आज जागतिक पितृदिन आहे. पण वडील हे फक्त एकाच दिवशी आठवायचे असतात का? वडील हे आपल्या आयुष्यात नेहमीच असतात. आपल्या मुलांचा अभिमान फक्त आपल्या आई वडिलांनाच असतो. वडील कठोर असतात, ते शिस्त लावतात हा आपला समज असतो पण त्यामागे निव्वळ मुलांचाच विचार असतो.
प्रत्येक वडील हे आपल्या मुलांसाठी हिरो असतात. मुले कितीही मोठे होऊ दे, त्याची चिंता काही सुटत नाही. मुले मोठी झाली, कमावती झाली, आपले निर्णय स्वतः घेत असली तरी, त्यांची मुलाबद्दलची काळजी काही कमी होत नाही.
मुले आईच्या खूप जवळ असतात, परंतु घराची आणि भविष्याची चिंता वडील काही सोडत नाही. आपले काय होईल हा त्याचा विचारच नसतो, आपल्यानंतर आपले काय होईल ह्याची काळजी मात्र त्यांना पोखरत राहते. मुलांनां मात्र आपले वडील जरा जास्तच विचार करतात असे वाटते.
वडील आयुष्यभर कर्तव्याचे ओझे वाहत राहतात.
माझे वडील तसे शांत आणि दुसऱ्यांचा विचार करणारे होते. मी सर्वात धाकटा असल्यामुळे माझ्यावर त्याचा खूप जीव होता. घरी यायला थोडा उशीर झाला तरी ते काळजीत असत. माझ्या अभ्यासावर त्यांचे कडक लक्ष असे. परंतु माझ्याकडून झालेल्या चुकांवर ते कधीच मला रागावले नाही. स्वभावाने ते थोडे हळवे होते. आपल्या मुलांना काय वाटेल हाच विचार ते शेवटपर्यंत करत राहिले.
त्यांचा हळवेपणा प्रत्येक प्रसंगात दिसत असे. दहावीनंतर जेव्हा मी शिक्षणासाठी गाव सोडले, तेव्हा ते मला वेशेपर्यंत सोडायला आले होते. मी मोठया शहरात माझ्या मोठ्या भावासोबत राहणार होतो. त्यावेळेस मी दूर जाण्याच्या कल्पनेने, त्यांच्या डोळ्यात आलेल्या अश्रूंची किंमत मला त्यावेळेस समजलीच नाही.
घरातील सुनांना आपल्या मुलींप्रमाणे वागवणारे ते होते. कधी गरज पडली तर त्यांना मदत करायला त्यांना कधीच कमीपणा वाटला नाही. त्यांच्या नातवंडांचे ते लाडके आजोबा होते. आम्हा सर्व भावंडाच्या छोट्या छोट्या गोष्टीचा त्यांना खूप अभिमान असे. त्यांच्या शेवटच्या दिवसात ते भावाकडे होते आणि मी मुंबईला जॉब करत होतो, पण ते माझी प्रत्येक आठवड्याला वाट पाहत असत. कधीतरी नाही जमले तर ते अस्वस्थ होत असत.
त्यांच्यासाठी त्यांच्या मनासारखे मला फारसे काही करता आले नाही परंतु आज त्यांचे अस्तित्व आजूबाजूला जाणवत राहते. आज माझा एकही दिवस त्यांच्या आठवणींशिवाय जात नाही.
(विनोद बिडवाईक ह्यांची सर्व पुस्तके फ्लिपकार्ट आणि बुकगंगा वर उपलब्ध आहेत. इंग्रजी मध्ये लिहिली पुस्तके किंडल फॉरमॅट मध्ये ऍमेझॉन वर उपलब्ध आहेत.)
वडीलांची न दिसणारी माया आपल्या आयुष्यातील मोठा ऊर्जास्रोत असतो.. छान लेख ��
उत्तर द्याहटवा