शनिवार, १५ डिसेंबर, २०१८

लॉटरी

Image result for indian village people sketchगणप्याला लॉटरी लागली ही बातमी संपूर्ण पंचक्रोशीत पसरली. हजाराची नव्हे, तर तब्बल दहा लाखांची लॉटरी गणप्याला लागली. ही बातमी गावात पसरायला तसा फारसा वेळही लागला नाही. गणप्या हा एक न्हावी. छोटीशी शेतीही होती त्याच्याकडे; पण नेहमीचा धंदा होता हजामतीचाच. त्यामुळे गणप्या एकदम दहा लाख रुपयांचा मालक होणार, हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला. त्यात गणप्याकडून पैसा कसा उकळावा या कामगिरीवर सर्वजण लागले. एखाद्या व्यक्तीकडे आलेला पैसाच शेवटी त्या माणसाची किंमत वाढवतो. गणप्याचंही तसंच झालं. त्याची किंमतही एकदम दहा लाख पटीने वाढली. गणप्याचा गणपतराव झाला. थोरामोठ्यांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला. त्याला मिळणारा सन्मान बघून त्याच्या बायकोला आणि मुलांनाही सर्वात जास्त आनंद झाला. कारण गणप्याची बायको म्हणून पुकारली जाणारी आता वहिनी म्हणून पुकारली जाऊ लागली आणि ‘शेंबड्या’ म्हणून हिणवून त्याच्या पोरांना हकलून देणारे आता गणप्याच्या पोरांना कडेवर घेऊन त्यांना खाऊ देऊ लागली. त्यातही या गोष्टीचं सर्वात आश्‍चर्य वाटत होतं ते स्वतः गणप्यालाच. कारण गावात कोणत्याही व्यक्तीशी स्वतः चांगलं बोलल्यावरही चेष्टा आणि अपमानच वाटेला यायचा; त्या जागी आता भरमसाठ सन्मान मिळू लागला. गणप्या गावातून चालायला लागल्यावर त्याच्यावर नमस्कार-चमत्काराचा वर्षाव होऊन लागला. पायरीवर उभी न करणारे माणसे त्याला चहासाठी तासन्तास बसवून घेऊ लागले. लॉटरी लागल्याची बातमी पसरल्यापासून गणप्याचा ‘गणपतराव’ होणे हे गणप्यालाही एक न समणजारं; पण उघड असणारं एक कोडं होतं.

सकाळी उठल्यानंतर नेहमीप्रमाणे प्रात:विधीस जात असताना सरपंचांचा घरगडी मोतीराम पळत पळत आला. ‘साहेबांचा बुलावा आला आहे,’ असा महत्त्वाचा निरोप दिला. अंघोळ वगैरे करून गणप्या धोपटी, वस्तारा वगैरे सगळं सामान घेऊन सरपंचाकडे निघाला. त्याला वाटलं सरपंचांना तालुक्याला मिटिंगला जायचं असणार म्हणून एवढा तातडीचा बुलावा आला.

आलिशान बैठकीत बसून सरपंच गणप्याची वाट बघत होते. गणप्या लांबून येताना दिसताच सरपंच लगबगीने उभे राहिले. गणप्याला सामोरे गेले. इकडे गणप्या पुरता चकीत झालेला. सरपंचांनी त्याला चक्क अलिंगन दिले. त्याला अवघडल्यासारखं झालं. सरपंचाच्या बलदंड शरीरातून सुटण्याची धडपड करीत असतानाच गणप्याला अफजलखान -शिवाजी महाराजांची, त्याच्या पाचवीत जाणार्‍या पोराने सांगितलेली कथा आठवली. तस तो ‘शिवाजी महाराज की जय!’ असं ओरडत बाहेर पडण्याची धडपड करू लागला. पण सरंपचांच्या पकडीमुळे त्याच्या तोंडातून ते उद्गार उंदराच्या चीचीसारखे वाटले. एका हातात धोपटी आणि दुसरा हात हलवता येईना शेवटी सरपंचानी सोडल्यावर त्याची सुटका झाली.

‘शिवाजी महाराज की जय’ काय त्यांच्या कृपेनेच आम्ही सरपंच झालो,’ बसाबसा गणपतराव.

गणप्याने धोपटी खाली ठेवली आणि हातरी पसरू लागला ते बघून सरपंच बोलले. ‘गणपतराव आम्ही तुम्हाला याच्यासाठी नाही बोलावलं. अहो, तुमच्याकडून हजामत करून घ्यायला आम्ही येडं का खुळं,’ असं म्हणत त्यांनी त्याला सोफ्यावर बसवलं. गणप्याच्या लक्षात येईना. आपल्याबद्द्ल सरपंचांचा काही गैरसमज तर नाही ना झाला, अशी शंकाही त्याच्या मनात चमकून गेली.

‘गणपतराव तु्म्हाला भेटून आम्ही अतिशय आनंदित झालो.’ काही महिन्यांपूर्वी गावातील मुतारीच्या उद्घाटनासाठी गृहनिर्माणमंत्री आले होते. तेव्हा शहरामध्ये कॉलेजाला जाणार्‍या गावातल्या सुधीरनं पढवलेलं वाक्यच सरपंचांनी गणप्यावर फेकलं.

‘मी पण,’ असं काहीतरी गणप्या पुटपुटला.

तेवढ्यात सरपंचांची कन्या फराळाचं ताट घेऊन आली. आयुष्यात कधीही न बघितलेले काजू, बदाम, निरनिराळी फळ-फळावळे आणि त्यावर चटपटीत पोहे. सरपंचांनी आयुष्यात गणप्याला साधा चहाही पाजला नव्हता. गणप्याने फराळावर यथेच्छ ताव मारला.

‘मग गणपतराव काय करणार पैशाचं?’  सरपंचांनी हळूच विषय काढला.

‘काय करणार बघाव लागेल. पुढच्या महिन्यात बायकोचं बाळंतपण. पावसाळा सुरू होतोय, घराची डागडुजी करावी लागेल. माझ्यासमोर तर चिंताच आहे,’ गणप्या आशाळभूतपणे सरपंचांकडे बघत उत्तरला.

‘अरे चिंता कसली, मी कशाला हाय? जनतेची सेवा करण्यासाठीच तर मी सरपंच झालो व्हयकी.’ सरपंचांनी गणप्याच्या पाठीवर जोरात थाप मारली.

‘बरं तिकीट कुठाय?’ सरपंचांनी हळूच विचारलं.

‘तिकीट? ...हा ते व्हय, हाय पैजाम्याच्या खिशात,’ गणप्या बोलला.

‘सांभाळून ठेव, ममईला जावं लागंल. मी ईन सोबत,’ सरपंचांनं गणप्याला सांगितलं.

गणप्या अजूनच गोंधळून गेला. सरपंचांनी तिकीट कशाला सांभाळून ठेवायला सांगितलं, याचा विचार करून त्याच्या डोक्याचा पार फालुदा होऊन गेला. एसटीचं तिकीट आणि तेही कालचं. हं बरोबर आहे. सरपंच मुंबईला जाण्याबद्दलही बोलत होते. म्हणजे काही सवलत-बिवलतीचं प्रकरण असणारं. प्रकरणांमध्ये सरपंच आहेत. सरकारी माहिती झाली असेन, असा विचार करून त्याने तो विचार सोडून दिला.

गणप्याने स्वतःच्या घराकडे प्रयाण केलं. तोच पारसमल सामोरे आले. गावातला एक नंबरचा चिक्कू माणूस. ‘या-या गणपतराव,’ म्हणत गणपतच्या घरातच गणप्याचं स्वागत केलं.

गणप्या बेशुद्ध पडायचाच काय तो बाकी होता. पारसमल आणि चक्क आपल्या घरी? काही महत्त्वाचं काम असणार असं समजून तो खाली ओटीवर बसला.

‘अगं शेठसाठी चा-बी टाक,’ त्यानं बायकोला ऑर्डर सोडली.

‘गणपतराव, म्हटलं चला तुमची थोडी विचारपूस करून येऊ. आताच आलो. वहिनी म्हणाल्या. तुम्ही संरपंचांकडे गेलात. गणप्याला धक्क्यावर धक्के जाणवत होते. गणपतराव काय आणि आता वहिनी प्रकरण काय? त्याची बायकोही खुश झाली. त्या खुशीत तिने चहात दोन चमचे साखर जास्तच टाकली.

‘तिकीट व्यवस्थित आहे ना गणपतराव?’ पारसमलने हळूच विचारलं.

‘हो व्यवस्थित आहे; पण शेठ तुम्ही हे का विचारताय?’ गणप्या थोडा वैतागलाच होता.

‘नाही तुम्ही सरपंचाकडे गेला होता ना म्हणून विचारलं.’

‘व्हय, गेलतो. तेबी तिकिटाबद्दल इचारत व्हते.’

‘मग दिलं नाही ना त्यांना?’

‘न्हाय.’

‘गणपतराव सरपंच महाचालू माणूस आहे. तिकीट घेऊन मुंबईला त्याच्यासोबत जाऊ नका. मी येईन सोबत.’

गणप्याला हे तिकीट प्रकरण काय आहे, ते कळंना. तो दहा-बारा दिवसांपूर्वी शहरात गेलो होता. तेव्हा सिनेमा बघितला होता आणि एक एसटीचं तिकीट होतं. आता या दोन तिकिटांपैकी कोणत्यातरी एका तिकिटाबद्दल या लोकांना एवढी काय चिंता पडली हे त्याला कळंना. 
गणप्याकडे दिवसभर माणसांचा राबता चालू होता. त्याचं तोंडही न बघणार्‍या व्यक्ती त्याच्याकडे येऊन गेल्या. तेव्हा तर गणप्याच्या बायकोला गणप्या खरंच मोठा माणूस झाला आहे, असं वाटू लागलं. ती नदीवर धुणं धुवायला गेली तेव्हा वाड्यातून आलेल्या बायका झेडपीच्या इलेक्शनबद्दल बोलत होत्या. आपला नवराही गणेशोत्सवात काम करतो, हे ती जाणून होती. त्यामुळे झेडपीचं इलेक्शन आलेत, तिकीट मिळालं असेल असेही तिला वाटून गेलं. अशा व्यक्तीची आपण बायको आहोत, हे उमजून तर तिला अतिशय अभिमान वाटला. आपण उगाचच त्यांना शिव्या घालतो, या विचाराने ती शरमली. आता यापुढे अशा मोठ्या महान नवर्‍याची सेवा करायची असंही तिने ठरवून टाकलं.

इकडे गणप्याचा संयम सुटला. त्याने पैजाम्याच्या खिशातलं बसचं आणि सिनेमाचं तिकीट घेतलं आणि शहरात शिकायला जाणार्‍या सुधीरला गुपचूप पकडलं. सर्व हकीकत त्याला सांगितली. गणप्याला लॉटरी लागली, ही बातमी सुधीरलाही कळली होती. सगळं एकेून घेतल्यावर त्याने विचारलं, ‘म्हणजे तू लॉटरीचं तिकीट घेतलंच नव्हतं?’

‘नाय. लॉटरी कशी खेळाची तेपण मला म्हाइत नाय. आमचा बाप म्हणायचा, लॉटरी खेळणं लय खराब.’ गणप्याने तोंडावर हात मारून सांगितलं. आपल्याला एवढा मानमराताब का मिळत होता हे शेवटी गणप्याला कळलं.

गणप्याला लॉटरी लागली, ही अफवा कोणी आणि का पसरवली हे मात्र गुपितच राहिलं. शेवटी गणप्याला लॉटरी लागलीच नाही ही बातमीही दुप्पट वेगाने गावात पसरली. पण आता या बातमीवर विश्‍वास ठेवायला कोणीही तयार नव्हतं. गणप्या महाचालू माणूस आहे आणि हे पैसे मदत म्हणून आपल्याला देता येऊ नये म्हणून त्याने ही बातमी मुद्दाम पसरवली, असा समज प्रत्येकाचाच झाला.

पण तरीही सर्व जण गणप्याला मान देतात. त्यांची खात्री आहे, गणप्याला लॉटरीचे पैसे मिळाल्यावर त्याला बोलण्यात गुंडाळून, त्याच्याकडून पैसै उकळता येतील याची.

विनोद बिडवाईक

२ टिप्पण्या: