"ऋणानुबंध" शहरातल्या मध्यवस्तीतील एक अपार्टमेंट. अपार्टमेंटचं नाव "ऋणानुबंध " असलं तरी फ्लॅटचं दार लावल्यानंतर शेजारचा संबंध संपला. दर महिन्याला मीटिंगच्या निमित्ताने एकत्र येत असतील तेव्हाच काय ते या अपार्टमेंटमधील व्यक्ती एकत्र येत. आणि त्याही मोजक्याच. एका फ्लॅटमधील घडामोडी दुसर्या फ्लॅटमध्ये कळू नये यासाठी सर्वांचा आटापिटा. प्रायव्हसी डिस्टर्ब होऊ नये म्हणून काळजी घेणार्या या अपार्टमेंटमध्ये एकमेकांचे नावच काय ते माहीत होतं. बाकी इथं प्रत्येकाचं आयुष्य आपलं असं स्वतःचं विश्व होतं. आणि त्यात कोणी ढवळाढवळ करू नये अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. तसं साहजिकच आणि स्वाभाविकच.
परंतु या अपार्टमेंटमध्ये एक अशी व्यक्ती होती जी व्यक्ती प्रत्येक फ्लॅटला परिचित होती. या व्यक्तीशिवाय कोणत्याही फ्लॅटमधील व्यक्तीचं पानही हलू शकत नव्हतं. ती व्यक्ती म्हणजे काका, ‘ऋणानुबंध’चा चौकीदार.
आणि म्हणूनच सकाळी पाचला उठून अंघोळ करणार्या मिस्टर शर्माच्या नळाला पाणी आलं नाही, तेव्हा काकांच्या नावाचा घोष करत शर्मा टॉवेलवरच बाहेर पडले. ‘काका मोटर शुरू करो. आज इतने देर हो गई ऑफिस जाना है,’ वगैरे वगैरे. त्यांच्या आवाजाने अपार्टमेंटमधील अनेक जणांना जाग आली. काहींनी तोंड वेंगाडत कूस बदलली. तर मिसेस पटवर्धन समोरून येणार्या मिसेस देसाईंकडे पाहून समजायच्या ते समजल्या.
मिसेस पटवर्धन, देसाई आणि शर्मा ओरडतच खाली आल्या. त्यांनी आत डोकावून पाहिलं, तर काका झोपलेले होते. सर्वांना आश्चर्य वाटलं. नाईट शिफ्टवरून येणारे अय्यंगार यांनी तेथे तोंड खूपसलं. तेवढ्यात घोष आपल्या कन्येसोबत तेथे आले. त्यांना पिकनिकला जायचं होतं आणि तयारीसाठी त्यांना भाजी आणायची होती.
काका शांत झोपले होते. सकाळी साडेचारलाच उठणारे काका सात वाजले तरी झोपलेलेच होते. हे बघून अय्यंगार आत गेले. त्यांनी काकांना हलवलं आणि ‘अय्यो रामा’ म्हणत त्यांनी हात झाडला. परत काकांच्या कपाळावर हात ठेवत ते पुटपुटले. ‘काका को तो तगडा बुखार है.’ एक-एक करत पटवर्धन, देसाई यांनी हात लावून बघितला. तोपर्यंत काकांना जाग आली होती. कण्हत ते उठायला लागले. तोच देशपांडेंच्या साठ वर्षांच्या आई आल्या. त्यांनी काकांना उठू नका, असं बजावलं. हळूहळू काका आजारी पडलेत ही खबर संपूर्ण ‘ऋणानुबंध ’ अपार्टमेंटमध्ये पसरली. पुरुष मंडळींपैकी काकांना दवाखान्यात कोणी न्यावं याची चर्चा सुरू झाली. मिस्टर शर्मांनी स्कूटर बाहेर काढली. परंतु पटवर्धन यांनी आपली कार बाहेर काढली आणि काकांना हवा लागू नये म्हणून कारनेच नेणं कसं योग्य आहे हे त्यांनी समजावून सांगितलं. शर्मांना थोडं वाईट झालं. पुढच्या वर्षी कार घ्यायचीच असं त्यांनी मनात ठरवलं आणि ब्लॉककडे गेले.
कोणीतरी मोटर सुरू केली. काकांची जी कामे होती ती प्रत्येकाने आटोपून घेतली.
पटवर्धन आणि घोष यांनी काकांना दवाखान्यात नेलं. औषध-पाणी वगैरे करून घेऊनही आले. काकांचा स्वभाव बसणार्यांपैकी नव्हता. हे सर्वांना माहीत होतं. त्यामुळे पूर्णपणे विश्रांती घ्यायची, असं बजावून सर्वजण आपापल्या कामाला लागले.
दुपारी बारा-एकच्या दरम्यान मिसेस देसाई खाली आल्या. त्यांच्या लक्षात आलं काकांना भूक लागली असेल. त्यांनी काकांसाठी लापशी करून आणली. थोड्या वेळाने मिसेस शर्माही येऊन गेल्या.
‘काका आता आराम करा पाच-सहा दिवस,’ मिसेस पटवर्धन.
‘काका इथे कसा आराम मिळेल तुम्हाला, गावाला जावून येता का? राजूला तुम्हाला सोडवायला सांगते,’ मिसेस देशपांडेंच्या या सूचनेवर सर्वांनी सहमती दर्शवली. यावर काका विषण्णतेने हसले.
‘नाही बेटा, तेथे जाऊन काय आराम होणार? येथेच बरा आहे,’ असं म्हणतं काकांनी तोंड फिरवलं.
मिसेस शर्मांनी ‘आता ताप उतरला का?’ असं म्हणत त्यांचं कपाळ चाचपलं. ‘उतरला आहे,’ म्हणतं त्या निघून गेल्या. हळूहळू ‘ऋणानुबंध ’ अपार्टमेंटमधल्या सर्व महिलांनी येऊन काकांची आपुलकीने विचारपूस केली. काकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.
त्यांना मागचं आठवलं तेव्हा ते गावी होते. तेव्हा शेती करून कसंबसं पोट भरायचे. मुलं मोठी झाली. शिकली-सवरली. पण आई-बापाकडं लक्ष द्यायला त्यांना वेळ नव्हता. लग्न झाल्यावर नोकरीच्या निमित्ताने दूर उडून गेली. काही दिवसांत बायकोचं निधन झालं. गावाकडं मन रमलं नाही. म्हणून मुलाकडं गेले. तिथं सुनेशी पटलं नाही. त्यामुळे त्यांनी एकटंच राहणं पसंत केलं. मुलं पैसे पाठवायची; पण नंतर नंतर तेही बंद झालं. काकांच्या नशिबी परत मजुरी आली. त्यांनी गाव सोडलं. काम मागत मागत एका बिल्डरकडे आले. बिल्डरने वॉचमन म्हणून त्यांना ठेवून घेतलं. ‘ऋणानुबंध ’ अपार्टमेंटच्या जन्मापासूनचे ते साक्षीदार राहिले. अपार्टमेंट गजबजली तेव्हा बिल्डरसोबत न जाता अपार्टमेंटला वॉचमन म्हणूनच राहायचं त्यांनी ठरवलं.
आणि आता ‘ऋणानुबंध’ अपार्टमेंटशी त्यांचे ऋणानुबंध पुरते जुळले होते. या फ्लॅटसंस्कृतीशी त्यांना काहीही घेणं नव्हतं. परंतु त्यांच्याशिवाय प्रत्येक फ्लॅट हा पोरका होता. लहान मुलांना खेळवून, बारीक सारीक कामं करून ते मनाला रिझवत होते. या फ्लॅटच्या संस्कृतीत कोणाचाच कोणावर विश्वास नसतो; पण काकांवर प्रत्येकाचा विश्वास होता.
रात्री सहज शर्मांनी हाक मारली. ‘काका कैसे हो?’ त्यांना प्रत्युत्तर मिळालं नाही. पण कण्हण्याचा आवाज आला. त्यांनी काकांच्या खोलीत डोकावून पाहिलं. हाताने चाचपत दिवा लावला. काकांचा ताप वाढला होता. त्यांनी देसाई, पटवर्धन, बंगारप्पा, घोष यांना हाका मारल्या. काकांचा ताप वाढला, हे पाहून त्यांनी डॉक्टरांना फोन केला. डॉक्टरांनी येऊन इंजेक्शन, औषधे देऊन गेले.
या परिस्थितीत काकांना एकटं सोडू नये, या मताचे होते देशपांडे. पण काकांना आपल्या फ्लॅटमध्ये न्यायला खूप जणांच्या चेहर्यावर नाखुषी जाणवली. त्यात ती जबाबदारी देशपांडेंनी उचलली. काकांना देसाईंच्या फ्लॅटवर हलविण्यात आले.
रात्र वाढत होती. मिसेस देसाईंनी पाण्याच्या पट्ट्या करून काकांच्या कपाळावर ठेवल्या. तिकडे अय्यंगारही आले. मिसेस पटवर्धन गरम पाण्याची बॅग शेकण्यासाठी घेऊन आल्या. आणि देशपांडेंनी राजूला सफरचंद आणायला पिटाळलं.
मध्यरात्रीनंतर काकांचा ताप उतरला. हळूहळू सर्वजण पांगले.
दोन-तीन दिवसांत काकांची तब्येत सुधारली. काही दिवसांतच ते ठणठणीत बरे झाले. सर्वांनी आपल्यासाठी केलेले कष्ट बघून त्यांचे डोळे पाणावले.
एका अनोळखी व्यक्तीशी काहीही संबंध नाही. अशा व्यक्तीचे संबंध जुळतात. रक्ताच्या नात्यापेक्षा हीच नाती कशी खरी याची ‘ऋणानुबंध’ देतात. हळूवार भावना असतात त्या.
काकांच्या आजारानंतर मात्र प्रत्येकजण या घटनेवर विचार करू लागला. काकांचे आपण एवढं केलं. त्यामागचं कारण काय? हा प्रश्न त्यांना भेडसावू लागला. पण या प्रश्नातच त्यांचं उत्तरही लपलेलं होतं. ‘ऋणानुबंध ’ अपार्टमेंट आता खर्या अर्थाने ‘ऋणानुबंध’ जाणवत होता .
विनोद बिडवाईक
Very nice....
उत्तर द्याहटवा