‘कल्चर चेंज’ हा प्रत्येक संस्थेमध्ये परवलीचा शब्द झाला आहे. संस्थेची मूल्ये ही ‘कल्चर’वर प्रभाव टाकत असतात आणि ही मूल्ये कधी बदलतात, तर कधी नाही. स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी वेगवेगळ्या ‘ट्रिक्स’ कराव्या लागतात. नवीन संस्था काही वर्षांनंतर ‘कल्चर प्रॉब्लेम’मध्ये अडकू शकतात. बदलत्या काळाप्रमाणे स्पर्धा बदलत असते. आणि माणसाची वर्तणूकही.
काही संशोधकांनी माकडांवर एक प्रयोग केला. पाच-सहा माकडांचा एक समूह एका खोलीत ठेवला आणि खोलीच्या बाहेर जाण्यासाठी एक झरोका ठेवला. एका हुशार माकडाला तो झरोका दिसला आणि तो तिथंपर्यंत जायला तयार झाला. तो वर चढायला लागणार, तोच इतर माकडांवर थंड पाणी टाकण्यात येई. ते बघून ती इतर माकडे वर जाणार्या माकडाला खाली ओढत. संशोधकांनी नंतर एका माकडाला बाहेर काढलं आणि मग नवीन माकडाला आत सोडण्यात आलं. नव्या दमाच्या त्या माकडानं परत प्रयत्न केला. परत इतर माकडांनी त्याला खाली ओढलं. असं करत करत सर्व माकडे एका मागून एक बाहेर काढली गेली. आणि एक-एक नवीन माकडाने त्याची जागा घेतली. खोलीतल्या इतर माकडांनी नव्या माकडाला काही वर चढू दिले नाही. शेवटी त्या खोलीमध्ये सर्व नवीन माकडे होती, पण त्यांनाही त्यांच्या वागण्याचा मथितार्थ कळला नाही.
कोणत्याही संस्थेमध्ये असंच असतं. जुन्या मंडळींना नवीन मंडळींनी आपल्यासारखंच वागावं असं वाटतं. आणि नवीन मंडळी तशीच वागायला लागतात. कल्चर असं बनतं, तयार होतं. या जगात मुखवटेच खूप असतात. माणूस मुखवटे लावूनच जगत असतो. व्यक्तिमत्त्व तयार होतं, ते अशा अनेक मुखवट्यांचं. आणि असे अनेक मुखवटे एकत्र येऊन स्वतःचं एक वेगळं ‘कल्चर’ बनवत असतात.
कल्चर म्हणजे नेमकं काय?
संस्थेमधील व्यक्ती ज्या गोष्टी करतो, वागतो त्या करण्याच्या आणि वागण्याच्या पद्धती म्हणजे कल्चर. समूहातील व्यक्तीच्या एकमेकांच्या वागण्याच्या, कामे करून घेण्याच्या, कामाच्या पद्धती आणि एकत्रितपणे जोपासलेली मूल्ये म्हणजे ‘कल्चर’. खूपदा या सर्व पद्धती अलिखित असतात. त्या कोणत्याही ‘सिस्टिम्स’ आणि ‘स्टँडर्ड ऑपरेटिंग’ प्रोसिजरमध्ये बांधता येत नाहीत.
खूपदा आपण प्रोफेशनलिझमबद्दल ऐकतो. हाही एक कल्चरचाच भाग असतो. ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व हे युनिक असतं, तसंच संस्थेचं कल्चरही युनिक असतं. हे सर्व आपसूकच घडत जातं. मूळात ‘प्रोफेशनिलझम’ची व्याख्या बर्याचदा व्यक्तिसापेक्ष असते. एखाद्याला दुसर्याचं वागणं ‘प्रोफशन’ल वाटत नाही. परंतु तो दुसर्यांशी वागताना अगदी विरुद्ध वागतो. मूळातचं कॉर्पोरेट कल्चर हे ‘डिफाईन’ करता येतं का, हा महत्त्वाचा प्रश्न प्रत्येकाला भेडसावतो. प्रत्येक संस्थेमध्ये काही वाक्ये नेहमी बोलली जातात. उदा : इथे ‘पॉलिटिक्स’ खूप आहे. ही संस्था खूप ‘अनप्रोफेशनल’ आहे. इथले लोक एकमेकांचे पाय ओढतात, वगैरे वगैरे. मूळातचं हे सर्व ‘परशेप्शन’वर अवलंबून असतं आणि हे ‘परशेप्शन’ कोणत्या तरी चांगल्या-वाईट अनुभवांवर आणि तेही प्रथमदर्शनी कोणत्यातरी चांगल्या-वाईट अनुभवांवर तयार झालेलं असतं. हे कदाचित चुकीचंही असू शकतं. अगदी अमेरिकेतील व्यक्तीचं वागणं भारतात चुकीचं वाटू शकतं. संस्थेतील कल्चरचंही तसंच आहे. यामध्ये व्यवस्थापन आणि कर्मचारी दोघांचाही सारखाचं वाटा असतो. जग हे कधीच ‘परफेक्ट’ असत नाही. त्यामुळे कल्चरची व्याख्या चांगलं कल्चर किंवा वाईट कल्चर अशी करता येत नाही. जी व्यक्ती या कल्चरमध्ये ‘फीट’ होते, ‘सूट’ होते ती त्या संस्थेमध्ये टिकते. आपला स्वभाव आणि आपली प्रवृत्ती कशी आहे, यावर हे अवलंबून आहे.
कल्चर हे सर्वस्वी एकमेकांच्या ‘रोल मॉडेल’पासून तयार होतं. व्यवस्थापनाशी व्यक्ती कशा वागतात, यावरून कल्चर कसे आहे, हे समजू शकते. ‘बीपीओ’ आणि ‘आयटी’सारख्या संस्थातील कल्चर आणि एखाद्या ‘ट्रॅडिशनल’ संस्थेतील कल्चर हे संपूर्णपणे वेगळं असतं असे नव्हे. कदाचित एखादी ‘ट्रॅडिशनल’ कंपनी खूपदा ‘प्रोफेशनल’ही असू शकते आणि एखादी आयटी कंपनी पूर्णपणे ‘अनप्रोफेशनल’ही असू शकते. एकंदरीत सर्व गोष्टींचा विचार करता ‘कल्चर’ एकूण तीन प्रकारचं असू शकतं.
1) कन्स्ट्रक्टिव्ह (विधायक) कल्चर
अशा प्रकारच्या संस्थेतील कर्मचारी ‘क्रिएटिव्ह’, ‘इनोव्हेटिव्ह’ असतात. इथे कर्मचार्यांच्या समाधानाचे प्रयत्न होताना दिसतात. संस्थेची ध्येयधोरणे साध्य करण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्नशील असतो. त्यावर विचार करून काम केलं जातं. नवनवीन ‘इनेसिएटिव्ह’ घेतात. जर काही अडचणी आल्या, तर त्या योग्य ‘प्लॅटफॉर्म’वर सोडवल्या जातात. ‘कन्स्ट्रक्टिव्ह कल्चर’मध्ये गुणवत्ता आणि कल्पकतेला जास्त महत्त्व दिलं जातं. सहकार्यांवर व ‘टीमवर्क’वर याचा पाया असतो. स्पर्धा असते; पण जीवघेणी नसते. स्पर्धा ‘रिझल्ट’ मिळविण्यासाठी असते. ‘कन्स्ट्रक्टिव्ह कल्चर’मध्ये समाधान, टीमवर्क, सर्वोच्च क्वॉलिटी, कंपनीची प्रगती खूप प्रमाणात असते. अशा संस्थेमधील कर्मचार्यांच्या ‘डेव्हलपमेंट’वर तितकाच ‘फोकस’ असतो. अशा पद्धतीचं कल्चर प्रत्येकाला हवंहवंसं वाटतं. ‘पॉलिटिक्स’ येथेही असतं; पण ते ‘वाईट’ या व्याख्येत मोडणारं नसतं. ‘ऑर्गनायझेशनल पॉलिटिक्स’ हा तसा गोड शब्द आहे आणि तोही ‘कल्चर’चाच भाग आहे. ‘पॉलिटिक्स’ला मूळातच आपण वाईट कंगोरे दिलेले आहेत. ‘पॉलिटिक्स’ म्हणजे वाईटचं असतं, हा आपला समज असतो. दुसर्यांचं वाईट होत असेल, तर ते वाईट ‘पॉलिटिक्स’; पण बर्याचदा कर्मचार्यांना ‘डिप्लोमॅटिक’ राहावं लागतं. ‘हेल्दी पॉलिटिक्स’ हे कधी कधी ‘ऑर्गनायझेशन’ची गरज असते.
2) पॅसिव्ह-डिफेन्सिव्ह कल्चर
अशा संस्थेमध्ये रुल्स, प्रोसिजर, ऑडर्स अगदी काटेकोरपणे पाळल्या जातात. वरिष्ठांना खूष ठेवणे एवढाच उद्देश येथे असतो. नातेसंबंध बिघडू नयेत याची काळजी घेतली जाते. ‘इंटरपर्सनल कन्फ्लिक्टस्’ टाळल्या जातात. येथे मॅनेजर हा कर्मचारी कधी चुकतो हे बघत असतो. अशा प्रकारचे वातावरण सरकारी किंवा ‘प्रोटेक्टेड’ कंपनीमध्ये हमखास आढळते. पण स्पर्धेमध्ये अशा कंपन्यांना बदलावे लागणार आहे.
3) अॅग्रेसिव्ह-डिफेन्सिव्ह कल्चर
अशा संस्थेमध्ये नात्यापेक्षा ‘रिझल्ट’ला महत्त्व जास्त दिलं जातं. पॅसिव्ह-डिफेन्सिव्ह कल्चरमध्ये बर्याचदा व्यक्तिसापेक्षता येते. येथे ती येत नाही. येथे ‘करा अथवा जा’ हा एकच मंत्र असतो. स्वतःची ‘पोझिशन मेंटेन’ करणे, सांभाळणे हे येथे आवश्यक ठरते. गुणवत्ता कधीकधी दुय्यम ठरते. ‘शॉर्ट टर्म’चा विचार करण्यात येतो. बदल सहजासहजी स्वीकारला जात नाही. प्रत्येकाचा एक वेगवेगळा ग्रुप असतो. आणि वेळोवेळी तो संस्थेवर अधिराज्य गाजवत असतो.
अतिशय आक्रमकपणे यांची वाटचाल असते. वेगाने वाढणार्या आणि स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी आवश्यक असणार्या संस्थेमध्ये असं ‘कल्चर’ खूप असतं. अशा संस्थेमध्ये आक्रमकपणा आपोआप येतो आणि जी गोष्ट मार्केटमध्ये वापरली जाते, ती कर्मचार्यांसोबत वापरल्यामुळे या संस्था वेगाने मागे पडतात. अशा संस्थांमध्ये सर्व निर्णय वरिष्ठ पातळीवर होतात. इतरांनी ते फक्त ‘फॉलो’ करायचे असतात.
मग कोणतं ‘कॉर्पोरेट कल्चर’ चांगलं? कोणत्या संस्थेमध्ये नोकरी करणं चांगलं?
कन्स्ट्रक्टिव्ह - चांगलं?
अॅग्रेसिव्ह-डिफेन्सिव्ह : खराब? का
पॅसिव्ह-अॅग्रेसिव्ह : अतिशय वाईट?
हे सर्वस्वी त्या- त्या ‘ऑर्गनायझेशन’नं ठरवायचं आहे. संस्थेची ध्येयधोरणे साध्य करण्यासाठी कोणतं ‘कल्चरं’ मदत करणार आहे आणि सध्याचे कल्चर हे कितपत उपयोगी आहे, हे सर्वस्वी संस्थांनी ठरवायला हवं. म्हणून ‘कल्चर चेंज’ हा प्रत्येक संस्थेमध्ये परवलीचा शब्द झाला आहे. संस्थेची मूल्ये ही ‘कल्चर’वर प्रभाव टाकत असतात आणि ही मूल्ये कधी बदलतात, तर कधी नाही.
स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी वेगवेगळ्या ‘ट्रिक्स’ कराव्या लागतात. नवीन संस्था काही वर्षांनंतर ‘कल्चर प्रॉब्लेम’मध्ये अडकू शकतात. बदलत्या काळाप्रमाणे स्पर्धा बदलत असते आणि माणसाची वर्तणूकही. म्हणूनच अगदी ‘कल्चर’ही बदलतं. तुम्हाला कोणत्या ‘कल्चर’मध्ये नोकरी करायला आवडेल?
विनोद बिडवाईक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा