(दामू दानपुळेचं वधू संशोधन)
"सारांश, ही साईडपोझने सुंदर दिसणारी मुलगी नाकारण्यात आली; पण मी एक मुलगी नाकारावी तोच अजेंड्यावर दोन मुली याव्यात, असं व्हायला लागलं. त्यात चांगल्या चांगल्या, सुंदर सुंदर मुली कोणत्या कारणासाठी नाकाराव्यात हेही कळेना. माझ्या विभाचा माझ्यावर विश्वास होता. माझ्यावर एवढं प्रेम होतं की, या मुली नाकारणे आवश्यकच होतं. एका क्षणाला विभाबद्दल घरी सांगावं, असाही विचार मनात येऊन गेला. पण एवढ्या लवकर हे प्रकरण मला सांगायचं नव्हतंच आणि लग्नाआधीच आमचं प्लॅनिंग करून ठेवलं होतं. त्यात ती दुसर्या धर्माची असल्यामुळे जे महाभारत, रामायण, पहिलं महायुद्ध ते दुसरं महायुद्ध घडणार होतं, ते एवढ्या लवकर घडू नये म्हणून मीच हा निर्णय घेतला होता. यामुळे तोंड दाबून बुक्क्याचा मार मला बसत होता. हे सर्व ढोंग आहे, हे मला माहीत होतं; पण हे ढोंग करण्यावाचून गत्यंतरही नव्हतं."
मोठ्या भावाचं ते पत्र वाचताच मी आयुष्यात कधी नव्हे एवढा दचकलो. पाल अंगावर पडली तरी मी एवढा दचकल्याचं आठवत नाही. कारणही तसंच होतं. ताबडतोब निघून ये. अमुक अमुक तारखेला, अमुक अमुक ठिकाणी, अमुक अमुक मुलगी बघायचा कार्यक्रम योजला आहे. या सूचनेतील गर्भित अर्थ उमजून माझ्या डोळ्यांसमोर काजवे की काय चमकायला लागले. नोकरीची अजून खात्री नव्हती आणि माझ्या घरच्यांना माझ्या लग्नाची काळजी पडली होती. माझं लग्न करून मला बंधनात अडकवण्याची त्यांची चाल होती आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी ज्या सुंदरीबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, त्या माझ्या प्रियतमेची विभाची माहिती घरी कशी द्यावी, या भयंकर पेचात मी होतो. अर्थात तिचं शिक्षण सुरू होतं आणि माझ्या नोकरीचं नक्की झाल्याशिवाय आम्हीही लग्न करणार नव्हतोच.
पण तरीही मुलगी बघायला काय हरकत आहे, पसंतीचा तर प्रश्नच नव्हता. भावाच्या आणि आई-वडिलांच्या समजुतीसाठी वधूसंशोधनाचा फार्स करण्याचा निर्णय मी घेतला. ‘मुलगी बघण्यासाठी येतो,’ हे उलट टपाली कळवून मी या सर्व मुली कशा नाकारायच्या याचा विचार करू लागलो.
‘काका, तुला हे नाटक करण्याची गरजच काय? सध्या तुझा लग्नाचा विचार नाही हे तू कळवू शकत नाही का?’ पुतण्याचा हा प्रश्न योग्य असला तरी त्याच्या प्रश्नावर मी मौनच धारण केले. पण एखादी गोष्ट नाकारल्यानंतर तीच गोष्ट करण्याची माझ्या भावाची सवय होती. कारण जवळपास एक वर्षापासून मी हे लचांड पुढे ढकलत होतो आणि भाऊ खाली हात टेकायला तयार नव्हता. त्यांना कोणत्याही परिस्थितीत माझ्या लग्नाची काळजी होती. आणि सुंदर, गोड, उच्चविभूषित, प्रगल्भ मुलीच्या शोधात ते होते. वरील निकष लावून त्यांनी मुलींची लिस्टही बनवली होती.
मी लग्नाच्या बाजारात उभा आहे, हे कळल्यानंतर उपवर कन्यांचे आई-वडील तर भावाच्या मागेच लागले होते. त्यामुळे मध्यस्थांची संख्याही वाढली होती. मी काहीतरी ‘व्हीआयपी’ आहे याची जाणीव मला व्हायला लागली.
मी जेव्हा घरी गेलो तेव्हा माझ्या लग्नाची हौस माझ्यापेक्षा घरच्या मंडळींना असल्याचं जाणवलं. प्रत्येकजण आपापल्या स्वप्नात मश्गुल होते. मी मात्र भयानक दडपणाखाली होतो. कारण घरच्यांचा उत्साह आणि हौस मोडू नये म्हणून मीच लग्नाला होकार देणार की काय, अशी परिस्थिती येण्याची भीती. तो लग्नाचाच सिझन होता आणि असं झालं असतं तर मला जिवंत सोडलं नसतं.
उपवर तरुणाला आयुष्यात दोन वेळाच सन्मान मिळतो. लग्नाआधी उपवर तरुणींच्या बापांकडून आणि लग्नात. बाकी लग्न झाल्यानंतर तो टिपिकल नवरा होतो. बायको ही त्याची शेवटची नियती होते आणि मग नवर्याचा सन्मान बायकोवर अवलंबून राहतो. भावाच्या लिस्टमध्ये, त्यांच्या मते सुंदर तरुणींची, शिकलेल्या तरुणींची नावे होती आणि विशेष म्हणजे श्रीमंत बापाच्या मुलींची नावे होती. या लिस्टमधील सर्व मुलींचे फोटोग्राफ्स माझ्यासमोर टाकण्यात आले. मला फारसा इंटरेस्ट नव्हताच. मला मुली बघण्याचं केवळ नाटक करायचं होतं. पन्नास-साठ मुलींच्या फोटोंपैकी दहा-बारा सुंदर मुली मी स्क्रिनिंग करून निवडल्या आणि एका शुभमुहुर्तावर माझा मुली पाहण्याचा कार्यक्रम सुरू झाला.
सुरुवात एका श्रीमंत बापाच्या मुलीपासून झाली. मी, वहिनी, भाऊ आणि पुतण्या असा जामानिमा होता. आमची कार बंगल्यासमोर येऊन उभी राहिली. मुलीचे वडील, दोन भाऊ आमच्या स्वागताला हजर होते. प्रथमदर्शनीच झालेलं हे स्वागत बघून वहिनी आणि भाऊ भारावून गेले. मीपण भारावणार होतो; पण पुतण्या चिमटा काढून मला विभाची आठवण करून दिली. त्यामुळे आताच भारावण्याचा निर्णय मी बाजूला ठेवला.
मुलीच्या घरच्यांनी कशातच कमी ठेवली नाही. दहा-बारा मुलींचा राबता ड्रॉईंगरूम ते किचनपर्यंत सुरू होता. त्यातील उपवर मुलगी कोणती हे ओळखणं अवघड होतं. अर्ध्या-एक तासानंतर एक सुंदर तरुणी ड्रॉईंगरूममध्ये आली. मुलगी खरंच सुंदर होती. वहिनीने माझ्याकडे बघून पसंतीची मान हालवली. भाऊ मोठ्या कौतुकाने तिच्याकडे बघत होता. फोटोत आणि प्रत्यक्षात तसं खूप अंतर असतं. तिने लाजत नमस्कार केला. ‘नमस्कार, मी आर्चीची आई...’ असं म्हणत तिने वहिनीचा हात धरला आणि त्यांना आत घेऊन गेली. आम्ही सर्व जण धाडकन जमिनीवर कोसळलो.
‘मला वाटतं हा ट्रेलर असावा. मुलगी कशी असेल याची कल्पना मला आली,’ पुतण्या माझ्या कानात पुटपुटला.
‘कल्पना कशीही असू दे, लेकिन इसको कटाये कैसे?’ मी त्यांच्याकडे बघत विचारलं.
‘मुलीचं नाव आर्ची आहे, कल्पना नाही.’ भावाने मधेच तोंड खूपसत आमचा संवाद थांबवला.
यजमान आमच्याकडे बघत हसत होते. त्यांचं ते हसणं बघून मला उगाचच अवघडल्यासारखं होत होतं. मग उगाचच हवा-पाण्याच्या गप्पा सुरू झाल्या. मग राजकारणाच्या गप्पा सुरू झाल्या. त्यानंतर यजमानांचं स्वतःच्या यशाचं पुराण सुरू झालं आणि त्यानंतर ‘आर्ची’पुराण सुरू झालं.
जेवण आटोपलं. आर्ची कोण आहे, हे वहिनींनी दाखवलं.
‘काका, क्या करे, मैंही मेरी ऑफर आगे कर दू?’ ‘शटअप. नो जोक्स,’ मी त्याला गप्प बसवलं.
शेवटी मुलाखतीचा कार्यक्रम सुरू झाला. भावाला अशी मुलाखत घेण्याची चांगली सवय होती. त्यांनी तो सोपस्कार पार पाडला. ‘तुम्हा दोघांना काही बोलायचं असेल तर बोलून घ्या,’ असं सांगून सर्वांनी आम्हा दोघांना चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यूपेक्षा माझी वाईट परिस्थिती होती. ‘तुझं इथं काय काम,’ अशा शब्दात झापून पुतण्या लाही बाहेर काढण्यात आले.
फायनल इंटरव्ह्यू सुरू झाला... काही क्षण दीर्घ स्तब्धता. ओपनिंग मलाच करावी लागणार, हे उमजून मी सुरुवात केली. ‘हॅलो मायसेल्फ दामोदर!’
‘हाय! आर्ची.’
‘आर्ची?’
‘आर्ची मला सर्वजण प्रेमानेच म्हणतात. अर्चना माझं नाव.’ पोरीचं मराठी अगाध होतं. ‘मला सर्वजण प्रेमाने आर्चीच म्हणतात,’ मी मनातल्या मनात तिच्या वाक्याची दुरुस्ती केली. तिचा दोष नव्हता, ती कॉन्वेंट शिक्षित होती.
‘एनीवे, तुमच्या भावी पतीबद्दल तुमच्या अपेक्षा काय आहेत?’
‘अपेक्षा? हं होप्स का? त्याने मला फुलासारखं ठेवावं आणि खूप प्रेम द्यावं.’ हाताने खूप म्हणजे किती दाखवत तिनं उत्तर दिलं, अगदी लहान मुलींसारखं. एकंदर हे प्रकरण अवघड आहे, हे मला जाणवायला लागलं. काही जुजबी संभाषण झालं आणि मी हॉल सोडला. आर्ची सुंदर होती; पण जगण्याबद्दलच्या तिच्या संकल्पना वेगळ्या होत्या. एखाद्या चित्रपटातील नायिकेसारखं जीवन तिला मी देऊ शकलो नसतो.
यजमानांचा पाहुणचार घेऊन भारावलेल्या अवस्थेत (मी सोडून) सर्वजण बाहेर पडलो.
‘मुलगी सुंदर आहे.’ (विभाएवढी नाही)
‘शिवाय चंट आहे.’ (विभासारखी नाही)
‘दामोदरला सांभाळून घेईल.’ (विभाची सर येणार नाही)
‘हुंडाही भरपूर मिळेल.’ (मला विकायचं ठरवलेलं दिसतंय)
वरीलप्रमाणे संभाषण सुरू होतं. कंसातील वाक्ये माझ्या मानतच सुरू होती...
‘दामोदर , मग?’ भावाने मला विचारलं.
‘भाऊ, तुम्हांला मुलगी कशी वाटली?’ मी त्यांना विचारलं.
‘सुंदर आहे, छान आहे.’ त्यांच उत्तर.
‘भाऊ, तुम्ही त्यांच्या वागणुकीवर जाऊ नका. माझ्या आयुष्याचा विचार करा.’
‘हो पप्पा, मुलीचं वागणं तुम्हाला वेगळं वाटलं नाही?’ पुतण्याने टोला हाणला. ‘गुड!’ मी त्याची पाठ थोपटली.
‘तुम्हाला वहिनी?’ मी.
‘आठव मम्मी, स्वतःच्याच तंद्रीत असल्यासारखं तिचं ते भांडं खाली सांडणं आणि स्वतःशीच हसणं,’ पुतण्याचं हे निरीक्षण आचरट होतं.
‘......’ वहिनी गहन विचारात पडल्या.
‘मम्मी. ती मंदबुद्धी आहे,’ पुतण्यानं टोला हाणला.
‘तुला काय वाटतं?’ मला भाऊने विचारलं.
‘यस, आय अॅग्रीड.’ मी मग हॉलमधील काल्पनिक किस्सा सांगितला. आणि मग वहिनींनीही त्यांना काय जाणवलं ते आम्हाला सांगितलं. थोडक्यात, एका मुलीच्या कचाट्यातून मी बचावलो होतो. पुतण्या अभ्यासात कसाही असो, तसा व्यवहारात हुशार आहे. माझं माझ्या पुतण्याबद्दल मत बदललं.
परंतु एकंदर हे सर्वच प्रकरण अवघड जागेचं दुखणं होणार असल्याची जाणीव मला व्हायला लागली. भाऊच्या लिस्टवरील पहिलं नाव रिजेक्ट झाल्यानंतर मला थोडफार बरं वाटलं. पुतण्याचा आधार आवश्यक वाटायला लागला.
दुसरा किस्सा मजेदार होता. एका नातेवाईकाच्या मुलीच्या लग्नातला. लग्न अटेंड करण्याला माझा विरोध नव्हता. उपवर मुला-मुलींचे नातेवाईक आणि पालक लग्नात हमखास भेटतात. मी या लग्नाला येणार ही माहिती खूप जणांना कळली असावी. दर दोन मिनिटांनी कोणीतरी अनोळखी माणूस भाऊजवळ येत असे. ‘नमस्कार’ मला हात जोडून अभिवादन करत असे. मीही मोठ्या विनम्रतेने हात जोडून त्याला प्रतिसाद देत असे. हे सर्व उपवर मुलींचे पिताश्री होते, हे कळायला मी वेडा नव्हतो. त्यात भाऊ, वहिनी, वहिनींच्या माहेरचे नातेवाईक, मेहुणे इत्यादी संपूर्ण फौज सुंदर मुलगी शोधण्यात गढलेली.
‘ती बघ काय सुंदर मुलगी आहे.’ भाऊ त्यांच्या मेहुण्यांना एक मुलगी दाखवत होते.
‘लग्न झाल्यावरही सुंदर मुलींचे आकर्षण संपत नाही का रे काका?’ पुतण्याने स्वतःच्या वडिलांकडे बघत मला हळूच विचारलं.
‘माझं लग्न अजून झालं नाही, पप्पांना विचार,’ मी त्याला झापलं. तो मिश्किलपणे हसला. इकडे भाऊने मेव्हण्यांना ती मुलगी दाखवल्यानंतर मेहुणे त्या मुलीमागे थोड्या वेळाने विजयीमुद्रेने परत आले. त्या मुलीची सर्व माहिती ते घेऊन आले होते. माझ्या डोळ्यासमोर कॉलेज तरुणांचे चित्र उभे राहिले. लग्न जुळवणं काय प्रकार असतो, याचा अनुभव मला येऊ लागला होता. मला लग्न करायची इच्छा नसतानाही.
‘अच्छा, ही मुलगी तुझ्यासाठी होती तर...’ पुतण्यानं मला विचारलं.
‘पण भाऊ, ही अजेंडावर नसणारी मुलगी का विचारात घेता आहात?’ मी माझी नाखुषी दर्शवली.
‘संबंधात असं चालत नाही. आपण आपलं धोरण लवचिक ठेवायला पाहिजे.’ भाऊंनी एखाद्या कसलेल्या राजकारण्याप्रमाणे माझ्या निषेधाची वाट लावली. माझ्या सुदैवाने ‘ती सुंदर मुलगी’ दुसर्या जातीची निघाली. अर्थात, मला जात जरी महत्त्वाची नसली तरी भाऊंना होती. विभा आणि मी तरी कोठे एका जातीचे होतो? पण येथे आणखी एका मुलीच्या तावडीतून मी बचावलो. पण हे प्राक्तन मीच माझ्या हाताने तयार केलं होतं. या वधूसंशोधनाच्या नाटकातून माझी सुटका होणं अवघड दिसत होतं. एखादी मुलगी नाकारल्यानंतर भाऊ, मेव्हणे, जिजाजी, वहिनी, ताई आणि सर्व नातेवाईक, मध्यस्थ दुप्पट जोमाने दुसरी मुलगी घेऊन माझ्यासमोर येत होते.
जिजाजी आणि भाऊसोबत आणखी एक मुलगी बघितल्यानंतर ही मुलगी कोणत्या कारणाने नाकारावी या विचारात मी असतानाच, जिजाजींनीच विचारलं.
‘मुलगी छान आहे ना,’ त्यांना ही मुलगी अतिशय आवडली होती.
‘मला एवढी चांगली वाटली नाही.’ मी ‘बरोबर आहे ना भाऊ?’ मी भाऊकडे बघितलं ते ‘नाही’ म्हणणारच हे मला माहीत होतं.
‘बरोबर आहे,’ त्यांचा दुजोरा.
‘पण ती साईडपोझने चांगली दिसते,’ जिजाजींचं उत्तर.
मी डोक्यावर हात मारून घेतला.
‘म्हणजे काय, तिला मी आयुष्यभर साईडपोजनीच बघत राहू?’ मी विचारलं.
‘काय हरकत आहे? माणूस बहुधा कडेवरच झोपतो ना?’ हे उत्तर मात्र भन्नाट होतं.
सारांश, ही साईडपोझने सुंदर दिसणारी मुलगी नाकारण्यात आली; पण मी एक मुलगी नाकारावी, तोच अजेंड्यावर दोन मुली याव्यात, असं व्हायला लागलं. त्यात चांगल्या चांगल्या, सुंदर सुंदर मुली कोणत्या कारणासाठी नाकाराव्यात हेही कळेना. माझ्या विभाचा माझ्यावर विश्वास होता. माझ्यावर एवढं प्रेम होतं की, या मुली नाकारणे आवश्यकच होतं. एका क्षणाला विभाबद्दल घरी सांगावं, असाही विचार मनात येऊन गेला. पण एवढ्या लवकर हे प्रकरण मला सांगायचं नव्हतंच. आणि लग्नाआधीच आमचं प्लॅनिंग करून ठेवलं होतं. त्यात ती दुसर्या धर्माची असल्यामुळे जे महाभारत, रामायण, पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध घडणार होतं. ते एवढ्या लवकर घडू नये, म्हणून मीच हा निर्णय घेतला होता. यामुळे तोंड दाबून बुक्क्याचा मार मला बसत होता. हे सर्व ढोंग आहे, हे मला माहीत होतं; पण हे ढोंग करण्यावाचून गत्यंतरही नव्हतं. घरातील सर्वांनाच माझ्या लग्नाबद्दल माझ्यापेक्षा जास्त उत्साह आणि हौस होती. त्यामुळे पुढे त्यांच्यावर मोठ्ठा बॉम्बगोळा पडणारच आहे तर त्यांना थोडं समाधान तरी का मिळू नये? त्यामुळे वधू संशोधनाची मोहीम जोरात राबवली जाऊ लागली.
अशीच एक उपवर कन्या माझ्याजवळ आली. समाजातील लग्न असल्यामुळे मला तेथे असणे भाऊंच्या मते आवश्यक होतं. त्या लग्नात ‘हम आपके है कौन’, ‘दिलवाले दुल्हनिया...’ वगैरेसारखे प्रकार घडायला लागल्यामुळे आम्हालाही अॅक्टिव्ह पार्टिसिपेशन देणे भाग पडले. अशातच अंताक्षरीच्या एका मैफिलीमध्ये तिने माझ्यावर एक फासा टाकला. या सर्व स्थितीत पुतण्या मला सोडायला तयार नव्हता. जणूकाही विभानेच माझ्या पाळतीवर त्याला ठेवला की काय अशा तर्हेने मी थोडाजरी घसरलो की, तो मोठ्या नाटकी शब्दात विभाचं स्मरण करून देत असे. विभा माझ्या हृदयातच होती. त्यामुळे तिचं विस्मरण कसं होणार? असो, ही कन्या एका साखर कारखान्याच्या चेअरपर्सनची कन्या होती. दिसायला सुंदर होती आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आमच्या वहिनींना पसंत पडली होती.
‘मला वाटतं, मी तुम्हाला ओळखतेय?’ तिने लंचच्या वेळेस मला विचारलं.
‘हो, आपण काल रात्री समोरासमोर बसून गाणी गायलीत.’ मी.
‘ते नाही हो, याआधीसुद्धा मी तुम्हांला पाहिलंय.’
‘व्हॉट डू यू मिन? म्हणजे खूप आधी जन्मापासून?’ मी मिश्कीलपणे उत्तरलो. पुतण्या या वेळेस खाकरला. ती गोडपणे लाजली.
‘तुमचं लग्न झालं?’ पुतण्याने आगाऊपणा केला.
‘वेड्या, तुला यांचं लग्न झालंय असं वाटतं का? गळ्यात लायसन नाही, काही नाही,’ मी म्हणालो.
ती परत हसली.
‘ओके, मी येतो, काकू कुठाय काका?’ पुतण्याने विचारलं.
‘काकू? ... हाहा... काकू?’ मी.
‘तुमचं लग्न झालं?’ तिनं विचारलं
‘नाही, हो नाही...’
‘काय?’
‘आय एम नॉट मॅरीड, बट एंगेज,’ मी स्पष्टपणे सांगितलं.
थोडक्यात चेअरपर्सनची कन्याही मी कटवली. पण हा प्रकार थोडा विचित्रच होता.
उपवर कन्या आता बिनधास्तपणे माझ्यावर गळ टाकण्याचा प्रयत्न करीत होत्या.
मी वधूशोधनात नाईलाजाने सामील होत होतो. मुली रिजेक्ट करत होतो. एकतरी मुलगी माझ्या पसंतीला उतरेल म्हणून घरची मंडळी प्रयत्न करत होती. सर्वजण माझ्या लग्नात कशी मौज करायची, मानपान कसा घ्यायचा, कोणी कपडे कसे घ्यायचे, याच्या प्लॅनिंगमध्ये व्यस्त होती.
हा सर्व प्रकार मला विचित्र वाटत होता. मी वाईट आहे, मला मॅनर्स नाहीत हे पटवून देण्याचाही प्रयत्न करू लागले. पण सर्वांना माझंच कौतुक वाटत होतं. एखादी मुलगी परत कटवावी म्हणून तिच्या बापाने थोडं उद्धट बोलावं तर स्पष्टवक्तेपणाचं कौतुक वाट्याला यायचं. ‘मनाने स्ट्रेट फॉरवर्ड आहे मुलगा,’ हा निष्कर्ष असायचा.
शेवटी लग्नाचा सिझन संपायची वेळ आली. आता मुली बघण्याची माझी इच्छा नाही म्हणून घरून परत फिरलो.
भाऊ-वहिनी, ताई, आई, वडील सर्वांच्या भावना दुखावल्यासारखं वाटत होतं मला. हा सर्व प्रकार मी विभाला सांगितला. विभाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. मी अवाक झालो ‘काय झालं?’
‘तू खरंच लग्न करून घेणार नाहीस ना?’ तिने रडत-रडत विचारलं.
तिला मिठीत घेत मी उत्तरलो.
‘वेडे, आयुष्याची दोरी तुझ्या हातात दिली असताना लग्न कोणाशी करणार?’
तिने लटक्या रागाने, माझ्या छातीवर ठोसे मारले.
यापुढे वधूसंशोधनाचा असा फार्स कधीच न करण्याचा निर्णय मी घेतला. माझी वधू तर संशोधन न करताच मला मिळाली होती ना!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा