, आरोळ्या मारायला प्रवृत्त करणार्याच त्या) जन्म घेतात, पण त्याहीपेक्षा भयानक असते, ती शेरोशायरी! काहीजण असे अचानक शायर, कवी, चारोळीकार बनतात, तसे अचानक त्यांची प्रतिभाही (इथे कोणताही अर्थ घ्या) गायब होते. अस्मादिकांचीही अशीच एक वही होती कवितांची. मस्तपैकी सजवलेली. आठवलेल्या प्रत्येक कविता तारखांसहित लिहून ठेवल्या होत्या. माझा तो स्वतःचाच हस्तलिखित कवितासंग्रह होता की! आता त्या कविता वाचल्या की मी किती वाईट कवी आहे, हे लक्षात येतं. मला वाटतं माझ्या या कविता एखाद्याने वाचल्या की तो कवितेच्या वाटेला परत कधी जाणार नाही. एवढ्या वाईट कविता वाचून आद्यकवींचा आत्मा स्वर्गात तळमळून जाईल. अर्थात हे काव्यही त्या वयातील आठवणी असतात. आपणही सुंदरतेवर प्रेम केलं होतं, याची जाणीव होते. त्यानंतर प्रेमभंग झाल्यावर (कितवा?) शून्यात नजर लावून दिवस कसे घालवावेत, हेही आठवतं. (प्रेमभंग हा तसा हमखास होणारचं असतो म्हणा की)
कविता करणं तसं वाईट नाही. प्रेम करणंही वाईट नाही, चांगलच आहे; पण या वयातलं हे प्रेम आणि काव्य यांचा एवढा निकटचा संबंध असतो की, आयुष्यात प्रत्येकजण हमखास एक तरी प्रेमकविता करतोच. सुंदर तरुणीच्या इश्क मोहब्बतवर शेर लिहतोच. स्वप्न बघून त्यावरही तो कविताच करतो.
यमकाला यमक जुळवलं की कविता तयार. त्यात प्रेयसीचा चेहरा घातला की प्रेमकाव्य तयार. या जागी एकच मोठा प्रश्न आहे, तो गुन्हेगारीचा नाही, बेकारीचा नाहीच नाही, तर तो आहे या काव्य पीडित जनतेचा. कविता करायला हरकत नाही, प्रेमकविता करायला तर मुळीच हरकत नाही; पण या सर्वात कहर म्हणजे हे सर्व कवी काव्यसंमेलनात किंवा काव्यस्पर्धेत भाग घेतात. त्याहीबरोबर वृत्तपत्रात कविता प्रकाशित करायला भाग पाडतात. ‘माझी पहिली कविता’ अशासारख्या सदरात हे ‘प्रेमकवी’ हजेरी लावून बेजार करतात. क्षणाक्षणाला अंगावर येणार्या चारोळ्या अगतीक करतात. प्रेम करावं, कविता कराव्यात, शेरोशायरीही करावी, चारोळ्यांचं पिकही काढावं; पण ते स्वतःसाठी करावं. जिच्यावर किंवा ज्याच्यावर लिहिलं, त्याच्यासाठीच असावं. यात कसली दुनियादारी? दुनिया व प्रेम याच्यात ‘दिवार’ असणे आवश्यक असते.
विनोद बिडवाईक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा