शुक्रवार, १९ ऑक्टोबर, २०१८

इंतजार

कुणाला कुणाची वाट बघणं प्रत्येकाच्या नशिबी लिहिलेलं असतं.. कुठल्या कारणासाठी कोण खोळंबून राहतं, यावर सगळं ‘तिष्ठत’ राहण्याची ‘तीव्रता’ अवलंबून असते....


" यह तनहाईया और ढलते लम्हे 
जला रहे है पल पल 
इंतजार आपका करते करते 
लम्हे भी थम गये है।"
 
Image result for girl waiting somebody sketch

इंतजार’ या शब्दातच एक प्रकारचा गहन अर्थ दडलेला आहे. बर्‍याच वर्षांपूर्वी दूरदर्शनवर अजीज मिर्झांची ‘इंतजार’ ही मालिका प्रक्षेपित होत होती. त्यातील शीर्षक गीतात कोणाला कशाचा ‘इंतजार’ असतो, यावर मस्तपैकी सांगितले होते. ‘भुखो की रोटी’का पासून तर रेल्वे स्टेशनवर येणार्‍या गाडीचा ‘इंतजार’ करणार्‍या व्यक्तीच्या मानसिक परिस्थितीचं विश्‍लेषण समजून घेण्यासारखं होतं.

‘इंतजार’, ‘वाट पाहणे’, ‘पाहणे’ या शब्दातच त्या व्यक्तीच्या भावना दिसून येतात. अर्थात कोण, कशाचा, कशासाठी इंतजार करतो, यावर त्या वाट बघण्याची तीव्रता अवलंबून असते. 

माणूस मुळातच बुद्धिमान आणि महत्त्वाकांक्षी प्राणी म्हणून ओळखला जातो. भाव-भावनांचा वरदान असणारा हा प्राणी एखाद्या गोष्टीची किंवा व्यक्तीची वाटही त्याच तीव्रतेने बघू शकतो. 

प्रत्येकाची जगण्याची पद्धत वेगळी आहे. ध्येय धोरणे वेगळी आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीने जगण्याचा प्रयत्न करतो. जगण्याची धडपड करतो. हे जगणंही मग एखाद्याकडे जाण्याची धडपड असते आणि ते ध्येय हातात येण्याची वाट बघू-नाही असं चालूच राहतं.
जगण्याचीही अशी तर्‍हा ‘इंतजार’ या शब्दात सामावल्यासारखी वाटते.

एखाद्या प्रिय व्यक्तीची वाट बघण्याचं सुख अवर्णनीयच. एखाद्या गोष्टीची वाट बघितल्यानंतर ती गोष्ट जेव्हा हातात पडते, तेव्हाचं समाधान हे स्वर्गीय आनंदाची अनुभूती देणारं असतं; पण परत नंतर काय? या प्रश्‍नात माणूस गुरफटून जातो आणि परत कशाची तरी वाट बघायला सुरुवात करतो.

त्याची वाट बघणं हे नित्याचंच झालंय. कधी दोन मिनिटंही उशीर झाला की, दोन वर्षांसारखी वाटतात. 
तो उशिरा आला की, ती लटकं रागावून घड्याळ दाखवते. ‘एवढा उशीर? वाट बघून बघून मी किती थकलेय.’
एकमेकांची अशी वाट बघणं, प्रणयाचाचं एक भाग होऊन जातो, हे कळतही नाही. हे वाट बघणं कधी संपतच नाही. 
वाट बघता बघता सांज लवंडते, वारा मंद होतो, वृक्षवेली रोमांचित होतात आणि तिच्या आठवणीने तो व्याकूळ होतो. संध्याकाळ संपायला लागते, ती येत नाही. ओठातून गाण्याच्या ओळी बाहेर पडतात.

‘इन्तेहा हो गयी इंतजार की, 
आयी ना कुछ खबर मेरे यार की!’ 

इंतजार-वाट बघण्याची परीक्षा/ कसोटी लागते; पण ती येत नसते. ती येणार हे मात्र नक्की असतं आणि शेवटी मात्र ती येते,
‘आयी रे... सजना’ म्हणतं

Image result for girl waiting somebody sketch

या गोड भावना मला वाटतं, वाट बघण्यात जगातलं सर्व सुख सामावलेलं असावं. तीच नेहमी वाट बघायला लावते असं नाही. कधी कधी तोही उशिरा येतो ‘टाईम मॅनेजमेंट’ कुठून प्यालो, असा दावा करणारा आणि तिच्यावर रागावणारा तो, तू कशी रुसली असेल या कल्पनेने मनातल्या मनात पुलकित होतो. तो येतो. तिचा लटका राग.

‘तुझी वाट बघून डोळे थकले’ असे जरी ती म्हणत असली तरी तिची कितीही वाट पाहण्याची तयारी आहे हे तिच्या डोळ्यात तो पाहतो. प्रेम, खरं प्रेम दिसतं डोळ्यात... मग ‘इंतजार’ एक मोठी तलवार बनून जाते. 

वाट बघणं हा मनुष्याचा स्थायीभाव आहे. तो त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येकाची तर्‍हा मात्र वेगळी. संध्याकाळी दरवाजात उभी राहून पतीची वाट बघणारी पत्नी, प्रेमिकांनी बघितलेली वाट, बाहेरगावी गेलेल्या नातेवाइकांची वाट आणि पप्पा आज माझ्यासाठी खेळणं आणा, म्हणून पप्पा घरी कधी येतील याचा विचार करत त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसणारी छोटी मुलगी, या सर्वांची वाट बघण्याची तर्‍हा वेगळी असली, तरी त्यांच्या भावना शब्दात व्यक्त करण्यासारख्या सोप्या नसतातच.

या वाट बघण्यात जुनेपणा नसतोच, रोज तेवढ्याच उत्साहाने, तेवढ्याच तीव्रतेने वाट बघण्याच्या प्रक्रियेमागे या भावनिक झिलई आहे. 

"क्या करू सजनी 
आये ना बालम’"

या  ठुमरीतलं विरहणीचं ते पियाच वाट बघणं म्हणूनच आर्द्र वाटतं. या वाट बघण्यामागे एक आशा असते, इच्छा असते आणि त्याहीपेक्षा एक भावनिक गुंतवणूक असते.

इंटरव्ह्यूच्या कॉलची वाट बघणारा बेरोजगार तरुण, तो कॉल आल्यावर आयुष्याची स्वप्न बघायला लागतो. त्यावेळेस त्याच्या चेहर्‍यावर स्वर्गीय आनंद बघून घरातल्या इतरांचे चेहरेही उजळतात.

वाट बघण्यात भावनिक गुंतवणूक नसली की, मग त्याला व्यवहाराचं रूप येतं, असा कोरडेपणा वाट बघण्यात नसतोच.
यापेक्षाही माणूस आयुष्यात एका गोष्टीची वाट बघत असतो, ते म्हणजे ‘यश’. ‘यशाची’ वाट बघणची इच्छा बनते, आशा वाटायला लागते. मग ते कोणतेही ‘यश’ असो, अगदी प्रेमापासून इंटरव्यू कॉलपर्यंत. कारण या वाट बघण्यामागे या सर्व इच्छा असतात. त्या एकमेकांशी संलग्न झालेल्या असतात. 

मग कधी-कधी ती आपली वाट बघताना कशी व्याकूळ होते, हे लपून बघायची इच्छा होते. ती वाट कशी बघते हे बघण्याची आणि तिला छेडण्याची इच्छा प्रणयाचाच भाग असतो.

हे वाट बघणं असंच असतं, इंतजार करतच राहतं, कोणी कोणाची तरी! भावनिक तीव्रतेने व्याकुळतेने.

"इंतजार और इस तनहाई मे
तुम्हारी याद मुझे 
जीने नही देगी 
तुम्हारा इंतजार हमे मरने नही देगा!"

विनोद बिडवाईक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा