रविवार, १४ ऑक्टोबर, २०१८

झपाटलेला...

Image result for cartoon passionateझपाटलेपण हे उपजत असावं लागतं, त्यासाठी माणूस संपूर्ण झपाटलेला हवा, अर्धा-कमी झपाटलेला ही संज्ञा असूच शकत नाही. मी एवढा झपाटलेला आहे किंवा जास्त झपाटलेला आहे, हा प्रकार नसतो. प्रकार असतोच तर तो फक्त ‘झपाटलेला’ आहे एवढाच. कारण झपाटण्याची तीव्रता, डिग्री असत नाही, असू शकत नाही, माणसाचंही तसंच.


मी अशी खूप माणसे बघितली जी कोणत्याही ध्येयाने, प्रेरणेने झपाटलेली असतात. मग त्यांच्या आयुष्याचा संपूर्ण ट्रॅकच बदलून जातो.
कॉलेजमध्ये शिकताना तर हे झपाटलेपण आपोआप येतं. झपाटलेपण येणं किंवा माणूस झपाटणं हा प्रकार तसा व्यक्तिसापेक्ष आहे. कडक शिस्तीच्या बडग्यातून जेव्हा उत्स्फूर्त वातावरणात माणूस येतो, तेव्हा त्याचं हे झपाटलेपण थोडं वाफेसारखं असतं. वाफेला जेवढं दाबून धरलं जातं, तेवढ्या जोरानं ती बाहेर पडते.

शाळेतून कॉलेजातील पायरी या वाफेसारखीच असते. मूळात माणसाचं आयुष्यच हे वाफेसारखं. भावभावना, स्वप्न वगैरेही वाफेसारख्याच.
काहीजण झपाटतात, काहीजण झपाटल्याचा देखावा करतात आणि काहीजण झपाटल्याचा आव आणतात.
अर्थात हे झपाटलेपण अवलंबून असतं, स्वभावावर.

कॉलेजमध्ये प्रवेश केल्या केल्या काही जणांना एक रोग होत असतो, हा तसा प्रत्येकालाच होतो. ‘प्रेमरोग’ नावाचा हा आजार जडल्यावर माणूस या ‘प्रेमाने’ संपूर्णपणे झपाटतो. कावीळ झालेल्या व्यक्तीला ज्याप्रमाणे संपूर्ण जग पिवळं दिसू लागतं. तसंच या झपाटलेल्या प्रेमवीरांना सर्व दुनिया हिरवी-हिरवी दिसू लागते. अर्थात हिरव्या रंगाचा संबंध कितपत आहे हे मला सांगता येणार नाही. मला वाटतं, हे झपाटलेलं प्रेमाचं भूत लवकरच डोळ्यावरून उतरतं. कारण शारीरिक आकर्षण संपलं की, मग खर्‍या प्रेमाचा साक्षात्कार होतो आणि खरं प्रेम या जगात खूप कमी मिळतं, जाऊ द्या. आपण झपाटलेपणावरच चर्चा करत होतो, तर या झपाटलेपणावर काही औषध आहे का? मला वाटतं, ज्या कारणांनी माणूस झपाटतो, त्या कारणांची पूर्तता हेच यावरचं औषध म्हणता येईल.

पण झपाटावं कोणी आणि झपाटावं का? यालाही काही नियम हवेत.
भूत डोक्यावर चढायलाच हवं; पण त्या भूताने माणसाचा बळी घ्यायला नको. झपाटलेपण हवंच, त्याशिवाय जीवन नाही. पण ध्येयाकडे वाटचाल करणारं झपाटलेपण असावं.

या जगात खूप व्यक्ती आहेत, ज्या कोणत्या ना कोणत्या ध्येयाने झपाटलेले आहेत, प्रेरित आहेत. कोणतं तरी भूत त्यांच्या डोक्यावर बसलेलं आहे. समाजसेवेचं, राजकारणाचं, माणुसकीचं, सेवेचं हे झपाटलेपण जीवघेणं नाही, हे झपाटलेपण आदर्श आहे. मदर टेरेसा, विनोद बिडवाईक, प्रकाश आमटे,  नरेंद्र मोदी , अण्णा हजारे या व्यक्तींसारखं झपाटलेपण असावं.

माणसानं जगावं तर झपाटलेलं आयुष्य जगावं, कसंही जगावं पण झपाटलेलं जगावं. पण माणूस या झपाटण्याचा आव आणतो. दुसर्‍यांचा विचार करून जगतो आणि स्वतःवर अन्याय करून घेतो.

झपाटून काम केलं की, मग तेथे स्वार्थाला वाव नसतो. जेथे वैयक्तिक हितसंबंध येतात, तेथे झपाटलेपण असूच शकत नाही. कारण तेथे सर्व काही चालतं. स्वतःच्या, स्वत:च्या जगण्यासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी.

हे झपाटलेपण कधी-कधी खूप कठीण जातं. त्यासाठी मनाची तयारी हवी आणि त्यावर अपमान सहन करण्याची तयारीही हवी.
सर्वच माणसं झपाटतात; पण यात हे अशा पद्धतीने झपाटलेपण नसतं. माणसानं जरूर झपाटावं. पण काहीतरी ठरवून झपाटावं.
प्रवाहाविरुद्ध सर्वच पोहत नाहीत. झपाटलेपण असंच हवं; पण हे पोहण अर्धवट नसावं. नाहीतर मनुष्य जिथून सुरुवात करतो तेथेच येऊन थांबतो आणि सर्व झपाटलेपण पाण्यात जातं.

विनोद बिडवाईक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा