रविवार, २८ ऑक्टोबर, २०१८

एकेकाचं स्वप्न

खूप दिवसांनी माझी त्याच्याशी भेट झाली. त्याचा अवतार बघून मला आश्‍चर्य वाटलं, अर्थात कॉलेजमध्ये ‘हँडसम’ या सदरात मोडणारा तो आता बेढब झाला होता. जरा ‘गोलमटोल’ झाला होता आणि नेहमी हसरा असणारा त्याचा चेहरा, आता एरंडाचे तेल प्यायलेल्या व्यक्तीसारखा दिसत होता. खूप दिवसांपासून भेट नसल्यामुळे आम्ही अगदी गळाभेट घेऊन भेटलो. गळ्यात अडकवलेला त्याचा टाय ओढत मी त्याला विचारलं, ‘काय म्हणते लाइफ?’. तो हताशपणे हसला.
‘नथिंग स्पेशल, अ‍ॅज युज्वल’

आयुष्याचा प्रत्येक दिवस नव्या आशा, नव्या गोष्टी, नवे स्वप्न घेऊन येतो, असं मत असणार्‍याच्या आयुष्याबद्दलचं असं उत्तर ऐकून मी चकीत झालो.

आम्ही दोघे लहानपणापासूनचे मित्र होतो. आयुष्यातील अनेक स्वप्ने, दिवा स्वप्ने एकमेकांच्या सोबतीने रंगवली होती. त्याचं एक मोठं स्वप्न होतं. शाळेमध्ये असताना त्याला डॉक्टर व्हावं असं वाटायचं; पण तो डॉक्टर होऊ शकला नाही. नंतर बीएसस्सीला अ‍ॅडमिशन घेतल्यावर एक शास्त्रज्ञ व्हावं, असं त्याला वाटत राहायचं. पण तो शास्त्रज्ञच काय साधा तंत्रज्ञही झाला नाही. पुढे त्याला आयुष्यात स्वतःची केमिकलची फॅक्टरी टाकावी, असं खूप दिवसांपर्यंत वाटायचं. आता तो एका औषधी कंपनीचा प्रतिनिधी आहे. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. पैसा चांगला कमावतो; पण आयुष्याची स्वप्नं आता तो बघत नसावा.

‘बरं, तू लग्न कधी करणार आहेस?’
‘लग्न ? सध्या विचार नाही यार...’ 

त्याने तुटकपणे उत्तर दिलं. स्वतःच्या आयुष्याबद्दल बिनधास्तपणे आणि रोमँटिक मतं देणारा हा प्राणी एवढा रुक्ष कसा झाला, याचंच मला आश्‍चर्य वाटलं. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह या आपल्याला जगातील सर्वात जास्त ज्ञान आहे, असं समजणारा प्राणी असतो. स्वतःचं मोठेपण सांगणारी आणि मार्केटिंग संपूर्णपणे कोळून प्यायल्याचा समज असणारी ही मंडळी ‘एक्स्ट्रॉऑर्डनरी’ असतात. असा त्यांचाच समज असतो. नेहमी इंग्रजीचा वापर केल्यामुळे ते आपला प्रभाव टाकतात. माणसाला बोलतं करण्यासाठी त्यांचा ‘इगो’ सुखवावा लागतो. मी त्याच्या व्यवसायाबद्दल सुरुवात केली, तसा तो खुलला आणि मग त्याची रसवंती सुरू झाली.

‘यार....आयुष्यात तुला डॉक्टर व्हायचं होतं मग आता एखाद्या डॉक्टरकडे गेल्यावर मनात एखादी खंत नाही येत?’  मी त्याला विचारलं.
‘या डॉक्टर लोकांना फारसा सेन्स नसतो. डोळ्यावर झापडं लावून जगणारी माणसं असतात ही. कधी कधी वाटतं आपण डॉक्टर झालो असतो तर एखादी मशिन झालो असतो.’
‘असतो पण तरीही...’
‘यू आर राईट, काही डॉक्टर्स एकदम मठ्ठ असतात रे. साधे लायसन्स कोर्स केलेले तथाकथित डॉक्टर्स नावापुढे तज्ज्ञ वगैरे लावतात आणि सामान्य माणसांकडून पैसे उकळतात. तेव्हा आपणही एखादी RMP डिग्री घेऊन बक्कळ पैसा कमावू शकलो असतो असं वाटतं.’
नोकरीच्या निमित्ताने तो खेडोपाडी फिरत असतो. त्याचं डॉक्टर्स मंडळींबद्दलचं निरीक्षण अगदी बरोबर होतं. एमडी सर्जन ते एलइईएच किंवा RMP डॉक्टरांना तो रोज भेटत असतो. तो त्याच्या नोकरीचा भाग असतो. त्यामुळे प्रत्येक डिग्रीहोल्डर डॉक्टरचं स्वभावविश्‍लेषण मस्तपैकी करतो.

‘कधी कधी वाटतं, यार डॉक्टर झालो नाही, ते बरं झालं. काही डॉक्टर्स चांगले असतात. एमबीबीएस, बीएएमएस, बीएचएमएस डॉक्टर्स स्वतःचं काहीतरी टॅलेंट दाखवतात. त्यांच्या बोलण्या, वागण्यात एक प्रकारचा आगाऊपणा असला तरी त्यातही थोडेफार मॅनर्स असतात. बाकी काही अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले आणि निव्वळ पैशांच्या मागे धावणारे डॉक्टर्सही आहेत.’

 त्याने एक लायसन्स कोर्स केलेल्या आणि स्वतःचं मोठ्ठं हॉस्पिटल बांधलेल्या डॉक्टरचा किस्सा सांगितला.

‘एका खेड्यातील गरीब बाई एका छोट्याशा बाळाला घेऊन आली. डॉक्टरांनी चेकअप वगैरे केलं. गॅस ट्रबल, अ‍ॅडमिट करावं लागेलं. एवढं बोलून त्या मुलाला अ‍ॅडमिट करणं किती आवश्यक आहे, हे समजून सांगितलं. बिचारी अडाणी बाई घाबरली. मुलाला अ‍ॅडमिट करायला तयार झाली.’ 

प्रत्येकाची आपल्या व्यवसायाची गुपित असतात. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आणि डॉक्टर यांचे संबंध नाहीत दोघांसाठी आवश्यक? एक डॉक्टर एका संस्थेच्या निमित्ताने फॉरेन टूरवर जाऊन आले (त्यांच्या भाषेत फोरेन) आणि इकडे पेशंटला ‘मी रिसर्चसाठी गेलो होतो,’ असं सांगतात. ‘धड इंग्रजीही बोलता येत नाही आणि तेथे काय रिसर्च करणार?’ मित्राचा प्रश्‍न.

‘तू डॉक्टर झाला नसला तरी त्याच क्षेत्रात पडलासी की, इनडायरेक्टली,’ मी.
‘पूर्ण आयुष्य येथे घालवायची इच्छा नाही. ही बॅग बघूनच लोकं नाव ठेवतात. त्यात एखाद्या डॉक्टरची मर्जी सांभाळा. वरून मॅनेजर टार्गेट पूर्ण करण्यासाठी शिव्या घालणार. काही केलं तरी पैसा, नाही केलं तरी पैसा, पण समाधान नाही.’ तो खिन्नपणे हसला. त्याच्या डोळ्यात चमक दिसली. तो अचानक बोलला.
‘विन्या, आठवतं माझं एक स्वप्न बाकी आहे.’
‘कोणतं?’
‘फॅक्टरी ओनर बनण्याचं. एक छोटीसी फार्मस्युटीकल कंपनीचा प्रोजेक्ट टाकण्याचं.’ एवढं बोलून त्याने स्वतःचे भावी प्लॅन्स् सांगायला सुरुवात केली.


विनोद बिडवाईक


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा