"नोकरीबद्दल चॉईस असायला हरकत नाही, पण स्वतःच्या कुवतीचा विचार न करता असं म्हणणं निराशेला जन्म देऊ शकतं."
"बेटा पुढच्या महिन्यात तुझी एमबीएची डिग्री तुझ्या हातात पडेल, त्यानंतर काय? कोठे प्रयत्न वगैरे सुरू केलेत की नाही?" मुलाच्या करिअरच्या बाबतीत सजग असणार्या बापाने मुलाला प्रश्न विचारला. डिग्री घेतल्यानंतर वरमाला घेऊन उभ्या असणार्या राजकन्येप्रमाणे नोकर्याही आपल्या पायाशी आहेत असं समजणार्या नव्या जमान्याच्या, आधुनिक, दुधाऐवजी पेप्सीवर जगलेल्या स्टार जनरेशनच्या तरुणाने सर्व अंग घुसळत आणि खांद्यांची विचित्र हालचाल करत उत्तर दिलं, "येस डॅडी, व्हाय नॉट. आय नो आय वील डेफिनेटली गेट द जॉब." संपूर्ण अंग घुसळून इंग्रजीत संभाषण न केल्यास आपण गावठी समजले जाऊ म्हणून संपूर्णपणे अमेरिकन बनलेल्या त्या तरुणाच्या या उत्तराने वडिलांच्या कपाळावर सूक्ष्मशी आठी पडली.
या वयात आपण अशा नटवेपणाने उत्तर दिलं असतं, तर बापाने खाडकन मुस्कटात दिली असती, असा विचार मनात येतो न येतो तोच मुलगा परत उत्तरला. "यू नो डॅड, कॅम्पस इंटरव्ह्यूज वील बी हेल्ड इन नेक्स्ट मंथ. त्यावेळेस मैं ऐसा परफॉर्मन्स दुंगा की..."
पुढचे शब्द बापाच्या डोक्यावरून गेले. समजून बापाने परत विचारलं, "बाळा तू मार्केटिंगमध्ये एमबीए केलं; पण आताच्या स्पर्धेच्या जगात तुला चांगली नोकरी मिळण्याचे चान्सेस किती आहेत?"
"सेंट परसेंट डॅड. आय विल गेट अ ब्युऽऽऽटीफुल जॉब विथ हाय कंपेसेशन पॅकेजेस, विथ कार, बंगलो अँड ब्युटीफूल सेक्रेटरी... यूसी..."
हे जग किती कठोर आहे, याचा अनुभव आलेल्या वडिलांनी उत्तर दिलं, "म्हणजे भविष्यात तुला नोकरी मिळण्याची अजिबात संधी नाही, असं तुला म्हणायचंय? मीन्स, युवर इंटेन्शन इज नॉट टू गेट जॉब इन फ्यूचर?" वडिलांनी स्वतःच्या वाक्याचे भाषांतर करून पोराला सुनावलं.
एखादी प्रोफेशनल डिग्री घेतल्यानंतर नोकर्या खूप स्वस्त आहेत. मोठ्या हुद्द्याच्या, पगाराच्या नोकर्या त्यांची वाटच बघत आहे, असं समजणारी खूप मंडळी आहेत. वडिलांच्या पैशावर शिक्षण घेतल्यानंतर पैसे कमावणे किती कठीण आहे, याचा प्रत्यक्ष अनुभव नसणारी ही तथाकथित हायप्रोफेशनल डिग्रीहोल्डरची मनं खूप वेगळी असतात. नाही माझंही तसंच मत आहे. एमबीए, बीई वगैरेनंतर चांगल्या पगाराची नोकरी मिळावीच. कारण हे कोर्सेस त्यादृष्टीने योजलेले असतात. पण प्रत्येक क्षेत्रात साठा झाल्यामुळे ‘मागणी तसा पुरवठा’ या तत्त्वाप्रमाणे खूपसे पदवीधारक आज महिन्याला दहा -पंधरा हजारावर काम करीत आहेत. आणि एखाद्या फॅक्टरीमध्ये साध्या हेल्परची कामे त्यांच्या वाटेला आलेली आहेत. एमबीए मार्केटिंग झालेल्या पदवीधारकांना डोअर टू डोअर मार्केटिंग अथवा खाजगी बँकेची खाती नाईलाजाने विकण्याचे काम करावं लागतं. तेव्हा या तरुणांच्या जगण्याच्या सर्व कल्पना धारातीर्थी पडतात.
एक-दोन दिवसांपूर्वी एक एमबीए झालेले, असेच नवबेरोजगार भेटले. वरील किस्स्यातील तरुणाप्रमाणेच कमीत कमी सत्तर हजार रुपये महिन्याची नोकरी मिळावी, अशा विचाराच्या या तरुणाची मला कीव आली.
"दॅट कंपनी वॉज ऑफरिंग मी फिफ्टी थाउजंड अॅट जलगॉन बट आय रेफ्यूज्ड जलगॉन! राम राम भैय्या मैने कहा."
वरील कंपनीचा इतिहास बघता ही कंपनी दहा हजार ऑफर करेल हे एक बंडलच असावं. कारण त्या कंपनीच्या अनुभवी मॅनेजरचा पगार एक लाखाच्यावर थांबला होता. आणि हे खरंही असेल तर त्या कंपनीने दिलेली पन्नास हजाराची ऑफर या स्पर्धेच्या युगात वाईट नव्हती. प्रत्येकाच्या नशिबात मल्टिनॅशनल कंपनी असेलच असं नाही. मग अनुभवासाठी या तरुणाने या कंपनीची ही ऑफर स्वीकारायला हरकत नव्हती. संधी ही चोरपावलांनी येते आणि बेकार राहण्यापेक्षा काही दिवस अनुभव मिळवण्यासाठी कोणतीही संस्था वाईट नसते. देशातील बेरोजगारी वाढण्याचं हेही एक कारण आहे. असं माझं मत आहे. ‘बेगर्स आर नॉट चुझर्स’ या वाक्यावर जरी आक्षेप घेतला, तरी मानसिकता बदलायला हवी. अशा वेळेस उगाचच सरकारवर दोष देण्यात अर्थ नाही. मुळातच स्वतःच्या कुवतीचा विचार न करता स्वतः बद्दलची भूमिका तयार करणं ही निराशेला जन्म देऊ शकते.
नोकरीबद्दल चॉईस असायला हरकत नाही; पण अशा नोकर्या मिळतात कोठे? चांगली नोकरी मिळण्यासाठी काही गुण असणे आवश्यक आहे. यस, हुशारी/ मेरिट आणि टॅलेंट हाही एक गुण आवश्यक असला तरी दुय्यम आहे. सरकारी नोकर्यांमध्ये पैसा आणि वशिला आवश्यक झालेला आहे.
सिन्नरमधील एका मोठ्या कंपनीची हकीकत माझ्यासमोर आहे. एका महत्त्वाच्या पदासाठी येथे दोन वेळा इंटरव्यू झाले. परंतु या मुलाखती म्हणजे फार्सच होता. माझ्या एका मित्राने स्वतःची वर्णी त्या पदावर लागावी म्हणून त्यांच्या मुंबई ऑफिसमधून ओळखीच्या अधिकार्याची चिठ्ठी आणली. ती चिठ्ठी घेऊन तो जेव्हा त्या कंपनीत गेला तेव्हा तेथे त्याच्याच कॉलेजमधील दुसर्याची वर्णी त्या पदावर लागली होती. मित्राच्या चिठ्ठीपेक्षा त्याचा ‘जॅक’ थोडा भारदस्त होता. दुसर्या कंपनीतलाही किस्सा असाच. तेथे मुलाखती झाल्यात आणि नेमणूक त्याच कंपनीतील एकाची झाली.

मृगजळाच्या मागे धावताना शेवटी तोही थकतो आणि मग नाईलाजाने कोणतीही नोकरी पत्करावी लागते. एकेकाळी कर्नल, मेजर, मॅनेजरसारख्या पदाची स्वप्ने बघत होतो, आता सध्या ऑफिसबॉय पदासाठीही अर्ज करण्याची तयारी आहे. माझ्या एका मित्राचं मत.
करिअर घडवणं हातात आहे; पण त्यासाठी आत्मविश्वास हवा. आयएएस, पीआय सारख्या परीक्षा देता देता अर्ध आयुष्य निघून जातं आणि तरीही तरुणाच्या डोक्यावरचं आयएएस किंवा पीआय होण्याचं भूत काही जात नाही. वेळ कोणासाठी थांबत नाही. त्यामुळे डिग्री हातात पडल्या पडल्या काहीतरी करणे गरजेचे असते. मृगजळ हे निव्वळ मृगजळच असतं. करिअर घडविताना याचाही विचार असावाच ना?
विनोद बिडवाईक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा