(दामू दानपुळे च्या प्रेमाची शोकांतिका त्याच्याच भाषेत)
"ती फोनवर बोलत राहिली आणि माझी गत भरलेल्या फुग्याला टाचणी लावल्यागत झाली. ती काहीबाही सांगत होती... मी एचएमव्हीच्या भोंग्यासमोर बसलेल्या श्वानासारखं इमानीपणे ऐकत होतो."
कॉन्फरन्स हॉलमध्ये एन्ट्री घेतली तेव्हा हॉलमधील प्रत्येकाचे डोळे क्षणभर माझ्यावर रोखले गेले.
स्वतःकडे लक्ष वेधून घ्यायचं असेल तर खूप जणांच्या गराड्यात उठून दिसेल अशा पद्धतीने कार्यक्रम सुरू झाल्यावर पंधरा मिनिटाने हमखास उशिरा जावं. अशा वेळेस सर्व मॉबचं लक्ष तुमच्यावर केंद्रित होऊन जातं.
मी ही संधी सोडली नाही. परिणामी हॉलमधील सुंदर कन्यांच्या नजरेत रोखून बघता येईल तेवढं बघून मी पाच-सहा मित्रांच्या गराड्यात समोरच्या खुर्चीत स्थानापन्न झालो. आपली प्रत्येक स्टाईल लक्षात घेतली जातेय हे लक्षात आल्यावर स्टाईल मारण्याची संधी तरी का सोडावी? एक पाय दुमडून, खास लकबीमध्ये विराजमान (?) झाल्यावर मागच्या खुर्चीवर चुळबूळ जाणवली. संयोजकांनी माझंही स्वागत केलं. वक्त्यांची नेहमीप्रमाणे रटाळ भाषणे सुरू झाली. माझ्या खांद्याला मागून कोणाचातरी हलकासा स्पर्श झाला. संपूर्ण मान वळवणंही जमत नव्हतं, अर्धवटपणे चेहरा बघितला. त्यात मी समोरच्या रांगेमध्ये बसलेलो. एक चष्मीस तरुणी माझ्याशी बोलायला उत्सुक होती.
बारीक काडीचा गोल्डन फ्रेमचा चष्मा, लांब लाल रंगाचा टी-शर्ट, दिसायला अतिशय सुंदर अशा या कन्येनं (आजूबाजूच्यांसह) माझं लक्ष वेधून घेतलं. ‘हाय, फ्रॉम विच कंपनी डू यू?’ प्रश्न अर्थातच मलाच होता.
मी कंपनीचं नाव सांगितलं
नंतर माझं सर्व लक्ष डायसवर केंद्रित झालं. मॅनेजमेंटच्या प्रोफेशनलसाठी असणारी ही कॉन्फरन्स माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची होती. कारण मला माझा थिसिस सादर करायचा होता.
एखाद्या मुलीसोबत थोडी दोस्ती वाढायला लागल्यावर माझ्या मित्रांचे चेहरे अशा वेळेस होतात तसेच झाले. माझे काही ज्युनिअर्स, तर काही सोबतचे कंपनीत वेगवेगळी डिपार्टमेंट सांभाळणारे, सर्व तरुण 24 ते 26 च्या दरम्यानचे. काही ट्रेनीज, तर काही एक्झिक्युटिव्हज त्यांच्यात खाणाखुणा सुरू झाल्या.
डिनरच्या वेळेस ती आमच्या ग्रुपजवळ आली. माझे केस विस्कटून टाकत तिनं विचारलं, ‘खाना कैसा है?’
‘तुम्हारी पुरी होने के लिए ठीक है।’
‘मतलब?’
‘खास ओळखी या जेवणाच्या वेळेसच घट्ट होतात.’
‘अच्छा।’
‘बोलो, बोलो शुरू हो जावो।’
‘बोअर हो जायेंगे आप?’
‘हम हसीनों से बोअर नही होते।’
तिनं रसमलाईचा एक तुकडा तोंडात टाकला. मी विचारलं, ‘डिनर लिया?’
‘नही, मै बाहर जा रही हूँ, कोई लेके जा रहा है?’
‘कौन हे वो बदनसीब?’ मी हसत विचारलं.
तीही हसली.
मी माझं डिनर संपवलं. मित्रांनी, माझ्यासोबत गराडा घातला. मूर्ख लेकांचे, माझं अभिनंदन करत होते.
एक तासानंतर, एक सेशननंतर.
‘क्या चल रहा हे मीताजी?’ मी विचारलं.
‘यह क्या, मुझे मीताजी, यह ‘जी’ मत कहीए’
मी फक्त हसलो, तिनंच विचारलं, ‘माझं वय काय असावं?’ आता इथं माझं खरं स्किल होतं. तरुण मुलगी ही कधीच अठराच्यावर जात नाही. अठराच्या वर्षानंतर तरुणींचं वय ब्रेकस लागल्यासारखं थांबतं. मला चतुराई दाखवणं गरजेचं होतं.
‘तरुणीच्या, त्यातही सुंदर मुलींच्या वयाबद्दल चर्चा करायलाच नको.’ मी उत्तरलो. अर्थात ‘पीजे’ होता माझा.
‘जाऊ द्या हो, तुम्ही कितीचे?’
बापरे, ही बया स्वतःला समजते तरी काय?
‘पच्चीस’ मी.
‘आय अॅम अॅट ट्वेंटी थ्री।’
‘दामोदर ..’ ती लाजली.’ मग या सोळा वर्षांच्या पोरीला आप, तुम्ही, जी वगैरे क्या लगा रखा है...’
‘मी काय बोलणार?’ ती बोलण्यात चतूर होती.
रात्री कॅम्पफायरमध्ये आम्ही धमाल केली. कामाच्या वेळी प्रचंड तणावाखाली काम करणारे आम्ही व्यवस्थापनाचे लोक गंमतीदार, मिश्किल आणि वात्रटही असतो. बेहोश होऊन नृत्याचा आनंद अनुभवला. पुण्याची गीता, नागपूरची रविना, नाशिकची चांदणी या पोरींसोबत बेधुंद नाचलो. मीता एका कोपर्यात बसून हे सर्व निर्विकारपणे बघत होती. माझं लक्ष तिच्याकडं गेलं, ती हसली. मी तिच्याजवळ गेलो. हात समोर केला, ती लाजत उठली आणि... केव्हातरी ड्रम्सची धून थांबली.
माझी संपूर्ण रात्र तळमळत गेली. नजरेसमोरून मीताचा चेहरा हलायलाच तयार नव्हता. दुसर्या दिवशी मला माझा परफॉर्मन्स द्यायचा होता. मार्केटिंग क्षेत्रातलं आघाडीचं नाव. मोठ मोठ्या कंपनीचे पदाधिकारी, डायरेक्टर्स, प्रमुख आमंत्रित होते आणि या सर्व दिग्गजांसमोर मला माझा लघुनिबंध सादर करायचा होता. मी गर्दीत नजर फेकली. कोपर्यात मीता उभी होती. तिनं हात दाखवला.
‘मला तुमचा रिसर्च ऐकायचंय.’
‘मला फक्त शुभेच्छा दे.’
‘दे आर ऑल्वेज ऑलरेडी विथ यू.’ मी माझा लघुप्रबंध आरामात वाचून काढला. नंतर खुल्या फोरममध्ये त्यावर चर्चा झाली. प्रमुख पाहुण्यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रश्नोत्तरे झाली. मी सराईतपणे या प्रकारातून तावून सुलाखून बाहेर पडलो. हा प्रकार मीता तटस्थपणे; पण अतिशय उत्सुकतेने बघत होती.
स्टेशन संपलं. मी बाहेर पडलो.
रस्त्यात मीताने माझ्या हाताचे चुंबन घेतलं आणि सर्वांना एक भयानक धक्का दिला. माझ्यापेक्षा माझे सहकारीच आनंदित होत होते. माहीत नाही का... पण माझे ‘पाऊल घसरावंच’ या उद्देशाने ते मला प्रोत्साहन देऊ लागले. लंचच्या वेळी तिनं माझ्याच प्लेटमधला गुलाबजाम माझ्या तोंडात घातला.
हा बुफे प्रकार विचित्र असतो. निवांतपणे, मन लावून, अस्वाद घेत खाताच येत नाही. कसरत करावी लागते अक्षरशः! ती या गडबडीत गायब झाली. थोड्या वेळाने ती मलाच शोधताना आढळली.
‘आय अॅम रिटर्निंग.’ ती.
‘इतने जल्दी? अभी तो concluding बाकी है।’
‘नही, अभी जाना है, घरसे फोन आया था।’
‘अर्जंट?’
‘बस,’ तिचा आवाज बसला होता. त्यामुळे बोलताना त्रास होत होता आणि इकडे रात्री कॅम्पफायरमध्ये ओरडल्याने माझ्याही घशाने दगा दिला होता. आमचा संवाद काही जण मन लावून ऐकत होते आणि आमच्या स्वरयंत्राच्या बिघाडाने त्यांचा गैरसमज जास्त होत होता.
‘चिठ्ठी लिखना, मेरा पता देती हूँ,’ तिनं स्वतःचा पत्ता दिला.
‘भुलोगी तो नही?’ मी.
‘कभी नही. आप नही भूलना.’ तिच्या डोळ्यातून दोन आसवं गालावर ओघळली. मी गोंधळलो. हा प्रकार मला नवीन होता. मुलगी रडल्यावर कोणती काळजी घ्यावी, हे आमच्या व्यवस्थापनात कुठेच सांगितलं नव्हतं.
‘रो रही हो, मीता?
‘.........’ ती स्तब्ध.
मी माझ्या कोटातला रुमाल काढून तिचे डोळे पुसले. हिंदी चित्रपटातील नायकाप्रमाणे एक डायलॉग फेकावा अशी तीव्र इच्छा झाली. पण वातावरण थोडं वेगळंच होतं. मी वर्कसचे संप हाताळले होते. मोठमोठ्या डिलिंग्ज हाताळल्या होत्या; पण हे प्रकरण वेगळंच होतं. तिच्या हाताला हलकंसं दाबलं. ती निघून गेली. राहिलेलं जेवण मी कसंबसं संपवलं.
नंतरच्या कार्यक्रमातला जिवंतपणाच संपून गेल्यासारखा वाटला. माझा प्रबंध मान्य झाला होता आणि त्याला चक्क पहिलं बक्षीस मिळालं होतं. अॅवॉर्ड डिस्ट्रीब्युशनच्या वेळी राजूने मला धक्का मारून मला भानावर आणलं. टाळ्यांच्या कडकडाटात मी डायसवर माझं अॅवॉर्ड घेण्यासाठी गेलो.... पण ते घेतानाही मी बैचेन होतो... तेथे मीता असायला पाहिजे होती.
कॉन्फरन्स संपली. एक नवा अनुभव देऊन गेली. मीताबद्दल विचार करायला हरकत नव्हती. घरून दबाव वाढत होताच. स्वतःच्याच क्षेत्रातील लाइफ पार्टनर भेटली तर बरंच होतं. आमचे आचार-विचार जुळत होते आणि आता तर वेव्हलेन्थही जुळली होती. मी स्वप्नात गढून गेलो. टेलिफोनच्या रिंगने माझी तंद्री भंग पावली. रिसीव्हर कानाला लावला. रिसेप्शनिस्टने सांगितलं. मुंबईवरून फोन आहे मीताचा. मीता बोलत होती. इकडचं-तिकडचं बोलणं झालं. तिचा ट्रेनी पिरियड संपला होता. आणि ती तिच्याच कंपनीत कन्फर्म झाली होती. मी आणि तीही मोठ्या उत्साहात बोलत होतो.
‘सॉरी उस दिन जल्दी निकल पडी।’
‘बात क्या थी? हमने मिस किया तुम्हे।’
‘सॉरी बाबा, उस दिन मेरे वुड-बी आनेवाले थे स्टेटसे। मम्मीका अर्जंट फोन था।’ मी अवाक.
‘वुड-बी, मतलब? तुम्हारी एंगेजमेंट....’
‘या, वो तो दो साल पहलेही हो गयी थी...’
‘बाकी...’ मीता तिच्या भावी नवर्याबद्दल बोलत होती. माझी परिस्थिती भरलेल्या फुग्याला टाचणी लागल्यावर होते, अगदी तशीच झाली होती. ती बोलत होती आणि मी ‘हिज मास्टर्स व्हाईस’च्या तबकडीवर भोंग्यासमोर बसलेल्या श्वानाप्रमाणे टेलिफोनवरून तिचं ‘वुड-बी’ पुराण ऐकत होतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा