सदाशिव खूप असा सधन नव्हता, परंतु इतर गावकऱ्यांपेक्षा सधनच म्हणावा लागेल. शिक्षितही होता. इरिगेशन विभागातून निवृत्त झाला होता. टुमदार घर, छोटीसी बागायती शेती आणि एक मुलगा असा त्याचा संसार होता. त्याची बायको काही वर्षांपूर्वी स्वर्गवासी झाली होती. त्याने दुसरे लग्न करायचे टाळले, ह्याचे एकमेव कारण होते त्याचा मुलगा, प्रफुल. सदाशिव आपल्या मुलासोबत राहत होता. यशवंत आणि त्याची बायको बायजा सदाशिवकडे घरगडी म्हणून काम करत होते. सदाशिवच्या घरचेच ते झाले होते. सदाशिव सुखी आणि आनंदी दिसत असला तरी आतून फारच अस्वस्थ आणि दुखी होता. दुर्दैवाने मुलगा, प्रफुल, मतिमंद होता. परंतु सदाशिवचा प्रफुलवर खूप जीव होता. त्याच्यावर त्याने मनापासून प्रेम केले होते. मुलगा पाच वर्षांचा होता तेव्हा त्याची आई मरण पावली. त्यामुळे तर तो मुलाला खूप जपत असे.
माझ्यानंतर मुलाचे काय होईल ह्या विचाराने त्याला झोप येत नसे. खूपदा तो माझ्या आई बाबा सोबत ह्या विषयावर बोलत असे. आई बाबा त्याची समजूत काढत असत.
काही वर्षांनी सदाशिवला अचानक हार्ट अटॅक आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याचा मुलगा पोरका झाला. अचानक सदाशिवच्या नातेवाईकांची गर्दी गावात वाढायला लागली. जे कधी गावात आयुष्यात आले नाहीत तेही दूरचे नातेवाईक गावात दिसू लागले. सर्वांचा डोळा सदाशिवच्या घरावर आणि शेतीवर होता.
एकमेकांत भांडणे सुरु झाली. प्रकरण, पोलिसात आणि नंतर कोर्टात गेले. शेवटी दोन तीन चिवट नातेवाईकांनी आपणच सदाशिवचे वारसदार आहोत असे कोर्टात ठासून सांगितले. ह्या सर्व गदारोळात प्रफुलची काळजी मात्र फक्त यशवंत आणि बायजाच घेत होते. काही दिवसांनी प्रफुलला शहरातील रिमांड होम मध्ये हलवण्यात आले. यशवंत आणि बायजा कधीकधी प्रफुलला भेटायला नियमित जात असत.
सदाशिवचा तालुक्याचा ठिकाणी एक वकील मित्र होता. त्याला हि सर्व परिस्थिती माहित होती. सदाशिवच्या संपत्तीतुन मुलाचे संगोपन करण्यासाठी एक ट्रस्ट तयार करावा असा त्याचा प्रस्ताव होता. शेवटी एकदोन वर्षांनी नातेवाईकांचा क्लेम कोर्टाने फेटाळून लावला. नातेवाईकांचा उद्देश हा स्वार्थी आहे हे लक्षात आल्यावर कोर्टाने प्रफुलच्या नावाने ट्रस्ट स्थापन करण्याचा आदेश दिला. मुलगा हे सर्व सांभाळण्यासाठी समर्थ नाही म्हणून सदाशिवचे घर, शेती आणि इतर मालमत्ता लिलाव करण्याची आणि आलेला पैसे ट्रस्ट मध्ये जमा करण्याची परवानगी कोर्टाने दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील एक सक्षम अधिकारी लिलाव अधिकारी म्हणून नेमण्यात आला. लिलावाची नोटीस गावात लागली. लिलावाचा दिवस ठरला. इतर गावातून आणि शहरातून बरेच लोक भाग घेण्यासाठी आले.
सर्वप्रथम, एक चित्राच्या फ्रेम ची बोली लागली. ते चित्र प्रफुल ने काढले असावे. सदाशिवने मोठ्या प्रेमाने ते चित्र फ्रेम करून ठेवले होते. कोणीही त्या फ्रेमला बोली लावायला पुढे आला नाही. लिलाव अधिकाऱ्याने ती फ्रेम बाजूला फेकण्यासाठी उचलली. त्या फ्रेमचे महत्व ते काय. एका लहान मतिमंद मुलाने काढलेले चित्राची किंमत ती काय?
तोच गर्दीतून, बायजाने हात वर केला. "मला घ्यायची आहे ते चित्र." ती ओरडली. तिचे डोळे पाणावले होते. कित्येक वर्षांपासून ती आणि तिचा नवरा त्या घरात वावरले होते. स्वतःला कोणीही मुलबाळ नव्हते, सारी माया तिने प्रफुलवर ओवाळली होती. प्रफुलच्या आठवणीने तिला रडू कोसळले.
"बोली लाव." गर्दीतून कोणीतरी ओरडले.
"पन्नास रुपये" बायजा म्हणाली.
त्या चित्रावर कोणीही चढती बोली लावली नाही. शेवटी ती फ्रेम, बायजाला मिळाली. फ्रेम हाताळताना अचानक ती खाली पडली. काच फुटली. हवेमुळे चित्र एका बाजूला गेले. बायजाने ते उचलले. चित्राच्या विरुद्ध बाजूला एक स्टॅम्पपेपर चिकटवला होता. लिलाव अधिकाऱ्याच्या सहाय्यकाने ते चित्र परत घेतले आणि तो स्टॅम्पपेपर बाहेर काढला. ते चक्क हाताने लिहिलेले मृत्यूपत्र होते आणि त्यात लिहिले होते, "माझ्या मृत्यूनंतर, सर्व संपत्तीचा आणि वस्तूचा लिलाव करण्यात यावा. आलेल्या पैशातून माझ्या मुलाच्या नावाने ट्रस्ट बनवण्यात यावा. परंतु माझ्या मुलाच्या ह्या चित्राचा मनापासून स्वीकार करणाऱ्या व्यक्तीलाच त्या ट्रस्टचे अधिकार द्यावेत. मुलाला काही झाले, अथवा त्याचा अचानक मृत्यू झाला तर माझी सर्व संपत्ती चित्र घेणाऱ्या व्यक्तीलाच देण्यात यावी. भविष्यकाळात माझ्या मुलानंतर माझा वारसदार, जो कोणी हे चित्र घेईल तोच होईल.” पुढे तारीख आणि सर्व मालमत्तेची माहिती दिली होती.
लिलाव संपला. परंतु सर्व गावात ह्या प्रकारची खूप चर्चा झाली. मृत्यूपत्र खरे कि खोटे? बायजाला ते चित्रच का आवडले? असे फाटे पाडण्यात आले. कोर्टाच्या आदेशानुसार परत मृत्युपत्राची शहानिशा करण्यात आली. मृत्यूपत्र खरे निघाले. बायजाने चित्राला बोली मनापासून लावली होती, प्रफुलच्या प्रेमापोटी. प्रफुलने काढलेल्या चित्राची किंमत सामान्य बायजाला कळली होती हे मात्र पक्के.
पुढे प्रफुलच्या नावाने ट्रस्ट करण्यात आला. यशवंत आणि बायजाने प्रफुलचा स्वतःच्या मुलासारखा सांभाळ केला.
विनोद बिडवाईक
अप्रतिम लेख आहे 🙏🙏
उत्तर द्याहटवाKhup chaan
उत्तर द्याहटवाखूप छान 👌
उत्तर द्याहटवा