"टीमवर्क’मधील माणसाला नोकरी, व्यवसायातील बदलांची बित्तंबातमी असते. मात्र, घरातल्या किंवा शेजारच्याला काय हवे, हे कुठे माहीत असते. वेगवान बदलांच्या लाटेत जीवनमूल्येही बदलत आहेत."
परिस्थिती संपूर्णपणे बदलली आहे. जगण्याची मूल्ये बदलत आहेत. ‘संस्कार’ या शब्दाची व्याख्या सोयीप्रमाणे बदलते आहे. जगण्याचे नियम बदलताहेत. मैत्रीचे परिमाण बदलताहेत. प्रेमाच्या व्याख्या बदलताहेत. सर्व काही बदलत आहे. काही गोष्टी बदलाच्या संपूर्ण वाटेवर आहेत. कुटुंबातील संबंध वेगवेगळ्या स्तरावर आहेत. हे सर्व होते आहे निखळ आणि अगदी वेगाने झालेल्या प्रगतीमुळे. महागडे कपडे, मोबाईल, टेक्निक्स, लॅपटॉप, शॉपिंग मॉल निर्माण होणार्या प्रगतीमुळे बदल झपाट्याने होत आहेत.
सर्वच क्षेत्रांत एक वेगळेच कल्चर तयार होण्याच्या मार्गावर आहे. काही वर्षांपूर्वी सुरू झालेला हा प्रगतीचा वेग अनाकलनीय असा वाढतो आहे. पुढे जातो आहे. परिस्थिती चांगली की वाईट माहीत नाही; पण सपोर्ट ग्रुप स्थापन करण्याची गरज निर्माण झाली आहे, हे निश्चित! ‘जगा आणि जगू द्या; काही झालं तरी माझ्याकडे येऊ नका,’ हे आजचं ब्रीद वाक्य झालं आहे. भावना व्यक्त करण्याच्याही पद्धती बदलताहेत. शहरी भागातील नागरिकांनी हे सर्व स्वीकारलं आहे.
लहान वयात प्रगतीची ओढ लागली आहे. Information Technology मुळे सर्वांचाच फायदा झाला आहे. दिल्लीत काय होतं आहे, हे का क्लिकवर कळतं आहे. फिलिपीन्सच्या मित्राच्या (सोशल मीडियावर मैत्री झालेल्या) आवडीनिवडी कळताहेत; पण शेजारच्या फ्लॅटमध्ये कोणी आजारी आहे, त्याला मदतीची गरज आहे, हे मात्र कळत नाहीये. मोबाईलवर तासन्तास बोलले जाते आहे. घरात आई-वडिलांना काय हवंय, हे मात्र माहीत नाही.
नक्कीच आपल्या जगण्याच्या व्याख्याच बदलताहेत. आपली जीवनशैली खरंच बदलली आहे आणि मूल्येही बदलली आहेत. ‘बदल’ हा सृष्टीचा नियम आहे आणि फक्त बदल स्थायी आहे हे मान्य करूनही एवढ्या वेगाने होणार्या बदलामुळे सर्व जण identity crisis मध्ये सापडले आहेत. कसं मॅनेज करायचं हे सर्व? आणि ते सर्व करणे आवश्यकही आहे. नाहीतर या स्पर्धेच्या युगात तुम्ही केव्हा मागे पडाल हे तुम्हालाही सांगता येणार नाही. आपण खरंच बदललोय? अल्लाउद्दीनच्या कथेसारखं आपलं झालं आहे. इच्छा व्यक्त करा, समोर हजर! घर हवंय - बँका द्यायला तयार, गाडी हवी - एक फोन करा, पैसे नाहीत - हरकत नाही, क्रेडिट कार्ड आहे. चैनीच्या सर्व वस्तू मिळताहेत आणि तेही आता फारसे पैसे न घालवता. पुढचं पुढं बघू. आयुष्यभर कर्ज फेडत राहू; पण चैनीत जगू. हे कर्ज फेडण्यासाठी नोकरी करणं आवश्यक आहे. पगार कमी मिळत असेल, तर नोकरी बदलण्याची आवश्यकता आहे. एका वर्षात दोन-तीन नोकर्यांमध्ये बदल, संस्थेत बदल, आत्मीयता नाही की loyalty नाही. माझं पॅकेज माझं प्रोफाइल , टीम, माझे के. आर. ए. (टार्गेट) मी... मी.... मी. सगळीकडे स्वयंकेंद्रित व्यक्तिमत्त्वे.
काम करा, परफॉर्म करा. ‘हार्ड वर्क नव्हे, तर स्मार्ट वर्क करा,’ हाच एक संदेश आहे आणि (कल्चर) कार्यसंस्कृती ही असंच तयार होते आहे. पगार वाढवा नाहीतर सोडून जातो. कामाचा ताण आहे, आमचं Work Life Balance होत नाही, काहीतरी करा. Fun at work आलंय. Picnics, Out Bound training, Parties, डान्सेस, वेगवेगळे डेज, सर्व साजरे करा; पण कामाच्या जागी आम्हाला मजाही करू द्या. पूर्वीचं कल्चरचं कसं वेगळं होतं. कामाच्या जागी ‘काम’ हा शब्द हद्दपार झाला.
खुल्या मैत्री वाढल्या, आणि कामाच्या जागी रोमान्सही वाढला. त्यामुळे येणारे प्रॉब्लेमही वाढले. घटस्फोटाचे प्रमाण वाढले. विवाहबाह्य संबंध वाढले, सर्व जण वयाने एकदम मोठे आणि मनाने आणि विचाराने लहान झाले. कॉर्पोरेट कल्चर बदलतंय आणि जुन्या लोकांचा मानसिक मनस्तापही (स्वतःमुळेच) वाढला. चेहर्यावरचं कृत्रिम हसू वाढलं, सिग्नलवरची भांडण वाढलीत. हे सर्व बदलांमुळे झालं.
बदल झाला आणि जीवनशैली बदलली; पण आपण या बदलाला सामोरे जाण्यासाठी तयार होतो? आहोत? माहीत नाही.
Professionalism वाढला; पण त्याच्याही व्याख्या मनाप्रमाणे झाल्या. प्रत्येकाला आता Professional व्हायचं आहे आणि तसंच वागायचं आहे.
अमेरिकेमध्ये 1960-65च्या दशकात Baby-Boomerची लाट आली होती. ही पिढी टीव्हीसोबत वाढली. त्यामुळे निर्माण झालेल्या सामाजिक परिस्थितीमुळे अमेरिकेला वेगळीच ओळख मिळाली.
तुलना करणं अशक्य आहे; पण संदर्भ तोच आहे आणि त्याचे परिणामही तेच आहेत. आता Millennial generation चा जमाना आहे. सगळीकडे Z factorचं महत्त्व एवढं वाढलं आहे, की Z-factorचं marketing बर्याच कंपन्यांना नफा कमावण्याचा मार्ग झाला आहे. पूर्वी ‘दिखावे पे मत जाओ’ असायचं. आता ‘देश बदला, भेस बदला’चा जमाना आहे. ही एक लाट आहे. अशा लाटा येतच राहणार.
प्रश्न आहे तो याही परिस्थितीत मूल्ये जोपासून बदलाला सामोरे जाण्याचा. याचं उत्तर मात्र ज्याचं त्यानंच शोधायचं आहे.
विनोद बिडवाईक
बदलत्या परिस्थितीची अतिशय उत्तम समीक्षाा...
उत्तर द्याहटवा